लेखणीचे कडू औषध!

आरोग्यविषयक प्रश्नांचा पत्रकारितेच्या भिंगातून शोध घेणे ही काळाची गरज आहे.

आरोग्यविषयक प्रश्नांचा पत्रकारितेच्या भिंगातून शोध घेणे ही काळाची गरज आहे. केवळ डॉक्टर आणि आरोग्यसंशोधक यांच्या खांद्यावर सामाजिक आरोग्याच्या प्रश्नांना समजून घेण्याचे ओझे न टाकता वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या तज्ज्ञांनी या प्रश्नांची उकल करण्यास मदत केली तर विविधांगी दृष्टिकोन पुढे येऊ  शकतात. आरोग्य-पत्रकारितेला पुनरुज्जीवित करणे ही आज आपल्याकडच्या माध्यमांची जबाबदारी आहे.

सन १८८७ मध्ये, जोसेफ पुलित्झर या अमेरिकेतील प्रख्यात वृत्तसंपादकाच्या ‘न्यूयॉर्क वर्ल्ड’ वृत्तपत्राच्या कार्यालयात एक तडफदार युवती दाखल झाली. दूरच्या एका गावावरून आलेल्या या युवतीला कला आणि संस्कृतीविषयी लिहून कंटाळा आला होता. तिने संपादकांसमोर एक साहसी कल्पना मांडली. तिची विनंती ऐकून संपादक चक्रावले, पण तिने खूप विनंती केल्यावर ते अमलात आणायला कसेबसे राजी झाले. ती युवती घरी आली आणि अचानक तिला वेड लागल्यासारखी करू लागली, बाजूच्यांनी तिला एका स्त्रियांच्या हॉस्टेलमध्ये राहायला धाडले. रात्री तिने तिथे थैमान घातले, ती तिथल्या कर्मचाऱ्यांना प्रचंड घाबरत होती आणि लपून बसून आरडा-ओरडा करत होती.

कर्मचाऱ्यांनी कसेबसे तिला थोपवून ठेवले आणि सकाळी पोलिसांना बोलावले. दुसऱ्याच दिवशी न्यायाधीशाने तिला मानसिक रुग्ण ठरवून तडक वेडय़ांच्या इस्पितळात धाडले. तिथे तिच्यावर प्रचंड अत्याचार झाले. उंदीर आणि घुशींनी कुरतडलेले अन्न, थंड फरशांवर झोपणे, रात्री-अपरात्री अमेरिकेच्या थंडीत गार पाण्याने जबरदस्तीने घातलेल्या आंघोळी, त्यांना विरोध केल्यास नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांकडून होणारी मारहाण, असे प्रचंड अत्याचार तिला सहन करावे लागले. दहाव्या दिवशी थकूनभागून ती युवती जेव्हा सकाळी उठली, तेव्हा तिला घ्यायला ‘न्यूयॉर्क वर्ल्ड’ वृत्तपत्रांमधून काही कर्मचारी आले होते. ती युवती शांतपणे आपले सामान घेऊन तेथून निघून गेली आणि काहीच दिवसात, ‘टेन डेज इन अ मॅडहाऊस’ हा लेख नेली ब्लाय या लेखिकेच्या नावाने छापून आला. हा लेख छापून आल्यावर अमेरिकेतली जनता आणि सरकार हादरलेच. या इस्पितळासाठी चौकशी समिती नेमली गेलीच, पण एकूणच मानसिक रुग्ण आणि मानसिक रुग्णांना ठेवायच्या संस्था यांच्याबद्दल अमेरिकेत गंभीरपणे चर्चा सुरू झाली. या एका लेखामुळे अमेरिकेतील या संस्थांमध्ये आमूलाग्र कायदेशीर बदल झाला.

अशाच धडाकेबाज शोधपत्रकारितेचे उदाहरण अलीकडेच भारतातील एका संस्थेने दाखवून दिले. ‘डाऊन टू अर्थ’ हे मासिक तोपर्यंत फारसे लोकप्रिय नव्हते. रोज लाखो लोक ज्या शीतपेयांचा चवीने आनंद घेतात, त्या शीतपेयांमध्ये कीटकनाशके आणि काही इतर अपायकारक पदार्थ आहेत, असा संशोधनाचा अहवाल छापून आला. तो निकाल त्यांनी छापल्यावर एरवी सर्व समस्यांवर पैशाने मात करणाऱ्या शीतपेय कंपन्यांवर प्रथमच लोकांना उत्तर देण्याची जबाबदारी आली. अनेक आरोप-प्रत्यारोप झाले, पण शास्त्रशुद्धपणे केल्या गेलेल्या या रासायनिक चाचण्यांना आणि सखोल शोधपत्रकारितेला उत्तर देताना या कंपन्यांना अनेक कसरती कराव्या लागल्या. त्या लेखमालेमुळे ‘डाऊन टू अर्थ’ हे नियतकालिक आणि त्याच्या संपादक सुनीता नारायण घराघरात पोहोचल्या. एक मोठी आरोग्य समस्या जनतेसमोर आली. शीतपेयसेवन बंद अर्थातच झालेले नाही, पण आपण जे खातो-पितो ते सहजपणे सुरक्षित आहे असे मानणे किती फोल आहे, हे अनेक सुज्ञ लोकांना कळून चुकले.

पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाते. समाजाच्या सर्वागीण विकासासाठी मारक जे काही असेल त्या सर्वाविरुद्ध आवाज उठवणे हे पत्रकारितेचे कर्तव्यच आहे. पण लोकशाहीच्या ‘आरोग्या’बरोबरच सामाजिक आरोग्याच्या प्रश्नांवरसुद्धा रोखठोक, अभ्यासपूर्ण आणि कठोर टीका करणाऱ्या पत्रकारितेचे कडू औषध समाजाला मिळणे किती महत्त्वाचे असते, हे वरच्या दोन उदाहरणांवरून लक्षात येते. जगभरात अनेक ठिकाणी, आरोग्याच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर आरोग्य पत्रकारांनी प्रकाश टाकला आहे आणि अशा पत्रकारितेमुळे अनेकदा राष्ट्रीय पातळीवरचे आरोग्यविषयक कायदे बदलले आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अपटन सिन्क्लेअर या अमेरिकेतल्या धडाडीच्या पत्रकाराने केलेला कत्तलखान्यांमधील कामगारांचा आरोग्यविषयक अभ्यास.. एके दिवशी तो कोणालाही न सांगता शिकागोच्या कत्तलखान्यांजवळ येऊन राहू लागला आणि त्याने तेथील एका कत्तलखान्यात कामही केले. सात आठवडे तिथे काम केल्यावर सिन्क्लेअर अचानक तिथून गायब झाला आणि पुढच्या काहीच महिन्यांत त्याची ‘द जंगल’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली. अस्वच्छता, असुरक्षित कामाच्या जागा, अत्यंत अंधारी, पडकी घरे, तेथील अस्वच्छ पाणी आणि अन्न या सगळ्यांमुळे कत्तलखान्यातील कामगार आणि त्यांच्या कुटुंबांमध्ये उद्भवणारे रोग आणि अनारोग्यावर केलेली ती जहाल टीका होती. जनक्षोभामुळे या उद्योगातील कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी कायदा करावा लागला.

सामाजिक आरोग्यासंबंधी केली गेलेली शोधपत्रकारिता ही अनेकदा समाजाला काही मोठय़ा आरोग्याच्या धोक्यांपासून वाचवत असते. जेथे कधी संशोधकांचे किंवा आरोग्ययंत्रणेचेही लक्ष जात नाही अशा ठिकाणी ही पत्रकारिता पोहोचते. मुळातच, एखादी उत्तम, सापेक्ष वृत्तसंस्थाही समाजातील विविध घटकांचा आणि त्यांचा समाजावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करत असते. हे करता करता एकाच क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांना जे दुवे दिसत नाहीत असे काही दुवे त्यांना दिसत जातात आणि त्यातून मग नवनवीन शोधप्रकल्प जन्माला येतात. मिशेल डय़ूसील हा ‘मायॅमी हेरल्ड’ या प्रख्यात वृत्तपत्रातला छायाचित्रकार होता. अमेरिकेच्या राज्यकर्त्यांनी अत्यंत गाजावाजा करीत अमेरिकी सैनिकांना इराक-अफगाणिस्तानला धाडले खरे, पण परत आल्यावर मात्र या सर्व सैनिकांना मिळणाऱ्या अपुऱ्या वैद्यकीय सेवेकडे मात्र कोणाचे लक्ष नव्हते. डय़ूसील काही इतर कामाकरिता या विषयाकडे वळला असताना त्याला युद्धभूमीवरून परत आलेल्या, आरोग्यसेवेसाठी तिष्ठत राहणाऱ्या सैनिकांची दुर्दशा दिसली. त्याने यावर छायाचित्रमालिका करायचे ठरविले. अत्यंत संवेदनशील पद्धतीने काढलेल्या छायाचित्रांद्वारे त्याने शासनाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले. त्याच्या मालिकेला अनेक पुरस्कार तर मिळालेच, पण त्याने स्वत: म्हटल्याप्रमाणे, त्याला अधिक आनंद याचा झाला की या हलगर्जीची चौकशी करायला एक उच्चस्तरीय समिती नेमली गेली. छायाचित्रे, शब्द या पत्रकारांकडे असलेल्या आयुधांचा किती संवेदनशीलतेने, नेमकेपणाने आणि अभ्यासपूर्ण वापर करता येऊ  शकतो!

