|| माधवी कुंटे

‘सेरेब्रल पाल्सी’मुळे बहुविकलांग असलेला अजित. त्याच्यातील गुणांना फुलवून अजितचे जीवन सुसह्य़ केले ते त्याच्या आईने, माधवी कुंटे यांनी. त्या सांगतात, ‘‘आपलं मूल विकलांग आहे हे कळलं आणि प्रथम धक्का बसला. पण त्यातून सावरलेल्या माझ्यासारख्या आईला एक असाधारण शक्ती प्राप्त होते, एक अल्लड, हौशी, फुलपाखराचे पंख ल्यालेली मी बावीसाव्या वर्षीच प्रौढ झाले होते.. ते जगणं नव्हतं तर विरघळणं होतं.’’

माझा मुलगा अजित दिवस पूर्ण होण्याआधीच जन्माला आला. देव आपल्यासमोर असे काही आव्हान निर्माण करेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. सातव्या महिन्यात जन्मलेल्या अजितच्या प्रसूतीमध्ये बरीच हेळसांड झाली, परंतु अजितच्या आयुष्याची दोरी बळकट होती आणि माझ्या मातृत्वाची परमेश्वराला सत्त्वपरीक्षा पाहायची होती, असे म्हणणे वावगे ठरू नये.

एकविसाव्या वर्षी लग्न, मनासारखा जोडीदार, नव्या नवलाईचे दिवस त्यातच बाळाच्या येण्याची चाहूल लागली. सारं घर आनंदून गेलं. पण मातृत्वाचे मधुर स्वप्न अजितच्या जन्मानंतर विरून गेलं आणि एक अल्लड हौशी, फुलपाखराचे पंख ल्यालेली मी बावीसाव्या वर्षीच प्रौढ झाले, नव्हे तसं व्हावं लागलं. एकतीस वर्षांपूर्वी म्हणजे १७ सप्टेंबर १९८७ या दिवशी वेगळं जगणं म्हणजे काय असतं हे आज शब्दात सांगणं अशक्य आहे. ते जगणं नव्हतं तर विरघळणं होतं. अजूनही बरीच वाटचाल बाकी आहे. मी एका विशेष मुलाची आई होणार आहे, असं कुणी भाकीत केलं असतं तर मी त्याला वेडय़ात काढलं असतं, पण जन्माला आलेलं आपलं मूल हे विकलांग आहे हे कळलं आणि प्रथम धक्का बसला. पण त्यातून सावरलेल्या माझ्यासारख्या आईला एक असाधारण शक्ती प्राप्त होते, प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत समर्थपणे जगाला सामोरे जाण्याची.

अजित ऊर्फ नंदन जन्मला तेव्हा फक्त ११०० ग्रॅ. वजनाचा होता. सहा महिन्यांपर्यंत कोणतीच हालचाल नव्हती. जन्मल्याबरोबर ऑक्सिजन कमी पडल्यामुळे शरीराचा तोल सांभाळणाऱ्या पेशींवर त्याचा परिणाम झाला आणि तो बहुविकलांग आहे म्हणून डॉक्टरांनी निदान केलं. एवढंच नाही तर त्याच्या बुद्धीवर आणि दृष्टीवरही त्याचा परिणाम झाला. जगाच्या पाठीवर याला कोणतेच उपाय नव्हते. ‘सेरेब्रल पाल्सी’  म्हणजेच बहुविकलांगता हे अपंगत्व त्याच्या वाटय़ाला आले. इथूनच माझी आणि माझे पती मोरेश्वर, आम्हा दोघांची कसोटी सुरू झाली. प्रत्येक दिवस परीक्षा पाहणारा होता, आजही आहे आणि पुढेही राहणार आहे. आम्ही दोघे त्याची सेवा, स्वच्छता, त्याला शिकवणं करू लागलो. हौसमौज हा शब्दच आयुष्यातून पुसला गेला. डोक्यात सतत त्याचाच विचार, त्याचीच काळजी. जन्मत:च एकमेकात गुंतलेले पाय, हातही वेडेवाकडे, दृष्टी अधू यामुळे अजितला त्याच्या हसण्या-बागडण्याच्या वयामध्ये सलाइन, इंजेक्शन, शस्त्रक्रिया यांना सामोरं जावं लागलं. फिजिओथेरपीशिवाय दुसरा उपाय नव्हता. नंतर शस्त्रक्रिया करून पाय एकमेकांतून सोडवले आणि उजव्या हातावर ‘मसल ट्रान्स्फर’ची शस्त्रक्रिया करून तो सरळ करण्याचा प्रयत्न केला. या सर्व शस्त्रक्रिया अवघड होत्या. हे सर्व स्वीकारणं, निभावणं माझ्याच वाटय़ाला का? असं सारखं वाटायचं. कधी संताप यायचा, टोकाचे विचार यायचे आणि निराशा, वैफल्य आणि ताण तर सतत डोक्यावर होतेच. पण अजितचं पालकत्व सुस होण्यासाठी आणि आठ मोठय़ा शस्त्रक्रिया झाल्या तो काळ सुसह्य़ होण्यासाठी मला नातेवाईक आणि मित्रपरिवाराची खूप मोठी मदत झाली. अजित अपंग आणि बहुविकलांग आहे याची कधीच लाज वाटली नाही.

