डॉ. किशोर अतनूरकर

नॉर्मल की सिझेरियन? या बाबतीत रुग्ण आणि नातेवाईकांनी डॉक्टरवर विश्वास ठेवावा हे जसं योग्य आहे, तसंच डॉक्टरांनी देखील या विश्वासास पात्र असा संवाद, वागणूक आणि कृती ठेवणं आवश्यक आहे. डॉक्टर मुद्दाम सिझेरियन करतात ही भावना समाजात का निर्माण झाली या बाबतीत डॉक्टरांनी देखील आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. ‘सिझेरियन प्रसूतीचे अर्थकारण’ या लेखाचा हा भाग दुसरा.

Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…
peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये

सिझेरियन प्रसूतीच्या अर्थकारणासंबंधी अजून काही महत्त्वाचे मुद्दे आणि अनुभव वाचकांसमोर मांडणं गरजेचं आहे असं वाटतं.

काही महिन्यांपूर्वी, खासगी क्षेत्रात सिझेरियनचं प्रमाण खूप जास्त आहे आणि आर्थिक लाभासाठी म्हणून डॉक्टर सिझेरियन करतात याबाबत एक जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. याचिका कर्त्यांची मागणी अशी होती की, खासगी मॅटर्निटी होम्सच्या डॉक्टरांनी आपल्या रुग्णालयाच्या रुग्ण आणि नातेवाईकांना दिसेल या ठिकाणी, त्यांना समजेल या पद्धतीने, दर महिन्यात किती नॉर्मल बाळंतपणं झाली आणि किती सिझेरियन प्रसूती झाल्या याची आकडेवारीचा बोर्ड लावावा. त्यामुळे समाजाला समजेल की कोणत्या रग्णालयात सिझेरियनचं प्रमाण अधिक आहे, त्या रुग्णालयात आपण आपला रुग्ण बाळंतपणासाठी घेऊन जावा किंवा नाही हा निर्णय सोपा होईल.

असे बोर्ड लावण्याने खासगी क्षेत्रात जर भरमसाट प्रमाणात सिझेरियन होत असतील तर ते कमी होण्यास मदत होईल असं वाटत नाही. त्याचं कारण असं की प्रत्येक मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये दर महिन्यात काही नॉर्मल प्रसूती तर काही सिझेरियन कमी-अधिक प्रमाणात होत असतात, अमुक एका हॉस्पिटलमध्ये सिझेरियनचं प्रमाण समजा कमी आहे म्हणून एखादा रुग्णाने त्या हॉस्पिटलची निवड केली तर त्या रुग्णाचं सिझेरियन होणारच नाही ते बाळंतपण नॉर्मलच होईल याची खात्री कोण आणि कोणत्या आधारावर देणार? सिझेरियन आणि नॉर्मल प्रसूतीच्या आकडेवारीचा बोर्ड लावायला हरकत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. नाही तरी आम्हाला महानगरपालिकेला ही आकडेवारी द्यावीच लागते, त्याच माहितीचा बोर्ड लावायचा. ठीक आहे. पण असं केल्याने, एक नवीनच समस्या निर्माण होऊन, गोंधळात भर पडेल. लोकांना एक चर्चा करण्यासाठी विषय मिळेल. अमुक हॉस्पिटल असं तर तमुक तसं! सिझेरियनचं प्रमाण का वाढत आहे आणि ते कमी कसं करता येईल हा महत्त्वाचा प्रश्न सोडवण्यासाठी, या चर्चेचा काही उपयोग होणार नाही. प्रत्येक रुग्णालयात नैसर्गिक आणि सिझेरियन प्रसूती, काहींना काही प्रमाणात होत होत्या, होत आहेत आणि होत राहतील. एखाद्या हॉस्पिटलमध्ये या महिन्यात कमी तर दुसऱ्या महिन्यात जास्त. लोकांना हा विषय विनाकारण चर्चेला देण्यापेक्षा, सातत्याने एखाद्या हॉस्पिटलमध्ये, प्रमाणाबाहेर खूप अधिक सिझेरियन होत असतील, तर ते का इतक्या जास्त प्रमाणात होत आहेत, याची तज्ज्ञांमार्फत चौकशी करून, ते प्रमाण कमी करण्याबद्दल चर्चा होऊ शकते, किंबहुना, आकडेवारीत शंका घेण्यासाठी जागा आहे असं सिद्ध झाल्यास त्या डॉक्टरला ‘समज’ देता येऊ  शकते.

