‘‘ग्रासरूट फेमिनिझम- ही लेखमाला म्हणजे पिढयान् पिढया पिचलेल्या माणसांच्या ठायी बदल घडवण्याची केवढी मोठी शक्ती असते, याचा प्रत्यय. समाजातल्या अनेकजणींमध्ये असलेली सुप्त शक्ती केवळ काही विचार, काही संधी, काही कृतींमुळे उफाळून वर आली आणि समाज घडू लागला. अनुभवांबरोबर माझ्याही जाणिवा बदलत गेल्या आणि एकमेकींना आधार देत, भगिनीभाव जोपासत, माणूस म्हणून आम्ही परस्परांना समृद्ध केलं, त्याची ही कहाणी.’’

गेलं वर्षभर चालू असलेल्या ‘ग्रासरूट फेमिनिझम’च्या या लेखमालेतून ‘ग्रासरूट फेमिनिझम’ म्हणजे दलित, मातंग, आदिवासी, घुमन्तु, मुस्लीम समूहातील ‘गरीब बिचाऱ्या’ मैत्रिणींच्या कामाचं काही कडबोळं आहे, असा गैरसमज झाला असल्यास तो दूर करण्यासाठीची आजची गोष्ट. माझी स्वत:ची. माझ्या बदलत गेलेल्या जाणिवांचा अनुभव आणि आलेख. ‘एम्पॉवरमेंट’ म्हणजे एखादं गाठोडं नव्हे, जे क्षणात कोणाला देता/ घेता येतं. सहप्रवासातून, सहअनुभूतीतून, सहजाणिवेतून स्त्री-सक्षमतेची प्रक्रिया कशी फुलत जाते, सहभागी असणाऱ्या प्रत्येकालाच कशी समृद्ध करते त्याची ही गोष्ट.

After five days Venus entering Ashlesha Nakshatra
पाच दिवसांनंतर शुक्र देणार बक्कळ पैसा; आश्लेषा नक्षत्रातील प्रवेशाने ‘या’ तीन राशीधारकांना मिळणार प्रत्येक कामात यश
Loksatta  Chaturang A trail of fear Experience the body
भय भूती : …आणि भीतीचा मागमूसही उरला नाही!
alimony for muslim women supreme court verdict on maintenance to divorced muslim
अन्वयार्थ : ‘शाहबानो’ला न्याय
loksatta kutuhal artificial intelligence empowered visual communication
कुतूहल : दृश्य संवाद कृत्रिम बुद्धिमत्ता
Confusion in the recruitment process of Junior and Assistant Engineers of Mahanirti Nagpur
‘या’ पदभरती प्रक्रियेतही घोळ? प्रतीक्षा यादीसह काही नावे…
Indian Army also has a suicide dron How will Nagastra 1 expand its power
भारतीय सैन्याकडेही आत्मघाती ड्रोन…‘नागास्त्र-१’ मुळे सामर्थ्य कसे विस्तारणार ?
Loksatta kutuhal Maculochpitts neuron Intelligence
कुतूहल: मॅक्युलोचपिट्स न्यूरॉन
What exactly does the NTA organization which is in discussion due to the NET scandal do
‘नीट’, ‘नेट’ घोळामुळे चर्चेत असलेली ‘एनटीए’ संस्था नेमकी काय करते?

माझा जन्म आणि संगोपन ब्राम्हण कुटुंबातलं. आम्ही चौघी बहिणी. त्यामुळे लहान असताना मुलगा-मुलगी भेद जाणवण्याचा प्रश्न आला नाही. आईवडिलांनी जिवाचा कोट करून आम्हाला सतत सुरक्षित ठेवल्यामुळे मुळापासून हलवणाऱ्या दु:खापासून बऱ्यापैकी लांब. वर्गात नेहमी प्रथम. सर्वांना अप्रूप वाटलेलं अभियांत्रिकी शिक्षण, स्वत: निवडलेला जोडीदार, सोलापुरातून मुंबईमध्ये स्थायिक होणं, मुंबईत सुरक्षित नोकरी, घर, स्त्री-चळवळीची ओळख आणि त्यात सहभाग. एकूणच विशेषाधिकाराचं (privilege) पूर्ण भाग्य. अगदी उच्च शिक्षण घेतानाही नजर सतत शिडीच्या पुढच्या पायरीवर. त्यामुळे स्वत:ला शोधणारे, चिंतनाचे, अस्वस्थ करणारे प्रश्न पडलेच नाहीत. सहजी मिळालेला विशेषाधिकार, मिळालेली प्रत्येक गोष्ट स्वत:च्या क्षमतेमुळे, कर्तृत्वामुळेच मिळाल्याची धारणा होती.

