डॉ. किशोर अतनूरकर  atnurkarkishore@gmail.com

नॉर्मल की सिझेरियन? या दृष्टिकोनातून एक छोटासा अभ्यास केला. बाळंतपणाच्या या दोन्ही पद्धतींचा अनुभव असणाऱ्या एकूण १३४ जणींच्या मुलाखती घेतल्या. पहिलं नॉर्मल आणि नंतर सिझेरियन हा गट मोठा (७० टक्के) होता. पहिलं सिझेरियन आणि नंतर नॉर्मलचा गट तुलनेने छोटा (३० टक्के) होता. अभ्यासातील सर्व स्त्रियांचं एकंदरीत मत विचारात घेतलं असता बहुतांश (७० टक्के) स्त्रियांच्या मते, सिझेरियनपेक्षा नैसर्गिक प्रसूतीचा अनुभव चांगला होता असं आहे.

Kane Williamson being run out Video Viral
NZ vs AUS : केन विल्यमसन सहकारी खेळाडूला धडकला, अन् १२ वर्षात पहिल्यांदाच घडलं ‘असं’, VIDEO होतोय व्हायरल
vladimir putin threatens nuclear war
युक्रेनमध्ये सैन्य पाठवल्यास जागतिक अण्वस्त्र संघर्षांचा पुतिन यांचा इशारा
Delhi metro catches fire incident video goes viral
दिल्लीतील मेट्रो स्टेशनवरील VIDEO व्हायरल; प्रवासी प्लॅटफॉर्मवर उभे असताना घडलं भयंकर…
Anamika Bishnoi
प्रसिद्ध इन्स्टाग्राम इन्फ्ल्युएन्सरची पतीने गोळी झाडून केली हत्या; व्हिडिओ व्हायरल

सिझेरियन प्रसूतीच्या बाबतीत जी काही वादग्रस्त चर्चा समाजात चालू आहे ती चर्चा थोडय़ा वेळासाठी आपण बाजूला ठेऊन अपत्यजन्माकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू. आईच्या आणि बाळाच्या प्रकृतीनुसार सिझेरियन करायचं का नैसर्गिक प्रसूतीची वाट पाहायची हा निर्णय जरी डॉक्टर घेत असतील तरी रुग्णाला त्या परिस्थितीत आणि नंतर काय वाटत असतं हे जाणून घेणं देखील महत्त्वाचं आहे. रुग्णांना काय वाटतंय यावर अर्थातच डॉक्टर्सचा निर्णय अवलंबून नसतो, किंबहुना तसा तो नसावा.

प्रश्न असा आहे की, सिझेरियन सेक्शनच्या वाढत्या प्रमाणाच्या विरुद्ध बाजूने भाष्य करण्याचा खरा अधिकार कुणाला आहे? मला वाटतं प्रत्येकाला नाही. अगदी स्पष्ट सांगायचं तर पुरुषांना अजिबात नाही. अपत्यजन्माचा अनुभव घेतलेल्या सर्व स्त्रियांना हा अधिकार आहे, असं आपण म्हणू शकतो. पण झालंय काय की, आजकाल दोन-तीन अपत्यजन्मानंतर देखील काही स्त्रियांना, दोन्ही-तिन्ही वेळेस सिझेरियनच्याच अनुभवातून जावं लागल्यामुळे नैसर्गिक प्रसूतीचा अनुभव घेण्याची संधी मिळत नाही. ज्या स्त्रियांना फक्त नैसर्गिक प्रसूतीचा अनुभव आलेला आहे, त्यांच्या सिझेरियनबद्दलच्या भाष्याला कितपत महत्त्व द्यायचं? अलीकडे, एखाद्या स्त्रीचं पहिल्या वेळेस नैसर्गिक बाळंतपणाचा अनुभव घेतल्यानंतर काही कारणांसाठी दुसऱ्या खेपेला सिझेरियन करावं लागतं, त्याच प्रमाणे, काही जणींचं पाहिलं सिझेरियन झाल्यानंतर दुसऱ्या खेपेला नैसर्गिक बाळंतपण होऊन जातं. असे बाळंतपणाच्या दोन्ही पद्धतीचा अनुभव घेतलेल्या स्त्रियांचा एक वेगळा गट समाजात तयार होतो आहे. दोन्ही पद्धतींचा अनुभव घेतलेल्या या गटातील स्त्रियांना यावर भाष्य करण्याचा पूर्ण अधिकार आहे असं मला वाटतं. अनेक स्त्रियांच्या व्यथा जवळून पाहिल्यानंतर तयार झालेलं माझं हे वैयक्तिक मत आहे.

