अस्मिता आणि आदित्य यांच्यातील वादावादीचं कारण केतकीला समजलं होतं आणि ते त्या दोघांनाही समजावं अशी तिची इच्छा होती. म्हणूनच केतकीनं दोघांनाही सांगितलं, ‘‘तुम्ही आता लहान नाहीत. तुम्हाला काय होतंय, काय वाटतंय हे नीट शब्दांत सांगता आलं पाहिजे. तुम्हाला तुमचंच कळत नाही तर दुसऱ्याला तरी कसं समजणार तुम्हाला काय होतं आहे ते?’’ अस्मिता आणि आदित्यने मनावर घेतलं आणि आपल्या कृतींचा अर्थ लावायला लागले..

संध्याकाळचे सात वाजून गेले होते. केतकी स्वयंपाकघरात काम करत होती. मकरंद हॉलमध्ये टीव्ही बघत होता. आदित्य, अस्मिता त्यांच्या खोलीत होते. अचानक त्यांच्या खोलीतून आदित्यचं चढय़ा आवाजातलं बोलणं ऐकू यायला लागलं. नेहमीसारखी भांडत असतील, होतील थोडय़ा वेळाने शांत, असा विचार करून केतकीनं दुर्लक्ष केलं. पण आदित्यचा आवाज चढतच गेला. तो अस्मिताला म्हणत होता, ‘‘आली मोठी शिकवणारी, तुझा शहाणपणा तुझ्याकडे ठेव. माझं मी बघून घेईन. आगाऊ आहे नुसती.’’ त्यानं खोलीचा दरवाजा जोरात बंद केला आणि पाय आपटत हॉलमध्ये आला. म्हणून मकरंद त्याला ओरडला, ‘‘काय झालं ओरडायला? आजकाल खूप चिडतोस.’’

व्यक्तिवेध : मीना चंदावरकर
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
lokrang article, book review, ekla chalo re, Autobiographical book, sanjeev sabnis, loksatta,
सकारात्मक आत्मकथन

‘‘मी कुठे चिडतो’’ असं आदित्यनं अजून रागावून चढय़ा आवाजात विचारलं. ‘‘ही ताई शिष्टपणा करते. सारख्या चुका काढते. माझं मला कळतंय. मी करेन माझा अभ्यास.’’ इतक्यात केतकी आणि अस्मिताही बाहेर आल्या. अस्मिता त्याच्यावर चिडून म्हणाली, ‘‘अरे, पण तू तर नेहमी माझ्याकडे येतोस ना काही अडलं तर? आता मला तुझी चूक झालेली दिसत होती म्हणून बोलले. आता नाही परत काही सांगणार.’’ त्यावर आदित्य म्हणाला, ‘‘हो कशी सांगणार? जर्मनीतून?’’ यानंतरही तो बराच वेळ बोलत राहिला. त्याचा सूर चिडका होताच आता तो रडवेलाही झालेला होता. मकरंद त्याला म्हणाला, ‘‘चिडतो आहेसच आणि लहान मुलासारखा रडणार पण आहेस का?’’ यावर केतकी मात्र काहीच बोलली नाही.

आजकाल आदित्य खूप चिडायचा. त्याचा सारखा मूड जायचा. कधी कधी रडवेला व्हायचा. यामागचं कारण आताच्या बोलण्यावरून केतकीच्या लक्षात आलं. अस्मिताला कॉलेजतर्फे एका अभ्यासक्रमासाठी सहा महिन्यांसाठी जर्मनीला जायचं होतं. हे स्वीकारणं आदित्यला कठीण जात होतं.

जेवताना मकरंद म्हणाला की, ‘‘अस्मिता जर्मनीला जाणार. आपल्याला महाविद्यालयाकडून सर्व माहिती कळली आहे, पण तरीही काळजी वाटतेच ना. आणि त्यात आजकाल हा आदित्यही चिडचिड, आदळआपट करायला लागला आहे. काही कळत नाही आहे.’’ त्यावर केतकी म्हणाली, ‘‘अगदी बरोबर. जे कारण तुझ्या काळजीचं आहे तेच त्याच्या चिडचिडीचं आहे. आपण दोघंही त्याच्याशी बोलू या.’’

