परंपरेने चालत आलेल्या उपयोजित अर्थात दैनंदिन जीवनाशी निगडित ज्या कला आहेत यामध्ये स्त्रियांच्या कलांचा आविष्कार अनुभवण्यास मिळतो, तो अर्थात मौखिक परंपरेने चालत आलेला आहे. गीतं, कथा, नृत्य, नाट्य, खेळ, लोकभाषेतील उखाणे, वाक्प्रचार, म्हणी या सगळ्यांनी मिळून लोकसाहित्यातील शाब्द साहित्य तयार झालं, जे स्त्रियांमुळे पुढे चालत राहिलं…

‘कलात्मकतेचे आदिमूळ’ या १७ जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या लेखाच्या शेवटी आपण पाहिलं होतं की, निसर्गाने माणसाला जे दिलेलं आहे, त्यावर तो कधीच संतुष्ट राहिलेला नाही, आपल्या गरजेनुसार आणि सोयीनुसार त्यात तो बदल करत आलेला आहे. म्हणजे प्रकृतीतून संस्कृतीकडे त्याची वाटचाल झालेली आहे आणि प्रारंभीची संस्कृती ही लोकसंस्कृती आहे.

लोकसंस्कृती ही अमुक काळाशीच बांधलेली आहे, असं म्हणता येणार नाही. कारण तो प्रवाह आहे. आपल्याकडे ‘लोकसाहित्य’ हा शब्द प्रचलित आहे. ‘लोकसाहित्य’ या शब्दाचा अर्थ सीमित आहे, कारण ‘फोक लोर’ या इंग्रजी शब्दासाठी मराठीत ‘लोकसंस्कृती’ हा शब्द जास्त उचित आहे, पण त्याच्यासाठी ‘लोकसाहित्य’ हा शब्द वापरला जातो. तो अपुरा अशासाठी आहे, की साहित्य या शब्दाचा अर्थ व्यवहारामध्ये, विशेषत: मराठी भाषिक हे शब्दांनी घडलेलं, तेच साहित्य मानतात म्हणजे कथा, नाटक, कादंबरी, कविता, ललित वगैरे… परंतु ‘फोक लोर’चा अर्थ शास्त्रकर्त्यांनी एवढा सीमित ठेवलेला नाही. लोकजीवनाची जडणघडण करण्यासाठी जे जे आवश्यक आहे, त्या सर्व साधनांना मिळून ‘साहित्य’ हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे ‘साहित्य’ हा शब्द साधनवाचक आहे. केवळ ‘शाब्द साहित्य’ असं नाही.

मी त्याचे दोन भाग करते. आपल्या जीवनाची जडणघडण प्रामुख्याने दोन प्रकारांमध्ये असते. एक शाब्द, म्हणजे शब्दांनी घडलेलं साहित्य. आणि दुसरं शब्देतर. म्हणजे शब्दांखेरीज अनेक गोष्टी जीवनामध्ये उपयुक्त असतात. ‘शाब्द साहित्या’मध्ये कथा, गीतं याशिवाय लोकपरंपरेतले मंत्र, म्हणी, उखाणे, वाक्प्रचार… अनेक कथा, काही लोकआख्यानंही येतात. या आख्यानांमध्ये काही परिचित कथा असतात. उदा. रामाची कथा (अंकुश पुराण) किंवा महाभारतातल्या कथा. त्यांना लोकपरंपरेमध्ये बऱ्याचदा ‘लोकपुराण’ असं म्हटलं जातं. म्हणून आपल्याकडे लवकुशाचं (अंकुश पुराण) आख्यान लोकपरंपरेत प्रसिद्ध आहे.

याशिवाय काही पुराणं निरनिराळी आहेत. आपल्याला फक्त संस्कृत पुराणं माहिती असतात, पण लोकपरंपरेमध्ये निरनिराळ्या जातींची ‘जातीपुराणं’ आहेत, निरनिराळ्या देवदेवतांशी, देवस्थानांशी संबंधित स्थळपुराणंही आहेत, म्हणजे पंढरपूरशी संबंधित ते पंढरपूरचं स्थळपुराण. देव-देवतांच्या कथांची आख्यानं आहेत. त्यालाही पुराणच म्हटलेलं आहे. त्यामुळे या शाब्द परंपरा, शब्दांनी घडलेल्या. यामध्ये लोकपरंपरेतले त्या त्या भाषेमधले मंत्रही असतात. उदा. दृष्ट काढायचा बायकांचा एक मंत्र असतो. शिवाय लोकभाषेतले मंत्र, उखाणे, वाक्प्रचार, म्हणी तर असतातच. यामुळे सगळं शब्दांनी घडलेलं साहित्य हे ‘शाब्दसाहित्य’.

