scorecardresearch

झिम्बाब्वेतील आजीबाईची ओसरी!

झिम्बाब्वेमधील अनेकांसाठी २००५ हे वर्ष दु:स्वप्न घेऊन उजाडलं.

झिम्बाब्वेमधील अनेकांसाठी २००५ हे वर्ष दु:स्वप्न घेऊन उजाडलं. तेथील शासनाने ‘ऑपरेशन रिस्टोअर ऑर्डर’ नावाची एक मोहीमच सुरू केली. या मोहिमेद्वारे बेकायदा बांधकामे, बेकायदा झोपडपट्टय़ा अक्षरश: काही दिवसांमध्ये जमीनदोस्त करण्यात आल्या. या मोहिमेमुळे लाखो लोकांचे प्रचंड नुकसान झाले, कित्येक जण बेघर झाले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बुडाले. झिम्बाब्वेमधील जनता तर या मोहिमेला ‘झिम्बाब्वेतील त्सुनामी’ असे संबोधू लागली!

हरारेमधील एका गावातही या मोहिमेमुळे अनेकांचे अतोनात हाल झाले. लोकांना धक्क्यातून सावरावे कसे ते समजेनासे झाले. आयुष्याची जपलेली पुंजी हरवल्याची भावना समाजात निर्माण झाली होती. अनेकांना नैराश्याने वेढले तर काहींना जीव नकोसा वाटू लागला. म्बारे गावातील बहुतांश लोकांनी त्यांना होणारा त्रास व्यक्त केला तो एका शब्दात- ‘कुफुन्गिसिसा’- अर्थात एखाद्या गोष्टीचा/घटनेचा अति विचार केल्याने होणारा मानसिक त्रास. त्यानंतर काही जणांनी शासनातर्फे विनामूल्य मानसिक उपचार होण्याची गरज व्यक्त केली. त्यांच्याकडे पैसे तर नव्हते पण विचारांच्या या वादळातून त्यांना वाट काढत पुढे तर जायचे होते!

ज्या प्रमाणात तेथील जनतेला मानसिक उपचारांची गरज निर्माण झाली होती ती पाहता एखादा डॉक्टर अथवा समुपदेशक नक्कीच पुरला नसता! ज्याप्रमाणे लहान-सहान उपचारांसाठी गावागावात आरोग्यसेवक काम करतात त्याप्रमाणेच मानसिक उपचारांसाठी लोकांना आपले वाटतील असे, समुपदेशनासाठी वेळ देऊ शकतील असे आरोग्यसेवक शोधता येतील का, यावर खल झाला. समुपदेशन हे यांत्रिकपणे करायचे काम नव्हे. रुग्णाच्या मनातल्या खोल भावना समजून-उमजून घेत, स्वत: शक्य तितक्या संवेदनशील तरीही विवेकी पद्धतीने त्यांना वाट दाखवत मानसिक त्रासातून बाहेर येण्यास मदत करण्यासाठी एक तर समुपदेशनाचे योग्य ज्ञान हवे, आवड हवी आणि वेळ हवा. मानसोपचार पुरवणारे आरोग्यसेवक या स्त्रिया असतील आणि त्यातही आजीच्या वयाच्या (साधारणत: वय वर्षे ५० पेक्षा जास्त) असतील तर उत्तम, असे समाजातील बहुतेकांचे म्हणणे पडले. त्यांच्याशी मनातले बोलताना कुठलाही अडसर येणार नाही, अशी त्यामागची भावना असावी. त्यांनी अशा जागेची आणि व्यक्तींची मागणी केली ज्यांच्यापाशी त्यांना मन मोकळं करता येईल, अर्थात त्यांच्या भाषेत- कुव्हुरा फुन्ग्वा!

