हेमा होनवाड
‘‘ताई, नववीतल्या एखाद-दुसऱ्या मुलीला, सगळ्या विषयांत नापास झाली तरीही, आम्ही दहावीत ढकलतो.’’
‘‘का हो? अजून एक वर्ष नववीत राहिली, तर कोणाची तरी मदत घेऊन तिचा अभ्यास पक्का नाही का करून घेता येणार?’’
‘‘ताई, काय सांगू तुम्हाला, अहो, मुलगी त्याच वर्गात राहिली की त्या मे महिन्यात तिचं लग्न उरकलंच बघा! किती तरी मुलींची अशी लग्नं झालीत. आणि लगेच दुसऱ्या वर्षी बाळाला दाखवायला घेऊन येतात. ताई, आजही ग्रामीण भागात हीच परिस्थिती आहे. लग्न उरकण्याची आईवडिलांना घाई असते. त्याचा ताण सहन न होऊन निराशेच्या भरात पोरींनी जीवन संपवण्याची उदाहरणंही आम्ही पाहिली आहेत.’’ मी मराठवाड्यातल्या एका लहान गावातल्या शाळेला भेट द्यायला गेले, तेव्हा मुख्याध्यापक सांगत होते. सुन्न झालं मन! ‘‘दाटला अंधार मार्गी, खाचखड्डे माजले… तस्करांनी वेढिले …’’ ही परिस्थिती कधी आणि कशी बदलणार? असं वाटत असतानाच दोन मुलींची कर्तृत्वगाथा समोर आली.
मला भेटलेल्या सुषमा आणि अर्चनासारख्या निर्भय युवतीच हे खाचखळगे निश्चयानं ओलांडून मागून येणाऱ्या छोट्या पावलांसाठी हा बदल घडवून आणणार याची खात्री पटली. स्वत:चं भविष्य घडवण्यासाठी घराबाहेर पडून धैर्यानं आपल्या स्वप्नपूर्तीच्या दिशेनं चालायला सुरुवात केलेल्या या दोघी जणी. जालना जिल्ह्यात लहानाच्या मोठ्या झालेल्या अर्चना उबाळे आणि डॉ. सुषमा तांगडे. अर्चना तेवीस, तर सुषमा अठ्ठावीस वर्षांची आहे.
अर्चना छोट्याशा सोलगव्हाण गावात लहानाची मोठी झाली. शेतकरी कुटुंब. आईवडिलांनी शेतावर मनापासून प्रेम केलं. सहनशील आणि विचारी आजोबांचा प्रभाव अर्चना आणि तिच्या भावावर पडला. ‘‘जे काम करायचं आहे ते ‘आपलं काम’ म्हणून केलं तरच उत्कृष्ट होतं. नाही तर सगळ्यांना आणि स्वत:लाही त्रास होतो’’. हे त्यांचं सांगणं तिच्या मनावर ठसलं ते कायमचं. सुषमा जालना जिल्ह्यातील जांबसमर्थ गावात लहानाची मोठी झाली.
आज ती डॉ. सुषमा मीरा-जालिंदरराव तांगडे या नावानं ओळखली जाते. या छोट्या गावातल्या मुलीनं घराचा उंबरठा आणि गावाची वेस ओलांडून स्वत:ची स्वप्न सत्यात उतरवली. सुषमाच्या शब्दात, ‘‘ग्रामीण मुलीचं शिक्षण म्हणजे केवळ अभ्यास-परीक्षा नव्हे, तो संघर्षांचा, सामाजिक बंधनांना आव्हान देऊन स्वत:चा मार्ग स्वत:च तयार करण्याचा प्रवास असतो, मातीच्या सुगंधात रुजलेला आणि जिद्दीच्या पावलांनी उंच शिखर गाठणारा…’’
तिचेही आई-वडील शेतकरी. लहानपणापासूनच ही छोटी त्यांच्या जबाबदाऱ्या, संघर्ष, कष्ट आणि त्याग पाहतच मोठी झाली. मुलींच्या शिक्षणाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन प्रतिकूल होता. शिक्षण फक्त मुलांसाठी. त्यामुळे सुषमाच्या भावांना पाचवीतच शिक्षणासाठी बाहेर पाठवलं गेलं. पण मुलींना शिकण्यासाठी बाहेर पाठवायचं तर परिस्थिती, सुरक्षिततेचे प्रश्न आणि समाजाचं दडपण आड येतं. मात्र या दोघींची जिद्द जबरदस्त होती. त्यांनी दहावीपर्यंतचं शिक्षण गावामध्येच पूर्ण केलं. घरकाम पूर्ण करून मगच अभ्यासाला बसता यायचं. पण त्यांच्या मनात दृढविश्वास होता. काहीतरी मोठ्ठं करूनच दाखवीन! ही जिद्द होती.