याशिवाय शब्देतर साहित्य, ते म्हणजे हातांनी घडलेल्या निरनिराळ्या प्रकारच्या गोष्टी. त्याला आपण ‘हस्तकला’ म्हणतो. मग त्याच्यामध्ये चित्र, शिल्प, निरनिराळ्या प्रकारच्या रांगोळ्या, पाककला, कशिदाकाम, शिवणकाम अशा दैनंदिन जीवनामधल्या कितीतरी गोष्टी असतात. त्याचाही आपल्याला विस्ताराने विचार करायचा आहे. याशिवाय लोकपरंपरा घडण्यामध्ये आणखीही एक प्रकार असतो, त्याला आपण ‘प्रयोगात्मक’ (Performing) कला आविष्कार म्हणू. या लोकपरंपरेमध्ये काही गाणी, नृत्य, काही नाट्यात्मक अभिव्यक्ती, त्यामुळे प्रयोगात्मक लोककला, क्रीडा नृत्य (झिम्मा, फुगडी, इ.) हस्तकला, शाब्दकला या सगळ्यांनी मिळून जीवन घडत असतं. आणि या सगळ्याला मिळून लोकसंस्कृती हा जास्त अन्वर्थक शब्द आहे.

विदुषी दुर्गाबाई भागवत यांनी ‘लोकसाहित्य’ हा शब्द वापरला, तो मराठीत रूढ झाला. ही गोष्ट खरी आहे, परंतु सगळ्या संस्कृतीला मिळून ‘लोकसंस्कृती’ हा शब्द जास्त अन्वर्थक ठरतो, असं अनेकांचं मत आहे. आपल्याकडे पहिल्यांदा ज्या वेळेला वि. का. राजवाडे यांनी निरनिराळ्या प्रकारची ऐतिहासिक कागदपत्रे (बखरी, ताम्रपट) शोधायला सुरुवात केली, त्यावेळेस त्यांना काही परंपरेने चालत आलेल्या कथा सापडल्या. त्यातली पहिली कथा होती, ‘सूर्याची कथा’. त्याला ‘आदित्य राणूबाईची कथा’ असं म्हटलं जातं. आणि ती बायकांच्या चातुर्मासात सांगितल्या जाणाऱ्या कथांमधली एक आहे. राजवाड्यांनी त्यासाठी शब्द वापरला आहे, ‘लोककथा’. काही गाणी त्यांना मिळाली. त्याला त्यांनी म्हटलंय, ‘लोकगीतं.’ त्यामुळे ‘लोककथा’, ‘लोकगीतं’ हे शब्द निरनिराळ्या लोकांनी वापरलेले आहेत. याशिवाय लोकसाहित्यासाठी आणखी काही शब्दांचा वापर निरनिराळ्या मंडळींनी केलेला आहे. दत्तो वामन पोतदारांनी यासाठी ‘लोकविद्या’,रामचंद्र चिंतामण ढेरे यांनी मात्र ‘लोकसंस्कृती’ हा शब्द जास्त अन्वर्थक आहे, असं म्हटलेलं आहे.