अशा परीस्थितीत ‘ग्रासरूट्स’मध्ये काम करण्याची संधी मिळाली. इंजिनीअर असून वस्तीतल्या लोकांना ‘मदत’ करायला आपण काम करत आहोत हा गंड होता. आपण त्यांना काय ‘देऊ’ शकतो असाच विचार. त्यांच्याकडून काही घेण्याचा विचारसुद्धा मनात नव्हता. वस्तीतल्या ‘लोकांसाठी’ किंवा ‘लोकांबाबत’ सुरू झालेल्या माझ्या कामाचं स्वरूप, ‘वस्तीतल्या लोकांबरोबर’ काम करण्यात केव्हा आणि कसं बदलत गेलं? त्यामुळे ‘ग्रासरूट फेमिनिझम’चा अर्थ आणि ताकद कशी कळत गेली, याची ही गोष्ट.

उत्तम आणि खूप शिक्षण हा जन्मसिद्ध हक्क असल्याच्या वातावरणात वाढलेल्या माझा, पिढयानुपिढया शाळेचं दर्शनसुद्धा न झालेल्या वास्तवाशी परिचय होत होता. आयुष्याच्या अनेक विसंगतींतून इथे माझं खरं शिक्षण सुरू झालं होतं. प्रश्न पडत होते, नव्या जाणिवा विकसित होत होत्या, स्वत:ची वेगळी ओळख होत होती. ३४ वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासात इथे भेटलेल्या अक्षरश: हजारो मैत्रिणींमुळे माझ्या चेहऱ्यावरचे अनेक मुखवटे गळून पडले. माणूस म्हणून आम्ही परस्परांना समृद्ध केलं.

सुरुवातीला स्वत:ला या सर्वांमध्ये ताबडतोब स्वीकृती मिळवण्याची गडबड होती, त्यात ब्राम्हण असल्याचं अपराधीपण वाटत होतं. त्यामुळे वागण्या-बोलण्यात कृत्रिमता राहायची, जी नातेसंबंध जोडायला फायदेशीर नव्हती. पण हळूहळू मुद्दाम केले जाणारे, मैत्री थोपवण्याचे प्रयत्न बंद झाले, तेव्हा आपसूक, हळुवारपणे नातेसंबंध जोडले गेले. सुरुवातीला अशा कामातून माझा स्वार्थ काय आहे, याची चाचपणी करणाऱ्या मैत्रिणी विश्वासानं घरात बोलवायला लागल्या, जेवू घालायला लागल्या, मनातल्या गोष्टी बोलायला लागल्या आणि कामात सहभागी व्हायला लागल्या.

सुरुवातीच्या काळातच आजवर जोपासलेल्या मान्यता ‘स्कॅनर’खाली आणणाऱ्या दोन घटना घडल्या. घेतलेलं कर्ज परत न करणाऱ्या स्त्रीला ‘पैसे देणं जमत नसेल, तर माझ्या नवऱ्याजवळ येऊन झोप’ असं म्हणणारी स्त्री भेटली. आणि शौचालयाच्या सेप्टिक टाक्यांमध्ये उतरून शौचाचा तुंब काढणारा वस्तीतला मित्र ‘आज काम करताना मजा आली,’ असं संध्याकाळी भेटल्यावर म्हणाला. या दोन्ही वेळा मी भांबावले होते. बिजू भोसले ही वस्तीतील मैत्रीण मला जेव्हा तिचे अनुभव समजावून सांगत होती. तेव्हा लक्षात आलं, की मी माझ्या संस्कारांच्या आणि मान्यतांच्या फूटपट्टीनं वस्तीतल्या मान्यता जोखत होते. आयुष्यात दुसऱ्याला समजून घेणं, परिस्थिती समजून घेणं, आपली मतं सापेक्ष ठेवणं आणि ‘नॉन जजमेंटल’ राहणं, याचे धडे मला मिळत होते.

