डॉ. किशोर अतनूरकर

प्रसूतिपूर्व तपासणीत शारीरिक तपासणीसोबत तिच्या मनात चालणाऱ्या खळबळीचा अंदाज डॉक्टरला घेता आला पाहिजे. एका बाजूला सगळं काही सुखरूप होईल की नाही अशी हुरहुर, तर दुसरीकडे लवकरच मातृत्व प्राप्त होणार याचा आनंद, उत्सुकता, नॉर्मल होणार का सिझेरियन याचा गोंधळ, अशा चमत्कारिक मानसिक अवस्थेतून तिला जावं लागतं. गर्भवतीचं मन अशा वेगवेगळ्या भावनांतून जात असताना डॉक्टर आणि नातेवाईकांची भूमिका महत्त्वाची ठरते.

पहिलटकरणीच्या तुलनेत, अनुभवी गर्भवती स्त्रियांची मानसिक अवस्था निराळी असते. बाळंतपणातल्या कळांची भीती नसतेच असं नाही. ती बऱ्याच अंशी कमी झालेली असते. पूर्वी नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे, आतादेखील नॉर्मलच होणार, अशी मनोधारणा असते. नॉर्मल का सिझेरियन याचा गोंधळ मनात नसतो. मुलगा होईल का मुलगी हा गोंधळ पहिल्या खेपेच्या तुलनेत वाढलेला असतो. पहिली मुलगी असल्यास आता मुलगा व्हावा, असं हमखास वाटत असतं, तर पहिला मुलगा असल्यास आता मुलगी व्हावी, असं वाटतं. पहिल्या दोन मुली असल्यास या वेळेस मुलगा झालाच पाहिजे, याचं अक्षरक्ष: दडपण असतं.

तिसरा गट हा पूर्वीचे अनुभव त्रासदायक असलेल्या गर्भवती स्त्रियांचा. मागच्या काही गर्भावस्थेच्या कालावधीत आणि बाळंतपणाच्या वेळेस आलेल्या कटू अनुभवांमुळे, या वेळेस तरी सगळं व्यवस्थित होईल ना, या मानसिक अवस्थेतून त्या जात असतात. निदान ही गर्भधारणा तरी नऊ महिने टिकावी, मुलगा असो वा मुलगी, एखादं तरी निरोगी बाळ पदरात पडावं, या अपेक्षांचं ओझं भरपूर असतं. देवाची विविध पद्धतीने उपासना केली जाते, नवस बोलले जातात. साध्या काही कारणांमुळे थोडंसं जरी पोटात दुखलं की लगेच, या वेळेस देखील गर्भपात होईल की काय अशी भीती असते. ‘डॉक्टर परत एकदा सोनोग्राफी करून, सगळं काही ओके आहे हे एकदा बघून घ्यायचं का’ असं स्वत:च सुचवत असतात. पोटात वाढणाऱ्या बाळाच्या प्रकृतीविषयी अनेकदा तेच तेच प्रश्न विचारतात. डॉक्टरांची पण अशा वेळेस अडचण होते. रुग्ण आणि नातेवाईकांना ‘सगळं काही व्यवस्थित आहे, काही काळजी करू नका’ असं उत्तर अपेक्षित असतं आणि प्रत्येक रुग्णांना असं ठामपणे डॉक्टर सांगू शकत नाहीत. क्वचित प्रसंगी, तपासणीत सर्व काही नॉर्मल आहे, या आठ-दहा दिवसांत कधीही बाळंतपणाच्या कळा सुरू होऊ शकतील अशा परिस्थितीत, संपूर्ण कुटुंब बाळाच्या स्वागताच्या मन:स्थितीत असताना रुग्ण म्हणतो की, मला बाळाची हालचाल नेहमीसारखी जाणवत नाही. नातेवाईक ताबडतोब तिला डॉक्टरकडे घेऊन जातात. डॉक्टर सोनोग्राफी करतात आणि त्यांच्या लक्षात येतं की, बाळाच्या हृदयाचे ठोके बंद झालेले आहेत आणि बाळाचा, जन्म घेण्यापूर्वीच गर्भाशयातच अंत झाला आहे. रुग्ण आणि नातेवाईकांसाठी हा फार मोठा धक्का असतो. अचानक असं कसं काय झालं? कालपर्यंत तर सगळं ठीक आहे, असं तुम्हीच तर म्हणाला होतात ना डॉक्टर. मग? कुटुंबीयांसाठी तर हा आघातच असतो. डॉक्टरला देखील क्षणभर सुचत नाही. असं का झालं असावं याचा अंदाज प्रत्येक केसमध्ये डॉक्टरांना बांधता येईलच असं नाही. डॉक्टरांसाठीदेखील हा एक प्रकारचा ‘शॉक’ असतो. कोणत्या शब्दात रुग्ण आणि नातेवाईकांना समजावून सांगायचं? त्यांची प्रतिक्रिया कशी असेल? या प्रश्नांचा भुंगा डॉक्टरला स्वस्थ बसू देत नसतो, तो देखील अशा काही केसेसमधे अनभिज्ञ असतो.

