scorecardresearch

Premium

गद्धेपंचविशी : आत्मविश्वासाची पायाभरणी!

सक्षम ‘बिझनेसवुमन’ म्हणून आत्मविश्वास कमावण्याचा काळ म्हणजे माझी विशी ते तिशी ही दहा वर्ष..

गद्धेपंचविशी : आत्मविश्वासाची पायाभरणी!

सुलज्जा फिरोदिया मोटवानी chaturang@expressindia.com

‘‘माझा जन्म मोठय़ा उद्योजक कुटुंबातला. त्यामुळे माझ्या बाबतीत दोन गोष्टी सहज शक्य होत्या. शिक्षणानंतर लगेच दुसऱ्या मोठय़ा कु टुंबातल्या मुलाशी लग्न करून ‘सेटल’ होणं किं वा घरच्याच व्यवसायात थेट मोठय़ा पदावर रुजू होणं. पण हे दोन्ही न करता मी आधी अमेरिके त नोकरी करून अनुभव घेण्याचा निर्णय घेतला. भारतात परतल्यावर मार्के टचं ज्ञान मिळवण्यासाठी देशभर फिरायचा निर्णयही याच काळातला. सक्षम ‘बिझनेसवुमन’ म्हणून आत्मविश्वास कमावण्याचा काळ म्हणजे माझी विशी ते तिशी ही दहा वर्ष..’’ सांगताहेत ‘कायनेटिक इंजिनीअरिंग’च्या उपाध्यक्ष आणि ‘कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्यूशन्स’च्या संस्थापक व प्रमुख कार्यकारी अधिकारी सुलज्जा फिरोदिया मोटवानी.

Gutami sai mrunmayi
गौतमी देशपांडे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला करतेय डेट? सई ताम्हणकरच्या कमेंटवर उत्तर देत मृण्मयी म्हणाली…
gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
Ajit Pawar on Sharad Pawar Praful Patel Photo
पक्षातील बंडखोरीनंतरही शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांचा एकत्र फोटो, चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

आमचं कु टुंब उद्योजकांचं. भारतातील दुचाकी वाहनांच्या क्षेत्रात प्रचंड काम करणारे आणि ज्यांना अनेक जण आपली प्रेरणा मानत ते ‘कायनेटिक’चे अध्वर्यू एच. के  फिरोदिया माझे आजोबा. त्यामुळे घरात उद्योगाचं वातावरण होतंच, त्यात काही नवल नाही; पण माझं कु टुंब आणखी एका गोष्टीसाठी मला खास वाटत आलं आहे, ती म्हणजे देशप्रेरणा आणि साधेपणा. स्वातंत्र्यलढा जवळून पाहिलेल्या माझ्या आजी-आजोबा दोघांनी गांधीजींच्या सत्याग्रहात भाग घेऊन तुरुंगवासही भोगला होता.उद्योग-व्यवसाय करताना देशाला काही तरी चांगलं देणं हा उद्देश असावा, ही भावना लहानपणापासून आमच्या कानावर पडत होती.

