scorecardresearch

ताणाचं नियोजन

किंबहुना या वाटण्यानेसुद्धा मला आलेल्या तणावामध्ये भर पडते

‘जसं आठवणींना नको म्हणतोय तसंच ताण असताच कामा नये, असं मला वाटतं आहे किंबहुना या वाटण्यानेसुद्धा मला आलेल्या तणावामध्ये भर पडते आहे. या ताणाचं योग्य ते नियोजन कसं करायचं आणि तो योग्य पद्धतीने हाताळून कसा कमी होईल, त्याचा त्रास कसा कमी होईल हे पाहायला हवं.’ असं ठरवून अस्मिता ताणाचं नियोजन करण्याकडे वळली.

अस्मिताला जर्मनीला पोहचून दहा दिवस झाले होते. पहिल्यांदाच ती सहा महिने घरापासून दूर, परदेशात राहात होती. घरातल्यांना सोडून ती इतके दिवस कधीच राहिली नसल्याने तिला सतत घरची आठवण यायची आणि रडू फुटायचं. घरच्यांनाही करमत नव्हतं. मकरंद तर खूप अस्वस्थ व्हायचा. त्याने तिला फोन केला, पण तिच्या कामाच्या वेळा सतत बदलायच्या म्हणून अस्मिताने तीच फोन करत जाईल असं सांगितलं. तिला तिथे वायफाय कितीही वापरता येत असल्याने फोन करता येणं शक्य होतं. पण दहा दिवसात अस्मितानं फक्त दोनदा फोन केला.

मकरंदला राग आला. त्याच्या मनात यायचं, ‘हिला जाऊन फक्त दहा दिवस झाले आहेत. परदेशाचं वारं इतक्या लवकर लागलं? इतक्यात कशी ती आम्हा तिघांना विसरली? इतकी बेजबाबदार कशी?..का तिथे काही तिला प्रॉब्लेम येतो आहे?’ रागाची जागा आता काळजीने घेतली. मकरंदने सांगितलं म्हणून केतकीने अस्मिताला फोन लावला. अस्मिताने लागलीच फोन उचलला, ‘‘मला कशाला फोन केलास? मला तुमची आठवण येत होती ना..’’ एवढं बोलून तिनं रडायला सुरुवात केली आणि फोन ठेवून दिला. केतकी चक्रावूनच गेली. आठवण आल्यावर मुलं घरी खूप फोन करतात किंवा पालकांना फोन करायला सांगतात. दिवसभरात खूप मेसेजेस करतात, पण हिचं काहीतरी जगावेगळंच होतं. आठवण आल्यावर फोन करायचा नाही किंवा साधा मेसेजपण करायचा नाही..? फोनच्या िरगने ती विचारातून बाहेर आली. अस्मिताचाच फोन होता. फोनवर अस्मिता रडतच बोलत होती. ‘‘मला फोन नका करत जाऊ. मला घराची, तुमची खूप आठवण येते..’’ तिने परत रडायला सुरुवात केली. केतकी तिला लागलीच म्हणाली, ‘‘फोन ठेवू नकोस. फोन नाही केलास तर घरची आठवण येणे बंद होणार आहे का? इतके दिवस तू फोन केला नाहीस त्याने काही फरक पडला का? आठवण येतच राहिली ना? तू कशी आहेस? तुमचा अभ्यास, काम प्रोजेक्ट कसा चालला आहे?’’ यावर अस्मिता भरभरून बोलत राहिली. तिथे प्रत्येकाला अजून एक प्रोजेक्ट करायला सांगितलं होतं. ते करताना तिला खूप शिकायला मिळत होतं आणि तिला ते खूप आवडत पण होतं. ती फोनवर बराच वेळ बोलली. आदित्यबरोबर त्यांचे नेहमीचे टाइमपास जोक्स पण करून झाले. मकरंदचा जीव भांडय़ात पडला.

