scorecardresearch

Premium

गतिमान काळातील कुटुंब संस्था

यापुढे या कुटुंब बदलाचे धक्के जर आपल्याला बसू द्यायचे नसतील तर अनेक प्रकारच्या कुटुंबरचना आपणच निर्माण केल्या पाहिजेत आणि प्रत्येक व्यक्तीची कुटुंब निवड समाजात मान्य झाली पाहिजे. अमुक नात्यांनी बनलेले आणि अमुक एकसंख्या असणारे, तेच तेवढे कुटुंब असे यापुढे आपल्या पूर्वजांपेक्षा उत्क्रांत झालेल्या आणि अर्थव्यवस्थेचा चक्रिय इतिहास माहीत झालेल्या माणसाला म्हणता येणार नाही. गतिमान काळात कुटुंब संस्था टिकणार का, या प्रश्नाचा १५ मेच्या जागतिक कुटुंब- दिनानिमित्ताने घेतलेला वेध.

गतिमान काळातील कुटुंब संस्था

यापुढे या कुटुंब बदलाचे धक्के जर आपल्याला बसू द्यायचे नसतील तर अनेक प्रकारच्या कुटुंबरचना आपणच निर्माण केल्या पाहिजेत आणि प्रत्येक व्यक्तीची कुटुंब निवड समाजात मान्य झाली पाहिजे. अमुक नात्यांनी बनलेले आणि अमुक एकसंख्या असणारे, तेच तेवढे कुटुंब असे यापुढे आपल्या पूर्वजांपेक्षा उत्क्रांत झालेल्या आणि अर्थव्यवस्थेचा चक्रिय इतिहास माहीत झालेल्या माणसाला म्हणता येणार नाही. गतिमान काळात कुटुंब संस्था टिकणार का, या प्रश्नाचा १५ मेच्या जागतिक कुटुंब- दिनानिमित्ताने घेतलेला वेध.
प्रे म, विश्वास आणि सुरक्षितता ही महत्त्वाची कौटुंबिक मूल्ये आहेत. ही मूल्ये जिथे असतात तिथे कुटुंब असते. मग ते माळरानावर आईच्या कुशीतसुद्धा असते. घर म्हणजे चार भिंती व छपराचा फक्त निवारा असतो. ज्या घरामध्ये प्रेम किंवा सुरक्षितता नसते; तिथली मुले पळून स्टेशनचा आसरा घेतात. अशी भग्न कुटुंबे आजही आहेत. म्हणजेच चार भिंतींचे घर असले की तिथे ‘कुटुंब’ असेलच असे नाही. एखादी कुटुंबरचना समाजात सर्वमान्य झाली की त्यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी काही नियम बांधावे लागतात आणि मग कुटुंबाचे रूपांतर कुटुंब संस्थेत होत असते. अशा रीतीने कुटुंब, घर आणि कुटुंब संस्था या वेगवेगळ्या संकल्पना आहेत.
आता, आजच्या गतिमान काळात, आज रूढ असलेली कुटुंब संस्था टिकणार का? तर पहिल्या प्रथम हे जाणावे लागेल की, गेल्या सुमारे ५०-६० हजार वर्षांच्या काळात वेगवेगळ्या कुटुंबरचना उदयास आल्या आणि अस्तास गेल्या. प्रत्येक काळ हा नेहमीच मागील काळापेक्षा गतिमान असतो आणि म्हणून प्रत्येक कालखंडामध्ये, आधीची कुटुंबरचना मोडली किंवा तिने वेगळे रूप धारण केले असे आपल्याला म्हणता येईल. या कुटुंबरचना मोडताना, आपल्या पूर्वजांनीसुद्धा मोठा विरोध केला. हिंसा झाली. युद्धेसुद्धा झाली.
