scorecardresearch

Premium

मोडला नाही कणा..

मुळातच कणखर आणि चिवटपणे काम करणारी स्त्री या लढय़ातूनही काही शिकली, अधिक स्वावलंबी झाली. अशाच काही जणींच्या जगण्याच्या या प्रेरक कथा.

women struggle for self empowerment
आशा सेविका शुभांगी कांबळे, सह्यगिरी बचत गटामुळे अनेकींना रोजगार मिळाला, ‘इकोब्रिक्स’चं घर, प्रिया पाटील

मंजिरी फडणीस

कोणत्याही नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक परिणाम तिथल्या स्त्रियांवर होतो असं म्हटलं जातं आणि तसा अनुभवही येतोच. पण ‘येणारी आपत्ती आपला दृष्टिकोन व्यापक करत असते’ या आशयाचं वाक्य सुपरिचित आहे. करोनाची पहिली साथ आली त्याला तीन वर्ष झाली. या काळात आपला दृष्टिकोन किती व्यापक झाला, तसंच या काळात स्त्रियांनी स्वत:च्या सक्षमीकरणासाठी केलेल्या संघर्षांला नेमकी कोणती फळं आली आहेत, हे तपासण्याचा हा प्रयत्न..

divocrce & term insurance
Money Mantra: घटस्फोटाचा टर्म विम्यावर कशाप्रकारे परिणाम होतो?
mahatma gandhi jayanti 2023 lifestyle 7 habits of mahatma gandhi ji that can change your life
सकारात्मक आयुष्य जगण्यासाठी महात्मा गांधींच्या ‘या’ सात सवयी ठरतील फायदेशीर; आजपासून करा फॉलो!
Gajkesari 2023
गजकेसरी योग बनताच ‘या’ राशींचे लोक होणार प्रचंड श्रीमंत? धनलाभासह व्यवसायात यश मिळण्याची शक्यता
religious beliefs origin of religions different religions answers Answers to questions about human
विवेकवादासमोरील आव्हान

कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली, की त्याचे परिणाम दीर्घकाळ राहातात; विशेषत: स्त्रियांवर तर जास्तच. स्त्रियांच्या आयुष्याचा, त्यांच्या सक्षमीकरणाचा अशा वेळी स्वतंत्रपणे विचार करावा लागतो. समाजाचा निम्मा भाग असणाऱ्या स्त्रियांचं सक्षमीकरण, ही सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिमाणं समाविष्ट असलेली बहुआयामी संकल्पना आहे. म्हणूनच आपत्तीचा परिणाम स्त्रियांबाबतीत अभ्यासताना अशा परिमाणातून स्त्रियांच्या कामाकडे पाहणं योग्य ठरतं. करोनाची पहिली लाट संपली त्याला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या काळात अनेक घरं अनाथ झाली, ज्यांच्या कमाईवर घर चालत होतं अशा अनेक पुरुषांच्या नोकऱ्या गेल्या. या संपूर्ण काळात परीक्षा होती ती कुटुंबातल्या बहुतांश स्त्रियांची. मग ती अगदी शहरी असो, की ग्रामीण स्त्री, शिक्षित असो की अशिक्षित. श्रीमंत असो वा गरीब. कुटुंबाचा सर्वच बाजूनं विचार करणं तिला क्रमप्राप्त होतं. मुळातच कणखर आणि चिवटपणे काम करणारी स्त्री या लढय़ातूनही काही शिकली, अधिक स्वावलंबी झाली. अशाच काही जणींच्या जगण्याच्या या प्रेरक कथा.

हेही वाचा >>> कलावंतांचे आनंद पर्यटन : रस्ता गिळत.. अंग आदळत..

