नैसर्गिक प्रसूती ‘सुलभ’ करताना..

अपेक्षेपेक्षा अधिक तीव्र आणि जलद कळांमुळे बाळाच्या हृदयाच्या गतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

प्रतिनिधिक छायाचित्र

डॉ. किशोर अतनूरकर

नॉर्मल डिलिव्हरी करावी लागत नाही, ती होत असते. अर्थात ही नैसर्गिक प्रक्रिया ‘सुखरूप’ चालू आहे किंवा नाही यासाठी डॉक्टरांना लक्ष द्यावं लागतं, ही बाब निराळी. सिझेरियन मात्र डॉक्टरांना करावं लागतं. या दोन कृतीच्या मधला अजून एक प्रकार असतो. नैसर्गिक प्रसूती होत असताना काही वेळेस मातेच्या अथवा बाळाच्या सुखरूपतेसाठी, डॉक्टरांना हस्तक्षेप करावा लागतो. डॉक्टरांना निसर्गाच्या साहाय्यकाची भूमिका घ्यावी लागते.

नॉर्मल डिलिव्हरीच्या शास्त्रीय व्याख्येत अनेक निकषांचा समावेश आहे. असं असलं तरी सामान्य माणसाचा समज, नैसर्गिक मार्गाने होणारं बाळंतपण म्हणजे नॉर्मल असतं आणि ते तसं नाही झालं तर सिझेरियन करावं लागतं असाच आहे. गर्भावस्था आणि बाळंतपणावर, अनिश्चिततेचे सावट पूर्वी होतं आणि आजदेखील आहे. साधारणत: ५० वर्षांपूर्वीच्या आणि आजच्या परिस्थितीत खूप बदल झाला आहे.

गेल्या अनेक वर्षांत, प्रसूतीशास्त्र विषयात झालेली प्रगती, प्रोस्टाग्लान्डिनसारख्या नवीन औषधाची भर, सोनोग्राफी तंत्रज्ञानाचा झालेला उदय, बधिरीकरणशास्त्र तज्ज्ञांची उपलब्धता, रक्त संक्रमणाच्या उपलब्ध झालेल्या सोयी, दळणवळणाच्या आघाडीवर झालेल्या सुधारणा, यामुळे अनिश्चित परिस्थिती आटोक्यात आणण्यात यश मिळालं आहे यात शंका नाही. उदाहरणार्थ, पूर्वी नैसर्गिक बाळंतपणानंतर, अति होणाऱ्या रक्तस्रावामुळे, माता मृत्यूचं प्रमाण खूप जास्त होतं ते आज या एकंदरीत सुधारणेमुळे समाधान वाटावं इतपत कमी झालेलं आहे. पूर्वी बाळंतपण नैसर्गिक मार्गाने व्हायचं पण, काही वेळेस ते दगावत नसे पण गुदमरलेल्या अवस्थेत जन्म घेत असे. गुदमरलेल्या अवस्थेत जन्म घेतलेल्या पैकी काही बाळ एक तर काही दिवसांत दगावत असत किंवा मतिमंद होत असत. बाळाच्या बाबतीत होणाऱ्या या गुंतागुंतीचं प्रमाणदेखील पूर्वीच्या तुलनेत खूप आटोक्यात आलं आहे.

नॉर्मल डिलिव्हरी करावी लागत नाही, ती होत असते. अर्थात ही नैसर्गिक प्रक्रिया ‘सुखरूप’ चालू आहे किंवा नाही यासाठी डॉक्टरांना लक्ष द्यावं लागतं, ही बाब निराळी. सिझेरियन मात्र डॉक्टरांना करावं लागतं. या दोन कृतीच्या मधला अजून एक प्रकार असतो. नैसर्गिक प्रसूती होत असताना काही वेळेस मातेच्या अथवा बाळाच्या सुखरूपतेसाठी, डॉक्टरांना हस्तक्षेप करावा लागतो. डॉक्टरांना निसर्गाच्या साहाय्यकाची भूमिका घ्यावी लागते.

