scorecardresearch

निडर हिरो

अंगावर चालून आलेल्या काळाला आपल्या धैर्याने त्याने हरवले. मृत्यूच्या स्वाधीन होऊनही आपल्या धीरोदात्त वागण्याने त्याने काळावर मात केली.

निडर हिरो
(संग्रहित छायाचित्र)

ज्योती दाते

शाळेत असलेल्या रोहनला आधी ब्रेन टय़ुमर आणि नंतर कर्करोगाचे निदान झाले. आणि सुरू झाली एक झुंज आजाराशी. अवघ्या १५-१६ व्या वर्षी रेडिएशन, किमोथेरपी आणि दोन शस्त्रक्रियांना निडरपणे सामोरे जाऊनही रोहनची ही झुंज १७ व्या वर्षी अखेर थांबली. पण ही दोन-तीन वर्षे त्याने सगळ्यांना दिलासा देत, रुग्णालयात हिरो होत आनंदाने, धैर्याने काढली. आणि त्याच्या प्रेरणेने पाच लाख रुपयांचा निधीही गोळा झाला.. त्या निडर रोहन दातेविषयी..

माझा धाकटा नातू रोहन नुकताच मेंदूच्या कर्करोगाला बळी पडला. अवघे १७ वर्षांचे आयुष्य.. त्याचा वियोग पचवणे अत्यंत अवघड असले, तरी गेले १५ महिने रोहनने ज्या धैर्याने व उदात्तपणे या रोगाशी सामना केला, ते पाहून आम्ही सर्वच अवाक झालो. त्याची या भयानक रोगाशी चाललेली झुंज आम्ही बघितली, त्यावेळचे त्याचे धैर्य, झुंजार आणि आनंदी वृत्ती पाहताना व प्रत्यक्ष अनुभवताना आम्हाला एक वेगळाच रोहन बघायला मिळाला.

रोगाचे निदान झाल्यापासून मेंदूच्या दोन शस्त्रक्रिया, रेडिएशन व केमोथेरपीची सात सायकल्स पूर्ण करताना व सर्व उपचारांनंतरही रोग परत आलेला आहे हे कळल्यावरदेखील त्याच्या तोंडून तक्रार, दु:खाचे शब्द आम्ही ऐकले नाहीत. अजिबात न डगमगता तो मृत्यूला सामोरा गेला. त्याच्या धैर्यापुढे आमच्या दु:खाला झाकूनच ठेवावे लागले. हे आव्हान हसतमुखाने झेलण्यास त्यानेच आम्हाला भाग पाडले.

अंगावर चालून आलेल्या काळाला आपल्या धैर्याने त्याने हरवले. मृत्यूच्या स्वाधीन होऊनही आपल्या धीरोदात्त वागण्याने त्याने काळावर मात केली. त्याच्या वाटय़ाला आलेल्या छोटय़ाशा आयुष्यात तो आम्हाला एक मोठा धडा शिकवून गेला. गेली पाच वर्षे काही ना काही कारणामुळे मला सतत रोहनबरोबर राहण्याची संधी मिळाली. मुलगा समीर व सून दीपाली गाण्याच्या कार्यक्रमासाठी सतत परदेश दौरे करीत असल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत १३ वर्षांच्या रोहनचा सांभाळ व देखभाल करण्यासाठी मला सतत पुण्याहून मुंबईला यावे लागत होते. सर्वसामान्य किशोरवयीन मुलांप्रमाणेच रोहनही आपल्या खटय़ाळ, मिश्कील व व्रात्य खोडय़ांनी आजीला बेजार करण्याची एकही संधी सोडत नसे. अभ्यासाची टाळाटाळ करून आजीला, पालकांना व शिक्षकांना जेरीस आणूनही दहावीला ८० टक्के मार्क मिळवले, तेव्हाच त्याने आम्हाला आनंदाश्चर्याचा पहिला धक्का दिला.