वयाच्या पाचव्या वर्षांपर्यंत स्वत: तो उठूनही बसू शकत नव्हता. सतत गळणारी लाळ पुसावी लागायची, मग मी स्वत: फिजिओथेरपी शिकले. फिजिओथेरपी हा त्याच्यासाठी एकमेव आधार आणि उपायही होता. वाकडी मान सरळ करण्यासाठी मला त्याच्या मानेला सतत आधार देत बसावे लागे. मान सरळ होऊन लाळ गळणे पूर्ण बंद व्हायला १३ र्वष वाट पाहावी लागली. ही एक तपश्चर्याच होती आणि प्रत्येक क्षण परीक्षा पाहणारा होता. फिजिओथेरपी, शस्त्रक्रिया अशा उपचारांमुळे अजितमध्ये थोडा थोडा बदल होत होता. अशा प्रतिकूल परिस्थितीत लक्षात येत होती ती अजितची कमालीची सहनशीलता.

सरपटत पुढे कसे जायचे हेही त्याला घरामध्ये प्रात्यक्षिक करून शिकवलं, पण बाहेर जाताना त्याला कडेवर उचलूनच घ्यावं लागे. त्याचे बाबा कामावर गेल्यावर मात्र सर्व जबाबदारी माझ्यावरच असे. त्याला कुठे बाहेर/समारंभामध्ये घेऊन गेलो तर लोक विचित्र नजरेने पाहायचे. कडेवरच्या बाळाकडे कौतुकाने बघणारे किंवा उचलून घेणारे लोक माझ्या बाळाला मात्र लांबूनच बघत असत. लग्न समारंभ, बागेमध्ये, नातेवाईकांकडे जिथे जायचे असेल तेथे अजितला उचलूनच न्यावं लागायचं. त्याचं बालपण रम्य करण्याकरिता आम्ही त्याला १६ व्या वर्षांपर्यंत खांद्यावर बसवून, गर्दीमध्ये जाऊन गणपतीही दाखवले. अजितला समुद्रकिनाऱ्यावर फिरायला घेऊन गेलो.

हे सर्व करत असतानाच त्याला अपंगांच्या विशेष शाळेमध्ये प्रवेश घेतला. इथे नवीन प्रश्न समोर उभा होता तो म्हणजे त्याला बसने कडेवर घेऊन शाळेत जाणे आणि आणणे. बसमधून त्याला नेताना, चढताना, उतरताना मला ब्रह्मांड आठवे, पण मी हार मानली नाही. हळूहळू अजितला शाळा आवडू लागली. मग माझ्या लक्षात आलं की शाळेत शिकवलेली गाणी आणि घरामध्ये आम्ही शिकवलेले श्लोक तो उत्तमरीत्या पाठ करतो आहे. त्याची श्रवणशक्ती उत्तम आहे. दृष्टी अधू असल्याने मी गोष्टींची पुस्तके, त्याला आवडणारी गाणी मोठय़ा आकारामध्ये छापून घेतली आणि त्यावरून काही दिवस झोपलेल्या स्थितीमध्ये त्याला अक्षरओळख करून दिली. हळूहळू तो वाचू लागला, उत्तम वाचकही झाला. आजी आणि बाबांनी सांगितलेल्या गोष्टींमध्येही तो रमू लागला आणि आणखी एक देणगी आमच्या लक्षात आली ती म्हणजे त्याची स्मरणशक्ती. कथा, कवितेतील शब्दन्शब्द एवढंच काय, पण विरामचिन्हंही तो विसरत नाही.