म्हणून आज कुटुंब मोडते आहे, म्हणजे आजच काहीतरी अघटित घडत आहे, असे नाही. पण मग कुटुंबरचना बदलण्याचे कारण काय? तर स्त्री-पुरुष शरीरसंबंधाची पद्धत बदलली की कुटुंबरचना बदलते. विवाहप्रथासुद्धा ‘एक पती-पत्नीत्व’ ही शरीरसंबंधाची निष्ठापद्धत सांगते, ज्यामधून ‘माता-पिता-मुले’ ही कुटुंबरचना उदयास आलेली आहे आणि स्त्री-पुरुष शरीरसंबंधाच्या या पद्धती बदलण्यामागे अर्थव्यवस्थेतील बदल कारणीभूत असतात. माणूस हा गेली काही हजार वर्षे विविध शोधातून आपली सारखी प्रगती करीत आहे. प्रत्येक वेळेस नव्या नव्या तांत्रिक बदलाने भौतिक प्रगती होत असते. अर्थव्यवस्थेत त्या अनुषंगाने बदल होतो आणि त्यातून स्त्री व पुरुषाची स्थाने, भूमिका किंवा महत्त्व यामध्ये बदल होत असतो. म्हणजे दोघंही स्वावलंबी असतात किंवा एक दुसऱ्यावर अवलंबित होतो किंवा स्त्री-पुरुष दोघंही एकमेकांवर अवलंबित होतात वगैरे! अर्थव्यवस्थेच्या फिरत्या चक्रामुळे, कुटुंबरचनेत स्त्री व पुरुष दोघे कसे नि कुठे राहणार? त्यांची पोट भरण्याची सोय काय? किंवा त्यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार कसे असणार, त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये (भिन्नलिंगी) शरीरसंबंधाच्या संधी तयार होत असतात आणि त्यानुसार कुटुंबरचना आकार घेत असते.
महत्त्वाचे म्हणजे, मानवी जीवनात निसर्गाची स्वत:ची एक कुटुंबरचना मुळाशी असते. ही नैसर्गिक कुटुंबपद्धत नवजात पिढीच्या जगण्याशी, वाढण्याशी संबंधित असते, म्हणून तीच तेवढी कायम असू शकते. ‘माता-अपत्ये’ हे या कुटुंबाचं स्वरूप असते आणि माणसासह सर्व सस्तन प्राण्यांमध्ये ती आढळते. माणूस जंगली अवस्थेत झाडाच्या आधाराने राहताना, त्याची कुटुंबरचना ‘माता-अपत्ये’ अशीच असू शकते. मेंदूचा विकास फार झालेला नाही. एकमेकांना दीर्घकाळ स्मरणात ठेवता येत नाही, कोणतीही नाती समजत नाहीत. फक्त मूल आणि त्याला जंगलात जन्म देणारी, त्याच्या संरक्षणासाठी डोंगर-दऱ्यांतून पळणारी जंगली माता असे ‘माता-अपत्य’ कुटुंब संशोधक मानतात. ही कुटुंबावस्था माणूस हा दोन पायांवर उभा झाला तेव्हापासून हजारो वर्षे त्याच स्थितीत होती. कारण अर्थव्यवस्थेला चेहरा प्राप्त झालेला नव्हता. पोट भरण्यामध्ये स्त्री व पुरुष स्वावलंबी होते. त्यांचे भेटणे अनिश्चित, म्हणून शरीरसंबंध स्वैर होते. मग ज्यांचे एकत्र राहणे अपरिहार्य आहे, ती ‘माता-मूल’ कुटुंबरचना या कालखंडात दिसते.
