scorecardresearch

गर्भावस्था : ‘बाळ सुरक्षित आहे ना?’

गर्भावस्थेत बाळाची होणारी हालचाल आणि त्याची मातेला होणारी जाणीव ही तिच्यासाठी कुतूहलाची बाब आहे

|| डॉ. किशोर अतनूरकर

एक प्रश्न – ‘बाळ सुरक्षित आहे ना?’ याच्या अनुषंगाने अनेक उपप्रश्न, गर्भवती स्त्री आणि तिच्या नातेवाईकांकडून विचारले जातात. या प्रश्नांची उकल झाली पाहिजे असं वाटतं. साधारणपणे तीस-पस्तीस वर्षांपूर्वी सोनोग्राफीचा आणि रक्ताच्या विविध तपासणीचा सर्रास वापर सुरू झाला नव्हता. त्या काळापर्यंत ‘बाळाची वाढ व्यवस्थित होत आहे किंवा नाही?’ या प्रश्नाचं उत्तर डॉक्टरांना केवळ शारीरिक तपासणी करूनच द्यावं लागत असे. आता गर्भावस्था आणि बाळंतपणाच्या नैसर्गिक प्रक्रियेची माहिती डॉक्टरांना आणि रुग्णांना अधिक सविस्तर पद्धतीने समजू शकते.

गर्भावस्थेत बाळाची होणारी हालचाल आणि त्याची मातेला होणारी जाणीव ही तिच्यासाठी कुतूहलाची बाब आहे, तसाच तो एक अद्भुत अनुभवदेखील आहे. रुग्ण आणि डॉक्टरांसाठी गर्भाशयात बाळ जिवंत आहे, याचा तो संकेत आहे. एका पहिलटकरीण स्त्रीनं विचारलं, ‘‘माझ्या पोटात बाळाची जी हालचाल होत आहे ना, त्यामुळे माझं पोट दुखतंय. काही होणार तर नाही ना?’’ मी विचारलं, ‘‘कितवा महिना आहे?’’ ती म्हणाली, ‘‘तिसरा.’’ तिसऱ्या महिन्यात, गर्भाच्या काही सूक्ष्म हालचाली होतात पण त्या जाणवत नाहीत. बाळाच्या हालचालींची अनुभूती, पहिल्यांदा, पहिलटकरणीला पाचव्या महिन्यात येऊ शकते. बाळाने हालचाल केल्यामुळे पोटात दुखत नसतं.

‘‘रोज जसं फिरतंय तसं या एक-दोन दिवसात फिरत नाही डॉक्टर, जरा कमी फिरतंय, काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना?’’ असा प्रश्न जेव्हा स्त्री विचारते, तेव्हा डॉक्टरला सतर्क राहावं लागतं. अशा वेळेस प्रथम डॉक्टर स्टेथास्कोपने बाळाचे ठोके ऐकतात किंवा डॉप्लर नावाच्या मशीनने बाळाचे ठोके रुग्ण आणि नातेवाईकांना ऐकवतात. बाळ कमी फिरतंय हे एक वेळेस ठीक आहे, पण अजिबातच फिरत नाही अशी तक्रार घेऊन रुग्ण जेव्हा डॉक्टरकडे येतो, तेव्हा बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकायला येईपर्यंत, डॉक्टरच्या पण जिवात जीव नसतो. आता जमाना सोनोग्राफीचा आहे. लगेच डॉक्टर सोनोग्राफी आणि डॉप्लर (कलर सोनोग्राफी)करून बाळ सुरक्षित आहे की नाही हे सांगू शकतात. सोनोग्राफीची जरी सोय आज झालेली असली तरी अशा प्रत्येक वेळेस ती करणे शक्य होत नाही. पूर्वी आणि आजही ठरावीक पद्धतीने बाळाच्या हालचालींची नोंद ठेवण्याने, बाळाच्या सुरक्षिततेचा अंदाज येऊ शकतो. उदाहरणार्थ, सकाळी ९ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंतच्या १२ तासांत किती वेळेस बाळाची हालचाल जाणवली याची नोंद ती स्त्री ठेवू शकते. असं सलग दोन दिवस करायचं. बारा तासांत जर १० वेळेपेक्षा कमी वेळेस बाळ ‘फिरत’ असेल तर सोनोग्राफी करायला हरकत नाही. गर्भावस्थेच्या २८ आठवडय़ांनंतर, बारा तासांत एकदाही हालचाल न जाणवल्यास, दुसऱ्या दिवसाची वाट पाहायची नाही. लगेच सोनोग्राफी केली पाहिजे. बाळाची हालचाल पूर्णपणे बंद झाल्यानंतर, बाळ गर्भाशयात ‘गेलं’ असण्याची शक्यता दाट असली तरी, हृदयाचे ठोके बंद पडण्यासाठी, साधारणत: २४ तासांचा अवधी असतो. बाळाचे प्राण वाचविण्याचे प्रयत्न करण्यासाठी डॉक्टरांच्या दृष्टिकोनातून, हा वेळ महत्त्वाचा असतो. बाळाची हालचाल कमी जाणवते याचा अर्थ प्रत्येक वेळेस परिस्थिती गंभीरच असते असं नाही. काही कारणांमुळे बाळाच्या भोवतालचं पाण्याचं (गर्भजल) प्रमाण कमी झालं असल्यास बाळ नेहमीपेक्षा कमी फिरतं.      गर्भजल कमी असल्यामुळे बाळाला हालचाल करण्यासाठी जागा कमी पडते. अर्थात हे सर्व सोनोग्राफी करून नक्की करावंच लागतं. त्यात पाणी कमी का झालं याचं कारण शोधावं लागतं. त्यावर उपचार करावे लागतात. गर्भाभोवतालचं पाणी कमी कशामुळे झालं याचं नक्की कारण प्रत्येक वेळेस सांगता येईलच असं नाही.