स्वत:च्या रूपाबद्दल सतत जागरूक असणारा देखणा रोहन तासन्तास आरशापुढे उभा राहून निरनिराळ्या केशभूषा करून बघण्यात, केसांना व चेहऱ्यांना नाना प्रकारच्या क्रीम्स चोपडण्यात सतत मग्न असायचा. तोंडावर एखादी जरी पुटकुळी दिसली तरी माझ्या मागे लागून स्किन स्पेशालिस्टला दाखवून त्यावरील औषधे आणून ती लावेपर्यंत त्याला चैन पडत नसे आणि एवढेसे खरचटले तरी आकांडतांडव करून लाड करून घेण्याची संधी तो सोडत नसे.

२८ डिसेंबर २०१७ ला आमच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस असल्यामुळे रोहन व ऋषी (मोठा नातू) यांच्या आग्रहानेच पुण्यात मोठी पार्टी करायची ठरली. सर्व आमंत्रणे देऊन झाली. १०-१५ दिवस आधी डोके दुखते, अधूनमधून उलटी होते, अशी तक्रार रोहन करू लागला. संपूर्ण तपासणीनंतर ब्रेन टय़ूमर असल्याचे निदान झाले. आमच्या पायाखालची जमीनच सरकली. तातडीने पार्टी रद्द करून आम्ही मुंबईला धावलो. ब्रेन स्टेमच्या वर असलेला पिंगपाँग बॉलच्या आकाराचा टय़ूमर ताबडतोब काढण्यासाठी शस्त्रक्रिया करायला हवी होती. आमच्या तोंडचे पाणीच पळाले, पण रोहनच्या अंगात जणू हजार हत्तींचे बळ सामावले. त्याच्या चेहऱ्यावर काळजीचा, दु:खाचा लवलेश दिसला नाही. हसतमुखाने, जराही न घाबरता तो मेंदूवरच्या शस्त्रक्रियेला सामोरा गेला. ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्यापूर्वी हसत-हसत हात हलवून, विजयाचा अंगठा वर करून, त्याने सगळ्यांचा निरोप घेतला. आठ तासांची गुंतागुंतीची, आम्हा सगळ्यांना चिंताग्रस्त मनाने वाट पाहायला लावणारी शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडल्यावर शुद्ध आली, तेव्हाही स्मितहास्याने हात उंचावून सर्व आलबेल असल्याची खूण त्याने केली. पाचव्या दिवशी त्याला घरी आणले. टय़ूमर काढून टाकल्याने डोके दुखणे थांबले होते. तब्येत सुधारू लागली होती. त्याच्या चेहऱ्यावरचे स्मितहास्य कायमच होते.

आठवडाभरात बायोप्सीचा रिपोर्ट आला तोच कर्करोग असल्याचे सांगत. पुन्हा एकदा आमच्या तोंडचे पाणी पळाले. पण रोहनच्या हसण्यात, वागण्यात, बोलण्यात काहीच फरक पडला नाही. ‘गुगल’वरून त्याने स्वत: रोगाची, उपचारांची सर्व माहिती शोधून काढलीच होती. डॉक्टरांनी देखील रेडिएशन व केमोथेरपी घ्यावी लागणार, हे त्यालाच स्पष्ट सांगितले, तरी तो जराही डगमगला नाही.

अमेरिकेत सॅन होजे इथे राहणाऱ्या माझ्या मुलीने, अश्विनीने, तोवर माहिती काढली होती, की अमेरिकेत टेनेसी प्रांतात, मेंफिस या शहरात ‘सेंट ज्यूड्स’ नावाचे खास लहान मुलांसाठीचे ‘कॅन्सर रिसर्च सेंटर’ व अद्ययावत हॉस्पिटल आहे. तिथे रोहनचा सर्वोत्तम इलाज होऊ शकेल. योगायोगाने ‘सेंट ज्यूड्स’चे प्रमुख कर्करोगतज्ज्ञ

