१९९९ ते २००६ या कालावधीत मेक्सिकोमधील पौगंडावस्थेतील बालकांमध्ये शीतपेये पिण्याचे प्रमाण दुपटीने वाढले तर स्त्रियांमधील हे प्रमाण तिपटीने वाढले. परिणामस्वरूप तेथील मधुमेहाचे प्रमाण दुपटीने वाढले. त्याच्यावर उपाय म्हणून अर्थमंत्रालयाने शीतपेयांवर १० टक्के सोडा कर लादण्याचा निर्णय घेतला. त्याचा योग्य परिणाम दिसू लागला आहे.

बांधकामावर काम करणारी मजूर मंडळी एका हातात जेवणाचा डबा आणि दुसऱ्या हातात एखाद्या लोकप्रिय शीतपेयाची भलीमोठी बाटली घेऊन कामावर निघाले आहेत, असे दृश्य आपण कधी ‘कल्पनेत तरी बघा’ म्हटले तरी बघू का? कदाचित नाही; पण मेक्सिकोसारख्या चिमुकल्या देशात मात्र हे दृश्य सर्रास दिसू लागले होते. ही गोष्ट १९९५-९६च्या आसपासची. रणरणत्या उन्हात कामावर निघालेली कामगार मंडळी सकाळी साइटवर चालत जाताना हातात पाण्याच्या नव्हे तर दोन लिटरच्या शीतपेयांच्या बाटल्या घेऊन चालत जाताना दिसू लागली. शीतपेय पिणे त्यांना सोयीस्कर, रुचकर आणि परवडणारे वाटू लागले होते – अगदी पाण्यापेक्षाही जास्त! एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला या शीतपेयांनी मेक्सिकोच्या जनमानसावर आणि राजकारणावर एवढा पगडा बसवला होता की, २००० च्या मेक्सिको देशाच्या अध्यक्षपदी निवडून आलेला डेमोक्रेटिक पक्षाचा सदस्य हा मेक्सिकोतील एका शीतपेय कंपनीच्या शाखेचा प्रमुख होता!

सामाजिक आयुष्यात अर्थातच याचे परिणाम वाढता वाढता मधुमेह, स्थूलपणा यांच्या रूपाने दिसू लागले तेव्हा शीतपेयांच्या परिणामांबाबत सर्वेक्षण करण्याची मोहीम हाती घेतली गेली. त्यातून समोर आले ते वास्तव फारच धक्कादायक होते. २००६ मध्ये मेक्सिको देशाच्या शासनातर्फे करण्यात आलेल्या आरोग्य आणि पोषण सर्वेक्षणात असे दिसून आले की, १९९९ ते २००६ या कालावधीत मेक्सिकोमधील पौगंडावस्थेतील बालकांमध्ये शीतपेये पिण्याचे प्रमाण दुपटीने वाढले होते, स्त्रियांमधील हे प्रमाण तिपटीने वाढले होते. या काळात स्त्रियांच्या कमरेच्या घेरामध्ये सरासरी ११ सेंटिमीटरची वाढ झालेली होती. ५ ते ११ वर्षांच्या बालकांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण ४० टक्क्य़ांनी वाढले होते आणि मेक्सिकोतील मधुमेहाचे प्रमाण तर या सहा वर्षांत दुपटीने वाढल्याचे दिसत होते. शीतपेयांच्या सेवनामुळे घडलेले हे उत्पात बघून राज्यकर्त्यांना मात्र घाम फुटला.. मेक्सिकोमध्ये उद्भवलेल्या या परिस्थितीला कोणताही एकमेव घटक कारणीभूत असणे अवघड होते; पण अनेक गुंतागुंतीच्या घटकांच्या लांबलचक साखळीतला सर्वात महत्त्वाचा आणि कमजोर दुवा शोधणार कसा?