या गटातील स्त्रियांचं म्हणणं काय आहे हे जाणून घेणं हा माझ्यासाठी उत्सुकतेचा विषय ठरला. त्या दृष्टिकोनातून एक छोटासा अभ्यास केला. या अभ्यासातील निरीक्षणं वाचकांसमोर ठेवावीत असं वाटतंय. एक प्रश्नावली तयार करून बाळंतपणाच्या या दोन्ही पद्धतीचा अनुभव असणाऱ्या एकूण १३४ जणींच्या मुलाखती घेतल्या. पहिलं नॉर्मल आणि नंतर सिझेरियन हा गट मोठा (७० टक्के) होता. पहिलं सिझेरियन आणि नंतर नॉर्मलचा गट तुलनेने छोटा (३० टक्के) होता. अभ्यासातील सर्व स्त्रियांचं एकंदरीत मत विचारात घेतलं असता बहुतांश (७० टक्के) स्त्रियांच्या मते, सिझेरियनपेक्षा नैसर्गिक प्रसूतीचा अनुभव चांगला होता असं आहे. दोन्ही गटांतील स्त्रियांच्या मतांचं वर्गीकरण करून विश्लेषण केलं तरी नॉर्मलचा अनुभव चांगला होता असं म्हणणाऱ्यांची संख्या अधिक होती. शिक्षणाचा निकष लावल्यासदेखील कमी शिक्षण झालेल्या आणि उच्चशिक्षित स्त्रियांमध्ये सिझेरियनपेक्षा नॉर्मलचा अनुभव चांगला असं म्हणणाऱ्याची संख्या जास्त होती. गरीब-श्रीमंतीचा निकष लावल्यास, हे प्रमाण ‘फिफ्टी-फिफ्टी’ असं होतं.

प्रथम, या गटातील स्त्रियांचे काही निवडक अनुभव त्यांच्या भाषेत आपल्यासमोर ठेवतो.

‘सिझेरियन करताना काही कळत नाही हे खरं, पण नंतर टाक्यांचा खूप त्रास होतो. सिझेरियन झाल्यास खर्च खूप होतो. पोटाला टाके पडतात, आम्हाला शेतात काम करावं लागतं, काम करताना भीती वाटते.’

‘नॉर्मलही अच्छा है, क्यूँ की, चार-पांच घंटे दर्द सहन किये बात खतम, सीझरचा फार त्रास असतो, टाक्यांमुळे चालताही येत नाही. बाळाला घेताही येत नाही. सीझरमे दो-तीन दिन तक सलाईन पर रहना पडता और खर्चा भी जादा होता.’

‘नॉर्मल चांगलं, कळा सहन कराव्या लागतात हे ठीक आहे, पण अगदीच सहन न होणाऱ्या कळा या तासभरच असतात.’

‘नॉर्मलमें ज्यादा तकलिफ हुयी. ‘नीचे’ टाकोमें इन्फेक्शन हुआ, ते ठीक होण्यासाठी दोन महिने लागले. सीझरनंतर चार दिवसात चालायला लागले. खराब अनुभव के बावजुद म नॉर्मलही अच्छा बोलूंगी.’

‘माझं पाहिलं सिझेरियन झालं, दुसरं नॉर्मल. तीन-चार तास कळांचा त्रास झाला. माझ्या मते नॉर्मलपेक्षा सिझेरियनच चांगलं. लोक म्हणतात की, सिझेरियननंतर जीव अधू होतो, पण माझं तसं झालं नाही. नॉर्मल डिलिव्हरीच्या कळा सहन करताना सिझेरियन व्हावं असं वाटत होतं. मी सिझेरियन झालेल्या रुग्णांना सांगत असते, सिझेरियननंतर जीव अधू होत नाही, तो गैरसमज आहे.’

