अपेक्षा चोकसी
प्रवास हा सुरुवातीपासूनच माझ्या आयुष्याचा खूप मोठा भाग राहिलेला आहे. मोटरसायकलने राइड्स सुरू करण्यापूर्वीही मला ‘सोलो’ प्रवास करायला आवडायचं. नवी ठिकाणं पाहणं, वेगवेगळ्या लोकांना भेटणं आणि त्या अनुभवांमधून शिकणं मला नेहमीच आवडतं. मोटरसायकलमुळे हा प्रवास अधिक जवळचा आणि प्रत्यक्ष अनुभव देणारा झाला. ‘रॉयल एनफिल्ड हंटर’ आणि ‘क्लासिक मोटरसायकल’ हे माझे प्रवासातले सखेसोबती. ‘रायडिंग’ची सुरुवात मी हळूहळू केली. सुरुवातीला पुण्याच्या आसपासच्या छोट्या राइड्स केल्या. त्यामुळे अनुभव वाढत गेला तसा आत्मविश्वासही वाढला. हळूहळू त्या राइड्स लांब पल्ल्याच्या होत गेल्या.

माझ्या लक्षात राहिलेल्या प्रवासांपैकी एक म्हणजे, पुण्याहून कोकणात जाताना ताम्हिणी घाटातून पहाटे केलेला प्रवास. थंडी, धुकं आणि पूर्ण रस्ताभर पसरलेली शांतता. फक्त आम्ही आणि आमच्या गाडीचा आवाज… पण थंडी इतकी की, मला माझे हातही जाणवत नव्हते, त्यामुळे गाडी चालवणं अवघड होत होतं. त्यात थंडीमुळे अंगावर सतत शहारे येत होते. शेवटी एके ठिकाणी थांबून आम्ही गाडीच्या इंजिनवर हात शेकले. तेव्हा कुठे हातात जीव आला… सूर्य उगवताच रस्ता स्पष्ट दिसू लागला आणि राइडही सोपी वाटू लागली. त्या अनुभवातून मला हे शिकवलं की, शांतपणे आणि लक्ष देऊन चालवलं तर कठीण रस्तेही सोपे होतात.

यानंतर मी पुण्याहून गोव्यापर्यंत ‘राइड’ केली आणि संपूर्ण कोकण किनारपट्टी फिरले. या सर्व राइड्स मी नेहमी सोबतीने केल्या. मी, यश प्रधान, आणि श्वेता मेहेंदळे आणि एकदा गोवा ‘राइड’ माझी मैत्रीण शुभांगी मांजरेकर हिच्यासोबत. खराब रस्ते, अचानक येणारा पाऊस, लांब अंतर आणि अनोळखी ठिकाणं, या सगळ्याचा अनुभव आम्ही एकत्र घेतला. एकत्रित ‘राइड’ केल्यामुळे सुरक्षितता, समन्वय आणि एकमेकांची साथ या गोष्टींची किंमत कळली.

हेही वाचा

सुरुवातीला प्रवासाचे व्हिडीओ फक्त स्वत:साठी करायला सुरुवात केली होती त्या क्षणांना जपण्यासाठी. पुढे मागे स्वत:लाच पाहता येतील म्हणून. हळूहळू लोकांना ते व्हिडिओ आवडू लागले, प्रतिक्रिया यायला लागल्या आणि तिथूनच व्लॉगिंगची सुरुवात झाली. माझा प्रवास आणि राइड्सचे व्लॉग्स तयार करून Apeksha Choksi या माझ्या यूट्यूब चॅनेल अपलोड करायला सुरुवात केली. मी रस्ते, ठिकाणं, खाणं आणि प्रवासातील खरे अनुभव शेअर करते.

भारतामध्ये मोटरसायकल चालवणारी स्त्री म्हणून मला अनेक प्रश्न, शंका विचारल्या जातात. मला मात्र यात काही वेगळं वाटत नाही. मोटरसायकल चालवणं ही एक सामान्य गोष्ट आहे. हो, कधी कधी जड बाईक हाताळताना ताकद लागते, पण ते सरावाने शक्य होतं. सुरक्षेचा विचार मी नेहमी करते. मी कधीही एकटीने ‘राइड’ करत नाही आणि रात्री जाणं टाळते. योग्य नियोजन, मर्यादेत रायडिंग आणि विश्वासाच्या लोकांसोबत प्रवास करणं, हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.

रायडिंग आणि प्रवासामुळे मला संयम, आत्मविश्वास आणि जबाबदारी शिकायला मिळाली. ज्यांना सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी माझा सल्ला सोपा आहे – गाडी उत्तम शिका, छोट्या ‘राइड्स’ने सुरुवात करा, सुरक्षित राहा. रस्त्याचा आणि नियमांचा आदर करा. कधी कधी, फक्त सुरुवात करणंच सर्वात महत्त्वाचं असतं. एकदा का ती केली की आकाश कवेत घेता येतं.

krishna. navgire9 @gmail. com