सोनोग्राफीच्या तपासणीशिवाय बाळ गर्भाशयात सुरक्षित आहे किंवा नाही यासाठी आजकाल आणखी एक तपासणी केली जाते. त्याचं नाव आहे- electronic monitoring of foetal heart rate (NST). या तपासणीत, २० मिनिटांसाठी बाळाच्या हृदयाच्या गतीवर बाळाच्या हालचालींचा कसा परिणाम होतो याचा आलेख मुद्रित होतो. त्या आलेखाचा अभ्यास करून बाळ पोटात सुरक्षित आहे किंवा नाही याचा अंदाज बांधला जातो.

गर्भावस्थेत सोनोग्राफी करून, बाळाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने माहिती मिळवणं हे एक वरदान आहे, यात शंका नाही. पण सोनोग्राफीचे रिपोर्ट्स वाचून, काही वेळेस रुग्ण आणि नातेवाईक गोंधळून जातात, विनाकारण काळजी करतात ही सोनोग्राफी कारण्यासोबतची अडचणदेखील आहे. उदाहरणार्थ शेवटची पाळी कोणत्या तारखेला आली होती यावरून बाळंतपणाची अपेक्षित तारीख काढण्याचं एक सूत्र आहे. त्याप्रमाणे डॉक्टर अपेक्षित तारीख अमुक आहे म्हणून सांगतात. सोनोग्राफीच्या रिपोर्टप्रमाणे बाळंतपणाची एक वेगळीच तारीख दिली जाते. मग? कोणती तारीख नक्की समजावी, हा प्रश्न पडतो. वास्तविक पाहता, कोणत्याही पद्धतीने काढलेली तारीख ही नक्की नसते, तशी ती अपेक्षितच असते. दोन तारखांमध्ये जर दहा किंवा दहापेक्षा कमी दिवसाचं अंतर असेल तर काळजीचं कारण नाही. पण दहा दिवसांपेक्षा जास्त दिवसाचं अंतर असेल तर, मग सोनोग्राफीच्या तारखेत एवढा फरक का याचं कारण शोधावं लागतं.

आजकाल सोनोग्राफीनंतर बाळाच्या भोवतालचं ‘पाणी कमी’ आहे, हा लोकांमध्ये चर्चेचा विषय आहे. पाणी कमी झालं तर मग काय होईल ही चिंता रुग्ण आणि नातेवाईकांना लागून राहते. त्याबद्दल असं सांगता येईल की, गर्भाभोवतालचं पाणी योग्य प्रमाणात आहे का नाही, याचं सोनोग्राफीद्वारे मोजमाप केलं जातं, Amniotic fluid index तपासाला जातो. तो ५ किंवा ५ सेमीपेक्षा कमी असेल तर गर्भजल कमी झालंय असं म्हणतात. पाच ते आठ सेमीच्या दरम्यान जर ते मोजमाप असेल तर, एक सावधानतेचा इशारा आपल्याला मिळतो. त्याप्रमाणे उपचार सुरू करता येतात. उपचारातला मुख्य भाग म्हणजे, गर्भवतीने भरपूर पाणी पिणे. चहा, दूध, कॉफी, ताक, सरबत, साधं पाणी, नारळाचं पाणी वगैरे, मिळून २४ तासात किमान ३ ते ४ लिटर द्रव पदार्थ तिने घेतले पाहिजे.

सोनोग्राफी रिपोर्ट वाचल्यानंतर, अजून एका बाबतीत लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे, तो म्हणजे ‘बाळाच्या गळ्याभोवती नाळेचा वेढा आहे, त्यामुळे बाळाच्या जिवाला काही धोका?’ याबाबतीत असं सांगता येईल की, बाळाची गर्भजलामध्ये सतत हालचाल चालू असते. या हालचालीदरम्यान नाळेचा वेढा बाळाच्या गळ्याभोवती असू शकतो. तो बाळाच्या हालचालींमुळे सुटू पण शकतो. गळ्याभोवती नाळेचा वेढा आहे याचा अर्थ, सोनोग्राफी करताना तशी अवस्था होती. समजा काही तासांनंतर सोनोग्राफी केली तर एखाद्या वेळेस नाळेचा वेढा असणारदेखील नाही. बाळंतपणाच्या अपेक्षित तारखेच्या महिना-दोन महिने आधीच्या रिपोर्टमध्ये गळ्याभोवती नाळेचा वेढा आहे या रिपोर्टकडे विशेष लक्ष देण्याची गरज नाही. बाळंतपणाची नैसर्गिक प्रक्रिया सुरू असताना जर नाळेचा वेढा असेल तर बाळाच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. गळ्याभोवती नाळेच्या वेढय़ासहित, चांगल्या अवस्थेत, बाळ जन्माला येऊ शकतं. अपवादात्मक परिस्थितीत बाळ गुदमरलेल्या अवस्थेत जन्माला येऊ शकतं. केवळ बाळाच्या गळ्याभोवती नाळेचा वेढा आहे म्हणून सिझेरियन केलं पाहिजे असं नाही. पण आजकाल, रुग्ण, नातेवाईक आणि डॉक्टर, कुणालाच रिस्क घ्यायची नसते, म्हणून या कारणासाठी सिझेरियन केले जातात.

atnurkarkishore@gmail.com

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व अपत्यजन्माचे समाजभान ( Apatyajnmache-samajbhan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: How to keep baby safe

ताज्या बातम्या