गृहिणीस्तरावर जसं स्त्रियांना काम करावं लागलं, तसं नोकरी-व्यवसायाच्या आघाडीवरही स्त्रियांना लढावं लागलंच. त्यातला एक वर्ग आशा सेविकांचा. कोल्हापूर जिल्ह्यातल्या अर्जुनवाडमधल्या शुभांगी कांबळे या आशा सेविका. आशा सेविका हा आर्थिकदृष्टय़ा दुर्बल गटच. अर्जुनवाड, जेमतेम साडेपाच हजार लोकवस्तीचं गाव. मातीच्या चिंचोळय़ा रस्त्यांच्या कडेनं शेतांमधून नदीकाठापर्यंत लहान-लहान घरं मधूनच डोकावणारी. त्यातलंच एक घर शुभांगी यांचं. २०१९ ला महापुरानं थैमान घातलं आणि शुभांगी यांचं राहतं घर कोलमडून पडलं. मुलं, जनावरं आणि जमेल ते सामान घेऊन त्यांच्या कुटुंबानं मिळेल तिथं आसरा घेतला. पूर ओसरला; पण त्यांचं घर विस्कटूनच. शुभांगी आजही त्या आठवणींनी धास्तावतात. ‘‘मुलांना घेऊन नवऱ्यासह गावी परतले तर नुसता चिखल पसरलेला. डोक्यावर छप्पर हवं म्हणून त्याच पडक्या घरात साफसफाई केली आणि निवारा तयार केला. महापुराचं संकट संपेपर्यंत करोनाचं संकट घरापर्यंत येऊन पोहोचलेलं होतंच,’’ त्या सांगतात. शुभांगी गावात आशा सेविका म्हणून काम करत असल्यानं या काळातही त्यांना कामासाठी बाहेर पडणं भागच होतं. सुरुवातीला सरकारकडून काहीच मदत आली नव्हती. मास्कसुद्धा मिळाले नव्हते. ‘‘आम्ही घरातले स्कार्फ बांधूनच बाहेर पडायचो. करोना रुग्ण शोधणं, त्यांची माहिती तालुका रुग्णालयात कळवणं, विलगीकरण होत आहे ना बघणं हे सगळं काम आम्हा आशा सेविकांना करावं लागायचं. ग्रामीण भागामुळे सुविधा नव्हत्याच. एका नर्सने दिलेले ग्लोव्हज मी रोज धुवून वापरायचे. करोनाची भीती तर होती, पण काम नाही केलं तर पगार कापतील ही भीती जास्त होती.’’

हेही वाचा >>> ‘‘हो, स्त्रियाही शिकारी होत्या..’’

आला दिवस पार पाडणं एवढंच त्यावेळी त्यांच्या हाती होतं. त्यानंतरच्या वर्षीही पूर आला. शुभांगी यांच्या कुटुंबाला पुन्हा गाव सोडावं लागलं. त्यानंतर करोनाची पुढची लाट आली. शुभांगी यांचं घर नदीकाठी, त्यामुळे पुराचा धोका अधिक. पूर आला की घरात पाणी साठणारच. यावेळी शुभांगी यांनी करोना रुग्णांची नोंद असणारी वही आठवणीनं सोबत घेतली. त्याची माहिती त्यांनी तालुका रुग्णालयात फोनवरून कळवली आणि गावातल्या कित्येक लोकांना करोनाचा संसर्ग होण्यापासून वाचवलं. शुभांगी सांगतात, ‘‘करोनानं कठीण परिस्थितीत जगायला शिकवलं. एका खोलीतच आम्ही सगळे एकत्र राहातो. रोज रुग्णांकडे जावं लागायचं. कुठे करणार विलगीकरण? नंतर नंतर तर तीन-तीन महिने पगार नाही. करोनामुळे दुकानदारांनी उधारी देणंही बंद केलं. कठीण परिस्थितीतही आपण मार्ग काढू शकतो हे त्या काळानं शिकवलं. म्हणूनच माझी मुलंही कणखर झाली आहेत. आजही दरवर्षी पुराची भीती असतेच. पत्र्याच्या भिंतीत सुरक्षितता नाही. पण आम्हाला माहितीय, ही वेळही जाते. कसलीही आपत्ती येऊ दे. आम्ही आता तयार झालोत.’’ त्या ठामपणे सांगतात. आता त्यांनी आपलं काम अधिक व्यापक केलंय. एका छोटय़ा गावातल्या एका वस्तीला सोयीसुविधा नसतानाही आरोग्याबाबत जागरूक करण्याचा वसाच त्यांनी घेतलाय. आशा सेविका म्हणून काम करताना त्या लोकांना आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे समजावून सांगतात. लोकांना चांगला आहार, व्यायाम याचं महत्त्व पटवून देतात. विशेषत  गर्भवती, लहान मुलं यांच्या आरोग्याच्या जपणुकीसाठी, त्यांच्या पोषक आहारासाठी त्या काम करतात. त्यांच्या आरोग्य नोंदींचा आदर्श ठेवत अनेक आशा सेविका ग्रामस्थांच्या आरोग्य नोंदी ठेवू लागल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही साथीच्या आजारावर मात करण्यासाठी त्या सज्ज आहेत.  नुकताच त्यांच्या घरापर्यंत पूर येऊन गेला. अशा वेळी आवश्यक साहित्य घेऊन घराबाहेर पडायचं आणि तात्पुरता नवा आसरा शोधायचा यासाठीची मानसिक तयारी त्यांनी केलेली आहे. त्यामुळे कुठल्याही संकटाचा सामना करताना त्या डगमगत नाहीत. कमी शिकलेली बाईसुद्धा अनेकांचा जीव सांभाळू शकते याचं उदाहरण त्या आपल्या कामातून घालून देत आहेत.