आज सत्तरीच्या असणाऱ्या सागर मोरे या माझ्या पहिल्या गुरू. माझ्या स्वत:बद्दलच्या अवाजवी समजुतीच्या त्यांनी अक्षरश: ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या. एका कठीण काळात संघटनेकडे अजिबात पैसे नसल्यामुळे सहकाऱ्यांनी दुसरं काम बघावं, असं निर्वाणीचं मी सर्वांना सांगितलं. दुसऱ्या दिवशी सागर आणि त्यांचा नवरा २० हजार रुपये रोकड घेऊन सकाळीच माझ्या दरवाजात हजर. त्यांचं ठिकठिकाणी भोकं पडलेलं पत्र्याचं घर पक्कं करण्यासाठी गावाकडच्या जमिनीचा तुकडा विकून आलेले हे पैसे. ‘आता संघटनेला याची जास्त गरज आहे. आपल्याकडे पैसे आल्यावर परत द्या,’ असं कोणताही आविर्भाव न ठेवता दोघांनी सांगितलं. योगदानाच्या या भावनेला काय म्हणावं? हल्लीच्या ‘want to give back to the society’ असं ‘सोसायटी’कडून खूप काही घेतल्यानंतर, काही देण्याच्या अवतारापेक्षा हे वेगळं होत. त्याही वेळेला आणि आताही स्तिमित करणारं, माझं गर्वहरण करणारं.

आम्ही चेंबूरमध्ये नवीन राहायला आलो तेव्हाची गोष्ट. बऱ्याच वेळा बाजारात जाताना एक तृतीयपंथीय व्यक्ती नियमित दिसायची. एकदम टापटीप. बोलण्याचा प्रश्नच नव्हता, पण जवळून गेली तरी भीती वाटायची, छातीत धडधडायचं. लहानपणापासून या समूहाबद्दल भीतीच मनात बसलेली. ते गुन्हेगार असतात, मुलांना पळवून नेतात, वगैरे मनात पक्कं होतं. नंतर आम्ही घर बदललं आणि तिलाही विसरले. पंधरा वर्षांपूर्वी एका वस्तीत बैठकीला गेले होते. काही वर्षांपूर्वी भीती वाटलेली ही व्यक्तीही तिथे होती. थोडी वृद्धत्वाकडे झुकलेली. लक्षपूर्वक सगळं ऐकत होती. मीटिंग संपली, तसं ती माझ्याजवळ आली. माझे दोन्ही हात प्रेमानं हातात घेऊन, आशीर्वाद देऊन म्हणाली, ‘‘खूप चांगलं काम करतेस तू. दुवा देते तुला!’’ आज आठवूनसुद्धा अंगावर रोमांच येतात. माणूसपणाचं वेगळंच दर्शन होतं ते. किती नकारात्मक समजुतीत मी जगत होते! लिंगभावाविषयी काम करताना पूर्वग्रहांचे अनेक कंगोरे माझ्या मनात उरले होते, ते या बैठकीनंतर वितळायला सुरुवात झाली. लिंगभाव समानतेचा वेगळा आणि संपृक्त अर्थ मला त्या दिवशी लागला.

