दिवस तिचे हे फुलायचे

आपण लेकीच्या, अस्मिताच्या बाबतीत फारच पझेसिव्ह होतो आहोत.

‘‘आपण लेकीच्या, अस्मिताच्या बाबतीत फारच पझेसिव्ह होतो आहोत. वयानुसार होणारे भावनिक बदल, मित्र रोहनविषयी तिला वाटणारी ओढ आपण अमान्य करतो आहोत. ‘दिवस तुझे हे..’ या काव्यपंक्तींप्रमाणे तिचे फुलायचे दिवस, वयातल्या या टप्प्यावर असं होणं नैसर्गिक आहे. तेही पालक म्हणून समजून घ्यायला हवं.’’ मकरंदला ते जाणवलं आणि पटलं.

अस्मिताला बारावीत आणि प्रवेश परीक्षेत चांगले गुण मिळाले त्यामुळे तिला हव्या असलेल्या कॉलेजमध्ये इंजिनीअिरगला प्रवेश मिळाला. मकरंद आणि केतकीचा ऊर अभिमानाने भरून आला. पण काही दिवसांतच अस्मिताचं अभ्यासातलं लक्ष उडालं. तिचे पहिल्या सेमिस्टरला तीन विषय मागे राहिले. ती आजकाल जास्तच नटत मुरडत होती. स्वत:च्याच धुंदीत असते, हे केतकीला जाणवू लागलं होतं. त्यातच बाहेरून तिच्या कानावर आलं की अस्मिता आजकाल एका मुलाबरोबर सतत असते. केतकीनं तिला यावरून टोकलं होतं. तिला स्पष्ट सांगितलं की, प्रेमप्रकरण नंतर करा आधी अभ्यास करा. पण अस्मिताने ‘हो गं आई, करीन अभ्यास मला कळतंय. तू सांगायची गरज नाही. पुढच्या सेमिस्टरला सोडवीन सगळे विषय. माझं काही कोणावर प्रेम नाही’ असं सांगून चक्क उडवून लावलं होतं. केतकीने मकरंदकडे तक्रार केली तर त्याने ‘मला माझी कामं कमी आहेत का म्हणून यात लक्ष घालू? तू आई आहेस ना मग घे बघून’ असं म्हणून अंग काढून घेतलं.
एक दिवस केतकीला त्यांच्या नेहमीच्या केमिस्टकडून फोन आला. तुमच्याकडे आजी आल्या आहेत त्यांच्यासाठी अस्मिता झोपेच्या गोळ्या मागत होती. पण तिच्याकडे प्रिस्क्रिप्शन नव्हतं म्हणून मला गोळ्या देता आल्या नाहीत. तिला क्लासला जायचं होतं म्हणून ती गेली. माझ्याकडे आज माणूस नाही तुम्ही प्रिस्क्रिप्शन घेऊन येता का मी लागलीच गोळ्या देतो. केतकीनं हो म्हणून फोन ठेवला. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. घरात कोणतीही आजी आलेली नव्हती, मग हिनं कोणासाठी गोळ्या मागितल्या, या विचारानं ती अस्वस्थ झाली. तिनं फोन करून अस्मिताला लागलीच घरी बोलावलं. ती पाच मिनिटांत घरी आली आणि तडक आपल्या खोलीत निघून गेली. तिचा पडलेला चेहरा पाहून तिच्या मागोमाग केतकी गेली आणि विचारलं, ‘तुला कोणत्या आजीसाठी झोपेच्या गोळ्या हव्या होत्या.’ अस्मिता किंचाळून पण रडक्या सुरात बोलून गेली, ‘‘जीव द्यायचा मला. त्या रोहनला मी नको आहे. ब्रेकअप झाला म्हणतो.’’ केतकीने तिच्यावर प्रश्नांचा भडिमार केला, ‘‘तुझं काही प्रेमप्रकरण नाही म्हणाली होतीस आणि आता ब्रेकअपच्या गोष्टी करतेस. कोण हा रोहन? किती दिवसांपासून अशी त्याला ओळखतेस की, त्याच्यासाठी जीव द्यायला निघालीस?’’ इतक्यात मकरंद आला. तिनं झाला प्रकार त्याच्या कानावर घातला. त्याला हे सर्व अनपेक्षित असल्यानं तो तर घाबरूनच गेला. न बोलता तिथेच बसून राहिला. एकीकडे अस्मिताचं मुसमुसणं चालू होतं. तिला एकटीला सोडू नकोस, असं सांगून केतकी चहा करायला निघून गेली.