झोपायच्या आधी दोघंही मुलांच्या खोलीत गेले, तर अस्मिता तिच्या कुशीत शिरली आणि म्हणाली, ‘‘आई मला कसं तरीच वाटतं आहे.’’ केतकी तिला थोपटत म्हणाली, ‘‘म्हणजे नक्की काय वाटतं आहे? मला शब्दात सांग ना काय वाटतं आहे?’’ अस्मिता म्हणाली की, ‘‘माहीत नाही. नीट सांगता येणार नाही, पण फार छान नाही वाटत.’’ केतकीनं दोघांनाही सांगितलं, ‘‘तुम्ही आता लहान नाहीत. तुम्हाला काय होतंय, काय वाटतंय हे नीट शब्दांत सांगता आलं पाहिजे. तुम्हाला तुमचंच कळत नाही तर दुसऱ्याला कसं समजणार तुम्हाला काय होतं आहे ते?’’ आदित्य उसळून म्हणाला, ‘‘ताई माझ्या चुका काढते म्हणून मी चिडतो.’’ केतकीनं त्याला विचारलं की, ‘‘खरंच तू रागावला होतास की तुला अजून दुसरं काही वाटत होतं त्याचा परिणाम म्हणून तू चिडलास? तुम्ही दोघांनीही आपल्याला नक्की काय वाटत आहे? का वाटत आहे? कोणत्या भावना मनात येत आहेत? याचा विचार करा. आता खूप रात्र झाली आहे, आपण उद्या बोलू आणि आदित्य, तू जसं ताईला बोललास ते काही योग्य नव्हतं. तुला असं कोणी बोललं तर कसं वाटेल?’’ आदित्य म्हणाला, ‘‘मी असं कधीच वागत नाही. मला माझा काही स्वाभिमान आहे की नाही? मी काहीही चूक केलेली नाही. मी सॉरी म्हणणार नाही.’’

इतका वेळ शांत असलेला मकरंद म्हणाला, ‘‘आदित्य तुला बहुतेक कसला तरी खूप त्रास होतो आहे. तू खूप गुणी आहेस. तुझं असं का होतंय ते तूच शोधून काढ.’’ केतकीनं मकरंदकडे पाहिलं आणि मनात म्हणाली, ‘‘आली याची गाडी रुळावर. मगाशी आदित्यचं रडणं त्याला मान्य नव्हतं. आपण पालक म्हणून कोणत्याही वयात मुलांना रडण्यापासून अडवायला नको. पण आपल्याला का रडू येत आहे हे ज्याचं त्याला कळलं म्हणजे झालं. मुख्य म्हणजे रडून मन मोकळं झालं की त्याचं वाईट वाटणं हे चिडचिड, आदळआपट या चुकीच्या पद्धतीनं तरी बाहेर पडणार नाहीत.’’

आई-बाबा गेल्यावर अस्मिता विचार करत बसली. ‘मला नक्की काय होतंय? खरं तर मला जेव्हा जर्मनीला जायला मिळणार हे कळलं तेव्हा खूप आनंद झाला होता. म्हणजे अजूनही आनंद वाटतोच आहे. मग हे मधेच असं काय होतंय? मधेच मला टेन्शन येतं आहे. त्यामुळे एकदा छातीत धडधडलं पण होतं. आईने सांगितलं होतं तसे मी लांब श्वास घेतले, गाणी ऐकली तर बरं वाटलं. थोडंसं टेन्शन आहेच, तिथे कसं होईल? घरापासून दूर कधीच राहिले नाही. त्यानं थोडं वाईट वाटत आहे. एकमेकांवर आमचं खूप प्रेम आहे. पण मी दूर गेले म्हणून प्रेम कसं कमी होईल? मलाही होस्टेल लाईफ कसं असतं ते अनुभवायचं होतंच. मैत्रिणींबरोबर राहायची आणि सर्व एकटीनं करायची इच्छा होतीच. ती तर मला संधी मिळते आहे. याचा आनंदही आहे. हे टेन्शन आहे म्हणून मी अभ्यास पण खूप मनापासून करते आहे. म्हणजे या टेन्शनने मला फायदाच होतो आहे. त्याने एक प्रकारचा उत्साहही येतो अंगात.’ विचार करताना तिला एक गोष्ट प्रकर्षांने जाणवली की, मी या इतक्या कमी वेळात जो विचार केला त्यात कितीतरी भावनांचा विचार केला. मुख्य म्हणजे मला प्रत्येक भावना शब्दात मांडता आली. त्यामुळे मला नक्की काय वाटतं आहे आणि का वाटतं आहे याची सुस्पष्टता येत आहे. बरं पण वाटायला लागलं आहे. कदाचित आदित्यचं पण असंच होत असेल.’’ हे मनात येताच तिच्या मनात त्याच्याविषयी अपार माया दाटून आली. तिने आवंढा गिळला आणि आदू म्हणत त्याच्याजवळ गेली. तसा तो म्हणाला, ‘‘मी सॉरी म्हणणार नाही. मी अभिमानी आहे.’’ अस्मिता त्याला म्हणाली, ‘‘मी जाणार म्हणून तुला वाईट वाटत आहे का? अरे मान्य करून टाक ना. मी पण तुला खूप मिस करणार.’’ त्याच्या गळ्यात हुंदका दाटून आला आहे हे बघून अस्मिता त्याला म्हणाली, ‘‘अरे लहान मुलंच रडतात असं काही नाही. मोठी माणसं पण रडतात आणि तू काही सारखा सारखा रडत नाहीस. मागे तू पडला होतास तेव्हा हाताला टाके घातले तेव्हा कुठे रडलास? तू माझा शूर भाऊ  आहेस.’’ आदित्य तिच्या गळ्यात पडून रडला. त्याला चक्क रडून बरं वाटलं.