गोमंतकामध्ये ‘लोक वेद’ हा छान शब्द वापरला जातो. लोकसाहित्याचे जे निरनिराळे प्रकार आहेत, शाब्द आणि शब्देतर, यामध्ये स्त्रीचा निर्मितीचा सहभाग काय, किती आहे, त्याचा विस्ताराने विचार करायचा आहे. परंपरेने चालत आलेल्या ज्या कला आहेत, त्या केवळ मनोरंजनासाठी नाहीत, तर ज्यांचा व्यवहारामध्ये प्रत्यक्ष वापर केला जातो. त्याला ‘उपयोजित’ कला असं म्हटलं जातं. त्यामुळे लोकपरंपरेमधल्या ज्या कथा आहेत, आणि विशेषत: स्त्रियांच्या कला, त्या प्रामुख्याने उपयोजित, जीवनातल्या कामाशी संबंधित आहेत. हे स्त्रियांचे सगळे आविष्कार उपयोजित आहेत. त्यामुळे त्या त्या कलाविष्कारांमध्ये, ओवी किंवा गाण्यांमध्ये, स्त्रियांच्या कामाची लय आणि ताल आहे. याचं थोडंसं दिग्दर्शन मागच्या भागात आपण केलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या कला शाब्द असतील, शब्देतर असतील, हस्तकला असतील, प्रयोगात्मक असतील, या सगळ्यांमध्ये स्त्रियांची निर्मिती फार मोठ्या प्रमाणावर आहे.

आपण प्रामुख्याने सुरुवात करू, ती स्त्रियांच्या मौखिक कलांबद्दल. त्यापैकी एक म्हणजे शाब्दकला. लोकपरंपरेतलं जे शाब्द साहित्य आहे ते प्रामुख्याने मौखिक आहे. मौखिक म्हणजे तोंडोतोंडी चालत आलेलं. पाठांतरातून चालत आलेलं. ज्या वेळी सार्वत्रिक लेखन, वाचन नव्हतं, त्या वेळी जगाच्या पाठीवर बहुतेक सगळं शाब्दसाहित्य हे मौखिक परंपरेने आलेलं आहे आणि भारतामध्ये तर जुनी परंपरा आहे. त्यामुळे केवळ ग्रामीण लोकसाहित्यच मौखिक आहे, असं नाही तर अभिजात साहित्याचा आविष्कारसुद्धा मौखिकच आहे. उदा. सगळ्यात जुनं साहित्य आभिजात परंपरेतलं वेद आहे, असं मानलं जातं. चारही ‘वेद’ आणि त्याच्याशी संबंधित ‘वेदांग’ ही मौखिक परंपरेने चालत आलेली आहेत. पाठांतर प्रक्रियेतून आलेली आहेत. त्यामुळे जुन्या काळामध्ये गुरुच्या घरी जाऊन विद्या शिकायची आणि पहाटेपासून वेदाचं पाठांतर करायचं, अशी पद्धत होती. ही पठण परंपरा आणि पाठांतर परंपरा संस्कृत साहित्यामध्येही आपल्याला दिसते. आणि लोकसाहित्यामध्ये तर ती आहेच. कारण माणसाला लेखनाचा शोध उशिरा लागला.

चीनमध्ये इसवीसनाच्या ६व्या शतकाच्या आसपास हाताने घडवलेला कागद म्हणता येईल असा जाडसर कागद तयार झाला. त्यावर लिहायचं कशाने, तो बोरू म्हणजे एक प्रकारची गवताची वाळलेली काडी. त्याला टोक काढायचं आणि ते शाईत बुडवून कागदावर उमटवायचं. शाई तयार करणं म्हणजे रंग तयार करणं, तोही पटकन उडून जाऊ नये अशा प्रकारचा. संस्कृतीतल्या दिसायला या लहानसहान गोष्टी आहेत, पण त्यांनी माणसाच्या आयुष्यातला पुष्कळ वेळ घेतला. त्याची कल्पकता, त्यांचे कष्ट यामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे उशिरा उमगलेलं लेखनही फार दुर्मीळ होतं. कारण अक्षर ओळख काही ठरावीक स्तरातल्याच पुरुष मंडळींना प्रथम होती. स्त्रियांना लेखन तर उशिराच आलं आणि त्यामुळे हे जे सगळं शाब्दसाहित्य आहे, लोकपरंपरेतलं असेल किंवा अभिजात परंपरेतलं, प्रामुख्याने मौखिक परंपरेने चालत आलेलं आहे.