सामाजिक आरोग्य हे असे क्षेत्र आहे, ज्यात समाजात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे प्रतिबिंब दिसू शकते. समाजातील अन्याय, विषमता, पर्यावरणीय प्रश्न, राजकीय अस्थैर्य या आणि अशा अनेक घटकांचा प्रभाव जनसामान्यांच्या आरोग्यावर कळत नकळत होत असतो. या सर्व घटकांचा नैतिक मार्गाने सखोल अभ्यास आणि संशोधन करून विषय मांडण्याची पत्रकारितेतील क्षमता संपत चालली आहे, ही गोष्ट अमेरिकेतील पॉल स्टायजर या ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या माजी संपादकांना खटकत होती. संपूर्णपणे शोधपत्रकारितेला वाहून घेतलेल्या आणि विना-नफा तत्त्वावर काम करणारी जगातल्या अत्यल्प संस्थांपैकी अशी ‘प्रोपब्लिका’ ही संस्था स्थापन झाली. ‘प्रोपब्लिका’मध्ये आरोग्य या विषयासाठी चार पत्रकारांची राखीव फळीच काम करते आहे. डॉक्टरांना वैद्यकीय कंपन्यांकडून मिळणारे पैसे, त्यांच्याकडून लिहिली जाणारी चुकीची आणि घातक औषधांची प्रिस्क्रिप्शन्स, शस्त्रक्रियेदरम्यान होणारे मृत्यू आणि त्यानंतर रुग्णांना त्यासाठी भरपाई मिळण्यासाठी द्यावा लागणारा प्रचंड लढा या सगळ्यांवर ‘प्रोपब्लिका’ सातत्याने काम करत राहिले आहे. कायदेशीर दस्तऐवजांचा वापर करून त्यांनी ‘डॉलर्स फॉर डॉक्स’ हे एक अ‍ॅप विकसित केले आहे, ज्यातून नागरिक अमेरिकेतील प्रत्येक डॉक्टरचे नाव टाकून त्यांना औषध कंपन्यांकडून विविध मार्गानी मिळणाऱ्या पैशांची माहिती मिळू शकते. त्याचप्रमाणे, अनेक वर्षे कॉलोराडो या नदीचे होणारे प्रदूषण आणि त्याचा आरोग्यावर आणि त्यातून उद्भवणारी पाणीटंचाई यावरसुद्धा ‘प्रोपब्लिका’ने अमेरिकेचे लक्ष वेधले आणि ज्या प्रश्नाविषयी फारशी वाच्यता होत नव्हती अशा विषयावर सरकारला कार्यवाही करणे भाग पडले. ‘प्रोपब्लिका’चे वैशिष्टय़ हे की ती संस्था प्रत्येक विषयाची कसून तपासणी करते आणि सर्व बाजू तपासल्यावरच ती लेखमाला छापली जाते. अशा कामामुळे ‘प्रोपब्लिका’ने अनेकदा खासगी कंपन्यांना, डॉक्टरांना आणि शासनालाही त्यांनी लिहिलेल्या समस्येवर कार्यवाही करण्याकरिता दबाव आणला आहे. याचीच परिणती म्हणून ‘प्रोपब्लिका’ला त्यांच्या विविध लिखाणासाठी अवघ्या दहा वर्षांत तीन पुलित्झर पुरस्कार आणि इतर अनेक पुरस्कारांनी नावाजले गेले आहे.

जेम्स नाक्तवे हा छायाचित्रकार शोधपत्रकारितेची गरज समजावताना एकच शब्द वापरतो, व्हिजिबिलिटी, अर्थात समाजातल्या अन्यायाचं दृश्य स्वरूप समाजापुढे आणणे. आरोग्याच्या विषयांवर तर अशी पत्रकारिता अत्यंतच महत्त्वाची ठरते, कारण गुणवत्तापूर्ण आणि कार्यक्षम समाजाचा पायाच मुळात चांगल्या आरोग्याने बनतो. आरोग्याचा पाया कच्चा असताना समाजाचा विकास होणे शक्य नाही आणि जर शासकीय यंत्रणा हा पाया कच्चा राहू देत असेल तर त्याला ताळ्यावर आणून त्याचे काम चोखपणे करायला लावण्यासाठी आरोग्य-शोधपत्रकारिता हवीच!

सामाजिक आरोग्याला मदत होईल अशा प्रकारची पत्रकारिता आज भारतामध्ये कमी होत चालली आहे का? कित्येक वर्तमानपत्रे केवळ रुग्णांच्या समस्यांचे निराकरण करणे किंवा आरोग्यविषयक घडामोडींची निवडक बातमी छापणे इतकेच मर्यादित स्वरूपाचे योगदान देताना दिसतात. हे गरजेचे आहे परंतु पुरेसे नाही. आरोग्यविषयक प्रश्नांचा पत्रकारितेच्या भिंगातून शोध घेणे ही काळाची गरज आहे. केवळ डॉक्टर आणि आरोग्य संशोधक यांच्या खांद्यावर  सामाजिक आरोग्याच्या प्रश्नांना समजून घेण्याचे ओझे न टाकता वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या तज्ज्ञांनी या प्रश्नांची उकल करण्यास मदत केली तर विविधांगी दृष्टिकोन पुढे येऊ  शकतात. आरोग्य-पत्रकारितेला पुनरुज्जीवित करणे ही आज आपल्याकडच्या माध्यमांची जबाबदारी आहे. अन्यथा अनेक गंभीर समस्यांना वाचा फोडणारे हे अस्त्र आपण न वापरल्यास ते आपलेच मोठे दुर्दैव ठरेल.

मुक्ता गुंडी सागर अत्रे

gundiatre@gmail.com

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Marathi articles on health journalism