काही वेळेस नऊ महिने नऊ दिवस होऊन गेले तरी बाळंतपणाच्या कळा सुरू होत नाहीत. मग? आता काय करायचं? काही धोका तर होणार नाही ना? असे प्रश्न रुग्ण किंवा नातेवाईकांकडून विचारले जातात. दिलेल्या तारखेच्या दरम्यान केल्या गेलेल्या सोनोग्राफीचा रिपोर्ट नॉर्मल असेल तर काही घाई करण्याची गरज नाही. किमान एक आठवडा नैसर्गिक कळा सुरू होण्याची वाट पाहायला हरकत नाही. अपेक्षित तारखेच्या पेक्षा एक आठवडा जर उलटून गेला असेल तर जास्त सतर्क राहावं लागतं. त्या आठवडय़ात किमान तीन ते चार दिवसाला सोनोग्राफी करून गर्भजलाचं प्रमाण कमी तर झालं नाही ना हे बघून बाळंतपण सुरू करण्याची प्रक्रिया विचारात घ्यावी लागते. ग्रामीण भागातील, अशिक्षित स्त्रिया, ज्यांना तारखा लक्षात ठेवण्याचं भान नसतं, अजून कळा सुरूच झाल्या नाहीत, आतापासून दवाखान्यात कशाला जायचं म्हणून घरीच बसतात आणि मग एके दिवशी बाळ फिरतच नाही म्हणून डॉक्टरकडे येतात, तेव्हा कदाचित ‘उशीर’ झालेला असू शकतो. असाच काहीसा प्रकार बाळंतपणाच्या अपेक्षित दिवसात ‘अंगावर पाणी जाणे’ या घटनेनंतरदेखील होतो. फक्त पाणी जात आहे, अजून कळा सुरू झाल्या नाहीत म्हणून डॉक्टरकडे जाण्याऐवजी काही जण अज्ञानापोटी तर काही जण पाणी गेल्यानंतर, लगेच डॉक्टरकडे गेलं तर डॉक्टर नॉर्मलची वाट न पाहाता ताबडतोब सिझेरियन करून टाकतील या गैरसमजापोटी घरीच थांबण्याची चूक करतात.

बाळंतपणाच्या अपेक्षित तारखेपेक्षा एक ते दोन आठवडे उलटून गेल्यानंतर, ‘पाणी गेल्यानंतर’ साधारणत: १२ ते २४ तासांपर्यंत निसर्गत:च कळा सुरू न झाल्यास, गर्भावस्थेत रक्तदाब वाढतोय आणि नेहमीच्या बीपीच्या गोळ्या दिल्यानंतरही, तो कमी होत नाही, अशा आणि काही अन्य कारणांसाठी, मातेच्या आणि बाळाच्या सुखरूपतेसाठी, कळा नसतानाही बाळंतपण करून टाकण्याचा निर्णय घ्यावा लागतो. कळा सुरू करण्यासाठी पूर्वी सलाइनद्वारे इंजेक्शन देणे हा एकमेव पर्याय होता. आता,  ‘प्रोस्टाग्लॅडीन’ नावाच्या औषधाच्या गोळ्या योनीमार्गात ठेवणे किंवा त्याच औषधाचे मलम गर्भाशयाच्या मुखातून आत सोडणे असे पर्याय उपलब्ध आहेत. कोणत्या रुग्णामध्ये ही औषधरूपी कळा आणण्याची प्रक्रिया यशस्वी होऊ शकते याचे काही वैद्यकीय निकष असतात, त्यानुसार डॉक्टरांना निर्णय घ्यावा लागतो. अशा रुग्णाची निवड करून, औषध सुरू केल्यानंतर, नैसर्गिक कळाच्या गुणवत्तेच्या कळा सुरू होऊन, अशा प्रत्येक केसमध्ये नैसर्गिक प्रसूती होईलच असं नसतं हे नातेवाईकांनी लक्षात घेतलं पाहिजे. काही रुग्णांमध्ये अपेक्षित परिणाम मिळत नाही. कळा कधी संथ गतीने तर कधी खूपच लवकर लवकर येतात. त्या कळांची तीव्रतादेखील कमी-अधिक होऊ शकते. अपेक्षेपेक्षा अधिक तीव्र आणि जलद कळांमुळे बाळाच्या हृदयाच्या गतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा वेळेस ही प्रक्रिया थांबवून, ताबडतोब सिझेरियन करण्याचा निर्णय घ्यावा लागतो. औषधरूपी कळा सुरू करून बाळंतपण घडवून आणण्यासाठी, योग्य रुग्णांची निवड केल्यास आणि औषधाचा अपेक्षित असा योग्य परिणाम झाल्यास, नैसर्गिक प्रसूती होऊ शकते.