सिझेरियनच्या आकडेवारीकडे दुर्लक्ष करा, ज्या गर्भवती स्त्रीला सिझेरियनची आवश्यकता आहे, तिची सोय झालीच पाहिजे, या जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या सूचनेचा आदर करून, महाराष्ट्र शासन, ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयात, आवश्यक त्या रुग्णांची अतिशय ‘अवघड’ परिस्थितीत गैरसोय होऊ नये म्हणून त्या ठिकाणी सिझेरियनची सोय कशी उपलब्ध होईल याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी, सिझेरियन करणाऱ्या डॉक्टरांची त्रुटींची समस्या शासनाला भेडसावत आहे म्हणून, खासगी क्षेत्रातील डॉक्टरांना ते आवाहन करीत आहेत हे ठीकच आहे. त्या आवाहनात्मक जाहिरातीमध्ये एक विसंगती आढळून आली आहे. खासगी डॉक्टरांना त्या बदल्यात जो आर्थिक मोबदला दिला जाणार आहे त्यात एक अट अशी आहे की, पैसे मिळण्यासाठी महिन्यातून किमान पाच सिझेरियन झाले पाहिजेत. समजा एखाद्या महिन्यात, तीनच सिझेरियन झाले तर पूर्ण पैसे मिळावेत या हेतूने आणखी दोन सिझेरियन (आवश्यक?) केल्या जाण्याच्या शक्यतेला वाव आहे. अशा जाहिरातीने नकळत शासन अनावश्यक सिझेरियन करण्यास हातभार तर लावत नाही ना? या विसंगतीबाबत शासनाने आपली भूमिका अधिक स्पष्ट करणं अपेक्षित आहे.

आपल्या देशात ज्या काही आरोग्य सुविधा आहेत त्यात भरपूर विसंगती आहेत. काही ठिकाणी त्या सुविधांचं प्रमाण गरजेपेक्षा खूप जास्त आहे. अगदी मोजक्याच (श्रीमंत) लोकांना, गरजेपेक्षा लवकर या सुविधा प्राप्त होतात. याच्या विरुद्ध खूप कमी सुविधा, खूप जास्त (गरीब) लोकांना, खूप उशिरा प्राप्त होतात. या व्यवस्थेचा प्रभाव सिझेरियनच्या प्रमाणावर पडतो, हे देखील लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. आजकाल छोटय़ा शहरातील सिझेरियनच्या बिलापेक्षा मोठय़ा शहरातील नैसर्गिक प्रसूतीचं बिल जास्त असतं. नैसर्गिक प्रसूतीनंतर रुग्णाला काही समस्या नसेल तर २४ तासांत घरी पाठवता येतं. सिझेरियननंतर किमान चार ते पाच दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं, नैसर्गिक प्रसूतीच्या मानाने जास्त दिवस खोली गुंतून राहते, पाणी-वीज अधिकची खर्च होते म्हणूनदेखील, सिझेरियनचं बिल तुलनेने जास्त असतं. समजा एखाद्या रुग्णाचं २४ तास लेबर मॉनिटर केलं आणि नंतर काही कारणांमुळे तिचं सिझेरियन करावं लागलं तर फक्त सिझेरियनचंच बिल घेतलं जातं, लेबर मॉनिटिरगचे वेगळे पैसे न आकारण्याची पद्धत आजही छोटय़ा मॅटर्निटी होम्समध्ये आहे. मोठय़ा शहरातील मोठय़ा हॉस्पिटलमध्ये सिझेरियन झाल्यानंतर, लाख-दीड लाख रुपयांपर्यंतच बिल चुकवावं लागतं. अपत्यजन्माचा आपल्याकडे एक उत्सव किंवा सोहळा साजरा करण्याची रीत आहे. जो तो आपापल्या आर्थिक कुवतीप्रमाणे फक्त हॉस्पिटलच्या बिलावरच खर्च करतो असं नाही तर नंतर बारसं, वाढदिवस वगैरे अपत्यजन्माशी संबंधित प्रसंगावर खर्च करत असतो. मी माझ्या मुलीचं सिझेरियन अमुक हॉस्पिटलमध्ये केलं आणि अमुक इतके रुपये खर्च केले असं