‘जेव्हा कळांचा खूप त्रास होत होता, तेव्हा मॅडमला मी स्वत: म्हणाले, माझं सीझर करा नाहीतर मला मारून टाका, मला बाळ नको, काही नको पण हा त्रास थांबवा. नॉर्मलचा इतका त्रास झाल्यानंतरदेखील नॉर्मलच चांगलं, असं मी म्हणेन.’

‘सिझेरियनचा अनुभव नॉर्मलपेक्षा खूप चांगला, कारण १० मिनिटांत बाळ बाहेर. पहिल्या सिझेरियननंतर दुसऱ्या वेळेस नॉर्मल होत असताना मला सिझेरियनची आठवण झाली, सीझर केलं असतं तर बरं झालं असतं असं वाटून गेलं. सिझेरियननंतर घरकाम करण्यात मला काही त्रास झाला नाही.’

नॉर्मलचा अनुभव चांगला की सिझेरियनचा? या संदर्भातील दोन्ही अनुभव घेतलेल्या स्त्रियांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर काही मुद्दे समोर येतात. नैसर्गिक प्रसूती होताना येणाऱ्या कळा कुणाला, कितपत सहन होतात हाच कळीचा मुद्दा आहे. कळा सहन करण्यासाठी ती मनाने किती खंबीर आहे, यावर बरंच काही अवलंबून असतं. बाळंतपणाच्या या दिव्यातून जाताना तिच्या सोबत असणारे नातेवाईक, विशेषत: नवरा, आई, सासूबाई आणि तिच्या आणि बाळाच्या तब्येतीवर नजर ठेवून असणारे डॉक्टर, नर्स किती भावनिक आधार देतात याला देखील महत्त्व आहे. सुरुवातीला, माझं बाळंतपण नॉर्मल व्हावं अशी इच्छा असणारी स्त्री, प्रत्यक्ष कळा सुरू झाल्यानंतर, सहन न झाल्यामुळे कुणाचेच काहीही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नसते, अगोदर माझा हा त्रास कमी करा आणि मग बोला, अशी अगतिकता व्यक्त करते. या परिस्थितीत देखील काही स्त्रियांची नॉर्मल डिलिव्हरी होते. ज्या नॉर्मल डिलिव्हरीचा अनुभव अत्यंत भयानक होता असं सांगतात, त्याच नंतर जे झालं ते योग्यच झालं असं पण म्हणतात.

बाळंतपणाच्या कळा या महत्त्वाच्या मुद्दय़ाव्यतिरिक्त नॉर्मलचा किंवा सिझेरियनचा शरीरावर आणि दैनंदिन जीवनावर अन्य पद्धतीने होणारे परिणाम, याचा देखील प्रभाव मत प्रदर्शित करताना जाणवतो. उदाहरणार्थ नॉर्मलच्या वेळेस ‘खाली’ पडणारे टाके, सिझेरियननंतर टाके कोरडे निघाले का नाही, नॉर्मलनंतर तात्काळ स्तनपान करता येण्याची सहजता, दोन्ही पद्धतीसाठी करावा लागणारा खर्च, मनुष्यबळाच्या स्वरूपात मिळणारा आधार वगैरे गोष्टी लक्षात घेतल्या जातात.

ढोबळ मानाने त्यांचा जसा अनुभव तसं त्यांनी त्यांचं मत बनवलं. पण काही वेळेस त्यांच्या मतांवर, अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या गैरसमजाचा प्रभाव देखील आहे. उदाहरणार्थ सिझेरियन झाल्यानंतर, ओझं उचलता येत नाही, जड कामे करता येत नाहीत, शेतात काम जर करता नाही आलं तर मग कसं होईल, सिझेरियनच्या वेळेस कमरेत (स्पायनल अनेस्थेशिया) दिल्या जाणाऱ्या इंजेक्शनमुळे आयुष्यभर कंबर दुखत असते, वगैरे.

नॉर्मल डिलिव्हरी होताना, कळा सहन करणे हे एक प्रकारचे दिव्य आहे असे मान्य करून देखील नॉर्मल म्हणजे नैसर्गिक आणि जे नैसर्गिक असतं ते केव्हाही चांगलंच असतं, अशी ती संकल्पना. काही तासांच्या वेदना, पण नंतर पूर्ववत सर्व कामे लगेच सुरू, यातच नॉर्मल डिलिव्हरीचं सौंदर्य दडलेलं आहे असं मला वाटतं.

chaturang@expressindia.com