scorecardresearch

रागावर ताबा

राग आल्यावर आकडे मोजायला सांगतात. पण आकडे मोजून राग कसा कमी होणार?

रागावर ताबा मिळवण्यासाठी मनातल्या मनात आकडे मोजायला सांगितलं जातं, पण डोक्यात तेच विचार असतील तर राग कमी होण्याऐवजी अधिक वाढतो. त्याचा त्रासही होतो.. पण राग शांत झाला  नाही तर परिस्थिती चिघळू शकते. मुलांच्या बाबतीतही हे होतंच. काय करायचं, रागावर ताबा मिळवण्यासाठी?

आदित्यची परीक्षा पंधरा दिवसांवर आली होती. पहिला पेपर मराठीचा होता म्हणून मराठीचा अभ्यास करावा असा विचार करून त्याने दप्तरातून मराठीचं पुस्तक काढलं, पण मराठीची वही सापडेना. त्याने पुन: पुन्हा आपलं दप्तर आणि कपाट शोधलं. आदित्य काही तरी शोधतोय हे केतकीच्या लक्षात आलं. तिचं स्वगत सुरू झालं, ‘‘सतत या मुलाचं काही तरी हरवलेलं असतं. कधी कोणती गोष्ट जागेवर ठेवत नाही.’’ शेवटी न राहवून तिने त्याला काय शोधतो आहेस म्हणून विचारलं. त्याने चाचरत उत्तर दिलं, ‘‘अगं, मराठीची वही शोधत होतो. बहुतेक रमाकडे राहिली असेल.. हो रमाकडेच आहे.’’ त्याला एकदम आठवलं. ‘‘तिचा एक प्रश्न राहिला होता म्हणून तिने माझ्याकडून वही घेतली होती. फोन करतो तिला,’’ असं म्हणून त्याने लागलीच रमाला फोन लावला. फोनवर रमानेच त्याला ऐकवलं, ‘‘स्वत:ची वही वेळीच घेता आली नाही तुला? उद्या आणते.’’

दुसऱ्या दिवशी रमाने वही आणली नव्हती. ‘‘मला मराठीचा अभ्यास करायचा आहे. मला माझी वही हवी आहे,’’ आदित्य तिला म्हणाला, तसं ती हेटाळणीच्या सुरातच ती म्हणाली, ‘‘अहाहा! माहिती आहे आला मोठा अभ्यास करणारा. तोंड बघ स्वत:चं.. असे किती मार्क मिळतात रे तुला मराठीत? जेमतेम सत्तर, बहात्तर पर्यंतच ना?’’ हे ऐकताच आदित्यचा तिळपापड झाला. त्याने रागाने मुठी आवळल्या, दात-ओठ चावले आणि जोरात ओरडला, ‘‘मुलगी आहेस म्हणून नाही तर दोन ठेवून दिल्या असत्या.’’ त्यावर आदित्य माझ्या अंगावर धावून आला असा कांगावा करत तिने जोरजोरात रडायला सुरुवात केली. आजूबाजूच्या मुलांचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं त्यामुळे सर्वानी आदित्यला दोषी ठरवलं. प्रकरण मुख्याध्यापिकांकडे गेलं. रमा जोरजोरात त्यांना आदित्य तिला मारायला आला, असं सांगत होती. आदित्यशी बोलते, असं सांगून रमाला त्यांनी वर्गात पाठवलं. आदित्य घाबरून उभा होता. त्यांनी शांतपणे आदित्यला विचारलं. आदित्यने त्यांना जे झालं ते तसंच्या तसं सांगितलं. त्या म्हणाल्या, ‘‘तुला राग आलेला दिसतोय.’’ आदित्य मनातल्या मनात म्हणाला, ‘‘राग येणार नाही तर काय आनंद होणार?’’ तोपर्यंत त्याच्या मनातलं वाचल्यासारखं त्या म्हणाल्या, ‘‘आनंद नक्कीच होणार नाही. राग येणारच. पण तो व्यक्त करायची पद्धत चुकली. या गोष्टीवर विचार कर आणि उद्या माझ्याकडे ये. आता घाबरला आहेस तसा घाबरू नकोस. मी काही खाणार नाही तुला. परत राग आलाच तर मनात दहा नाही तर चांगले पंचवीस आकडे मोज.’’ खाली मान घालून तो बाहेर आला. वर्गात आल्यावर रमा त्याच्याकडे बघून कुचकट हसली. आदित्यला राग येऊ  लागला. पण या वेळी आपल्याला राग येतो आहे असं त्याला जाणवू लागलं, पण रमाचं कुचकट बोलणं चालूच होतं. त्याने मनात आकडे मोजायला सुरुवात केली, पण कमी होण्याऐवजी त्याच्या रागाचा पारा वाढतच गेला.