हरारेतील म्बारे या गावात अत्यंत गर्दीच्या दवाखान्यात बाहेरच्या ओसरीत शास्त्रीयदृष्टय़ा तपासल्या गेलेल्या एका मानसिक उपचार पद्धतीची चाचणी करायची, असे ठरले. यालाच ‘फ्रेन्डशिप बेंच’ पद्धती असे नाव देण्यात आले आहे. मानसोपचारासाठी आलेल्या रुग्णाकडून प्रथमत: एक प्रश्नपत्रिका भरून घेतली जाते. या प्रश्नपत्रिकेत काही साधे परंतु महत्त्वाचे प्रश्न विचारलेले असतात. जसे की- ‘‘तुम्हाला झोप लागण्यात त्रास होतो का?’’, ‘‘इतक्यात तुम्ही फार चिंताग्रस्त आहात का?’’ या प्रश्नांबरोबरच रुग्णाची माहिती, तिला/त्याला असलेले आजार, आर्थिक परिस्थिती याची माहिती भरून झाल्यावर रुग्णाला आरोग्यसेवक आजीकडे पाठवले जाते. म्बारे येथील दवाखान्यातील आवारात लाकडी बाकडी टाकण्यात आली आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात बसलेल्या या हसतमुख आज्या कोणताही कृत्रिमतेचा आव न आणता शांतपणे रुग्णाचे म्हणणे ऐकून घेतात.

त्यांना उत्तम रीतीने ऐकून कसे घ्यायचे, याचे प्रशिक्षण दिले गेलेले असते. बहुतांश व्यक्तींना आर्थिक चणचण असते, असे लक्षात आल्यावर त्यांना स्थानिक लहान उद्योजकांशी जोडून देण्याचा प्रयत्नही या उपक्रमाद्वारे केला जातो. आजी आरोग्यसेविके सोबत साधारण ६ सत्रे पूर्ण केल्यावर रुग्णाकडून आधी भरून घेतलेली प्रश्नपत्रिका पुन्हा भरून घेण्यात येते, जेणेकरून रुग्णामध्ये नेमक्या कोणत्या बाबींमध्ये फरक पडला आहे, हे समजण्यास मदत होते.

एकून सहा सत्रांची आखणीही अतिशय पद्धतशीररीत्या केली गेली आहे. पहिल्या सत्राचा उद्देश असतो- रुग्णाची गरज, प्रश्न समजून घेणे, त्यावर विचार करणे आणि दुसऱ्या सत्राचा उद्देश असतो- (रुग्णाच्या परवानगीने) रुग्णाच्या घरास भेट देणे, कुटुंबाशी ओळख करून घेणे. तिसऱ्या सत्राचा उद्देश असतो- शक्य असणाऱ्या सर्व उपायांची पडताळणी करणे, गरजेनुसार रुग्णास योग्य व्यक्तींना जोडून देणे. चौथ्या सत्रात रुग्णास ध्येय साध्य करण्यासाठीचा आराखडा बनवण्यास मदत केली जाते. काही गृहपाठ दिला जातो. गरज असल्यास साहाय्यता गटाशी जोडून दिले जाते. पाचव्या सत्रात वाटेत असणाऱ्या अडथळ्यांना पार करण्यासाठी आखणी केली जाते. नेमके काय साध्य होते आहे, काय करताना अडचण येत आहे याविषयी मोकळेपणाने चर्चा केली जाते. शेवटच्या सत्रात सर्व सत्रांचा मागोवा घेतला जातो. गरजेनुसार काही चर्चा पुन्हा केल्या जातात. अडथळे पार होत नसल्यास तज्ज्ञांची मदत मागितली जाते व काहीच फायदा होत नसल्याचे आढळल्यास परिचारिकेकडे व नंतर डॉक्टरकडे पाठवले जाते. या सर्व सत्रांची मालिका डोळ्यांखालून घालण्याचे काम मानसशास्त्रज्ञ दर दोन आठवडय़ांनी करीत असतो तर मनोविकारतज्ज्ञ दर महिन्यातून एकदा या रुग्णांना तपासतो. अत्यंत पद्धतशीरपणे आणि शास्त्रीय मार्गाने आखलेल्या या फ्रेन्डशिप बेंच उपक्रमाने आजवर अनेक रुग्णांना मदत झाली आहे. यात हिंसाचाराने मानसिक धक्का बसलेले रुग्ण आहेत, एड्समुळे नैराश्य आलेले रुग्ण आहेत, तणावग्रस्त लोक आहेत तसेच एकटे पडलेले लोकही आहेत. या उपक्रमावर आधारित करण्यात आलेले संशोधन असे सांगते की, फ्रेन्डशिप बेंचचा प्रयोग नैराश्याने ग्रस्त असलेल्या रुग्णांना फायदेशीर आहे. या उपक्रमाचा फायदा मिळालेल्या रुग्णांशी या उपक्रमात सहभागी नसलेल्या रुग्णाची तुलना केली तर असे लक्षात येते की, फ्रेन्डशिप बेंचमधील सहभागी लोकांमध्ये आत्महत्या करण्याचे विचार तुलनेने पाच पटींनी कमी झाले.