रोजच्या जेवणासाठी एकत्र टेबलापाशी बसल्यावर किं वा सणासुदीला नातलग जमल्यावर मोठय़ांच्या ज्या गप्पा होत, त्या याच स्वरूपाच्या असत. देशाच्या प्रगतीसाठी आणि लोकांचं दैनंदिन आयुष्य सुकर करण्यासाठी उद्योजक म्हणून काय करता येईल, हा मुद्दा केंद्रस्थानी असे. घरात मुलामुलींच्या शिक्षणाला फार महत्त्व होतं. मला अगदी लहानपणापासून हे सगळं फार आवडायचं. आजोबांबरोबर मी त्यांच्या ऑफिसात जात असे, त्यांना काम करताना पाहात असे, त्यांच्या ऑफिसच्या भिंतींवर काही तरी गिरगटून, लिहून ठेवत असे, तेही सगळ्यांना कौतुकानं नातीचं लिखाणकाम म्हणून ते दाखवत. या सगळ्या वातावरणामुळे उद्योग क्षेत्राबद्दल मला ओढ निर्माण होणं साहजिक होतं. त्यामुळे मी पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आणि १९ वर्षांची असतानाच  व्यवस्थापनशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी अमेरिके त पेन्सिल्वेनियामध्ये ‘कार्नेजी मेलन युनिव्हर्सिटी’त दाखल झाले. ‘एमबीए’ला प्रवेश घेणाऱ्या व्यक्तीला उद्योगातील काही वर्षांचा अनुभव असणं हे गृहीत धरलेलं असायचं; पण मला या विषयात असलेला रस, परीक्षांमधील उत्तम गुण आणि आमच्या कु टुंबाचं उद्योगातील योगदान या सर्व गोष्टींचा विचार करून तुलनेनं लहान वयाची असूनही माझा त्या प्रवेशासाठी विचार करण्यात आला. २१ वर्षांची असताना ‘एमबीए’ पूर्ण करून प्रत्यक्ष या क्षेत्रात येण्यासाठी मी उत्सुक होते. त्या वेळी मी असं ठरवलं की, लगेच भारतात परतायचं नाही. काही वर्ष  अमेरिके तच राहून दुसऱ्या कं पनीत काम करायचं आणि पुरेसा अनुभव घ्यायचा. अमेरिके सारख्या प्रगत राष्ट्रामध्ये कॉर्पोरेट कं पन्यांचं व्यवस्थापन कसं चालतं, हे जाणून घेणं मला उपयोगी पडेल, असं वाटत होतं. ‘बारा इंटरनॅशनल’ या फायनान्स क्षेत्रातील कं पनीत मला लगेच नोकरी मिळाली आणि पुढची चार वर्ष मी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये नोकरी के ली. अमेरिके त शिकण्याचा आणि नोकरी करण्याचा हा काळ मला माझ्या करिअरच्या दृष्टीनं निश्चित वाट दाखवणारा होता. उद्योगासाठीचा माझा असा एक खास दृष्टिकोन या वर्षांमध्ये तयार झाला.

आधी सांगितल्याप्रमाणे माझं कु टुंब पुरोगामी विचारांचं असल्यामुळे घरातल्या मुलींना विविध संधींचा फायदा करून घेण्यासाठी, अनुभव घेण्यासाठी वाव मिळत होता. नव्वदच्या दशकात मारवाडी कु टुंबांमध्ये हे सर्रास दिसत नसे. अमेरिके त स्वत:चं घर स्वत: चालवणं, चारचाकीचा परवाना काढणं, तिथे मोटार चालवणं, दैनंदिन जीवनात काही प्रश्न आले तर ते सोडवणं, नोकरी सांभाळून सगळ्याची सांगड घालणं, हे सर्व मी प्रथमच करत होते. अमेरिकन समाज आपल्या तुलनेत खूप मोकळ्या विचारांचा आहे, हे जाणवत होतं. लोकांची स्वत:ची काही मतं असतात आणि त्यांचा आपण पूर्वग्रह न बाळगता सन्मान करायला हवा, हे तिथे शिकले. नोकरीसाठी मला दर आठवडय़ाला चार दिवस वेस्ट कोस्ट ते ईस्ट कोस्ट असा भरपूर प्रवास करावा लागायचा. तो काळ मोबाइल आणि ‘जीपीएस’चा नव्हता, त्यामुळे नवीन ठिकाणी गेल्यावर नकाशे वापरण्यापासून तयारी असायची.

मी चांगलं काम करत होते आणि त्याप्रमाणे मला बढती मिळत गेली; पण यातली सर्वात मोठी कमाई म्हणजे मला ‘एम्प्लॉयी पर्सपेक्टिव्ह’ समजून घेता आला. चार वर्षांनी जेव्हा मी भारतात परतायचं ठरवलं, तेव्हा ‘तुम्ही घरच्या व्यवसायात काम करालच, पण त्याबरोबर ‘बारा इंटरनॅशनल’चं ऑफिस भारतात स्थापन कराल का,’ अशी विचारणा मला करण्यात आली. मी सक्षम कर्मचारी आहे आणि स्वत:च्या मेहनतीवर यशस्वी होऊ शकते, हा आत्मविश्वास यामुळे आला. एखाद्याचा घरचाच उद्योग आहे, म्हणून परंपरेनं त्याला ती गादी मिळाली आहे, असा बऱ्याच जणांचा दृष्टिकोन असतो आणि ते साहजिक आहे. शिक्षणानंतर थेट घरच्या उद्योगात काम के लं असतं, तर कदाचित माझ्यात तसा आत्मविश्वास आला नसता. १९९२ ते १९९६ च्या त्या काळात ‘सिलिकॉन व्हॅली’ची चलती सुरू झाली होती, मोठी ‘इंटरनेट क्रांती’च आमच्या डोळ्यांसमोर घडत होती. ते पाहाण्याचा अनुभव वेगळाच होता.