मकरंदच्या डोक्यात विचारांनी थैमान घातलं, ‘‘हिला आपण समजूतदार समजत होतो. आताच दोन महिन्यांपासून असं उद्धटपणे, विचित्र वागायला लागली होती. रोहनच्या दोन महिन्यांच्या सो कॉल्ड प्रेमाखातर जीव द्यायला निघते? आई-वडील आहेत ना, त्यांचं काहीच नाही हिला? सगळं फुकट मिळतंय आणि खूप स्वातंत्र्य दिल्याचे परिणाम.’’ इकडे अस्मिताचे हुंदके वाढले होते. आता मात्र त्याच्या चिडचिडीची जागा काळजीने घेतली. अस्मिताला वाटतं होतं की, ‘‘इथे बाबा नुसते बसले आहेत पण एक अक्षर बोलत नाहीत. साधं जवळसुद्धा घेतलं नाही. आई तर सतत लेक्चर देत असते. कोणालाही मला काय वाटतंय हे कळत नाही आहे. त्यांना माझी काही पडलीच नाही. त्या रोहनसाठी तर जे तो म्हणायचा ते मी करायचे. आजकाल त्याचीही दादागिरी वाढली होती. याच्याशी बोलायचं नाही, हे करायचं नाही किंवा असंच करायचं. त्यातील किती तरी गोष्टी मला आवडायच्या नाहीत पण मी त्याच्यासाठी आनंदानं करायचे. परीक्षा जवळ आली आहे म्हणून अभ्यास करायचाय. आपण चार दिवसांनी भेटू म्हटल्यावर ब्रेकअपची भाषा केली. सतत त्याचंच ऐका. मला काही मतच नाही. त्याला पण माझी काही पडलेली नाही. मैत्रिणी मी त्याचं एवढं ऐकते म्हणून मला मूर्खातच काढायच्या. त्या त्यांच्या अभ्यासात गुंग आहेत. मला या जगात कोणीच नाही. मी अगदी एकटी आहे.’’ या विचारांनी तिला अजूनच रडू आलं. मकरंदनं तिला जबरदस्तीनं चहा पाजला.
इथे केतकीच्या डोक्यातले विचार थांबत नव्हते. ‘‘हिला अगदी फुलासारखी जपली. मी नोकरी करते. मुलांना वेळ देऊ शकत नाही म्हणून दर वर्षी मुलांना बाहेर ट्रीपला नेतो. आम्ही दोघंही हवं ते देतो त्यांना. किंबहुना कित्येक वेळा त्यांनी मागायच्या आधी कित्येक गोष्टी दिल्या. कधी कधी त्यांनी काही मागितलं आणि कुवतीच्या बाहेर असलं तरी आमच्या गरजा कमी करून मुलांना दिलं. कशाला नाही म्हटलं नाही. प्रत्येक परीक्षेला सुट्टी घेऊन घरी बसले आणि कोण तो रोहन आमच्यापेक्षाही तिच्यासाठी मोठा झाला? आई, वडील, भाऊ कोणीच नाहीत का हिच्यासाठी? काळजीनं डोकं बधिर झालंय.’’ हतबल होऊन ती फेऱ्या घालत बसली.