आयुष्यभर पुरणारे अनुभव

करोनाकाळानं आयुष्यभर पुरतील असे अनुभव दिलेच, पण त्यातून आयुष्यासाठीची शिदोरीही मिळाली. प्रिया पाटील हे त्यातलं एक नाव. करोनामुळे एखाद्या व्यक्तीचं निधन झालं की तो मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्याचं काम प्रिया करायची. करोनाकाळात गरजेला धावलं पाहिजे,  असं या १८-१९ वर्षांच्या तरुणीला वाटत होतं. यातूनच एका सामाजिक संस्थेत शववाहिकेसाठी ड्रायव्हर म्हणून ती रुजू झाली. केवळ सेवा म्हणूनच हे काम होतं. पहिल्याच दिवशी पहिलंच काम मृतदेह उचलून नेण्याचं. प्रिया म्हणते, ‘‘क्षणभर सुचलं नाही. मला वाटलं मी फक्त चालक असेन. पण प्रत्यक्षात मला मृतदेह उचलण्यासाठीसुद्धा मदत करायची होती. पहिल्याच दिवशी बारा मृतदेह नेले अंत्यसंस्कारासाठी. रात्री झोपच लागत नव्हती. तरी दुसऱ्या दिवशी उठले आणि कामावर रुजू झाले. त्या पूर्ण काळात मी ५०० पेक्षा अधिक मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेले. इतकंच नाही तर अनेकांना अग्नीही दिला.’’

हेही वाचा >>> निसर्गकन्यकांचा गणेश!

या काळात प्रिया आणि तिच्या घरच्यांना नातलगांनी वाळीत टाकल्यासारखं केलं. मुलीला कशाला हे काम लावायचं, म्हणून तिच्या आई-वडिलांवर टीका झाली. घरचे फोन वाजायचे ते कौतुकासाठी नाही, तर टीकेसाठीच. नंतर तिच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. सामाजिक संस्थांनी तिचं कौतुक केलं, तेव्हा नातलगांचे विचारही बदलले. मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना त्यांच्या नातलगांशीही वेगळे बंध तयार झाले. जे अजूनही जपले गेल्याचं प्रिया सांगते. वाईट बोलणं, टोमणे, याकडे दुर्लक्ष करायचं, लोकांना मदत करायची आणि समोरच्या माणसाच्या मनातले भाव ओळखायचे, हे प्रिया शिकलीय. आता ती वेगळं करियर करतेय. तिला ब्रँडिंग, मार्केटिंग अशा वेगवेगळय़ा विषयांत आवड आहे. स्वत:ची फर्म उघडण्याचंही तिचं स्वप्न आहे. त्यासाठी सध्या ती शिक्षण घेते आहे. करोनाकाळात ज्यांच्याशी बंध जुळले त्यांच्याशी ती नियमित बोलते. त्यांचं दु:ख कमी करण्याचा प्रयत्न करते. समाजसेवा करते. पुरेसं शिक्षण घेतलं की चांगलं काम अधिक जोमानं करता येईल, असा तिला विश्वास वाटतो. ‘करोनाकाळानं एका सामाजिक कार्यकर्तीला जन्म घातला आहे, तो मी सार्थकी लावेन,’ या भावनेनं प्रिया आयुष्याकडे बघते आहे.