घरी पाऊल टाकलं तेव्हाही तो रागाने खदखदतच होता, पण त्याने तो दाबण्याचा प्रयत्न केला. प्रयत्नपूर्वक आदळआपट न करता त्यानं बूट जागेवर ठेवले. हातपाय धुतले. घरात कोणी नव्हतं. स्वत:चं जेवण वाढून घेतलं आणि जेवण झाल्यावर खोलीत जाऊन झोपायचा प्रयत्न केला, पण डोळ्यासमोर शाळेतला प्रसंग उभा राहत होता. विचार चालू होते. मी चिडलोय आणि घाबरलो आहे हे बाईंनी बरोबर ओळखलं. मला त्या ओरडल्या नाहीत. त्यांनी माझं बोलणं ऐकून घेतलं. चक्क माझं चिडणं मान्यही केलं. पण मला त्यांनी विचार कर म्हणून का सांगितलं? यात मी काय विचार करणार? रमाच्या वागण्याने मी चिडलो. आज मी रागाला आवर घातलाच की.. मी तिला कुठे मारलं?.. पण, जोरात मुठी वळून दात-ओठ खाऊन बोललो हे मात्र खरं. यालाच बहुतेक बाई राग चुकीच्या पद्धतीने व्यक्त केला, असं म्हणत असतील. म्हणजे त्यांना मला राग आला हे चुकीचं वाटलं नाही. त्यांनी सांगितलं तसे पंचवीस आकडे मोजले, पण माझा राग कमी झालाच नाही. उलट वाढला, पण सर्वच जण राग आल्यावर आकडे मोजायला सांगतात. पण आकडे मोजून राग कसा कमी होणार? आई कधी तरी म्हणाली होती की, राग आल्यावर विचारांवर पडदा पडतो. आपण पहिले काही सेकंद सारासार विचार करू शकत नाही. आकडे मोजल्यावर आपल्याला शांत व्हायला थोडा वेळ मिळतो आणि मग आपल्या हातून फेकाफेकी, ओरडणं यासारख्या विपरीत गोष्टी घडत नाहीत. मग माझा राग कसा वाढला? अक्षरश: माझ्या अंगाची लाहीलाही होत होती..’ त्याला उत्तर मिळत नव्हतं त्यामुळं त्याची अस्वस्थता वाढत गेली.

संध्याकाळी अभ्यास करतानाही हेच विचार डोक्यात घोळत होते. केतकी नेमकी त्या वेळी तेथे आली. ती त्याला म्हणाली, ‘‘आदित्य, तू मोठय़ांदा वाचतो आहेस खरा, पण तू वाचतो आहेस एक आणि डोक्यात मात्र काही तरी दुसरंच चालू आहे असं वाटतंय. कंटाळा असेल तर ब्रेक घे.’’ या वाक्याने आदित्यला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. ‘मी पंचवीस आकडे मोजले तरी प्रत्येक आकडय़ाबरोबर मी जोरात मनात रमाने वही आणली नाही, ती अशी उत्तरं कशी उत्तरं देऊ  शकते, ती बेजबाबदार आहे, माझे मार्क काढायची काय जरुरी आहे? असेल ती हुशार.. खरं तर ती नालायक आहे.. असं बरंच काही बोलत होतो. आकडे नुसतेच यंत्रवत म्हणत होतो. त्याच्याकडे माझं लक्षच नव्हतं. त्यामुळे माझा राग वाढतच गेला.’ प्रश्नाची उकल झाल्यामुळं आदित्यला खूप बरं वाटलं.

