चैताली कानिटकर Chaitalikanitkar1230@gmail.com
ही गोष्ट आहे आसामच्या २३ वर्षांच्या मुलीची- टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला बॉक्सिंगमध्ये कांस्यपदक जिंकून देणाऱ्या लवलिना बोर्गोहाइनची.

आसामच्या गोलाघाट जिल्ह्य़ातील बारोमुखिया या अतिशय लहानशा खेडय़ात     २ ऑगस्ट १९९७ रोजी टिकेन आणि मामानी बोर्गोहाइन यांच्या घरी हे कन्यारत्न जन्माला आलं. आर्थिक परिस्थिती बेताचीच असणारं हे कुटुंब. वडील शेतकरी. चहाच्या मळ्यात काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह ते चालवायचे.

लवलिनाला दोन मोठय़ा जुळ्या बहिणी आहेत- लिमा आणि लीचा. बालपणीपासून आपल्या दोन्ही बहिणींना मू-थाई हा (बॉक्सिंग व तायक्वांदो यांचा एकत्रित क्रीडाप्रकार) खेळताना ती पाहायची. ‘तुम्ही मुली असूनसुद्धा काही वेगळं करून स्वत:ला सिद्ध केलं पाहिजे,’ असेच संस्कार आईवडिलांनी लहानपणापासूनच त्यांच्यावर केले होते. लवलिना लहान असताना एक प्रसंग तिच्या आयुष्यात बॉक्सिंग खेळाची पाळंमुळं रोवून गेला.  एकदा लवलिनाच्या वडिलांनी मिठाई आणली, ती ज्या वर्तमानपत्रात बांधलेली होती त्यात मोहम्मद अली या बॉक्सिंगपटूची यशोगाथा छापून आली होती. वडिलांनी लवलिनाला ती वाचून दाखवली. तो क्षण तिचं आयुष्य बदलवणारा ठरला. ती सांगते, ‘मोहम्मद अली यांच्याविषयी पहिल्यांदा त्यावेळी ऐकलं आणि बॉक्सिंग हा काय खेळ आहे हेही समजलं. तिच माझी प्रेरणा ठरली. ’’

बारोमुखिया गावात मार्शल आर्ट्स, बॉक्सिंगचं प्रशिक्षण केंद्र नव्हतं. त्या वेळी शाळेकडून गुवाहाटी येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणात तिला पाठवण्यात आलं आणि तेथील प्रशिक्षक पदम बोरो यांनी तिच्यातले गुण हेरले. बॉक्सिंग सरावासाठी घरापासून लांब गुवाहाटीला तिला राहावं लागलं. घरापासून एकही दिवस दूर न राहिलेल्या लवलिनासाठी हा परीक्षेचा काळ होता. ती म्हणते, ‘ते दिवस माझ्यासाठी खूप जिकिरीचे होते. रोज रडू यायचं, पण ते मी जिद्दीनं पूर्ण केलं.’’ त्यानंतर लवलिनानं राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदकं जिंकली. अतिशय मानाचा अर्जुन पुरस्कारदेखील मिळवला.

अनेक वर्षांच्या सरावानंतर, अनेक स्पर्धा जिंकल्यानंतर टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्यावर सुवर्णपदक जिंकण्याचं स्वप्न तिनं उराशी बाळगलं होतं. त्यानंतर उच्चस्तरीय प्रशिक्षण सुरू झालं. मात्र करोनानं साऱ्या जगभर थैमान घातलं आणि ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलली गेली. ती शिबिरातून पुन्हा ती घरी आली. घरी आल्यानंतरसुद्धा सतत इतर बॉक्सिंगपटूंच्या चित्रफिती पाहाणं सुरू होतंच. वडिलांबरोबर शेतात मदत करणंसुद्धा सुरू होतं. याच काळात तिची आई मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त झाली होती. तिचं खेळात लक्ष लागेना. आईची मूत्रपिंड रोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर लवलिना पुन्हा ऑलिम्पिकच्या तयारीला लागली. पण गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये शिबिरात सामील झाल्यानंतर पाच दिवसांत लवलिनाला करोनाची लागण झाली. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याचे स्वप्न अधुरे राहणार का, अशी चिंता तिला भेडसावू लागली. परिणामी इटलीतील विशेष सराव शिबिराला मुकावे लागले. त्याशिवाय दोन बॉक्सिंग स्पर्धामधूनही माघार घ्यावी लागली. जवळपास दोन महिन्यांनी रिंगणात परतल्यावर असंख्य आव्हानांचा सामना तिला करावा लागला. परंतु प्रशिक्षकांसह अनेकांनी तिला या काळात सातत्यानं मानसिक पाठबळ दिल्यामुळे ती टोक्यो ऑलिम्पिकमध्ये उत्तम कामगिरी करू शकली.

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये चेहऱ्यावर हास्य ठेवून रिंगणामध्ये उतरलेल्या लवलिनानं तुर्कीच्या विद्यमान विजेत्या सुरमेनेलीविरुद्ध रोमहर्षक लढत दिली आणि कांस्यपदकाला गवसणी घातली. ‘लवलिना, खूप उत्तम लढलीस. बॉक्सिंग रिंगणामधील तुमचं यश अनेक भारतीयांना प्रेरणादायी आहे. कांस्यपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन आणि भविष्यासाठी अनेक शुभेच्छा,’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून तिचं खास कौतुक झालं. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अनुकूलता प्राप्त करणाऱ्या, सतत सकारात्मक राहाणाऱ्या आणि लहान वयात यशाचं उत्तुंग शिखर गाठत भारताच्या शिरपेचात मानाचं पदक खोवणाऱ्या लवलिनाचं यश देशासाठी प्रेरणादायीच आहे.