बाळंतपणाच्या अगदी सुरुवातीच्या अवस्थेत काही वेळेस वेदना भरपूर तीव्र असतात, पण गर्भपिशवीचं ‘तोंड’ जसं उघडायला पाहिजे तसं उघडत नाही. अशा बिनकामाच्या कळा इंजेक्शन देऊन तात्पुरत्या थंड कराव्या लागतात आणि योग्य त्या तीव्रतेच्या कळा येण्याची काही तास वाट पाहावी लागते. डॉक्टरांनी चांगल्या येत असलेल्या कळा इंजेक्शन देऊन मुद्दाम थांबविल्या, कारण त्यांच्या मनात सिझेरियन करावं असं असणार, अशाप्रसंगी नातेवाईकांचा असा गैरसमज होऊ शकतो.

बाळंतपणाची नैसर्गिक प्रक्रिया पूर्ण होत आहे असं वाटत असताना, एका ठरावीक वेळेनंतर, चांगल्या कळा असूनदेखील बाळ पुढे सरकत नसल्यामुळे, नाइलाजाने डॉक्टरला सिझेरियन करून बाळ बाहेर काढण्याचा निर्णय घ्यावा लागतो. तेव्हा रुग्णाच्या बाजूला उभी राहून, बऱ्याच वेळापासून तिला धीर देणारी तिची आई किंवा सासू म्हणते, ‘कशाला सिझेरियनची वेळ आणता डॉक्टर, बाळाचं डोकं तर दिसतंय, चिमटा लावून काढून घ्या की लेकराला!’ चिमटा लावून बाळ बाहेर काढता येतं हे बऱ्याच स्त्रियांना आणि नातेवाईकांना माहिती असतं पण, कोणत्या रुग्णामध्ये तो लावला जाऊ शकतो याची कल्पना त्यांना नसते. त्याचे काही निकष असतात. त्या निकषांची पूर्तता झाल्याशिवाय चिमटा लावल्या गेल्यास आईला किंवा बाळाला किंवा दोघांना देखील इजा होऊ  शकते. सुरक्षित पद्धतीने चिमटा लावून (Forceps Delivery) अथवा व्हॅक्युमचा वापर करून, आई आणि बाळाला इजा न होऊ देता अलगद बाळ काढून घेणे ही एक कला आहे. गेल्या काही दशकात हे ‘कौशल्य’ लोप पावत आहे. आजही या पद्धतीचा वापर होतो पण प्रमाण खूप कमी झालं आहे.

गेल्या काही वर्षांत, मोठय़ा शहरातील ठरावीक रुग्णालयात बाळंतपणाच्या वेदना ‘गायब’ करून, प्रसूती नैसर्गिक मार्गाने करण्याच्या पद्धतीचा अवलंब केला जात आहे. वेदनारहित ‘नॉर्मल’ डिलिव्हरी (Painless Labour) विशेषत: पहिलटकरीणीसाठी एक वरदानच आहे. वेदनारहित बाळंतपण बधिरीकरण आणि प्रसूतिशास्त्र तज्ज्ञांचं टीमवर्क आहे. एक गैरसमज असा आहे की, वेदनारहित बाळंतपणाचा अवलंब केल्यास, सिझेरियन करण्याचं प्रमाण वाढतं.

सामान्यत: लोकांची अपेक्षा काय असते? बाळंतपण शक्यतो नैसर्गिक मार्गाने व्हावं, बाळंतपणानंतर कुठली गुंतागुंत होऊ नये, आई आणि बाळ सुखरूप असावं. सिझेरियन त्यांना नकोच असतं असं नाही, पण ती वेळ न आलेली बरी असं वाटत असतं. नॉर्मल डिलिव्हरीच्या शास्त्रीय व्याख्येशी त्यांना विशेष देणं-घेणं नसतं.

atnurkarkishore@gmail.com

chaturang@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अपत्यजन्माचे समाजभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Making natural childbirth easy

ताज्या बातम्या