बॅरिस्टर एक हिमनग

साधारण १९७७चा सुमार- एका दुपारी ‘गोवा हिंदू असोसिएशन’च्या हॉलचं दार मी घाबरत-घाबरत उघडलं.

(संग्रहित छायाचित्र)

– प्रतिमा कुलकर्णी

‘बॅरिस्टर’- जयवंत दळवी लिखित आणि विजया मेहता दिग्दर्शित नाटक. हे रडवणारं नाटक नाही. नाटकभर बरेच वेळा प्रेक्षक हसतात, खूश होतात, गम्मत अनुभवतात.. मुळात दळवींनी नाटक उदासवाणं लिहिलेलं नाही. पात्रांचा हा सगळा मनोव्यापार, त्यातली आंदोलनं, कल्लोळ, हे हिमनगासारखं खोल राहतं आणि आपल्या समोर उलगडतं एक असं नाटक ज्यात आपण चुटपुटतो, हळहळतो, पण रडत नाही. तरीही शेवटी पडदा पडतो तो आपल्याला घायाळ अवस्थेत सोडून..

‘बॅरिस्टर’- जयवंत दळवी लिखित आणि विजया मेहता दिग्दर्शित सुमारे ४० वर्षांपूर्वी आलेलं नाटक. आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. म्हणूनच ‘बॅरिस्टर’वर लिहा असा प्रेमळ आग्रह एका वाचकाने केला. ‘बॅरिस्टर’ म्हटलं की दोन आठवणी हमखास येतातच. दुसऱ्या आठवणीविषयी – पुढल्या लेखात!

आत्ता पहिली आठवण-

साधारण १९७७चा सुमार- एका दुपारी ‘गोवा हिंदू असोसिएशन’च्या हॉलचं दार मी घाबरत-घाबरत उघडलं. विजयाबाईंची तालीम सुरू आहे हे माहीत असल्यामुळे त्यात व्यत्यय येणार नाही अशा बेताने. सुहास जोशी आणि विजयाबाईंचा नाटकातला एक प्रसंग चालू होता. एक तात्पुरता छोटय़ा खोलीचा सेट लावला होता आणि सुहास -म्हणजेच राधाक्का- बाईंना, म्हणजे मावशीबाईंना सांगत होती- ‘‘मला विष तरी आणून द्या..’’

मला नाटकाबद्दल काहीच माहिती नव्हती. मला वाटलं, हे नाटक त्या मुलीचं आहे. जसजशी मी ती तालीम आणि पुढे अनेक प्रयोग बघत गेले तसं-तसं हे नाटक कशाबद्दल आहे याची माझी जाण विस्तारत गेली ती आजतागायत.

‘बॅरिस्टर’ नाटकाकडे अनेक कोनांतून बघता येतं. प्रत्येक पात्राने आपापली कहाणी सांगितली तर ते पात्र ती वेगवेगळ्या कोनातून सांगेल आणि प्रत्येक वेळी त्याचा पट आणि पोत पूर्णपणे वेगळा असेल. १९२५-३०च्या सुमारास विलायतेहून शिकून आलेले सुधारक बॅरिस्टर, बालपणीच विधवा झालेली त्यांची सोवळी मावशी, यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहात असलेला एक साधा भोळा मध्यमवर्गीय तरुण भाऊराव, त्याची सुंदर त्याच्याहीपेक्षा तरुण असलेली बायको राधाक्का आणि भाऊरावाचे नट असलेले चंगीभंगी वडील तात्या.. एका विशिष्ट काळात, विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट संस्कृतीत या सगळ्यांचं एकत्र येणं- त्या येण्याने त्यांच्यात असे प्रसंग घडत जातात की ज्यामुळे त्या सगळ्यांचीच आयुष्य- उधळली जातात.. यातला एक जरी धागा जरा इकडचा तिकडे झाला तर ते नाटक मुळापासून बदलेल- किंवा मुळात घडणारच नाही.