अभिमानाने (!) सांगणारी माणसं आपल्या समाजात आहेत. श्रीमंत वर्गासाठी, अशा पद्धतीने खर्च करणे हा प्रतिष्ठेचा भाग झाला आहे असं आपण पाहतो. गरिबांना, ज्यांना उधार पैसेदेखील मिळत नाहीत त्यांना सरकारी रुग्णालयाशिवाय पर्याय नाही. मध्यमवर्गीय लोकांची अवस्था नेहमीप्रमाणे ना इकडची ना तिकडची. चांगल्या सुविधा तर पाहिजेत पण कमी पैशात, अशी त्यांची मानसिकता असते.

सिझेरियनचं प्रमाण जास्त कारण ते करण्याने मिळणारा पैसा जास्त हे एक वेळेस मान्य केलं तरी सिझेरियन म्हणजे सर्व काही सुरक्षित असं मानण्याचं काही कारण नाही. सिझेरियन प्रसूती करण्याच्या सोयी सर्वत्र उपलब्ध झाल्या आहेत, डॉक्टर आणि रुग्णाच्या दृष्टिकोनातून सिझेरियन या शस्त्रक्रियेकडे नैसर्गिक प्रसूतीसाठी सहज सोपा पर्याय म्हणून पाहिलं जात आहे. असं असलं तरी शेवटी ती एक मोठी शस्त्रक्रिया आहे. सिझेरियन आईच्या आणि बाळाच्या जिवावर बेतू शकतं. सिझेरियन झालेल्या स्त्रीच्या प्रकृतीवर दूरगामी आणि कायमचे परिणाम होऊ शकतात. याबाबतीत रुग्ण आणि नातेवाईकांना माहिती अवगत करून देणे, त्यांना सावध करणे हे देखील डॉक्टरचं काम आहे. एक काळ होता, जेव्हा सिझेरियन या शस्त्रक्रियेकडे अगदी शेवटचा पर्याय म्हणून पाहिलं जायचं, आज कदाचित सिझेरियन हा पहिला पर्याय आहे की काय असं म्हणण्यासाठी वाव आहे.

नॉर्मल का सिझेरियन या बाबतीत कितीही चर्चा केली तरी ‘वेळ’ आल्यानंतर डॉक्टरवर विश्वास ठेवणे हा एकच पर्याय असतो. रुग्ण आणि नातेवाईकांनी डॉक्टरवर विश्वास ठेवावा हे जसं योग्य आहे, तसंच डॉक्टरांनी देखील या विश्वासास पात्र असा संवाद, वागणूक आणि कृती ठेवणं आवश्यक आहे. अधिकचे पैसे मिळतात म्हणून डॉक्टर मुद्दाम सिझेरियन करतात ही भावना समाजात का निर्माण झाली या बाबतीत डॉक्टरांनी देखील आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. काही डॉक्टर जर जास्तीचे पैसे मिळतात म्हणून नॉर्मल होणाऱ्या रुग्णाचं मुद्दाम सिझेरियन करत असतील तर या वृत्तीस पायबंद घालण्याचं काम आम्हा डॉक्टरांचंच आहे, असं मी समजतो.

atnurkarkishore@gmail.com

chaturang@expressindia.com