कागदाच्याही आधी लिहिलेलं जुन्यातलं जुनं साहित्य, ज्याला कोरीव लेख म्हणता येतील, ते दगडावर, शिळांवर कोरलेलं होतं – शिलालेख. जुन्यात जुने शिलालेख जगाच्या पाठीवर पुष्कळ उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातही उपलब्ध आहेत. माळरानावर, पठारावर, गुहांमध्ये कोरलेले बरेचसे लेख सापडलेले आहेत. आणि त्यात दर खेपेला ते शाब्द वा अक्षरच असतील, असं नाही. माणूस मनातला विचार, भावना व्यक्त करताना पहिल्यांदा चित्राचा उपयोग करत आला. त्यासाठी प्रथम काही संकेत वापरले. त्या चित्रांमधून ते संकेत व्यक्त होतात. उदा. शिकार करायची झाली तर एखादा पशु, त्याला बाणाने किंवा भात्याने मारायचं, मात्र तो बाणसुद्धा उशिरा आला त्यामुळे शिकारीसाठी दगडाचं टोकदार साहित्य, हत्यार वापरलं गेलं. गुहांमध्ये कोरलेलं त्याचं चित्र, हे ‘गुहाशिल्प’. त्यामुळे दगडावर कोरलेली शिल्पकला आधी आली. मग कागद आला. मग लेखन आलं. त्यामुळे प्राचीनातलं प्राचीन शाब्द साहित्य हे मौखिक परंपरेने चालत आलं. केवळ लोकसाहित्यच नव्हे तर अभिजात साहित्यसुद्धा.

दुसरं असं की, इंग्रजोत्तर काळामध्ये आपल्याकडे एक असा समज निर्माण झालेला आहे की, ज्यांना लेखन, वाचन येतं तीच माणसं शहाणी किंवा सुसंस्कृत. परंतु हे खरं नाही हे आपल्या लक्षात येईल. कारण लेखन, वाचन परंपरा ही जुन्या काळापासून फारच थोड्या लोकांसाठी उपलब्ध होती. ज्या वेळेला कागद मोठ्या प्रमाणावर येऊ लागला, लेखन साहित्य मोठ्या प्रमाणावर येऊ लागलं त्यावेळी लेखनाची परंपरा हळूहळू सार्वत्रिक होत गेली. कारण लेखन-वाचन कोणी शिकायचं याला सामाजिक, धार्मिक मर्यादा मोठ्या प्रमाणावर होत्या हे आपल्याला माहीत आहे. म्हणून मुद्रणकला आल्यानंतरच लेखनाचा आणि वाचनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. तोपर्यंत मराठीमध्ये जुन्यात जुनं साहित्य आहे, ते एक तर कोरलेलं आहे किंवा जाड हातकागदावर बोरूने लिहिलेलं आहे. त्यासाठी लागणारी शाई तयार करताना बाभळीच्या शेंगा जाळून त्याची राखुंडी केली जायची. त्यात चिकट डिंकाचं पाणी मिसळलं जायचं तेव्हा ती तयार व्हायची. आणि अशा प्रकारे त्या शाईने, बोरूच्या साहाय्याने आणि जाड कागदावर केलेलं जुन्यात जुनं लेखन उपलब्ध आहे.

मुद्रणकला पहिल्यांदा आली त्या वेळेला मुद्रणाचे जे साचे आले ते साचे दगडातले होते. लोखंडातले बारीक अक्षरांचे साचे उशिरा आले. आणि म्हणून मुद्रण कलेमध्येसुद्धा त्याला ‘शिळा प्रेस’ असं म्हणतात. सुरुवातीला जो छापखाना आला त्यात शिळांच्यावर कोरलेली अक्षरं असत, त्यावर शाई ओतली जायची. त्यावर कागद दाबायचा. आणि मग ती ठसे उमटलेली अक्षरं हेच प्राथमिक मुद्रण. त्यामुळे लेखन परंपरा सुरू व्हायला पुष्कळ काळ जावा लागला. पुष्कळ खटाटोप करावा लागला. अनेक संस्कार करावे लागले. आणि म्हणून लोकपरंपरेमधलं जे साहित्य आहे, ते प्रामुख्याने शाब्द परंपरेमध्ये राहिलेलं आहे. मौखिक परंपरेमध्ये राहिलेलं आणि टिकलेलं आहे. याशिवाय दैनंदिन जीवनाशी निगडित सर्व प्रकारच्या कलांमध्ये स्त्रीनिर्मित कलांचे अनेकविध आविष्कार दिसतात. त्याविषयी विस्तृत माहिती पुढील भागात.

●chaturang@expressindia.com