डॉ. गज्जर हे माझ्या सुनेच्या, दीपालीच्या, ओळखीचे निघाले. त्यांच्या मते रोहनची आणखी एक शस्त्रक्रिया करून टय़ूमर १०० टक्के काढून टाकावा लागणार होता व त्यानंतर रेडिएशन व केमोथेरपी घ्यावी लागणार होती. त्यासाठी ११ महिने मेंफिस येथे राहावे लागणार होते. अमेरिकेत जाऊन ११ महिने राहणे व आणखी एक शस्त्रक्रिया करणे यामुळे अस्वस्थ होऊन समीरची- त्याच्या बाबाची चलबिचल होत होती. पण रोहनने आमचे काम सोपे करून टाकले. उपचारांसाठी अमेरिकेला जायचे ठरले आहे, हे कळल्यावर तो खूशच झाला. गेल्या-गेल्या आणखी एक शस्त्रक्रिया करून घ्यायलाही त्याची काहीच हरकत नव्हती. अकरा महिने अमेरिकेत राहायला मिळणार म्हणून तो खूशच होता. त्याचा तो निरागस आनंद पाहून आम्हाला एकीकडे बरे वाटत होते, पण दुसरीकडे मनात कालवाकालव होत होती.

‘सेंट ज्यूड्स’ हॉस्पिटलमधील वातावरण, डॉक्टर्स, नर्सेस यांची वागणूक, अद्ययावत वैद्यकीय उपकरणे व चोख व्यवस्था पाहून तो खूपच प्रभावित झाला. जराही न घाबरता मेंदूच्या दुसऱ्या शस्त्रक्रियेला सामोरा गेला. शस्त्रक्रिया उत्तम झाल्याचे व टय़ूमर १०० टक्के काढून टाकल्याचेही त्यानेच आम्हाला हसतमुखाने सांगितले. रेडिएशनचा एक महिन्याचा कोर्स संपल्यावर त्याला पुढचा एक महिना कोणतेही उपचार घ्यायचे नव्हते. मेंफिसला परत गेल्यावर केमोथेरपीच्या सायकल्स सुरू झाल्या. त्याचा त्रास, केस गळणे वगैरे सर्वातून त्याला जावे लागत होते. पण त्याचा बाऊ त्याने कधीच केला नाही.

अमेरिकेचे आठ वर्षे उपराष्ट्रपती असलेले व सध्या संपूर्ण अमेरिकेतील कर्करोग संशोधन कार्यक्रमाचे प्रमुख असलेले जो बायडन जेव्हा ‘सेंट ज्यूड्स’ हॉस्पिटलला भेट द्यायला आले, तेव्हा त्यांना भेटायला निवडलेल्या तीन मुलांमध्ये रोहनचा समावेश होता. त्या अविस्मरणीय भेटीचा आनंद त्याने लुटला.

किमोचा त्रास त्याला होतच होता. पण त्यातूनही गमतीचे किस्से शोधून तो आम्हाला सांगत असे. तो भारतातील कोणते जेवण सगळ्यात जास्त ‘मिस’ करतो असे एकदा त्याला विचारण्यात आले, तेव्हा त्याचे उत्तर होते, बटर चिकन व गार्लिक नान. ‘सेंट ज्यूड्स’मधील आहारतज्ज्ञांनी रोहनला खूश करण्याचा विडा उचलला. ‘गुगल’वरून पाककृती शोधून इंडियन स्टोअरमधून सामान मागवण्यात आले व दोन्ही पदार्थ खास रोहनसाठी बनवण्यात आले. त्याला स्वतंत्र टेबलावर बसवून खिलवण्यात आले. त्याच्याकडून पसंतीची दाद मिळेपर्यंत सर्व गोष्टी चित्रबद्ध करण्यात आल्या. जाहिरातीसाठी बनवलेली ही चित्रफीत आम्हाला पाठवताना आपण हिरो बनल्याचा आनंद रोहनच्या चेहऱ्यावरून ओसंडत होता.

त्याची उपचारप्रक्रिया आता संपत आली होती. स्वत: रोहन, आम्ही सर्व घरातली मंडळी तसेच ‘सेंट ज्यूड्स’मधले डॉक्टर्सही रोहन उपचार पूर्ण करून रोगमुक्त होऊन परत जाणार, या खुशीत असतानाच परत येण्यापूर्वी ५-६ दिवस आधी त्याचा शेवटचा एम.आर.आय. घेण्यात आला. त्यात आधीचा भाग रोगमुक्त दिसत असला, तरी मेंदूच्या इतर भागात काही स्पॉट्स डॉक्टरांना दिसले. ते पाहिल्यावर डॉक्टर गंभीर झाले. इतक्या उत्तम उपचारांनंतरही रोगाने मेंदूच्या इतर भागांमध्ये हात-पाय पसरलेले बघून डॉक्टरही हतबुद्ध झाले. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी स्वत:च रोहनला सत्य परिस्थिती सांगितली. तरीही रोहन शांत होता. ‘ठीक आहे, मग मी आता भारतात परत जातो. मला मित्रांना व घरच्यांना भेटायचे आहे,’ असे म्हणून त्याने डॉक्टरांचा निरोप घेतला.

