डॉ. किशोर अतनूरकर  atnurkarkishore@gmail.com

आपलं कुटुंब छोटं असावं याचं महत्त्व फक्त शहरातील सुशिक्षित लोकांना पटलंय असं नाही तर खेडय़ातील अशिक्षित-अडाणी लोकदेखील आजकाल अपत्यसंख्या मर्यादित ठेवतात. पण आपल्याला किमान एक तरी मुलगा असायला पाहिजे या मानसिकतेतून फारशी कुणाची सुटका झालेली नाही, असं मलाच नाही तर माझ्यासारख्या अनेक स्त्रीरोगतज्ज्ञांना अनुभवातून जाणवतंय.

मुलाचा हव्यास, गर्भलिंग निदान, स्त्रीभ्रूण हत्या, त्यासंबंधी अस्तित्वात असलेला कायदा, त्या कायद्याची अंमलबजावणी, मुलाच्या हव्यासापोटी गर्भलिंग निदान करून, गर्भ मुलीचा असेल तर नको म्हणून गर्भपात करण्याने निर्माण होणारी भीषण सामाजिक विषमता, यासाठी जबाबदार कोण डॉक्टर का समाज, ही परिस्थिती परिणामकारकरीत्या कशी हाताळणे योग्य वगैरे विविध दृष्टिकोनांतून, विविध माध्यमांतून, विशेषत: गेल्या १० वर्षांत भरपूर ऊहापोह झालेला आहे. असं असलं तरी, या आघाडीवर अजून सुधारणेसाठी वाव आहे, शासकीय आणि खासगी स्तरावर कृतिशील योजना आणखी मजबूत झाल्या पाहिजेत, त्यात नव्याने काही भर टाकता येईल का हे पाहणे गरजेचं आहे.

प्रत्येक गायनाकॉलॉजिस्टच्या (स्त्रीरोगतज्ज्ञ) जीवनात मुलाच्या हव्यासाच्या संदर्भात अनेक धक्कादायक अनुभव येतात. परिस्थिती किती भीषण आहे आणि या आघाडीवर अजून किती काम करावयाचं शिल्लकआहे याचा अंदाज वाचकांना यावा म्हणून काही अनुभव नमूद करतो.

* एक विशेष शिक्षण नसलेला, खेडय़ात राहणारा मराठी माणूस, त्याला दोन मुलींनंतर एक मुलगा झाला. दोन्ही मुलींची लग्नं झाली. त्या एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवाने अपघातात मृत्यू झाला. इस्टेट भरपूर पण वारस नाही. बायकोचं गर्भाशयाचं ऑपरेशन झालेलं. पन्नास वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या या गृहस्थाने २१ वर्ष वयाच्या मुलीशी दुसरं लग्न केलं. लग्न होऊन सहा महिने झाले तरी अजून ‘पाळी चुकली नाही’ या कारणास्तव मोठी बायको लहान बायकोला घेऊन आली. सुरुवातीला वाटलं, ती आपल्या सुनेलाच घेऊन आली आहे. नंतर लक्षात आलं की तिची सवत आहे. मी विचारलं, पाटलाने दुसरं लग्न कसं काय केलं? मोठय़ा बायकोचं उत्तर, ‘‘काय करणार? मुलगा गेला, माझं गर्भपिशवीचं ऑपरेशन झालेलं, मी तर त्यांना आता दुसरा मुलगा देऊ शकत नाही. मग मीच म्हणाले-करा दुसरं लग्न, त्यांची तरी काय चूक?’’ दुसरी बायको यथावकाश गर्भवती राहीलदेखील, पण तिच्या पोटी मुलगाच जन्माला येईल याची काय खात्री? अजून एखादी मुलगीच झाली तर? या गोष्टीचा विचारच नाही!

मोठी बायको आपल्या लहान सवतीशी प्रेमाने बोलत होती. ती नवी नवरी मात्र गप्प होती. ती न शिकलेली, दिसायला सुंदर, गरीब घरची मुलगी. तिच्या आई-बापाला सहा मुली. त्यातली एक मुलगी पाटलाच्या घरात जात आहे यातच त्यांना आनंद. ‘‘पाटलाच्या घरात काय कमी हाय? समदं हाय, अन् शेतावर बी कामाला जावं लागत न्हाय! बस्स..’’ माझ्या आग्रहास्तव पाटलाने दुसरं लग्न केलं म्हणून पहिली बायको खूश. मुलीचं लग्न पाटलाच्या घरी झालं म्हणून आई-बाप खूश. मुलगा होईल आणि तो इस्टेटीचा वारस होईल यासाठी वयाने दुप्पट मोठय़ा माणसाशी लग्न करून आरामात राहायला मिळेल म्हणून नवी नवरीपण तयार. कुणाला काही आक्षेप असण्याचं काही कारणच नाही. मुलगा पाहिजेच यासाठी केवढा अट्टहास! मुलाच्या हव्यासापोटी काय हे स्त्रियांचं जीवन!