नाटकाचा पट मोठा आहे, पण प्रयोग मात्र बंदिस्त! त्याचं एक कारण म्हणजे त्याची रंगावृत्ती आणि दुसरं मोठं कारण म्हणजे त्याचं नेपथ्य. बॅरिस्टरचा वाडा मोठा प्रशस्त असणार, पण आपल्याला दिसते फक्त त्याची मागची पडवी, न दिसणाऱ्या वाडय़ाची श्रीमंती दाखवणारा नक्षीदार खांब, बुलंद असा कोरीव लाकडी दरवाजा, एक लखलखता सोनेरी कर्णा मिरवणारा ग्रामोफोन आणि एक झुलणारी आरामखुर्ची. ही खुर्ची नाटकात फार मोठी भूमिका बजावते आणि नाटकाचा जीवघेणा विदारक शेवटही ही खुर्चीच करते!

हे सगळं रंगमंचाच्या एका भागात- दुसऱ्या भागात एक छोटंसं साधं घर- त्याची ओसरी आणि आतमध्ये न दिसणारी एक खोली.

रंगमंचावर जेवढं नाटय़ घडतं तेवढंच या न दिसणाऱ्या वाडय़ाच्या भागात आणि न दिसणाऱ्या खोलीत, त्या मागे सूचित होणाऱ्या विहिरीवरही घडतं! बॅरिस्टरच्या घरात वेडाची परंपरा आहे. त्याचे आजोबा, वडील, मोठे बंधू नाना – सगळे त्या खुर्चीत निष्क्रियपणे बसून राहतात आणि एक दिवस परागंदा होतात. यामुळे बॅरिस्टर मनातून पोखरला जातोय. त्या काळच्या धार्मिक परंपरा, जाचक रूढी त्याला मान्य नाहीत, पण आपल्या मावशीला विकेशा होण्यापासून तो वाचवू शकलेला नाही, याची बोचही त्याच्या मनात आहे. पण तो काही फक्त एक सामाजिक प्राणी नाही, त्याला स्वत:चं खासगी आयुष्य तर आहेच, पण एक रसिक मन, रसिक दृष्टी, आयुष्याची व्यामिश्र गुंफण या सर्वाची जाणीव आहे- जोडीला वंशपरंपरेतून आलेली मानसिक दुर्बलातही आहे. विलायतेला त्याच्या विरहात एकटी राहिलेली ग्लोरिया आहे, तर इथे जिच्याशी लग्न ठरूनही त्यानं ते केलेलं नाही अशी दमयंती आहे.

या पाश्र्वभूमीवर त्याला भेटते राधाक्का- जी भाऊरावाशी लग्न करून आलेली आहे. भाऊराव राधाक्काचा संसार फुलतो आहे, वाढतो आहे- त्याच्या उलट बॅरिस्टर आणि मावशीबाई- यांचा वाडा उजाडतो आहे. ते दोघं समोर फुलणाऱ्या संसाराकडे बघत स्वत:च्या इच्छा पूर्ण करण्याची धडपड करत राहतात. एका पावसाळी रात्री नानाही परागंदा होतात आणि त्यांना शोधायला गेलेले भाऊराव आजारी पडून जग सोडतात. सुधारक बॅरिस्टरच्या डोळ्यासमोर राधाक्काचं केशवपन होतं आणि बॅरिस्टर हताशपणे बघत राहतो. तात्या-राधाक्काचे सासरे तिच्यावर जबरदस्ती करू पाहतात आणि विहिरीत पडून मरतात. कसे ते कळत नाही, पण बॅरिस्टर तिला वाचवायला विहिरीवर गेलेला असतो हे खरं!

या सगळ्या अवधित बॅरिस्टरचा प्रवास अपरिहार्यपणे आपल्या वाड-वडिलांच्या वाटेने निघालेला असतो आणि मावशीबाई, राधाक्का आणि त्याबरोबर पाहणाऱ्या आपल्यालाही विदीर्ण करत तो आपल्या परिणतीकडे पोचतोही!