समीरला, माझ्या मुलाला त्याच्या डोळ्याला डोळा भिडवण्याचे साहस होत नव्हते. रोहनच्या प्रश्नांना काय उत्तर द्यायचे याची जुळवाजुळव त्याने मनाशी करून ठेवली होती. पण रोहनने कोणतेच प्रश्न कधीच विचारले नाहीत. आपले प्राक्तन त्याने शांतपणे स्वीकारले होते.

त्याच्या जन्माच्या आधीपासून आमच्याकडे कामाला असलेल्या व त्याला आईच्या मायेने सांभाळलेल्या अनिताजवळ  तो मनातले सगळे बोलत असे. तिला त्याने सांगितले होते की, ‘‘मुझे मालूम है की मैं जा रहा हूँ’! मगर तुम लोग फिकिर मत करना. खूश रहना, मैं तैयार हूँ! वर जाऊन मी माझ्या पणजोबाला (कै. रामूभय्या दाते), अरू आजोबांना (कै. अरुण दाते), कुमुद आजीला व त्याच्या आईच्या आजीला सगळ्यांना भेटणार आहे. आनंदात राहणार आहे. तुम्ही पण आनंदात राहा. पण माझी ही जगावेगळी गोष्ट मात्र नक्की लिहा.’’ त्याच्या सगळ्याच इच्छा पूर्ण करायला आम्ही आसुसलेले होतो. मग ही इच्छा तरी कशी डावलणार. डोळ्यात अश्रू व हृदयावर मणामणाचे ओझे, अवतीभोवती रोहनच्या आठवणींचा घेराव असतानाही मला लेखणी उचलावीच लागली.

त्याला वेदना होऊ नयेत म्हणून इथले डॉक्टर्स शेवटपर्यंत प्रयत्नांची शर्थ करीत होते. शेवटी १३ मार्चला, दुखण्याला सुरुवात झाल्यापासून १५ महिन्यांनी त्याला सर्व वेदनांपासून मुक्ती मिळाली. धीरगंभीरपणे तो मृत्यूला सामोरा गेला.

रोहन मेंफिसमध्ये उपचार घेत असतानाच त्याने कर्करोगग्रस्त मुलांसाठी फंड जमवण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. समीरने ती लगेच पूर्ण करण्याचे ठरवले. कर्करोगग्रस्त लहान मुलांसाठी मुंबईत राहण्याची, जेवण्या-खाण्याची व हॉस्पिटलला ने-आण करण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या ‘अेसेस लाइफ’ या बांद्रा येथील स्वयंसेवी संस्थेची माहिती काढून त्या संस्थेसाठी रोहनच्या नावाने फंड गोळा करण्याचा विडा त्याने उचलला. या उदात्त उपक्रमाला इतका भरघोस प्रतिसाद मिळाला, की आठ दिवसांच्या आत पाच लाख रुपयांचा निधी रोहनच्या नावाने उघडलेल्या फंडात जमा झाला. ‘अेसेस लाइफ’ संस्थेमध्ये देणगीदारांच्या भिंतीवर रोहनच्या नावाचा फोटो व बोर्ड लागला. ही खरी रोहनला श्रद्धांजली!

एका दु:खद घटनेचे रूपांतर उदात्त समाजसेवेत झाल्याने आम्हा सर्वानाच समाधान वाटले. दु:ख थोडे हलके झाले. रोहनच्या या दुर्धर रोगाशी केलेल्या असामान्य धीरोदात्त लढय़ामुळे आम्हाला रोहनचा सदैव अभिमानच वाटत राहील. रोहन आजन्म आमचा निडर हिरोच असेल.

datejyoti@ymail.com

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या