फोन झाल्यावर अस्मिताला खूप बरं वाटलं. ती विचार करू लागली, ‘मला सगळ्यांची खूप आठवण येत होती म्हणून मला वाटायचं की घरातल्यांशी बोलून मला अजून त्रास होईल. पण झालं उलटंच, मला या फोनमुळे खूप बरं वाटलं. पण सगळ्या आठवणीही पुन्हा जाग्या झाल्या आहेत.’ तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. पण दुसऱ्या दिवशीची सगळी कामं तिला आठवली आणि तिनं मन लावून कामाला सुरुवात केली. थोडय़ाच वेळात ती काम करण्यात गुंग झाली.

हळूहळू अस्मिताचं प्रोजेक्टचं काम वाढू लागलं. अजूनही काही कामं वाढली. एकंदरीत तिच्यावरचा ताण वाढतच होता. हा ताण अस्मिताला कधी कधी असह्य़ व्हायचा. उगाचच इथे आलो. आपल्या हातून हे काम काही होणार नाही असं तिच्या मनात शंभर वेळा येई. कधीकधी तर या ताणाने तिचे हातपाय गार पडत. पोटात खड्डा पडे. तोंडाला कोरडही पडत असे. केतकीशी ती यासंबंधी बोलली होती. केतकीने सांगितलेले उपाय ती करत होती. शवासन करताना शरीर शिथिल व्हायचं पण विचार वाढायचे. प्राणायाम करून तिला फ्रेश वाटायचं, पण ते करतानाही विचार चालू असायचे. त्याच्यावर मात कशी करायची आणि या ताणातून मुक्त कसं व्हायचं हे तिला कळत नव्हतं. यावर उपाय म्हणून तिने ध्यान पण करायला सुरुवात केली. पण प्रोजेक्टचे विचार यायचे. त्याने अस्वस्थता वाढायची. मग घरची आठवण यायला सुरुवात व्हायची मग परत वाईट वाटायला लागायचं, रडू यायचं आणि परत ताण वाढायचा. असं हे दुष्टचक्र चालू व्हायचं. या सर्वातून दूर पळून जावं असं तिला वाटायचं. हळूहळू काम वाढत गेलं त्यामुळे टेन्शन वाढत गेलं. मकरंद आणि केतकी तिला समजवायचे. तेवढय़ापुरतं तिला बरं वाटायचं.

एकदा अस्मिता शवासन करत होती. नेहमीसारखे विचार यायला लागले. प्रथम तर माझ्या मनात विचार यायलाच नको, अशी तिची धारणा होती. असा विचार केला की तिच्या मनात दुप्पट विचार यायचे. त्याने तिची अस्वस्थता वाढत गेली. पण ती तशीच सतरंजीवर पडून राहिली. काही वेळाने तिच्या विचारात थोडी सुस्पष्टता यायला लागली. मनात विचार न येऊ  देण्याचा अट्टहास सोडून दिला. जसे विचार येतील ते तसेच बघण्याचा प्रयत्न केला. ‘‘मला आई, बाबा, आदित्य, मैत्रिणी, घर, कॉलेज भारतातल्या सगळ्यांचीच खूप आठवण येते आहे.. कारण या सगळ्याबद्दल मला खूप प्रेम, आदर, काही जिव्हाळा आहे. या सगळ्या गोष्टी खरं तर माझी ताकद आहेत. मग मला आठवण येऊन त्रास होतो म्हणून त्यांची आठवणच नको, घरच्यांशी बोलणंच नको असा विचार करणं योग्य नाही. मीच आदित्यला समजावून दिलं की मी त्याच्यापासून दूर जाणार याचं त्याला वाईट वाटतं आहे, त्यामुळे तो चिडचिड करतो आहे. पण अशीच काहीशी परिस्थिती माझी आहे जी मी स्वीकारत नाही आहे. किंबहुना फोन न करतासुद्धा त्यांची आठवण सतत मनात राहतेच आहे आणि त्यातून मी जराही बाहेर यायचा प्रयत्न करत नाही. परिणामी माझा अभ्यास नीट होत नाही. आठवणी गुलाबाच्या मंद सुवासासारख्या आहेत. आपण त्यांना गुलाबाच्या काटय़ांची तर जागा देत नाही आहोत? गुलाबाला काटे आहेत म्हणून आपण गुलाब टाकून देत नाही. काटे कसे टोचणार नाहीत हे बघतो. घरची आठवण येणं त्यातून थोडं भावुक होणं हे नॉर्मलच आहे. इथे असताना मला त्यांची आठवणच नको आणि त्याने होणारा त्रासही नको हा विचारच अविवेकी आहे. त्यांच्याशी बोलून होणाऱ्या आनंदाला मी फोन न करून मुकते आहे. आईने फोन केला तेव्हा मला खूप बरं वाटलं. एवढय़ा अंतरावरून बोलूनही त्यांचा आधार वाटला.’ फोनच्या िरगने तिला शवासनातून बाहेर यावं लागलं. तिच्या मैत्रिणीचा फोन होता.