* एका शिक्षिकेला, ती कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी आली असताना विचारलं- सरिता, तीन मुली  का होऊ दिल्या? दोन मुलींवरच ऑपरेशन करून घ्यायचं ना? त्यावर तिने आपल्या सासूबाईंना दोष देत सांगितलेली कथा मजेदार, पण बोलकी आहे. तिचा नवरापण शिक्षक. त्यांना दोन मुली झाल्या. आपण दोन मुलींवरच समाधान मानू, मुलासाठी म्हणून तिसरा चान्स घ्यायचा नाही असं त्या दोघांनी ठरवलं. त्यांचा हा निर्णय आदरणीय (!) सासूबाईंना मान्य नव्हता. ती सारखं मुलगा व्हावा यासाठी तिसरा चान्स घ्या अशी भुणभुण लावली. त्या जोडप्याची ‘साधन’ वापरताना काहीतरी चूक झाली आणि ‘पाळी चुकली.’ ही खबर तिच्या मासिक पाळीच्या वेळापत्रकावर बारकाईने लक्ष ठेवून असलेल्या सासूबाईला लागली. तिने गर्भपात करून ऑपरेशन करून घेण्याच्या त्या जोडप्याच्या निर्णयाला विरोध केला. सुनेला, शेजारच्या खेडेगावातील एका ‘महाराजा’कडे घेऊन आली. महाराजाने सांगितले, ‘हा प्रसाद घ्या, या खेपेला मुलगा होणार.’ हर्षोल्हासित सासूबाई घरी आल्या, जाहीर केलं की महाराजांच्या आशीर्वादाने या खेपेला मुलगा होणार. पहिली दोन्ही बाळंतपणं माहेरी झाल्यामुळे मुलीच झाल्या, या खेपेला मी हिला मुळीच माहेरी पाठवणार नाही. सासूबाईने अतिशय प्रेमाने (?) सुनेच्या प्रकृतीची ९ महिने काळजी घेतली. यथावकाश बाळंतपण झालं आणि तिसरी मुलगी झाली. हा ‘निकाल’ सासूबाईंसाठी धक्कादायक होता. त्या भयंकर रागावल्या. आपल्या सुनेला तिसऱ्या मुलीसह महाराजांकडे घेऊन आल्या आणि तक्रार केली-याला काय अर्थ आहे? त्यावर महाराजाने चमत्कारिक उत्तर दिलं-माझ्या आशीर्वादात काही गडबड नाही. तिच्या नशिबात खोट आहे, त्याला मी काही करू शकत नाही. ही कथा ऐकल्यानंतर, कुणालाही सासूबाईंचं असं वागणं अविवेकी आहे असं लक्षात येईल. पण या शिक्षिकेला सासूबाईंचा हा आग्रह बिनबुडाचा आहे असं का वाटलं नाही? ती आपल्या निर्णयावर का ठाम राहू शकली नाही? हे प्रश्न उपस्थित होतात. याचा दुसरा अर्थ असा होऊ शकतो की, सरितालादेखील, अनपेक्षित राहिलेली ही गर्भधारणा आपल्याला मुलगा देऊन जाईल, असं कुठेतरी वाटलं असणार याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. समजा योगायोगाने झाला असता मुलगा तर या शिक्षिकेने सासूबाईंना दोष दिला असता का?

* मी एका हॉस्पिटलच्या पायऱ्या चढत होतो. इतक्यात वॉर्डातून मोठय़ाने रडण्याचा आवाज ऐकू आला. वॉर्डातील एखादा रुग्ण, अनपेक्षितरीत्या दगावला की काय या मन:स्थितीत वॉर्डात गेलो. तिथे तीन-चार बायकांचं सामूहिक रडणं चालू होतं. कानोसा घेतला तर लक्षात आलं की तिसरी मुलगी जन्माला आली म्हणून हा आक्रोश होता. स्वत: रुग्ण, तिची आई आणि सासू मोठय़ाने रडत होते. देवाने जे दिलं त्याचा आनंदाने स्वीकार करा आणि कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन करून घ्या असं मी त्यांना समजावण्याच्या सुरात बोललो. यावर रुग्णाची आई म्हणाली : तुमाला असं म्हणायला काय जातंय सायेब, हुंडा देऊन या तिन्ही मुलींचं लग्न कोन करून देणार? आमाला एकांदा तरी मुलगा नको का? देवानं असं कसं केलं म्हणून पुन्हा मोठय़ाने रडायला लागली. त्या बाईचा नवरा शेती करणारा, तिसरी मुलगी झाल्याचा निरोप मिळाल्यावर, मला बायकोचं तोंड पाहायची इच्छा नाही असा निरोप पाठवला.

सर्वसाधारणपणे पहिल्यांदा मुलगा झाला की सर्वच जण (डॉक्टरदेखील) सुटकेचा नि:श्वास सोडतात. ‘‘पहिला मुलगा झाला ना! ‘लकी’ आहेस! आता नंतर काहीही होवो’’ असं बोलतात. पहिल्या वेळेस मुलगी व्हावी असं मनापासून वाटणारी जोडपी नाहीतच असं नाही, पण प्रमाण अतिशय अल्प आहे.

आपलं कुटुंब छोटं असावं याचं महत्त्व फक्त शहरातील सुशिक्षित लोकांना पटलंय असं नाही तर खेडय़ातील अशिक्षित-अडाणी लोकदेखील आजकाल अपत्यसंख्या मर्यादित ठेवतात. पण आपल्याला किमान एक तरी मुलगा असायला पाहिजे या मानसिकतेतून फारशी कुणाची सुटका झालेली नाही, असं मलाच नाही तर माझ्यासारख्या अनेक गायनाकॉलॉजिस्ट्सना अनुभवातून जाणवतंय. मुलगा असो वा मुलगी, निसर्गाने आपल्याला जे काही दिलं आहे त्याचा आनंदाने स्वीकार करण्याची सवय लोकांच्या मनाला लागण्यासाठी विविध आघाडय़ांवर, वेगवेगळ्या पद्धतीने निराश न होता भगीरथ प्रयत्न सातत्याने चालू ठेवले पाहिजेत. अन्यथा मुलगी तर पाहिजे, पण ती दुसऱ्याच्या घरी जन्माला यावी या मानसिकतेतून बाहेर पडणं कठीण.

मुलाच्या हव्यासाचा बीमोड करण्यासाठी समाजाने आणि सरकारने अजून काय केलं पाहिजे याविषयी लेखाच्या पुढील भागात चर्चा करू.

chaturang@expressindia.com