दुसऱ्या दिवशी आदित्यने रमाकडे वही मागितली. तिने वही आणली नव्हती. आणि तिचा उद्धटपणाही कमी झाला नव्हता. ती उर्मटपणे म्हणाली, ‘‘आजही मराठीचा तास नाही. आणि असा तू काय अभ्यास करून तारे तोडणार आहेस?’’ हे ऐकून आदित्यचा पारा चढलाच पण त्याने मनात उलटे आकडे मोजले, पाणी प्यायला, तिला खंबीरपणे म्हणाला, ‘‘मला काय तारे तोडायचे ते मी बघेन, पण माझी वही आहे. मला ती आजच हवी आहे. तुझं घर इथून दोन मिनिटांवर आहे. मधल्या सुट्टीत आपण तुझ्या घरी जाऊन ती घेऊन येऊ.’’ त्यावर तिचं म्हणणं होतं की, ‘‘मधल्या सुट्टीत कसं घरी जाऊन येणार?’’ आदित्य तिला म्हणाला, ‘‘आपण दोघे मुख्याध्यापिकांना भेटू. मी त्यांना सांगेन.’’ रमाला आदित्य डरपोकच वाटत होता. तिला वाटलं हा फक्त त्यांच्या ऑफिसपर्यंत येईल, पण आत काही जाणार नाही. ती त्याला लागलीच ‘हो’ म्हणाली. दोघेही तिथपर्यंत गेले. मुख्याध्यापिका रूमच्या बाहेरच उभ्या होत्या. रमाला आदित्य घाबरेल असं वाटलं, पण तो आत्मविश्वासाने त्यांना म्हणाला, ‘‘रमाने आजही माझी वही आणलेली नाही. आम्ही मधल्या सुट्टीत तिच्या घरी जाऊन आणू का? सुट्टी संपायच्या आधी आम्ही येऊ  आणि मगच डबा खाऊ.’’ बाई त्याच्याकडे बघून हसल्या आणि त्यांनी परवानगी दिली. मधल्या सुट्टीत रमा शांतपणे आदित्यला घेऊन घरी गेली आणि त्याला वही दिली. आदित्य तिला हसून, ‘थँक यू’ म्हणाला  आणि  मनातल्या मनात म्हणाला, ‘आता मला रागाला कसं समोर जायचं आहे हे कळलं आहे. आता मी रागाच्या भरात वाहून जाऊन अयोग्य कृती करणार नाही. रागाचा पहिला भर ओसरेपर्यंत मी श्वासावर लक्ष ठेवेन किंवा आकडे मोजेन. एक ते दहा मोजण्यापेक्षा उलटे आकडे मोजेन किंवा एखादा पाढा उलटा म्हणेन. ज्याच्यामुळे उलटे पाढे, आकडे म्हणणं कठीण असल्यामुळे माझं लक्ष राग आलेल्या विषयावरून त्याच्यावर येईल. प्रत्येक ठिकाणी मऊपणे वागण्याची गरज नाही तसंच आरडाओरडाही करायची गरज नाही.’ आपण आपली बरोबर, योग्य ती मतं समोरच्या व्यक्तीसमोर शांतपणे, ठामपणे मांडू शकतोय, हे कळल्याने आदित्य खूप निश्िंचत झाला आणि त्याला पोटात कावळे कोकलत असल्याची जाणीव झाली. तो डबा खाण्यासाठी आपल्या वर्गाकडे वळला..

माधवी गोखले

madhavigokhale66@gmail.com

मराठीतील सर्व आपुलाची संवाद आपुल्याशी ( Apulachi-samvad-apulyashi ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Control in angry sechuation

ताज्या बातम्या