आपल्या कुटुंबाच्या मान्यता, व्यवहार आपल्या ‘आयडेंटिटी’चा ( स्व-ओळख) अविभाज्य भाग असतात. माझ्या वडिलांची मी एकदम लाडकी. त्यांना मी कानातलं किंवा बांगडया वगैरे दागिने घातलेले अजिबात आवडत नसे. लहानपणीही भेट म्हणून त्यांनी नवीन कपडे नाही आणले, विचारांना चालना देणारे खेळ आणले. ते रोज मला पाच नवे इंग्रजी शब्द पाठ करायला लावायचे. ‘मेनस्ट्रीम’सारखी मासिकं आणि इंग्रजी वृत्तपत्र वाचायला लावायचे. आईवडिलांच्या प्रोत्साहनामुळे वक्तृत्व स्पर्धामध्ये मी सतत पहिल्या क्रमांकाची बक्षिसं मिळवली. पण शाळेतल्या मैदानी खेळांसाठी त्यांनी कधी प्रोत्साहन दिलं नाही. त्यामुळे नकळत वैचारिक गरजा आणि आनंद हे शारीरिक गरजा आणि आनंद यांपेक्षा श्रेष्ठ, अशी माझी समज तयार झाली. त्याला सतत खतपाणीही मिळत होतं. आमच्या घरात सर्व प्रकारच्या मोकळया चर्चा व्हायच्या, पण सेक्स, शारीरिक आनंद, गरज याबद्दल आम्ही वयात आल्यावरसुद्धा कधीच चर्चा झाल्या नाहीत. परिणामी लग्नानंतरही जोडीदाराबरोबर वैचारिक एकतानता सर्वात आणि फक्त तीच महत्त्वाची, अशी समजूत होती. त्यामुळे वैवाहिक नातं सांभाळणं या महत्त्वाच्या बाबीकडे दुर्लक्षच झालं.

जोडीदाराचे नातेसंबंध विरायला लागले, तरी वैचारिक सहमतीच्या मुद्दयावर मी तग धरला होता. त्यात घुसमट होती. यातून बाहेर निघू शकले, ते केवळ माझ्या या मैत्रिणींमुळे. अन्वरी खान, अनिता कांबळे, मुमताज शेख, पल्लवी पालव, द्वारका पवार, शीला पवार, विनया घेवदे आणि यांच्यासारख्या जिवाभावाच्या मैत्रिणींनी आणि सहकारी मित्रांनी समजून घेतलं, प्रसंगी टोकलं, आव्हान दिलं आणि आधारही दिला. लहानपणापासून जपलेल्या समजुतींचा पुनर्विचार करायला लागले. लग्नसंबंधामध्ये केवळ वैचारिक नव्हे, तर मानसिक आणि शारीरिक जवळीक आवश्यक असल्याचं पटणं, आपल्या आयुष्यात ते नाही हे दिसणं, या वास्तवाचा स्वीकार करणं आणि संयत पद्धतीनं त्यातून आपल्यापुरता सन्मानाचा मार्ग काढणं, हे माझ्या मैत्रिणींमुळे शक्य झालं. व्यक्तिगत आयुष्यात मी काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकले. अर्थात माझी आई, तीनही बहिणी, मुलगा-सून, यांचाही बिनशर्त पाठिंबा आणि आधार सतत होताच. जेवढा आधार माझ्या मैत्रिणींना माझा वाटतो, तेवढाच मला त्यांचा वाटतो. परस्परांवर आमचा प्रभाव आहे. अनेकांच्या लग्नाची, अवघड घटस्फोटाची, घरातल्या प्रश्नांची रदबदली करताना मीही होतेच त्यात. एकत्र असू तर जग बदलू, असा विश्वास आम्हाला असतो.

अशा प्रवासात आणि नातेसंबंधांत जात, शिक्षण, वर्ग यांच्या प्रतवारीची आडकाठी होत नाही. आपली जात, धर्म, पंथ, त्यांची समाजमान्यता, नीतिनियम, आर्थिक परिस्थिती, हे आपली व्यक्ती म्हणून मान्यता, सन्मान, ठरवत असतात. त्यावरच आपल्या वाटयाला संधींचा समुद्र येणार, की अवहेलना आणि नकार, हे ठरतं. याचं प्रामाणिक भान आलं आणि आपणच आपल्याला चिकटवलेली पिसं एकेक करून गळायला लागली, की आपले विशेषाधिकार इतरांबरोबर वाटून घेण्याची एक मानवीय निकड तयार होत असणार. माझे आणि वस्तीतल्या मैत्रिणींचे अनुभव, कौशल्यं एकत्र वापरून नवीनच सहनिर्मितीची आस यातून तयार झाली. या सगळया प्रक्रियेत एकमेकांचा वैचारिक-मानसिक आधार, केलेला सहप्रवास, त्यातून एकत्रित आलेलं समृद्धपण आणि शहाणपण ही मोठीच मिळकत झाली.