डॉक्टरांची ही मन:स्थिती रुग्ण आणि तिच्या नातेवाईकांना समजेलच असं नाही. अशा प्रसंगाला ‘४ल्ली७स्र्’ं्रल्ली ्रिल्ल३१ं४३ी१्रल्ली ऋी३ं’ीि्रे२ी’ असं म्हणतात. सगळं काही ठीक असतं आणि ध्यानीमनी नसताना वातावरणात बदल होतो, वादळ येतं, गारपीट होते आणि पिकांचं कधीही न भरून येणारं नुकसान होतं. रुग्ण, नातेवाईक आणि डॉक्टर हताश होतात. डॉक्टरांना अशा परिस्थितीतून तिची ‘सुटका’ करायची असते. मनातून भेदरलेले नातेवाईक, नीट सहकार्य करतीलच असं नाही; कारण त्यांनी कुठं तरी ऐकलेलं असतं – बाळ पोटात ‘गेल्यानंतर’ त्याचं विष होतं. त्यामुळे मातेच्या जिवाला धोका निर्माण होतो. नातेवाईक म्हणतात- ठीक आहे. जे झालं ते झालं. पण आता लवकरात लवकर ते बाळ बाहेर काढा डॉक्टर. काही जण वेगळी भाषा वापरतात.

‘जल्द से जल्द बच्चे को बाहर निकालो, नही तो उसका जहर माँ के पुरे बॉडी में फैलकर, बडी जान को धोखा हो जायेगा.’ एरवी सिझेरियनच्या विरोधात असलेले म्हणतात, ‘लगा तो जल्दी सिझेरियन करो लेकिन माँ को बचाव.’ वास्तविक पाहता अशा प्रसंगी सर्वसाधारणपणे सिझेरियन टाळायचं असतं, सलाइनद्वारे कळा येण्याचं इंजेक्शन देऊन बाळंतपण ‘नॉर्मल’ व्हावं यासाठी प्रयत्न केले जातात. नातेवाईकांच्या आग्रहाला बळी पडून, विनाकारण सिझेरियन करण्याची गरज नसते. ज्या सिझेरियननंतर जिवंत बाळ पदरात पडणार नसेल तर असं सिझेरियन टाळलं पाहिजे. गर्भशयात कोणत्याही कारणामुळे बाळाचा मृत्यू होऊन आईच्या जिवाला धोका निर्माण होण्यासाठी किमान दोन आठवडे लागतात. कितीही समजावून सांगितलं तरीही दोन आठवडे तर काय, दोन तासदेखील बरेच नातेवाईक थांबायला तयार नसतात, असा माझाच नव्हे तर अनेक स्त्रीरोगतज्ज्ञांचा अनुभव आहे. नातेवाईकांनी संयम पाळून, डॉक्टर म्हणतील त्याप्रमाणे त्यांना सहकार्य केलं पाहिजे.