फ्रेन्डशिप बेंचमधील आजी आरोग्यसेविका शेबा खुमालो आणि जॉयसी कुबे ‘द गार्डियन’ला दिलेल्या मुलाखतीत सांगतात, ‘‘आम्ही आधी कुणी त्यांच्या मनातलं सांगितलं की लगेच ‘मग हे करा, असं करू नका,’ असं सांगायची घाई करायचो. आता आम्हाला मिळालेल्या प्रशिक्षणानंतर विवेकनिष्ठ पद्धतीने प्रश्न ऐकून घेणे जमू लागले आहे. लोकांना आमच्याजवळ मन मोकळं करता येतं, हीच आमच्यासाठी जीत आहे!’’

झिम्बाब्वेमधील दर चार जणांपैकी एक जण नैराश्याने किंवा चिंतेने ग्रस्त आहे, असे अभ्यास सांगतो. परंतु १४ दशलक्ष जनतेला उपलब्ध असणारे मनोविकार तज्ज्ञ किती? तर, केवळ बारा! मानसिक आरोग्याची ही अत्यंत दयनीय परिस्थिती बदलायची असेल समाजाधिष्ठित मानसिक उपचार सेवा सुरू करणे अपरिहार्य आहे, हे झिम्बाब्वेच्या उदाहरणावरून लक्षात येऊ शकते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार भारतात सुमारे ४५ दशलक्ष नैराश्याचे रुग्ण आढळतात. भारतीय स्त्रियांमधील प्रसूतीनंतरच्या नैराश्याची टक्केवारी १५-२३ टक्के इतकी मोठी आहे. भारतातील दर १०० बालकांपैकी एका बालकाला नैराश्याने ग्रासलेले आहे, असे हा अभ्यास सांगतो, तर वृद्धांमध्ये ही टक्केवारी २१ टक्के इतकी प्रचंड आहे. एवढय़ा प्रचंड आणि गंभीर सामाजिक आरोग्याच्या प्रश्नाला भिडण्यासाठी आपल्याकडे मनोविकारतज्ज्ञ किती? तर १ लक्ष जनतेमागे ०.०७ इतके- म्हणजेच एक लक्ष जनतेमागे साधा एक मनोविकारतज्ज्ञही आपल्या देशात उपलब्ध नाही! ग्रामीण तसेच शहरी भागातही मानसिक आजारांविषयी, उपचारांविषयी अत्यंत त्रोटक माहिती असते. मानसिक आजाराविषयी असलेली भीती आणि लाज यामुळे कित्येक वेळा हा त्रास कुटुंबापासून लपवला जातो आणि त्यावर उपचार होत नाही.

ज्याप्रमाणे गडचिरोलीतील डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांनी गावातील बायकांना प्रशिक्षित करून बालमृत्यूचे प्रमाण आटोक्यात आणण्याचे मोठे काम केले आहे, त्याप्रमाणेच आपल्याच समाजातील घटकांना (आजी-आजोबांना?) प्रशिक्षित करून मानसिक रुग्णांना त्यांच्या व्यथा मांडण्यासाठी एक प्राथमिक व्यासपीठ उभे करणे गरजेचे आहे. हे व्यासपीठ ठिकठिकाणच्या ओसरीत असू शकते, बागांमध्ये असू शकते, शाळामध्ये असू शकते किंवा शेतातल्या पारावर असू शकते.

निसर्गाच्या सान्निध्यात, प्रेमाने ऐकून घेणाऱ्या माणसाकडे आपलं मन मोकळं करायची संधी उपलब्ध झाली तर नैराश्याकडे झुकणारा समाज स्वत:चा वेळीच तोल सावरू शकेल. शरीर आणि मन यांच्या अद्वैतात एकाकडे दुर्लक्ष करून कसे चालेल? फ्रेन्डशिप बेंच आपल्याला आपल्याच मनाशी मैत्री करण्याचा मंत्र देत आहे. आपण हा मंत्र कधी मनावर घेणार?

– मुक्ता गुंडी सागर अत्रे

gundiatre@gmail.com

मराठीतील सर्व आरोग्यम् जनसंपदा ( Arogya-jansanpada ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The friendship bench in zimbabwe

ताज्या बातम्या