अस्मिताला डोळा लागला तसा मकरंद केतकीशी बोलायला आला. केतकी त्याला म्हणाली, ‘‘अभ्यास सोडून ही प्रेमप्रकरण करीत बसली आहे. पहिल्या सेमिस्टरला तीन विषयांत नापास झाली आहे. तोंडावर परीक्षा आली आहे आणि त्यात आता तो मुलगा घरच्यांच्यापेक्षा जास्त जवळचा झालाय हिला? ती अशी या वयात प्रेमात पडते हे आणि जीव द्यायचा विचार करते हे मला कळत नाही. आई-बाबा आपल्यासाठी झटतात तर हिला आई-बाबा सांगतात त्याप्रमाणे वागता येत नाही? ही माझी मुलगी? मी जन्म दिला हिला?’’ बोलता बोलता केतकीला रडूच फुटलं. मकरंदने हळुवार थोपटलं तिला. त्याच्या डोक्यात विचारचक्र चालू होतं, ‘‘माझी मुलगी म्हणजे माझाच एक भाग आहे आणि त्यामुळे तिने आपला सतत विचार करायला हवा, आपण म्हणतोय त्याचप्रमाणे वागायला हवं, असा केतकी हट्ट धरते आहे. आपण अस्मिताच्या बाबतीत फारच पझेसिव्ह होतो आहोत. वयानुसार होणारे भावनिक बदल, त्या रोहनविषयी वाटणारी ओढ आपण अमान्य करतो आहोत. ‘दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे’ या काव्यपंक्तींप्रमाणे तिच्या या वयात असं होणं नैसर्गिक आहे. पालक म्हणून या आधीच योग्य, अयोग्य काय या बाबतीत तिच्याशी सखोल चर्चा करायला हवी होती. त्या सगळ्यांचे होणारे परिणाम, दुष्परिणाम तिला विश्वासात घेऊन सांगायला पाहिजे होते. तिचे हे दिवस फुलण्यासाठी तिच्याबरोबर सहभागी व्हायला हवं होतं. आतापर्यंत तिच्या परिघात आपण घरातील माणसं, नातेवाईक, काही मैत्रिणी, कॉलेज अशा काहीच गोष्टींचा समावेश होता. पण हा परीघ आता मोठा होणार. केतकीशी बोलायला हवं.’’
केतकीचं रडणं थांबलं तसं मकरंद तिला म्हणाला, ‘‘तुला वाईट वाटणं, काळजी वाटणं साहजिक आहे. आपल्यापेक्षा तो मुलगा अस्मिताला महत्त्वाचा वाटतोय, ती आपल्याला काहीच बोलली नाही याचा धक्का बसणं, दुखावलं जाणं पण साहजिक आहे. पण ती आपलीच मुलगी आहे. तुला आठवतंय, तुला आवडलेला हिरे आणि मोत्यांचा हार घेण्यासाठी आपण किती बचत केली होती. मी काही दिवस ओव्हर टाइम करीत होतो. तूही घरातून काही कामं केलीस. तसेच कष्ट आपण आपल्या परिवारासाठी करतो. तो हिरे, मोती यांनी बनलेला सुंदर हार आहे. हार एकच आहे पण मोती आणि हिरा हे वेगवेगळे आहेत. हिरा हा हिरा तर मोती हा मोती आहे. तसंच आपल्या चौघांनी मिळून हे आपलं छान कुटुंब तयार झालं आहे. पण तरीही अस्मिता म्हणजे तू किंवा मी नाही. ती आपल्या शरीराचा हात, पाय यासारखा भाग नाही.’’
केतकीला पटलं. तिला आठवलं, सासूबाईंच्या बद्दल आपलीही हीच तक्रार होती की त्या मकरंद म्हणजे त्यांचं सर्वस्व असल्यासारखंच वागतात. अस्मिता आपल्यापेक्षा वेगळी व्यक्ती आहे. आपण फक्त पालक आहोत मालक नाही. मुलांना फक्त मोठं हो म्हणतोय. पण त्यांच्या मोठं होण्यात सहभागी होत नाही की त्यांना मोठं होणं म्हणजे काय हे समजावून सांगत नाही आहोत आणि आपण समजूनही घेत नाही आहोत तर आपण त्याचं मोठं होणंच नाकारतो आहोत.
आपल्या या कुटुंबातील हिऱ्याला आता अजून काळजीपूर्वक हाताळायला हवंय. त्याला काही पैलू पण पडायला हवेत. या विचारानं तिला थोडी उभारी आली. यावर तिनं आणि मकरंदनं अस्मिताशी तिच्या कला कलानं बोलून तिला यातून बाहेर काढायचं ठरवलं.
madhavigokhale66@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व आपुलाची संवाद आपुल्याशी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Parenting of young age and teenage girls

ताज्या बातम्या