या बाबतीत एक गर्भवती स्त्री जी स्वत: एक डॉक्टर आहे, तिच्या बाबतीत घडलेला प्रसंग मला इथे सांगावासा वाटतो. तिला एक सहा वर्षांचा मुलगा, डिलिव्हरी नॉर्मल; दुसऱ्या खेपेला नवव्या महिन्यात तिच्या पोटातील बाळ दुर्दैवाने दगावलं. या परिस्थितीत तिची प्रसूती नैसर्गिक मार्गाने व्हावी म्हणून खूप प्रयत्न केले, जवळपास ४८ तास वाट पहिली, पण यश आलं नाही, आम्हाला नाइलाजास्तव सिझेरियन करावं लागलं. तिसऱ्या गर्भधारणेच्या वेळेस तिला मधुमेह झाल्याचं लक्षात आलं. गर्भावस्थेत मधुमेह झाल्यास आणि त्याचा उपचार नियमित झालेला नसल्यास, असं बाळ पोटात दगावण्याची शक्यता असते. आमच्या या डॉक्टरीणबाई, खूप टेन्शनमध्ये. मनावर दडपण-मागच्या वेळेस सारखं आता पुन्हा तर बाळ दगावणार तर नाही ना? आठवा महिना लागल्यापासून अनेक वेळा डॉक्टर माझं बाळ ‘फिरतच’ नाही म्हणून तपासणीसाठी येत होती. प्रत्येक वेळेस सर्व काही नॉर्मल. सहावा महिना लागल्यानंतर, मला अजिबात रिस्क घ्यायची नाही म्हणून सिझेरियन करूनच घेतलं.

गर्भवती स्त्रीच्या मनाशी संबंधित असलेल्या अजून एका गोष्टीचा उल्लेख इथे झाला पाहिजे असं वाटतं. काही गर्भवती स्त्रियांना ‘डोहाळे’ लागतात. डोहाळे का लागतात याचं नक्की कारण समजलेलं नाही. ज्या अन्नपदार्थात फारसे पोषक गुण नाहीत असे पदार्थ गर्भावस्थेत काही स्त्रियांना खूपच खावेसे वाटतात. उदाहरणार्थ आंबट (चिंचा), लोणचं, चाट, बर्फाचा गोळा, माती-खडू वगैरे. असे काही पदार्थ खाण्याची त्यांची इच्छा फार तीव्र असू शकते. असं काही तरी खाऊन आपल्या मनाचं तात्पुरतं सांत्वन करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. माती, खडू यांसारखे पदार्थ खावेसे वाटणे हे त्या स्त्रीला रक्तक्षय (अ‍ॅनेमिया) झाला असल्याचं लक्षण समजलं जातं. आमच्या अभ्यासात जवळपास ५० टक्के गर्भवतींमध्ये ‘डोहाळे’ लागणे हा प्रकार आढळून आला. ‘मला आजकाल गोड पदार्थ खूप खावेसे वाटतात’ असं सांगणाऱ्या स्त्रियांची संख्या जास्त होती.

प्रसूतिपूर्व तपासणीत बऱ्याचदा डॉक्टरांकडून यांत्रिक पद्धतीचा अवलंब होताना दिसतो. शारीरिक तपासणीसोबत तिच्या मनात चालणाऱ्या खळबळीचा अंदाज डॉक्टरला घेता आला पाहिजे. एका बाजूला सगळं काही सुखरूप होईल की नाही अशी हुरहुर, तर दुसरीकडे लवकरच मातृत्व प्राप्त होणार याचा आनंद, मुलगा होणार की मुलगी याची उत्सुकता, नॉर्मल होणार का सिझेरियन याचा गोंधळ, अशा चमत्कारिक मानसिक अवस्थेतून तिला जावं लागतं. त्यामुळे डॉक्टरांबरोबरच तिच्या कुटुंबियांनीही तिची काळजी घ्यायलाच हवी.

atnurkarkishore@gmail.com

chaturang@expressindia.com