दहावीनंतर शहरात जाऊन शिक्षण पूर्ण करण्याच्या तीव्र इच्छेला त्यांना मुरड घालावी लागली. शेवटी मुली होत्या ना त्या! अकरावी घरूनच पूर्ण करावी लागली. बारावीला मात्र सुषमा रोज जांबसमर्थ ते कुंभारी-पिंपळगाव असा प्रवास करायची. पदवीचा अभ्यास करायला आठ दिवसांतून एकदाच महाविद्यालयात जायची परवानगी मिळाली. पण ‘थांबायचं नाही’ हा तिचा निर्धार होता. पदवी मिळवल्यानंतर मात्र पदव्युत्तर शिक्षणासाठी शहरात पाठवणं घरच्यांना भाग पडलं. छत्रपती संभाजीनगर येथील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा’कडून तिला शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे घरच्यांवर तिच्या शिक्षणाचा आर्थिक भार पडू न देता वसतिगृहात राहून तिनं पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला.
राहण्याची जागा अडचणीची होती. आर्थिक चणचण तर होतीच. स्वत:च्या सुरक्षेबाबत सतत सावध राहावं लागायचं. पुढे एम. फिल. आणि पीएच.डी.चं उच्च शिक्षण घरच्यांना परवडणं शक्यच नव्हतं. सुषमानं रात्रीचा दिवस करून अभ्यास केला आणि ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था’ (सारथी) ही फेलोशिप मिळवली. ही केवळ आर्थिक मदत नव्हती, तर तिच्या मेहनतीची पावती; तिच्या स्वप्नांना मिळालेले पंख आणि स्वत:च्या ताकदीवर पुढे जाण्याची पहिली मोठी उडी होती.
विद्यापीठात प्रचंड स्पर्धेला, प्राध्यापकांच्या अपेक्षांना तोंड देत, लहानशा खोलीत अभ्यास करत होती सुषमा. मुलगी म्हणूनही संघर्ष होताच. संशोधनाचा ताण, वेळेची कमतरता, समाजाचा दबाव, घरून लग्नाचा आग्रह, आर्थिक अडथळे सुषमाला अधिक कणखर बनवत गेले. आई-वडिलांना शेतकरी कुटुंबातील मुलगी विद्यापीठात संशोधन करायला पोहोचली, याचा अभिमान होता. तिच्या मनात मात्र कायम कोणी शिक्षण थांबवेल की काय ही धास्ती असायची.
‘एवढं शिकून काय करायचं पोरीच्या जातीला?’च्या नसत्या चौकशांना तोंड द्यावं लागायचं. पण हाच संघर्ष तिचे विचार अधिकाधिक दृढ करत गेला. ‘माझ्या मागून येणाऱ्या मुलींसाठी मला मार्ग मोकळा करायचा आहे. मी जर यशस्वी झाले, तर आमच्या घरातील आणि गावातील मुली निर्धास्तपणे शिक्षणासाठी बाहेर पडू शकतील. आज अनेक मुलींना माझा प्रवास प्रेरणा देतो हेच माझं खरं यश आहे,’ हे तिला पूर्णपणे माहीत आहे. ती मुलींना सांगते, ‘‘परिस्थिती कितीही खडतर असली, तरी मोठी स्वप्नं पाहायला घाबरू नका!’’