पुढच्या काही दिवसांत तिच्या प्रोजेक्टच्या अभ्यासाची कठीणतेची पातळी वाढत गेली. शिवाय अजून एका प्रोजेक्टची भर पडली. तो प्रोजेक्ट दोघांनी मिळून करायचा होता. तिची जोडीदारीण जर्मनीची होती. तिची आणि अस्मिताची मतं जुळत नसत. क्वचितप्रसंगी वादही होत. त्यामुळे अस्मिताच्या तणावामध्ये भर पडली. कधी कधी तिला खूप उदास वाटायचं. अशा वेळी घरची खूप आठवण यायची. पण आता ती उदास वाटायला लागल्यावर घरी फोन करायची आणि प्रयत्नपूर्वक स्वत:ला समजावत असे, ‘मला आठवण येणार. थोडंसं भावुक झालो तरी हरकत नाही. मला माझं काम करायचं आहे.’ या बदललेल्या स्वगताने तिला बरं वाटायचं. थोडासा ताण कमी व्हायचा. पण परत काहीतरी व्हायचं आणि तिला तो ताण अस व्हायचं. त्यानं कधी कधी तिचं डोकं दुखायचं. एक दोन वेळा उलटय़ा पण झाल्या. तिला तिकडच्या डॉक्टरांनी औषधे दिली, पण औषधांनी झोप यायची. केतकीशी ती या विषयावर बोलली. तेव्हा अस्मिताला एक गोष्ट कळून चुकली की जसं आठवणींना नकोच म्हणतोय तसंच या ताणाच्या बाबतीतही म्हणतो आहोत. हा ताण मला असताच कामा नये असं मला वाटत आहे. किंबहुना या वाटण्यानेसुद्धा मला आलेल्या ताणात भर पडते आहे. त्यामुळं मला ताण यायलाच नको असं म्हणण्यापेक्षा काहीतरी ताणतणाव असणारच हे मान्य करायला हवं. या ताणाचं योग्य ते नियोजन कसं करायचं आणि उत्तम पद्धतीने हाताळून तो कसा कमी होईल, त्याचा त्रास कसा कमी होईल हे पाह्य़ला हवं.

म्हणून अस्मितानं अभ्यासातून जो वेळ मिळे त्यात या विषयावरची पुस्तकं वाचायला सुरुवात केली. वेगवेगळ्या पद्धतीनं माहिती गोळा करायला सुरुवात केली. तिला हळूहळू ताणाचं नियोजन कसं करायचं हे कळू लागलं होतं. हे तिला आईबरोबर शेअर करायचं होतं म्हणून तिने केतकीला फोन लावला.

( क्रमश:)

माधवी गोखले

madhavigokhale66@gmail.com

मराठीतील सर्व आपुलाची संवाद आपुल्याशी ( Apulachi-samvad-apulyashi ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tress management

ताज्या बातम्या