झोपताना आई म्हणाली तसं त्याने असं का होतंय याचा उत्तर शोधायचा प्रयत्न केला. ‘मला खरंच ताईचा राग आला होता का?..नाही ..ताई जर्मनीला जाणार म्हणून मीच किती खूश झालो होतो. सगळ्यांना सांगत सुटलो होतो. बाहेर खूप मित्र आहेत, पण घरात ती नसली तर कसं चालेल असं वाटतं. आम्ही खूप बोलतो, खूप भांडतो पण त्याने काही फरक पडत नाही. कधी कधी आमच्या भांडणाला अर्थ पण नसतो आणि त्या भांडणात मज्जा पण असते. मला ताई जाणार त्याचं वाईटच वाटतं आहे. पण ताईने मला सांगितल्यानंतर कळलं. एवढी साधी गोष्ट मला का कळली नाही? बहुतेक त्याचमुळे ही भावना मला हाताळता आली नाही. मला मान्य करता आली नाही. नाही तर ती सहा महिन्यांत परत येणार आहे, असा विचार केला असता तर तिला जाण्यासाठी जो प्रोजेक्ट करायचा आहे त्यासाठी माहिती गोळा करायला मदत करू शकलो असतो. अगदी पूर्वी ताई आईला म्हणाली होती की ऑफिसच्या कामाच्या तणावामुळे आमच्यावर रागावू नकोस. तसंच काहीसं माझं झालं.’

त्याला एकदम ‘कपूर अँड सन्स’मधला एक प्रसंग आठवला. त्यात आलिया भट सांगते की, ‘तिचे आई-वडील तिच्या वाढदिवसाला पोहचू शकणार नसतात. याचं तिला खरं तर खूप वाईट वाटतं. पण ती तिच्या पालकांना चिडून सांगते, ‘मला तुम्हाला परत भेटायचं नाही. भारतात येताना ते अपघातात जातात. तिला सारखं डाचत राहातं की मी माझ्या पालकांना मला तुम्ही खूप आवडता, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, तुम्ही मला वाढदिवसाला हवे आहात, असं सांगायला पाहिजे होतं. हे सर्व स्वत:च्या भावना नीट न ओळखल्यानं आणि त्या चुकीच्या पद्धतीनं व्यक्त केल्यानं होतं.’

शाळेत एकदा शिकवलं होतं की खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भावना असतात. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या मनात काय काय भावना आहेत त्यांना नावं द्या. पण आपण लक्ष दिलं नव्हतं. आता मात्र आपल्या भावना आपल्याला कळल्या पाहिजेत. त्यानं लागलीच ताईचा मोबाइल घेतला आणि इमोटिकॉन्सचे अर्थ वाचत बसला.

माधवी गोखले

madhavigokhale66@gmail.com