स्त्रीला स्थैर्याची गरज पुरुषापेक्षा जास्त असते. अग्नीचे उपयोग कळल्यावर, अग्नी घेऊन स्त्री जेव्हा गुहेतून स्थिर झाली, तेथपासून रानटी युग सुरू झाले, असे संशोधक मानतात. माता-मुले यांच्या टोळ्या अग्नीभोवती गुहेतून स्थिर झाल्या आणि जंगलातून गोळा केलेल्या अन्नपदार्थाचे टोळी सदस्यांमध्ये टोळीमाता जेव्हा वाटप करू लागल्या, तेव्हा टोळीतील स्त्री-पुरुषांचे जगण्यासाठी एकमेकांवरचे अवलंबित्व प्रथमच सुरू झाले. संस्कृत शब्द ‘मा’ म्हणजे वाटप करणे यावरून टोळीमध्ये अन्नपदार्थाचे वाटप करणाऱ्या स्त्रीला ‘माता’ हे संबोधन पुढे प्राप्त झाले. माता-मुले यांचे नाते वाढत्या स्मरणशक्ती आणि सततच्या स्थिर राहण्याने दृढ होत गेले. तसे पुढे भाऊ, बहीण, मामा, मावश्या, आई, आजी असे एकत्र मातृटोळीकुटुंब उदयास येऊन ‘माता-मूल’ ही मूळ कुटुंबव्यवस्था त्याच्या विस्तारातून बदलली. जंगली युगातला अर्थव्यवस्थेचा स्वैरपणा जसा रानटी युगात राहिला नाही, तसतसे स्वैर शरीरसंबंध आटोक्यात आले. टोळीच्या एकजुटीसाठी, सुरक्षिततेसाठी आणि सामायिक पोटभरणासाठी मानवी जीवनात प्रथमच भावंडांत आणि नातलगांत टोळीअंतर्गत शरीरसंबंध सोयीचे झाले, ज्याला संशोधक ‘एन्डोगामी-इन्सेस्ट’ असे संबोधतात.
रानटी युगाच्या उत्तरार्धात नवनव्या शोधांमुळे मातृटोळ्या विविधे उत्पादने कुळातून घेऊ लागल्या. उद्योगातील वैविध्याप्रमाणे टोळीमधून मातेच्या नावाने कुलपद्धती उदयास आली. भारतीय संस्कृतीत दनू स्त्रीचे दानव, दितीचे दैत्य, अदितीचे आदित्य अशी कुळे सांगितली जातात. या मातृकुळामध्ये निर्माण झालेल्या वस्तूंच्या देवाणघेवाणीतून व्यापारव्यवस्था उदयाला आली. निव्वळ शिकार करणारे पुरुष मातृकुळांना जंगलातील कच्चा माल पुरवू लागले, तर स्त्रिया आपली उत्पादने अनेक मातृकुळातून घेऊन जाऊ लागल्या. या बदलत्या अर्थव्यवस्थेतून स्त्री व पुरुषांचे नातलगांतील शरीरसंबंध बंद पडले आणि भिन्न भिन्न मातृकुळातल्या स्त्री-पुरुषांमध्ये ते घडून येऊ लागले. एकमेकांना पूरक ठरणारे उद्योग करणाऱ्या मातृकुळांना स्त्री-पुरुषांच्या शरीरसंबंधाद्वारे जोडता येणे हे आर्थिकदृष्टय़ा फायदेशीर होऊ लागले, तसतसे कुळांतर्गतचे नात्यातले संबंध कमी होत, पुढे त्यावर बंदी आणण्यात तर आलीच, पण तसे संबंध कोणी केल्यास त्यांच्यासाठी मृत्युदंडासारख्या शिक्षा आजच्या आदिवासी समाजात आढळतात. त्या अर्थी बदललेल्या शरीरसंबंधाच्या नव्या पद्धतीला विरोध करणारे आपले पूर्वज होते हे लक्षात येते. शरीरसंबंधाच्या या पद्धतीला ‘एक्झागामी’ म्हटले जाते. जंगली युगातून रानटी युगाकडे जाताना शरीरसंबंधाच्या पद्धती बदलत्या अर्थव्यवस्थेनुसार बदलल्या तरी कुटुंबाचा आणि तत्कालीन समाजाचा तोंडावळा नैसर्गिक मातृप्रधानच राहिला.