पण- हे रडवणारं नाटक नाही. नाटकभर बरेच वेळा प्रेक्षक हसतात, खूश होतात, गम्मत घेतात.. मुळात दळवींनी नाटक उदासवाणं लिहिलेलं नाही. पात्रांचा हा सगळा मनोव्यापार, त्यातली आंदोलनं, कल्लोळ, हे हिमनगासारखं खोल राहातं आणि आपल्या समोर उलगडतं एक असं नाटक ज्यात आपण चुटपुटतो, हळहळतो, पण रडत नाही. काही प्रसंग-

विलायतेत ग्लोरिया गेली हे कळल्यावर तिचा पोशाख हातात घेऊन बॅरिस्टर भाऊरावांकडे येतात. तो गाऊन त्याने अशा रीतीने धरलेला असतो की जणू ते ग्लोरियाचं कलेवर आहे.

मावशीबाई बालविधवा आहेत. त्यांच्या वाटय़ाला आलेयत ते फक्त कष्ट आणि अनेक प्रकारच्या अतृप्त इच्छा. स्वत:च्या आयुष्याबद्दल बोलताना मावशीबाई त्यांचे सगळे भोग तटस्थपणे सांगतात असं वाटतं, पण त्याला एक खिन्न अस्तर असतं. बॅरिस्टर आणि मावशीबाई समोरच्या संसारात अतिरेकी रस घेतात- हे सगळं आपल्याला अस्वस्थ करत जातं.

अनेक र्वष मावशीबाईंशी अबोला धरल्यावर बॅरिस्टर त्यांना बोलावतात. त्या वेळी आधी येतो तो दाराच्या कोरीव चौकटीवर मावशीचा गोरा पान हात- आणि मग त्यांचा आवाज- ‘‘मी नाही यायची- मी नाही दाखवायची माझं पांढरं कपाळ त्याला.’’ हे वाक्य बॅरिस्टरचं आणि आपलंही काळीज चिरून जातं. आधी आलेल्या सगळ्या तटस्थ संवादांचा वादी सूर – काऊंटर पॉइंट- असल्यासारखं. आधीच्या सगळ्या तटस्थतेला भेदून काढत त्यांच्या आयुष्याची शोकांतिका आपल्याला हादरवते.

न दिसणाऱ्या विहिरीत पडून तात्या मरतात तेव्हा अंधारलेल्या मंचावर गडगडत येते ती एक कळशी आणि तिच्या मागे हातात कंदील घेतलेले बॅरिस्टर. असे हे नाटय़मय क्षण पूर्ण नाटकात अतिशय निगुतीने वापरलेले आहेत. जाता-येता नाटय़ घडवल्यास हळूहळू त्याचा परिणाम क्षीण होत जातो. अर्थशास्त्रात सांगितलेली ‘लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी’ कलेलाही लागू पडते. ग्रामोफोनवर मधून-मधून मावशीबाई बालगंधर्वाची गाणी ऐकत असतात. बॅरिस्टर राधाक्काला केस वाढवायला लावतात, परत लग्न करायचा आग्रह धरतात. ती हरखते. पण राधाक्का प्रश्न विचारते ते त्यांना सहन होत नाही आणि शेवटी तेही त्या झुलत्या खुर्चीत बसतात! मागे बालगंधर्वाचं भैरवीतलं गाणं ऐकू येतं- ‘‘दया छाया घे निवारुनिया.. प्रभू मजवरी कोपला..’’

मंचावर मावशीबाई, राधाक्का आणि आपल्या खुर्चीत आपण- विदीर्ण होऊन थिजून बसलेलेच राहतो. न टाळ्या वाजवायचं भान, न अभिवादन करण्याचं.. नाटकाने रडवलं असतं तर आपल्या भावनांचा निचरा होऊन त्या आसवांबरोबर वाहून गेल्या असत्या. पण तसं होत नाही. पडदा पडतो तो आपल्याला अशा घायाळ अवस्थेत सोडून..

pamakulkarni@gmail.com

chaturang@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Article on barrister ek himnag play

ताज्या बातम्या