डॉ. किशोर अतनूरकर

अपत्यजन्माकडे समाजाला गैरसमजविरहित नजरेने पाहाता यावं, या संदर्भात अपेक्षित असलेली जबाबदारीची जाणीव विकसित व्हावी, लोकांना या संदर्भात ‘शहाणं’ करावं, हा या लेखमालेचा उद्देश होता असं मी समजतो. या कार्यात मी अंशत: का होईना भर घातली याचं मला समाधान आहे. समाजाचं अपत्यजन्मासंबंधीचे भान अधिक सजग होवो, ही शुभेच्छा.

अपत्यजन्माच्या बाबतीत समाजमनाचा प्रस्तुत लेखमालेत मांडलेल्या अनुभवांचा मागोवा घेत असताना, मनात संमिश्र भावना आहेत. लेखमालेचा समारोप करताना काही मुद्दे सारांशरूपाने आपल्यासमोर मांडण्याची इच्छा आहे.

आजही आपल्या समाजात अपत्यजन्माला लोक गांभीर्याने घेतात असं वाटत नाही. अपत्यजन्माच्या आदर्श वेळेचा विचार केल्यास, आपल्याला पाहिजे आहे तेव्हाच अपत्य जन्म होऊ द्यावा, प्रतिबंध घालता येत नाही म्हणून अपत्य जन्माला येणे योग्य नाही. वेगळ्या शब्दांत सांगायचं म्हणजे, अपत्यजन्मासाठी ती स्त्री शारीरिक आणि मानसिक दृष्टीने तंदुरुस्त असली पाहिजे, आर्थिक आणि मनुष्यबळाच्या स्तरावर सक्षम असायला हवी, तरच खऱ्या अर्थाने अपत्यजन्माचे स्वागत करता येईल. आपल्याकडे अजूनही ग्रामीण भागात बऱ्याच मुलींचं शिक्षण जेमतेम दहावीपर्यंत होतं, आई-वडील तिच्या लग्नाकडे एक जबाबदारी म्हणून पाहातात, लग्न लवकर उरकलं जातं, विवाहोत्तर काही महिन्यांतच गर्भधारणा राहायला हवी, अशी अपेक्षा, बऱ्याचदा ती अपेक्षा पूर्णदेखील होते. ‘तिला’ गर्भधारणा पाहिजे का नाही याबद्दल तिचं मत विचारात घेतलं जात नाही. वातावरणच असं असतं की, तिच्यासाठीदेखील कळत नकळत हा भावनेचा आणि प्रतिष्ठेचा मुद्दा बनतो. आपण अपत्यजन्माच्या आदर्श वेळेच्या व्याख्येला फाटा देत आहोत हे लक्षातही येत नाही. अजून एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे, अपत्यजन्माच्या दिव्यातून जाणे हे तसं खूप कठीण, पण त्याहीपेक्षा बाळाचं संगोपन अधिक कठीण, त्यासाठी भरपूर संयम अंगी असावा लागतो, नसेल तर तो प्रयत्नपूर्वक वाढवावा लागतो याची जाणीव अनेकांना नसते. अपत्यजन्माच्या अगोदर तिला कुणी तरी (घरातील ज्येष्ठ किंवा डॉक्टर) ती करून दिली पाहिजे.

अपत्यजन्माच्या अनुभवातून जाताना स्त्रियांना खूप सोसावं लागतं, त्यातून ती स्त्री जर नोकरी किंवा व्यवसाय करणारी असेल तर तिची प्रचंड ओढाताण होते, हे समजून घरातील पुरुषांनी तिला सहकार्य केलं पाहिजे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी नवऱ्याने सर्वार्थाने सोयीस्कर असलेली पुरुष नसबंदी करून घेण्याचा समंजसपणा दाखविला पाहिजे.