अर्चनाचा प्रवास थोडी वेगळी वळणं घेत पण सुषमाच्या प्रवासाशी सुसंगत चालला आहे. अर्चनाच्या घरी भावाला आणि तिला कधी वेगळं वागवलं नाही. अभ्यासाबरोबरच मुलांसारखे विविध खेळ ती खेळायची. झाडांवर चढून फळं काढणं, उड्या मारणं, डोंगरावर भटकणं, दुचाकी चालवणं, मुलांचे कपडे घालणं, शेतातील पाण्याची मोटर सुरू करणं हे उद्याोग ती करायचीच पण त्याबरोबर स्वयंपाक, कविता लिहिणं, घरकाम, रांगोळी काढणं, वृद्धांची काळजी घेणं या गोष्टीही तिला मनापासून आवडायच्या.
‘सगळे सासू-सासरे नेहमी खाष्टच असतात.’ या समजुतीनुसार तिची आई आजी-आजोबांशी नीट वागत नसे. ते लक्षात आल्यावर होईल तितकी स्वत:च आजी-आजोबांची काळजी घ्यायची, असं अर्चनानं ठरवलं. दहावीचा निकाल आणि आजोबाचं हृदयविकाराच्या झटक्यानं अचानक हे जग सोडून जाणं एकाच वेळी घडून आलं. अत्यंत प्रिय व्यक्तीच्या जाण्यानं बसलेल्या धक्क्यातून सावरायला अर्चनाला खूप वेळ लागला. पंधरा वर्षाचं अडनिडं वय. आईच्या त्रासामुळे आजोबा गेले असं वाटल्यानं, ती पहिल्यांदाच आईशी जोरदार भांडली. दोन महिने तिच्याशी अबोला धरला. शेवटी आई मामाकडे निघून गेली. तेव्हा घराची सर्व जबाबदारी अर्चनावर आली.
हळूहळू समज वाढत गेली तसं आपण आईवर उगीचच रागावलो हे लक्षात आलं. पण त्या वयात ‘बरोबर-चूक आणि चुकीला शिक्षा’ एवढंच समजत होतं. आज या गोष्टीची खंत तिला सतावते. पुढे वाढत्या वयात शिक्षणाचं महत्त्व पटत गेलं. ‘‘कशाला शिकायचं? नंतर सासरी जाऊन काय दिवे लावणार? नियमित महाविद्यालयात जाण्याची काय गरज आहे?’’ असले टोमणे शेजारी-पाजारी आणि नातेवाईक मारायचेच. त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून तिनं जालन्याला वाणिज्य शाखेतून होस्टेलमध्ये राहून बारावी पूर्ण केली.
तेव्हा पैशांची खरी किंमत आणि कुटुंबाचं महत्त्व समजलं. इतरांबरोबर मिळून-मिसळून राहायला आणि वेळोवेळी आपले विचार ठामपणे मांडायला अर्चनाला जमू लागलं. भविष्यासाठी विचारपूर्वक योग्य निर्णय घेता येऊ लागले. नेतृत्वाच्या संधी मिळाल्या त्या उत्तम रीतीनं पार पाडल्या. मुलांबरोबर गटात काम करण्याचा अनुभव नवा होता. त्यातून मुलांशी छान निखळ मैत्री झाली. काही नकारात्मक अनुभव आले, ते न घाबरता हाताळता आले.
घरच्यांनी करोना साथीच्या काळात नात्यातल्या एका मुलाशी लग्न ठरवलं, तेव्हा पुढाकार घेऊन त्या मुलाला भेटली, त्याचे विचार जाणून घेतले. मुलींना कमी लेखण्याची त्याची वृत्ती टिपली, घसरत चाललेली त्याची जीवनमूल्यं, जगण्याची उद्दिष्टं यात प्रचंड तफावत तिला जाणवली. तो मुलगा योग्य नसल्याचं घरच्यांना न घाबरता, न भांडता ती छान पटवून देऊ शकली. हे सगळं धीटपणे तिनं केलं. एकीकडे स्वत:चा शोध घेणं सुरूच होतं.