 स्वावलंबनासाठी वेळ

वर्षभरापूर्वीची गोष्ट, संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद रस्त्यावर शरणापूर फाटा इथे एक घर बघायला लोक  लांबून लांबून यायचे. ते घर होतं ‘इकोब्रिक्स’चं. इकोब्रिक्स म्हणजे पर्यावरणपूरक विटा. संभाजीनगरच्याच नमिता कपाळे आणि कल्याणी भारंबे या दोन मैत्रिणींनी हे घर उभं केलं. जेव्हा टाळेबंदीमुळे सगळय़ांचंच आयुष्य काही काळासाठी थांबलं होतं, तेव्हा या दोन तरुणींनी त्या वेळेचा चांगला उपयोग करायचा ठरवलं. फाईन आर्ट्सचं शिक्षण घेणाऱ्या या तरुणींना सोशल मिडियाच्या माध्यमातून इकोब्रिक्स घरांची कल्पना सापडली. याच काळात त्याचा दोघींनी अभ्यास केला आणि प्रत्यक्षात घर उभंही केलं. नमिता सांगते, ‘‘इकोब्रिक्स बनवण्यासाठी आम्ही जवळपास १६ हजार प्लास्टिकच्या बाटल्या गोळय़ा केल्या. तसंच १० टन इतका प्लास्टिकचा अविघटनशील कचराही गोळा केला. मातीच्या भिंती उभ्या करण्याचं मोठं आव्हान आमच्यासमोर होतं. कारण प्लास्टिक माती धरून ठेवू शकत नाही. मग आम्ही नारळाच्या शेंडय़ासारखे काही घटक त्यात मिसळून प्रयोग केले. प्रायोगिक तत्त्वावर पहिली भिंत उभी राहिली.’’

हेही वाचा >>> शोध आठवणीतल्या चवींचा! : वैदर्भीय पदार्थाची नवलाई!

नमिता आणि कल्याणी यांनी बाटलीमध्ये प्लास्टिक भरण्यासाठी ३० स्त्रियांना कामावर ठेवलं. यामुळे टाळेबंदीच्या काळात जवळपास ३ महिने त्या स्त्रियांना रोजगार देऊ शकल्या. या घराच्या प्रयोगानंतर अशी घरं उभी करण्यासाठी या दोघींकडे मागणी होऊ लागली. काही बांधलीही. नमिता सांगते, ‘वेळेचा चांगला उपयोग करायला करोना आणि टाळेबंदीनं शिकवलं. करोनानंतर परिस्थिती थोडी बदलली आहे. एकदाच वापरायच्या प्लास्टिकबाबत लोक आता जागरूक झाले आहेत. घराबाहेर पडताना प्लास्टिकच्या बाटलीपेक्षा धातूची बाटली नेणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. या आमच्या प्रयोगाचा इतर स्त्रियांवरही चांगला परिणाम झाला. आजही अनेकजणी आम्हाला भेटून स्वत: उभ्या केलेल्या स्टार्टअपबद्दल सांगतात.’’

सध्याच्या कामाबद्दल नमिता म्हणाली, ‘‘इकोब्रिक्सची घरं बनवणं हे पर्यावरणपूरक काम होतं. पण सध्या सरकारनं त्याबाबत अनेक नवीन कायदे केले आहेत. त्यामुळे रिकाम्या प्लॉस्टिक बाटल्या मिळणं कठीण होतं आहे. त्यामुळे हळूहळू त्या घरांच्या मागणीनुसारच आम्ही ते काम करतो. उर्वरित वेळेत स्त्रियांना स्टार्टअप सुरू करण्यासाठी मदत करतो. अनेकजणी आम्हाला त्यांच्या व्यवसायाबद्दल सांगतात, तेव्हा आमच्याकडे असणारी माहिती, नवीन काम सुरू करतानाच्या टिप्स आम्ही देतो. आम्हीही स्वतंत्रपणे भविष्यात असं स्टार्टअप सुरू करण्यासाठी नियोजन करत आहोत. त्यातून काही बायकांना काम देता येईल. किमान छोटं-मोठं काम स्त्रियांनी काम करावं म्हणून आम्ही अनेकींना प्रवृत्त करतो.’’