मुलाच्या हव्यासावरही खूप चर्चा झाली. मुलगा किंवा मुलगी यापैकी ज्यांना जे पाहिजे असतं ते कधी मिळतं, तर कधी मिळत नाही. काही वेळेस ज्यांना मुलगा व्हावा असं वाटत असतं त्यांना मुलगी होते आणि ज्यांना मुलगी व्हावी असं वाटतं त्यांना मुलगा होतो. याचं कारण कुणाला काय व्हावं याची ‘किल्ली’ निसर्गाने आपल्याकडे ठेवली आहे. जे पाहिजे ते झालं तर भावनांचा उद्रेक होऊन मिठाई वाटणे, फटाके वाजवणे असा जल्लोष पूर्ण होतो, तर कधी नको ते झालं तर रडारड, आक्रोश, देव किंवा नशिबाला दोष देणारी मुक्ताफळं यापासून ते बायकोला घटस्फोट देण्याइतपत आपली मजल जाताना आपण पाहातो. एक डॉक्टर म्हणून रोज या अनुभवातून जाताना, विनोदाच्या अंगाने असं म्हणावंसं वाटतं की, निसर्गाने निदान आपल्या देशापुरतं का होईना  आपली ‘मनमानी’ बंद करून प्रत्येक जोडप्याला (बाय डिफॉल्ट) एक मुलगा आणि एक मुलगी ‘मंजूर’ करावी म्हणजे या भानगडीच नको, पण तसं होणे नाही.

या लेखमालेच्या वाचकांनी ई-मेल पाठवून चांगला प्रतिसाद दिला. जवळपास प्रत्येकाने प्रशंसाच केली. काहींनी आपले अनुभव शेअर केले, एखादा राहून गेलेला मुद्दा सांगितला, अपत्यजन्मासंबंधी त्यांच्या वैयक्तिक समस्या विचारल्या. यानिमित्ताने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांशी संबंधित अनेकांशी झालेला संवाद हा माझ्यासाठी ‘ठेवा’ आहे. दत्तात्रय क्षीरसागर यांचा मला ई-मेल आला. ‘मुलाचा हव्यास’ या लेखाविषयी त्यांनी प्रतिक्रिया दिली होती. माझ्या उत्सुकतेपोटी, तुम्ही कुठे असता, काय काम करता? असे प्रश्न विचारले. त्यांनी उत्तर दिलं- मी सांगली जिल्ह्य़ातील, महांकाळ तालुक्यातील मळणगाव येथील राज्य परिवहन मंडळात वाहक पदावर कार्यरत आहे आणि सामाजिक बांधिलकी असणाऱ्या संस्थेची स्थापना करून नोकरी सांभाळून कृतिशील योजना राबवितो. वाहक पदावर कार्यरत असणारा माणूस सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून काही काम करू शकतो, हे निश्चितच सर्वासाठी प्रेरणादायी आहे. असाच अनुभव मुंबईच्या वसुंधरा आणि प्रमोद देवधर या दाम्पत्याशी संवाद झाल्यानंतर आला. मुलाचा हव्यास कमी व्हावा यासाठी, म्हातारपणी आईवडिलांनी शेवटपर्यंत मुलीकडे येऊन राहण्याची पद्धत सुरू झाली पाहिजे, असं मी लेखात सुचवलं होतं. त्यावर त्यांनी त्यांच्या आयुष्यात असा प्रयोग आधीच केला आहे, असं सांगितलं. केवळ माझे आई-वडील माझ्याकडे येऊन राहिले नाहीत, तर आम्ही दोन कुटुंबांचं विलीनीकरण केलं. माझी आई आणि सासू-सासरे, आम्ही एकत्र १०-१५ वर्ष आनंदाने राहिलो. माझ्या सासूबाई अर्धागवायूने आजारी असताना त्यांना माझ्या आईचा आधार होता, वगैरे ऐकून, हे सगळं समाजासाठी प्रेरणादायी आणि अनुकरणीय आहे, असं वाटून गेलं. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी ‘डॉक्टर, तुम्ही ‘चतुरंग’मधून छान लेखन करीत आहात, तुमच्याशी बोलायला आवडेल. माझा सेल नंबर देत आहे’ असा मेल येणं आणि अर्थातच त्यांच्याशी सिझेरियन सेक्शनच्या वाढत्या प्रमाणावर फोनवर चर्चा करण्याची संधी मिळणं, ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. नाशिकचे बधिरीकरणतज्ज्ञ डॉ. शशांक कुलकर्णी, ‘गरज नॉर्मल डिलिव्हरीची’ या लेखासंदर्भात, कळा गायब करून बाळंतपण नॉर्मल होण्याच्या दृष्टिकोनातून epidural analgesia पद्धत सर्व ठिकाणी राबवली पाहिजे, असं सुचविलं. आधी केले, मग सांगितले या धर्तीवर त्यांनी नाशिकात आतापर्यंत २ हजार बाळंतपणाच्या केसेसमध्ये या पद्धतीचा अवलंब केल्याचं नमूद केलं. ते निश्चितच कौतुकास पात्र आहेत.