मात्र इ.स.पूर्व सुमारे ३ हजार वर्षे जगामध्ये काही शतकांच्या अंतराने नांगरतंत्राचा शोध लागला. विळ्या-कोयत्याच्या वापराने जो शेती व्यवसाय अनेक सहस्रकेस्त्रियांच्या हाती होता, तो मातृकुळातील भाऊ आणि मामा हे नांगराला जनावरे जुंपून शेतीमध्ये उतरल्यावर त्यांच्या हाती गेला. अमाप धान्य निर्माण होऊन, जमीनदारी उदयास आली. मातृकुळातील स्त्री स्थानाचे महत्त्व कमी होऊन, पुरुष स्थानाचं महत्त्व वाढलं. पुरुषाची मालमत्ता त्याच्या वंशजाकडे हस्तांतरित करण्यासाठी विवाहविधी समाजासमक्ष करून, स्त्रीच्या प्राचीन मुक्त संबंधावर बंदी आणून फक्त एका पुरुषाबरोबर पती म्हणून तिचे संबंध मर्यादित केले गेले आणि मानवी जीवनात प्रथमच मुलगी स्वत:चे मातृकुळ सोडून पतीगृही जाऊ लागली. अतिप्राचीन मातृप्रधान कुटुंबरचनेला त्यामुळे मोठा हादरा मिळाला आणि नव्या पद्धतीच्या स्त्री-पुरुष शरीरसंबंधामुळे मातृप्रधान कुटुंबव्यवस्था जमीनदोस्त झाली.
तरीसुद्धा, ही कुटुंबरचना बदलताना आपल्या पूर्वजांनी तीव्र विरोध केल्याचे पुरावे भारतीय संस्कृतीत सापडतात. हजारो वर्षांची माताप्रमुख कुटुंबपद्धती, तिचे अंगवळणी पडलेले रीतीरिवाज आणि मातृदेवतांचे पूजन याची सवय असणाऱ्या आपल्या पूर्वजांना, मुलीने मातृकुळ सोडून पतीगृही जाण्याच्या पुरुषप्रधान रीती आणि पुरुषदेवांचा स्वीकार करताना, मानसिक पातळीवर प्रचंड प्रयास पडले. त्यातूनच स्थानिक भारतीय संस्कृती आणि आर्याची पुरुषप्रधान संस्कृती यामध्ये संघर्ष पेटला. रामायण आणि महाभारत ही दोन्ही युद्धे म्हणजे या दोन संस्कृतींचा संघर्ष असे अलीकडील संशोधक मानतात. राम हा विवाहप्रथेचा आग्रही होता आणि स्त्री-प्रधान राज्यांचा नायनाट करण्यासाठी आर्य ऋषींनी त्याची नेमणूक केलेली होती. तसेच कुंतीचा विवाहपूर्व पुत्र कर्ण आणि द्रौपदीचे पाच पती या मातृसंस्कृतीच्या लक्षणांना प्रमाण मानणारे पांडव आणि पितृसंस्कृतीचा आग्रह धरणारे कौरव यांच्यामधील हे संघर्ष! ही युद्धे संपल्यानंतरही उद्योगप्रधान असंख्य मातृकुळांनी म्हणजे गवळी, धनगर, विणकर, कासार, सुतार, लोहार, कुंभार, चर्मकार वगैरे कुळांनी या नव्या कुटुंबरचनेला विरोध चालू ठेवला आणि मातृदेवता पूजन चालू ठेवलं. आर्यानी शिक्षा म्हणून त्यांना शूद्र वर्णात ढकलले, अशारितीने संस्कृतीसंघर्षांतून पुढे वर्णसंघर्षांत आणि नंतर जातीसंघर्षांत अशा प्रकारे हा विरोध आपली रूपे बदलत भारताचा सामाजिक इतिहास बनून गेला.
नव्या कुटुंबरचनेला, कुटुंबसंस्कृतीला विरोध करण्याचा आपल्या पूर्वजांचा हा जगातील सर्वात प्रदीर्घ संघर्ष म्हणावा लागतो. विवाहपुरस्कृत पितृप्रधान कुटुंबे आरंभी मातृप्रधान छाप म्हणजे पिता, मुलगे, भाऊ, आत्या, काका व त्यांच्या स्त्रियांची मिळून एकत्र पद्धतीची होती. कुटुंबातील उद्योगही तसेच चालू होते. फक्त त्याचा वारसाहक्क पित्याकडून मुलाकडे जात होता. औद्योगिक क्रांतीपर्यंत ही पितृप्रधान एकत्र कुटुंबरचना टिकून होती. औद्योगिक क्रांतीमुळे कौटुंबिक व्यवसाय बंद पडले आणि ‘वेतनावर नोकरी’ ही संकल्पना उदयास येऊन पुरुष घराबाहेर पडले, तशी एकत्र कुटुंब पद्धतीसुद्धा मोडून गेली आणि ‘माता-पिता-मुले’ हे नवे कुटुंब स्वरूप जगभर दिसून येऊ लागले. गेली सुमारे २५० ते ३०० वर्षे ‘माता-पिता-अपत्ये’ ही कुटुंबव्यवस्था रूढ आहे. जिला अर्थात विवाहाचा टेकू लागतो आणि या कुटुंबरचनेचे संस्कार गेल्या अनेक पिढय़ा आपल्यावर झालेले आहेत. इतकेच नव्हे, तर हेच कायमचे कुटुंब असा आपला समजही आहे.