या सगळया प्रवासात आणखी एक जिवाभावाची मैत्रीण मिळाली. कृष्णा शिरोळे. गेली ३२ वर्ष आम्ही सावलीसारख्या एकमेकांच्या पाठीशी आहोत. माझ्या घराची सगळी जबाबदारी नेटकी सांभाळून कृष्णांनी मला कामात आकंठ बुडून घ्यायचं स्वातंत्र्य दिलं. आयुष्यात अनेक चढउतार आले. कृष्णा नसत्या तर आयुष्य अवघड होतं, अशी माझी प्रामाणिक भावना आहे.

ऑड्री लोर्डे अमेरिकी लेखिका, प्राध्यापिका, तत्त्वज्ञ, समलिंगी, कृष्णवर्णीय स्त्रीवादी, कवयित्री, आणि मानवाधिकाराच्या खंद्या कार्यकर्त्यां आहेत. ‘कोणत्याही जोखडातली स्त्री मुक्त व्हायची राहिली, तर याचा अर्थ मी मुक्त नाही,’ असं त्या मानतात. म्हणतात, ‘मी जर कोणत्याही दडपलेल्या स्त्रियांना माझेच दुसरे चेहरे म्हणून ओळखू शकले नाही, तर मी त्या प्रत्येकीवर होणाऱ्या जुलमात भर टाकते आहे,’ ‘ग्रासरूट फेमिनिझम’चा हा अर्थ आम्हाला लागतो.

गेली अनेक वर्ष आम्ही केलेला सहप्रवास, घेतलेली सहअनुभूती, मिळून तयार केलेला व्यापक परिवार, एकमेकांना समजून घेण्याचे, जपण्याचे केलेले प्रामाणिक प्रयत्न, यामुळे जैविक नातं आणि बंध तयार झाला आहे. त्यामुळेच या लेखमालेचं धाडस आम्ही केलं. हे लेख कोणी कोणाच्या ‘वतीनं’, केवळ दुरूनच्या निरीक्षणातून, उसन्या संवेदनशीलतेनं लिहिलेले नाहीत. हा दीर्घ काळाच्या सहप्रवासाचा, सहनिर्माणाचा परिपाक आहे. एक वेगळं वास्तव समोर मांडण्यासाठी मिळून घातलेला घाट आहे. कोणत्याही लेखात वैचारिक किंवा विश्लेषणाच्या नावाखाली मैत्रिणींच्या खासगी आयुष्यात डोकावण्याचा बाष्कळपणा नाही. उलट सर्व एकाच नावेचे प्रवासी असल्याची जाणीव आहे. आम्हा सगळय़ांचीच आयुष्यं उघडया पुस्तकासारखी एकमेकांना उपलब्ध आहेत. आणि ती नातेसंबंध घट्टच करत आहेत. स्त्री-चळवळीत याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भगिनीभावाचा अर्थच आपल्यातल्या भिंती वितळवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे.

किशोरी आमोणकरांच्या स्वर्गीय सुरांतला संत सोयराबाईंचा अभंग ऐकू येतो- अवघा रंग एक झाला। रंगी रंगला श्रीरंग।। मी तूंपण गेले वायां।.. अशा सहनिर्माणात शांतता, आनंद, समृद्धी आणि मुक्तीचा अनुभव असतो. तो आमच्यापर्यंत पोहोचला आहे.

(या लेखासाठी अन्वरी खान, अनिता कांबळे, मुमताज शेख, पल्लवी पालव, द्वारका पवार, शीला पवार, विनया घेवदे यांचा सहभाग मिळाला आहे.)

coro.grassrootfeminism@gmail.com