हेही वाचा >>> पाहायलाच हवेत : शिक्षणातून नवा दृष्टिकोन!

पुन्हा उभं राहण्याचं शिक्षण

परिस्थितीतून मार्ग काढत स्त्री सक्षमपणे उभी राहू शकते याचं एक ठोस उदाहरण घालून दिलं एका बचत गटानं. सह्याद्रीच्या पश्चिम घाटातला शाहुवाडी तालुका. तिथलं छोटसं आंबा गाव. पर्यटनाचं ठिकाण म्हणून हंगामातच इथं लोकांची ये-जा असते. रानमेव्याची मुबलक उपलब्धता. करोनासारख्या काळात या रानमेव्याचं काय करायचं, बाहेर कसा पाठवायचा असे अनेक प्रश्न निर्माण झालेले. इथल्या ‘सह्यगिरी बचत गटा’नं हा प्रश्न सोडवला. करोनाकाळात रानमेव्याच्या पदार्थाचं सर्वाधिक उत्पादन केलं, त्यांची विक्री केली. स्वत: सक्षमपणे उभ्या राहिल्या आणि इतरांनाही त्यांनी उभं केलं. सायली लाड, शुभांगी वायकूळ यांचा हा बचत गट. या काळात गटातर्फे करवंद, फणस यापासून जॅम, सॉस अशी उत्पादनं तयार केली. करोनामुळे अनेकजण शहर सोडून गावाकडे आले. त्यांना ही उत्पादनं विकली. गटानं गावातल्या अनेक स्त्रियांना रोजगार दिला. कठीण परिस्थितीतही उभं राहणं या स्त्रिया शिकल्या. करोना काळात सुरू झालेलं हे काम गटानं अधिक व्यापक केलं आहे, केवळ गावातच नव्हे तर राज्यात आपली उत्पादनं विकली जावीत यासाठी या गटातील सर्वजणी सतत प्रयत्न करत असतात. विविध प्रदर्शनांमध्ये सहभाग घेतात. गावात येणाऱ्या पर्यटकांना आपल्या उत्पादनांची माहिती देतात. त्याचा दर्जा पटवून देतात. लोकांच्या मागणीनुसार आणखी नवीन उत्पादनं तयार करण्यासाठी सतत संशोधन सुरू असतं. लोकांना चव आवडली की मागणी वाढते आणि गटाचं कामही. याच गावात अनेकजणी आजही दिवसभर फिरून करवंदाच्या जाळय़ांतून करवंद तोडण्याचं काम करतात. लीलाबाई कांबळे अशाच गावाच्या एका टोकाला लहानशा मातीच्या घरात राहणाऱ्या. सकाळ झाली, की स्वयंपाक आवरायचा आणि बादली घेऊन जंगल गाठायचं. जाळय़ा जाळय़ा शोधायच्या. काटय़ांतून अलगद करवंदं काढायची आणि ती विकायची हेच त्याचं आता जीवितकार्य झालंय, पण त्यानंच त्यांना चरितार्थही दिलाय. स्वत:च्या पायावर उभं राहायची ताकद दिलीय.

स्त्री, मग ती कोणतीही असो, परिस्थितीशी लढणं, त्यातून मार्ग काढणं, स्वत: उभं राहणं आणि इतरांनाही उभं करणं हे तिच्या स्त्रीपणातच असावं. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती आली तरी ती डगमगत नाही. सक्षमपणे उभी राहते.. त्या परिस्थितीतून धडे घेते.. अधिक कणखर होते.. भविष्य सुरक्षित करण्यासाठी!

manjiri.phadnis@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Article about women struggle for self empowerment during corona period zws

First published on: 23-09-2023 at 01:08 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×