देव काही सर्वच दरवाजे एकदम बंद करत नाही तर एखादा तरी दरवाजा उघडा ठेवतो तसंच काहीसं घडलं. त्याचे पाठांतर चांगले आहे हे लक्षात आल्यावर मी त्याला वक्तृत्व, नाटय़छटा, प्रासंगिक कथा अशा स्पर्धासाठी घेऊन जायला लागले. हा माझा निर्णय धाडसीच होता. सुरुवातीला मनावर दडपण असायचं. तो स्टेजवर सरकत जायचा. एकदा बोलायला लागला की त्याच्यातील कमतरतेची जाणीवही व्हायची नाही. अजितमध्ये खूप कमतरता आहे, मात्र ज्या गोष्टी, गुण त्याच्याकडे होते ते आम्ही फुलवले. अजित हळूहळू वेगवेगळ्या स्पर्धामध्ये बक्षिसे मिळवत गेला आणि माझा उत्साहही वाढत गेला. सतत वेगवेगळे विषय निवडून, त्याचे वाचन करून त्याची वेगवेगळ्या स्पर्धासाठी तयारी करून घेणं सुरू झालं. स्पर्धेला जाताना मात्र कडेवर उचलून न्यावं लागत असे.

सोळाव्या वर्षांपासून तो एल्बो क्रचेसच्या साहाय्याने दैनंदिन व्यवहार करू लागला. विशेष शाळांच्या नियमाप्रमाणे अठराव्या वर्षी अजितची शाळा बंद झाली, पण माझं घरी अभ्यास घेणं सुरूच होतं. मी स्वत: संगणक/इंटरनेट शिकून घरीच त्याला संगणक शिकवला. त्याच्या बाबांनी त्याला बाहेर फिरवण्यासाठी चारचाकी गाडी घेतली. आता अजित संगणकावर गाणी ऐकतो, यूटय़ूब सर्च करतो. त्याचबरोबर स्मार्ट फोनही उत्तमरीत्या वापरतो. हे सर्व मात्र त्याचा उजवा हात काम करत नसल्याने डाव्या हातानेच करतो. त्याने व्हॉट्सअ‍ॅपवर मित्रांचा ग्रूपही केला आहे.

अजित ३१ वर्षांचा आहे. आम्ही त्याच्यासाठी घरामध्ये दैनंदिन व्यवहारामध्ये सोपे जावे म्हणून अनेक सोयी केल्या आहेत. पलंग, बेसिन, लाइटची बटणे त्याच्या उंचीप्रमाणे केली असून ठिकठिकाणी आधारासाठी रॉड लावले आहेत.

अजितने कथाकथनामध्ये स्वत:चे नाव आणि वेगळा ठसा उमटविला आहे. पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, शंकर पाटील यांच्या कथांचे सादरीकरण करून, आपले अपंगत्वाचे दु:ख बाजूला सारून लोकांना आनंद देण्याचा प्रयत्न करीत असतो. हे सर्व चालू असताना वेगवेगळ्या आंतरमहाविद्यालयीन/ राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धामध्ये खुल्या गटात भाग घेऊन अनेक बक्षिसे मिळवत असतो. त्याने बी. ए. राज्यशास्त्र ही पदवीही उत्तमरीत्या संपादन केली आहे. त्याच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी सलग तीन्ही वर्षे मी स्वत: त्याच्याबरोबर सर्व लेक्चर्सना उपस्थित राहून त्याला घरीच शिकवले. या सर्वामागे त्याची जिद्द आणि चिकाटी ही फार महत्त्वाची ठरते. आत्तापर्यंतच्या या प्रगतीची दखल घेऊन राज्य सरकारने त्याला २०१४-१५ या वर्षीच्या ‘अपंग कल्याण राज्य पुरस्कारा’ने सन्मानित केले आहे.

आयुष्यभर त्याला जगण्याची उभारी देताना लढावं लागत आहे. असंख्य प्रश्न, अडचणी, अडथळे आहेतच, पण मी आणि त्याचे बाबा हा लढा लढतो आहोत, अजितला साथ देत आहोत आणि त्यातून उरलेले आयुष्य सुंदर अशा पद्धतीने आणि आनंदाने जगत आहोत..

mkunte10@gmail.com