पण माणसाचे शोध काही थांबले नाहीत. इलेक्ट्रॉनिक युगाचा उदय होऊ लागला आणि पुनश्च अर्थव्यवस्था बदलू लागली. औद्योगिक क्रांतीनंतरचा पुरुष हा शेतीप्रधान राहिलेला नव्हता. बदलत्या काळात तो अधिकाधिक नोकरीप्रधान, व्यवसायप्रधान भांडवलदार होत गेला, जी क्षेत्रे स्त्रियांनासुद्धा व्यापता येऊ लागली. तसतसे स्त्री-शिक्षण व स्त्री-स्वावलंबन विस्तारू लागले आणि अनेक शतकांनंतर स्त्री प्रथमच पुरुषावरील परावलंबनातून मुक्त होऊ लागली. विवाह म्हणजे स्त्रीच्या चरितार्थाची सोय अशी स्थिती राहिली नाही. साहजिक स्त्री-स्वातंत्र्य आणि स्वावलंबनाला पायात गाडून उभ्या असलेल्या विवाह संस्थेला हादरे बसू लागले आणि त्यावर आधारलेल्या आजच्या  कुटुंब संस्थेचे काय, हा प्रश्न आपल्यासमोर उभा ठाकला.
अर्थव्यवस्थेच्या एका टप्प्यावर (नांगरतंत्रामुळे) जेव्हा स्त्रीचे स्थान पुरुषापेक्षा खाली गेले, तेव्हा स्त्री-पुरुष शरीरसंबंधाच्या पद्धती, विवाह आणून त्या काळाशी सुसूत्र केल्या गेल्या. आज तेच स्त्रीचे स्थान अर्थव्यवस्थेतील बदलामुळे पुनश्च पुरुषाबरोबरीने येत आहे असे म्हणताच शरीरसंबंधाच्या पद्धती बदलणार हे ओघाने आलेच आणि त्यानुसार कुटुंबरचना बदलणार हेसुद्धा त्याबरोबरीने आले. त्यामुळे स्वावलंबी मुलींकडून लग्नबंधनाला नकार किंवा त्यांची घटस्फोटाची मागणी, हे वाढू लागणे अपरिहार्य होत जाणार आहे. अर्थव्यवस्थेमधून आलेल्या बदलाचे ते परिणाम आहेत. हे पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण वगैरे काही नाही. तिकडे आधी शोध लागून आपल्याआधी अर्थव्यवस्था बदललेली असते, म्हणून हे कुटुंबातील बदल तिकडे प्रथम झालेले दिसतात. आज घटस्फोट घेऊन स्त्री-पुरूष (पती-पत्नी) एकमेकांपासून दूर होत आहेत, म्हणजेच शरीर संबंधांच्या विवाहाने आणलेल्या पद्धती बदलू पाहत आहेत.
घटस्फोट घेतल्यावर मुली आपले अपत्य घेऊन वेगळ्या होतात किंवा कमावत्या अविवाहित मुली मूल दत्तक घेऊन जीवन जगतात. या पाश्र्वभूमीवर ‘माता व मूल’ अशा कुटुंबांची संख्या वाढत जाणार. अजून कमावत्या मुलीने लिव्ह इन पद्धतीने मूल होऊ देऊन, त्याच्यासह स्वतंत्र राहण्याची पद्धत मध्यमवर्गात आलेली नाही. तरीपण ती केव्हाही येऊ शकते. म्हणजे थोडक्यात, जंगली अवस्थेतील माता व मूल ही कुटुंबरचना त्यानंतरच्या मातृकुलपद्धती, पितृकुलपद्धती, एकत्र, विभक्त अशा सर्व अवस्थांमधून फिरून, एक वर्तुळ पूर्ण करून पुन्हा एकदा ‘माता व मूल’ या नैसर्गिक कुटुंबामध्ये विलीन झालेली आपण पाहतो. फक्त ‘माता-मूल’ ही कुटुंबरचनाच तेवढी अनादिअनंत आहे. कारण ती नवजात पिढीची नैसर्गिक तरतूद आहे, नैसर्गिक संरक्षण आहे.