शिक्षण, भविष्य, स्वातंत्र्य याचा अर्थ आणि समाजाची मुलीकडे पाहण्याची दृष्टी या विचारांच्या भोवऱ्यात मन गटांगळ्या खाऊ लागलं. प्रकृती बिघडत चालली. मायग्रेनचा त्रास सुरू झाला. निराशेनं घेरलं. सगळ्या आशा, स्वप्न निसटून जाऊ लागली. या जाळ्यातून आपणच स्वत:ला प्रयत्नपूर्वक बाहेर काढावं लागणार हे लक्षात आल्यावर तिनं निकराचे प्रयत्न केले, भावानं साथ दिली आणि तिच्या मनानं पुन्हा एकदा उमेदीनं शिक्षणाला प्राधान्य दिलं. ती जालन्याला वसतिगृहात गेली. तिथे काही मुलांनी त्रास दिल्यावर ‘दामिनी’ पथकाची मदत घेऊन धीरानं तिनं तो थांबवला. शिक्षण बंद करतील या भीतीनं घरच्यांपासून तिनं हा विषय लपवला.
पुढील शिक्षण चालू ठेवायला घरी कोणी हरकत घेतली नाही तेव्हा अर्चनाला पंखच फुटले. चित्र, लिखाण, कविता आणि एकांतातील शांततेची व्यक्त होण्यासाठी मदत व्हायची. ‘एकलव्य इंडिया फाउंडेशन संस्थे’च्या कार्यशाळेत सामाजिक क्षेत्रातील करियरच्या संधी आणि संस्था याविषयी माहिती मिळाल्यावर विचारांना स्पष्टता आली. तिनं जोमानं प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. दिल्लीला ‘केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालया’त इंटर्नशिपसाठी तिची निवड झाली.
मुलींना प्रगती करायची असेल तर शिक्षण आणि स्वावलंबनाशिवाय पर्याय नाही हे उमजल्यावर तिनं शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा निश्चय केला. ताईचं उदाहरण समोर होतं. ती सातवीत असताना ताईचं लग्न झालं. लग्नासाठी भरपूर पैसा ओतला, पण नवरा आणि सासू प्रचंड त्रास द्यायचे. तिनं घरी परत येऊन पुढील शिक्षण घ्यावं असं ठरवलं. पण समाज व नातेवाईकांच्या दबावामुळे तिला सासरी परत पाठवावं लागलं. अर्चनाला खूप वाईट वाटूनही काही करता आलं नाही. आता स्वत: घराबाहेर पडल्यामुळे तिच्यासारख्या इतर मुलींसाठी काम करण्याकरिता ती नक्कीच पावलं टाकणार आहे. तिनं लहान भावाला ‘सेंट्रल युनिव्हर्सिटी’च्या प्रवेश परीक्षेची तयारी करायला लावली आणि त्याची चांगल्या महाविद्यालयामध्ये निवड झाली.
दिल्लीहून परतल्यावर अर्चनाची ‘अझीम प्रेमजी विद्यापीठा’त निवड झाली, पण तिनं भावाच्या शिक्षणाला प्राधान्य देऊन स्वत: एका ग्रामीण शाळेत ‘फेलोशिप’ स्वीकारली. मन लावून वर्षभरात असंख्य जबाबदाऱ्या उत्कृष्टपणे पूर्ण केल्या आणि विद्यार्थ्यांवर भरभरून प्रेम केलं. यशाकडे अखंड झेप घेण्याची प्रेरणा तिच्या हृदयात तेवते आहे. या दोघींनी सेतू बांधला आहे. गावातल्या मुलींना मार्ग मोकळा करून ठेवला आहे आणि सांगताहेत, ‘‘रडू नका, कुढू नका, चला पुढे पुढे. उजेडच उजेड आता चहूकडे…’’