मेक्सिकोतील आरोग्यमंत्र्यांनी आरोग्याच्या या जटिल प्रश्नावर तोडगा काढण्याकरिता मेक्सिकोमधील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ पब्लिक हेल्थ येथील शास्त्रज्ञ ज्युआन रिवेरा यांना या प्रश्नासाठी कारणीभूत असणारा एकमेव महत्त्वपूर्ण घटक शोधण्यास सांगितला. रिवेरा यांचे उत्तर तयार होते, ते होते- ‘शीतपेय’! ‘शीतपेय पिण्याचे प्रमाण कमी व्हायला हवे, कारण त्यात प्रचंड प्रमाणात साखर घातलेली असते,’ असे त्यांनी सुचवले. कसे कमी करायचे हे प्रमाण? शीतपेयांच्या आरोग्यास असणाऱ्या धोक्यांविषयी जागरूकता मोहीम राबवणे हा यावरचा एक उपाय होता; पण अशा प्रकारच्या मोहिमेला काही मर्यादा असू शकतात. जागरूकता वाढल्याने शीतपेये पिण्याची सवय बदलेलच याची खात्री फार कमी असते. मेक्सिकोसारख्या विकसनशील देशातील जनतेला एखादे उत्पादन खरेदी करण्यापासून परावृत्त करण्याच्या दृष्टीने त्या उत्पादनावरील कर वाढवणे हा एक महत्त्वाचा सुचलेला उपाय होता. मेक्सिकोतील आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेवरून २०१३ मध्ये तेथील अर्थमंत्रालयाने शीतपेयांवर १० टक्के आणि ‘जंक फूड’वर ८ टक्के कर लादण्याचा निर्णय घेतला. थोडक्यात, आधीपेक्षा शीतपेयांची किंमत १० टक्क्य़ांनी वाढली. शीतपेयांवर लादलेला हा कर मेक्सिकोतील ‘सोडा टॅक्स’ म्हणून प्रसिद्ध आहे. सोडा टॅक्समुळे सामाजिक आरोग्यावर परिणाम झाला का आणि झाला असल्यास नेमका किती आणि कसा, याविषयी ठोस पुरावे गोळा करण्याचे काम अजूनही आरोग्यशास्त्रज्ञ करीत आहेत; पण काही राजकारणी आणि अर्थातच, शीतपेये बनवणाऱ्या कंपन्या या कराच्या विरुद्ध पुरावे गोळा करण्यातही गुंतले आहेत! परंतु बॅरी पॉपकीन या प्रख्यात आहारतज्ज्ञाने केलेल्या अभ्यासानुसार डिसेंबर २०१४ मध्ये म्हणजेच कर अमलात आणल्याच्या एका वर्षांनंतर मेक्सिकोतील शीतपेये पिण्याचे प्रमाण १२ टक्कय़ांनी कमी झाले होते. आणखी एक सुखावह बाब म्हणजे निम्न आर्थिक स्तरातील जनतेमधील शीतपेये पिण्याच्या प्रमाणातही १७ टक्के घट दिसून आली. मेक्सिकोतील निम्न आर्थिक स्तरातील गटालाच मधुमेहासारख्या दुर्धर आजाराचा सगळ्यात जास्त आर्थिक फटका बसत होता.

‘पब्लिक लायब्ररी ऑफ सायन्स’च्या आकडेवारीनुसार मेक्सिकोतील शीतपेय पिण्याच्या प्रमाणात केवळ १० टक्के जरी घट झाली तरी त्यामुळे जवळजवळ एक लाख नव्वद हजार मेक्सिकन व्यक्ती मधुमेहापासून वाचू शकतील आणि वीस हजार मृत्यू कमी होऊ  शकतील. अर्थात, अजून या कराचे दूरगामी परिणाम कळायला थोडा वेळ द्यावा लागेल, परंतु या करामुळे मेक्सिकोने एक महत्त्वाचा पायंडा पाडला आहे, ज्याकडे सगळ्या जगाचे लक्ष आहे.

मेक्सिकोचे हे एक पाऊल या धोक्याला पूर्णपणे टाळू शकेल का? याचे उत्तर इतके सोपे नाही. हा कर लादण्याव्यतिरिक्त मेक्सिकोमधील अनेक स्वयंसेवी संस्थांनी अत्यंत हिरिरीने जनतेला शीतपेयांपासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. जनजागृती मोहिमा काढणे, शाळा, महाविद्यालये अशा महत्त्वाच्या ठिकाणी हा संदेश पोहोचविणे आणि शाळांमध्ये शीतपेये सहज उपलब्ध न करून देणे अशी अनेक पावले उचलली.

अमेरिकेच्या खाली वसलेला मेक्सिको हा देश आणि भारत यांच्यात एक महत्त्वाचे साम्य आहे. या दोन्ही विकसनशील देशांमध्ये ग्रामीण अर्थकारण महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. भारतातील ग्रामीण जनतेच्या वाढत्या जीवनावश्यक गरजा, वाढती क्रयशक्ती, शहरी जीवनाचा कळत-नकळत होणारा परिणाम आणि शीतपेय कंपन्यांची ग्रामीण भागातील उत्तम प्रसार यंत्रणा यामुळे भारतीय ग्रामीण भागातील शीतपेये पिण्याचा वाढीचा दर १९९९-२००६ या कालावधीत वर्षांला १९ टक्के इतका होता.