आधुनिक तंत्रज्ञानानुसार स्त्री-पुरुषाची बदलणारी जीवनशैली, त्यानुसार बदलणाऱ्या अपेक्षा आणि विचार तसेच दडपलेल्या स्थितीतून लैंगिक, नैतिक आणि धार्मिक कल्पनांची होत जाणारी सुटका आणि त्यातून स्त्री-पुरुषांनी विकासाची गती पकडणे, या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून कुटुंबरचना पूर्वीसुद्धा बदलत राहिली आणि पुढेही बदलत राहणार आहे. यापुढे या कुटुंबबदलाचे धक्के जर आपल्याला बसू द्यायचे नसतील तर अनेक प्रकारच्या कुटुंबरचना आपणच निर्माण केल्या पाहिजेत आणि प्रत्येक व्यक्तीची कुटुंब निवड समाजात मान्य झाली पाहिजे. अमुक नात्यांनी बनलेले आणि अमुक संख्या असणारे, तेच तेवढे कुटुंब असे यापुढे आपल्या पूर्वजांपेक्षा उत्क्रांत झालेल्या आणि अर्थव्यवस्थेचा चक्रिय इतिहास माहीत झालेल्या माणसाला म्हणता येणार नाही.
सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे प्रेम, विश्वास आणि सुरक्षितता व्यक्तीला ज्या सहजीवनातून मिळण्याची खात्री आहे, ते त्या माणसाचे कुटुंब असेल. मग हे कुटुंब फक्त दोन किंवा अधिक पुरुषांचे असेल, तर कुठे दोन किंवा अधिक स्त्रियांचे असेल. काही कुटुंबे ‘माता-मुले’ अशी असतील, तर काही ‘पिता-मुले’ अशी असतील, काही स्त्री, पुरुष एकेकटे राहतील, काही जण फक्त दत्तक मुलांबरोबर राहतील. विवाह हा दंडक आवश्यक असेलच असे नाही. तरी ‘माता-पिता-मुले’ असे कुटुंब हवे असणारे, विवाह करतीलच. खुशीने एकत्रित राहणाऱ्यांची कुटुंब संस्था अनैतिक म्हणता येणार नाही. अशा विविध कुटुंब संस्थांमधील आर्थिक व्यवहारासंबंधी, वारसाहक्कांसंबंधी कायदे होणे आवश्यक ठरेल. एक कुटुंबसंस्कृती मोडते आहे, तर त्याला अनेक पर्याय निर्माण करण्याचा हा काळ आहे आणि हे पर्याय स्वीकारण्यातच आपले मानसिक, सामाजिक स्वास्थ्य आहे, हे आपण ओळखले पाहिजे.

women, men, house, home loan
गृहकर्ज घेणं पुरुषांपेक्षा महिलांसाठी अधिक सोपं!
idol of Adishakti is also affected by inflation
गोंदिया : आदिशक्तीच्या मूर्तीलाही महागाईची झळ, श्रृंगार साहित्यांच्या दरात वाढ
Nana Patole criticized Devendra Fadnavis
“फडणवीस, गडकरींच्या विकासाच्या पोकळ गप्पा अन् भाजपाचा भ्रष्ट कारभार उघड”, असे का म्हणाले नाना पटोले? वाचा…
palghar police stn
पोलीस व जनता एकत्र राहिल्यास प्रदेशात कायद्याचे राज्य कायम राहील; अपर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके यांचे प्रतिपादन

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Article on occasion of international family day family institution in modern fast moving lifestyle

First published on: 18-05-2013 at 01:04 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×