दरम्यान, माझ्या आजोबांना अचानक कर्क रोगाचं निदान झालं, तेही तिसऱ्या स्टेजचं. आणि त्यांची प्रकृती खालावली. त्यांच्याबरोबर काही काळ राहाता यावं आणि वडिलांना व्यवसायात मदत करता यावी म्हणून मी भारतात परतले. अर्थात असं झालं नसतं, तरी आणखी २-३ वर्षांनी भारतात परतायचं, हा निर्णय झालेलाच होता. इथे आल्यावर पहिली दोन वर्ष मी ‘बारा इंटरनॅशनल’चं ऑफिस भारतात स्थापन करण्यात लक्ष घातलं आणि ‘कायनेटिक’मध्ये विविध विभागांत काम करून व्यवसायाची माहिती करून घेतली. त्याचबरोबरीनं मार्के टचं ज्ञान हवं, म्हणून देशभर दौरा करून कायनेटिकच्या वितरकांकडे भेटी द्यायला सुरुवात के ली. हा दौरा फक्त मोठय़ा शहरांचा नव्हता. उदा. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूरमध्ये, तर मी गेलेच; पण सातारा, वाई, बार्शी, अमरावती, अकोला, बुलढाणा, असं राज्यभर फिरले. त्याचा मला फार उपयोग झाला. मग मी व्यवसायात अधिकाधिक जबाबदाऱ्या घ्यायला सुरुवात के ली.

‘ऑटोमोबाइल’ हे पुरुषप्रधान क्षेत्र आहे. आपण ‘पुरुषांच्या क्षेत्रातली स्त्री’ असलो, तरी कष्ट घेण्यात आणि व्यवसायाला जितका वेळ देणं गरजेचं आहे त्यात कु ठेही कमी पडायचं नाही, हा माझा निश्चय होता. करिअरमधून मी कोणत्याही कारणानं ‘ब्रेक’ घेतला नाही. माझ्या मुलाचा जन्म झाल्यावरही चौथ्या दिवशी मी कामाला सुरुवात के ली होती. माझ्या आईवडिलांनी, कु टुंबानं मला लहानपणापासून प्रोत्साहन दिलं नसतं, व्यवसायाबद्दलच्या चर्चामध्ये सहभागी होऊ दिलं नसतं किं वा अमेरिके ला पाठवलं नसतं, तर कदाचित पुढचं सगळं शक्य झालं नसतं. कदाचित मी एका मोठय़ा कु टुंबातली मुलगी म्हणून दुसऱ्या मोठय़ा कु टुंबातल्या मुलाशी लग्न करून वेगळं जीवन जगले असते. घरच्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मीसुद्धा पुढे जाण्यासाठी प्रयत्न के ले. हे प्रयत्नच महत्त्वाचे असतात. शिक्षणाच्या पुढे जाऊन अनुभव कमावण्याची ही विशीतली वर्ष असतात. आपल्याकडे कित्येक मुली उत्तम शिक्षण घेतात; पण विशी ते तिशीच्या काळात मात्र लग्न झाल्यावर किं वा मूल झाल्यानंतर घरी बसतात किं वा चांगली पदवी घेऊन एकदम लग्नच करतात. असा ‘ब्रेक’ आल्यानंतर आपल्या बरोबरीची मंडळी त्यांच्या नोकऱ्यांमध्ये पुढे गेलेली असतात. त्यामुळे व्यक्तीसाठी  कुटुंबाचं पाठबळ किती महत्त्वाचं असतं, हे मला वारंवार सांगावंसं वाटतं. प्रत्येकीला नोकरी-व्यवसायच करावासा वाटेल असं नव्हे; पण आपलं स्वप्न काय आहे आणि त्यासाठी आपण किती कष्ट घेतोय, हे घरच्यांना आणि सासरच्यांना पटवून देण्याची हातोटी मुलींनी दाखवायला हवी. सांसारिक जबाबदाऱ्या आल्यावर काही प्रमाणात विरोध होणं सार्वत्रिक आहे; पण त्यांना आपण विश्वासात घेतो का, त्यांच्याशी कसा संवाद साधतो, हे मार्ग काढण्यासाठी फार महत्त्वाचं ठरतं.