शीतपेयांच्या कंपन्यांचे राजकीय लागेबांधे, आर्थिक बळ आणि त्यांनी जनमानसावर मिळवलेला कब्जा या गोष्टी विचारात घेतल्या की, ‘कर लादणे’ ही साधीशी वाटणारी योजना किती जटिल असू शकते, हे आपल्या लक्षात येईल. तसेच ज्यादा कर लादल्याने सर्व आर्थिक स्तरांतील लोक शीतपेयांचा वापर कमी करतील का, हेही ठामपणे सांगणे कठीण. ते शोधून काढण्यासाठी पुढील अनेक वर्षे उत्तम दर्जाचे आणि पूर्वग्रहरहित असे संशोधन होणे गरजेचे असेल; पण मधुमेह-स्थूलपणा-कर्करोग-हृदयरोग यांचा समाजावर वाढत जाणारा विळखा घट्ट व्हायच्या आत आपण आपल्या परीने विविधांगी उपाययोजना केल्या पाहिजेत, एवढे तरी मेक्सिकोकडून शिकायला हवे.

उन्हातान्हात काम करणारी मेक्सिकोमधील ही कामगार मंडळी असोत किंवा भारतातील उच्चमध्यमवर्गीय घरातील तरुण-तरुणी असोत, शीतपेयांची तहान कुणाला चुकते? जाहिरातीत ‘ए दिल मांगे ..’ अशी आर्जव करणारी वाक्यं पेरली, की बघणाऱ्याचंही मन पाघळतं, हे शीतपेय कंपन्यांना चांगलंच ठाऊकअसतं.

मी काय खावं आणि प्यावं याचा निर्णय खरं तर स्वत:चा असतो, पण आजच्या काळात तो खरंच आपल्या हातात राहिला आहे का? मेक्सिकोमधील ही शीतपेयांवर तहान भागवणारी कामगार मंडळी किंवा आपल्याकडे शीतपेयाची जाहिरात पाहून हट्ट करणारे लहान मूल हे आजूबाजूला फोफावणाऱ्या खाद्यसंस्कृतीला त्यांच्याही नकळत शरण गेलेले असतात. लहान-लहान बाटल्या आणि कॅनच्या स्वरूपातून शीतपेय संस्कृती खेडय़ांमध्ये रुजवणे आजच्या मीडिया-सॅव्ही जगात फारसे अवघड राहिलेले नाही. एकीकडे २०३० पर्यंत सुमारे आठ कोटी भारतीय जनता मधुमेहाने ग्रस्त असेल, असे जागतिक दर्जाची आकडेवारी सांगते; तर दुसरीकडे भारतात शीतपेयांच्या सेवनाचे प्रमाण वाढावे याकरिता कंपन्या जोर लावीत आहेत, हे परस्परविरोधी चित्र सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक आहे!

सार्वजनिक आरोग्यशास्त्रात ‘सवय बदल’ अर्थात ‘बिहेवीयर चेंज’ या गोष्टीवर म्हणूनच मोठा ऊहापोह केलेला दिसून येतो. व्यक्तीच्या आरोग्यविषयक सवयी आणि निवड ही मुळातच तो राहतो तिथले वातावरण, त्या ठिकाणच्या आरोग्य योजना, त्या व्यक्तीचे कौटुंबिक जीवन आणि त्या व्यक्तीला उपलब्ध असणारे आरोग्यदायी पर्याय या सगळ्या घटकांवर ठरते. म्हणूनच सार्वजनिक आरोग्याचा विचार करताना केवळ व्यक्तिनिहाय उपाय शोधून चालत नाही तर समाजावर कळत-नकळत प्रभाव पाडणाऱ्या बारीकसारीक गोष्टींचा विचार करावा लागतो. शीतपेयांचा प्रभाव विरुद्ध माणसाची हतबलता या लढाईत माणूस हरू नये याकरिता मेक्सिको या लहानग्या देशाने केलेले प्रयत्न म्हणूनच महत्त्वाचे ठरतात!

मुक्ता गुंडी / सागर अत्रे

gundiatre@gmail.com