तात्पुरते संततिनियमनचे संस्कार ग्रामीण जनतेवर नीट झालेच नाहीत. शहरातील, सुशिक्षित लोक ती साधनं वापरताना चुका करतात. निरोधचा वापर करणाऱ्यांपैकी काही जण प्रत्येक ‘संबंधाच्या’ वेळेस ते वापरतच असतील याची खात्री देता येत नाही. तांबी आणि गोळ्यांबद्दल शहरातील लोकांच्या मनात अजूनही नकारात्मक भावना आहे.

गर्भावस्था आणि बाळंतपणाच्या बाबतीत घरातील मोठी माणसं (प्रामुख्याने स्त्रिया) उदा. आई, सासू, आजी, काकू, मावशी वगैरे नातेवाईक, त्या स्त्रीला खाणेपिणे, उठणे-बसणे, झोपणेबद्दल गरजेपेक्षा जास्त सूचना देऊन गोंधळवून टाकतात. ती किंवा तिचा नवरा डॉक्टरने सांगितलेली जवळपास प्रत्येक सूचना गुगल करून पाहातात. त्यामुळे मनातील गोंधळ कमी होईलच असं नाही, कधी-कधी तो वाढू शकतो. याचा अर्थ घरातील मंडळींनी सूचना देऊच नये किंवा गुगल करूच नये असं नाही. दोन्हीचा अतिरेक नको.

अपत्यजन्माकडे समाजाला गैरसमजविरहित नजरेने पाहाता यावं, या संदर्भात अपेक्षित असलेली जबाबदारीची जाणीव विकसित व्हावी, लोकांना या संदर्भात ‘शहाणं’ करावं हा या लेखमालेचा उद्देश होता, असं मी समजतो. या कार्यात मी अंशत: का होईना भर घातली याचं मला समाधान आहे. वैद्यकीय गर्भपात, कुमारी मातांचे प्रश्न, अपत्यजन्मासंबंधी डॉक्टरांची व्यथा, सिझेरियन सेक्शन ऑन डिमांड, स्त्री गायनॅकॉलॉजिस्टचे स्वत:चे अपत्यजन्माचे अनुभव, लोकसंख्या नियंत्रण- कितने पास कितने दूर, अपत्यजन्माशी संबंधित शासनाची धोरणं वगैरे काही विषयांवर लेखमालेचा कालावधी संपत असल्यामुळे लिहायचं राहून गेलं. या राहून गेलेल्या विषयांवर वाचकांपर्यंत हे अनुभव पोहोचवण्याची संधी भविष्यात मिळेल अशी आशा बाळगून तूर्त थांबतो. ‘चतुरंग’चे, चित्रकार निलेश यांचे आणि वाचकांनी दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार. या लेखन प्रवासात नांदेड येथील माझे मित्र एल.के. कुलकर्णी, डॉ. अरुण महाले आणि डॉ. नंदकुमार मुलमुले यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

समाजाचे अपत्यजन्मासंबंधीचे भान अधिक सजग होवो, ही शुभेच्छा.

(सदर समाप्त)

atnurkarkishore@gmail.com

chaturang@expressindia.com