माझे आजोबा एच. के . फिरोदिया हे कायम माझ्यासाठी ‘रोल मॉडेल’ आहेत. ‘सचोटी, कसोटी आणि हातोटी’ हा त्यांचा मंत्र होता. कोणतीही नवी सर्जनात्मक वस्तू पाहिली, की तशी कल्पना वापरून भारतात उपयोगी पडेल असं उत्पादन निर्माण करता येईल का, असा त्यांचा विचार सुरू होई. मी अमेरिके त असताना ते तिथे आले आणि आम्ही एका मेक्सिकन रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो. तिथलं टॉर्टिया (मक्याच्या पिठाच्या पोळ्या) करायचं यंत्र पाहून ते आपल्याकडे पोळ्यांसाठी वापरण्यासाठी काय करावं लागेल, अशी लगेच आमची चर्चा सुरू झाली. त्यांच्याशी होणाऱ्या अशा साध्या गप्पांमधूनही शिकायला मिळायचं. त्यांचा एक छानसा फोटो ऑफिसमध्ये माझ्या टेबलावर नेहमी ठेवलेला असतो. एखादा खूप मोठा निर्णय घेण्याची वेळ येते किंवा प्रश्न पडतो, तेव्हा त्यांनी आता काय के लं असतं असा विचार मी करते आणि मला माझं उत्तर सापडतं.

अमेरिके तली नोकरी संपवून भारतात परतल्यावर एकदा मी आजोबांच्या खोलीत लॅपटॉपवर काम करत होते. कर्क रोगामुळे त्यांच्याकडे दोन-तीन महिन्यांपेक्षा अधिक वेळ नाहीये, हे त्या वेळी स्पष्ट झालं होतं आणि त्यांनाही ते माहीत होतं. तेव्हाची एक आठवण ताजी आहे. ‘एक्सेल स्प्रेडशीट’वर माझं काम सुरू होतं. ते मला म्हणाले, ‘‘हे फार उपयुक्त सॉफ्टवेअर दिसतंय, मला जरा शिकवतेस का?’’ पुढे दोन तास मी त्यांना एक्सेलमध्ये कसं काम करायचं हे दाखवत होते आणि ते अतिशय उत्सुकतेनं शिकू न घेत होते. ते म्हणत, ‘‘मी लवकरच मरणार आहे याबद्दल मला दु:ख होत नाही, पण तरी मला आणखी दहा वर्ष जगायला आवडलं असतं. पुढच्या दहा वर्षांत विज्ञानाची प्रचंड प्रगती होणार आहे. त्याबरोबरीनं जग कसं बदलतंय हे पाहायला मला आवडलं असतं..’’ ही कायम लक्षात राहणारी शिकवण मला गद्धेपंचविशीतच मिळाली.

अनुभव घेणं, स्वत:ला पारखून पाहाणं, शिकणं, यातून व्यक्तीचा जो दृष्टिकोन तयार होत जातो, तो प्रामुख्यानं शिक्षणानंतरच्या आणि करिअरच्या सुरूवातीच्या दहा वर्षांतच. म्हणूनच विशी ते तिशीपर्यंतच्या या दहा वर्षांची कमाई आत्मविश्वासाची भक्कम पायाभरणी करणारी ठरते. माझ्याही बाबतीत ती तशीच ठरली.

शब्दांकन – संपदा सोवनी

 

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-05-2021 at 00:36 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×