संतोष धर्माधिकारी

एप्रिल महिन्याच्या १८ तारखेला पहाटे चार वाजता माझा मोबाइल खणखणला. सामाजिक कार्यकर्ते अरुण बनसोडे यांचा फोन होता. म्हणाले, ‘‘अंबाजोगाईला त्वरित पोहोचा. स्नेहा आणि तिच्या बाळाची तब्येत बिघडत चालली आहे.’’ गेल्या दोन वर्षांपासून अरुणजी बीड जिल्ह्य़ातील अत्याचारित स्त्रिया, बालमाता, त्यांची बालके यांच्या सुरक्षा आणि पुनर्वसनासाठी ‘स्नेहालय’ संचालित ‘स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रा’सोबत काम करत आहेत.

अंबेजोगाई येथील ग्रामीण रुग्णालयात स्नेहा (बदललेले नाव) या तरुणीने बाळाला जन्म दिला होता. अरुणजींनी सांगितले की, स्नेहाची मानसिक अवस्था बिघडलेली आहे. तिच्या माहेरच्यांनी तिच्याशी संबंध तोडल्याने ती प्रचंड तणावाखाली असून बाळाची काळजी घ्यायला असमर्थ आहे. बनसोडे यांच्या स्वरातली काळजी लक्षात घेऊन ‘रूपाली मुनोत बालकल्याण संकुला’तील तज्ज्ञ परिचारिका, मावशी आणि मी अवघ्या दहा मिनिटांत निघालो आणि त्या ग्रामीण रुग्णालयात साडेतीन तासात पोहोचलो.

अंबेजोगाई येथील गरीब शेतकरी कुटुंबातून आलेली स्नेहा उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहत होती. त्यासाठी ती लातूरला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती. राज्य लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा ती उत्तीर्ण झाली होती. दरम्यान तिची ओळख एका तरुणाशी झाली. त्याने स्नेहाला लग्नाच्या आणाभाका दिल्या. या जवळकीतून स्नेहाला दिवस गेले. त्या वेळी स्नेहाचे वय  २१ वर्षे होते. स्नेहा त्याला लग्नाविषयी विचारू लागताच त्याने ‘घरच्यांना  विचारून लग्न करतो,’ असे सांगत सहा महिने घालवले. आणि शेवटी वेगळी जात आणि आर्थिक अडचणींचा बहाणा करून फरार झाला.

भीतीपोटी आई-वडिलांनाही स्नेहा काही सांगू शकत नव्हती. परंतु एरवी दीर्घकाळ संपर्क ठेवणाऱ्या मुलीचे काही तरी बिनसले आहे याची कल्पना आई-वडिलांना आली आणि त्यांनी तिला अंबेजोगाई येथे घरी बोलावून घेतले. गर्भवती असल्याची बाब तिने तरीही दडवून ठेवली. आई-वडिलांनी घाईगडबड करत त्यांच्या जवळच्याच गावातील एका तरुण मुलासोबत तिचे लग्न जमवले. दुष्काळ आणि परिस्थितीने गांजलेल्या अडाणी आई-वडिलांनी जमीन गहाण ठेवली, २ लाख रुपयांचे कर्ज काढत त्यांनी लग्न लावून दिले. स्नेहाने तोपर्यंत वाढलेलं पोट दिसू नये यासाठी ढगळ कपडे घालून आपली अवस्था लपवली होती. लग्न झाले तेव्हा स्नेहा आठ महिन्यांची गर्भवती होती. स्नेहा जमेल तशी आपली परिस्थिती लपवत होती पण ते फार काळ लपवणे शक्यच नव्हते. यथावकाश स्नेहाची प्रसूती झाली. सासरच्या लोकांसाठी तो धक्काच होता. नवऱ्याने ताबडतोब विभक्त होण्याचा निर्णय घेतला. नवजात बाळ असलेल्या स्नेहाला कुठलाच आधार राहिला नाही. तिच्या आई-वडिलांनाही प्रचंड नैराश्य आले.

‘स्नेहांकुर’ टीमने अंबेजोगाई येथे जाऊन स्नेहाचा, तिच्या बाळाचा आणि एकूण सर्व परिस्थितीचाही ताबा घेतला. बाळासह स्नेहा आणि आई-वडिलांना अहमदनगरला आणले. बाळाच्या भविष्याचा विचार करून स्नेहाने त्याला ‘दत्तक विधाना’च्या प्रक्रियेत सादर केले. अहमदनगर येथील बालकल्याण समितीने यासंदर्भात स्नेहाचे म्हणणे नोंदवून बाळाला ‘स्नेहांकुर’च्या ‘रुपाली मुनोत बालसंकुला’त दाखल केले. या घटनेतून स्नेहाचे आई-वडील कसेबसे सावरले. मात्र स्नेहाची शारीरिक-मानसिक अवस्था खालावतच चालली होती. २१ एप्रिलला स्नेहाला खूप ताप आला. तिचे हिमोग्लोबिन फक्त ५ होते. तिला आम्ही ‘स्वास्थ्य हॉस्पिटल’ला नेले. तिथे

डॉ. रेणुका पाठक यांनी तिच्यावर नि:शुल्क उपचार केले. तिच्या प्रसूतीला १० दिवस पूर्ण झाले होते पण ती प्रचंड तणावाखाली होती. २६ एप्रिलची सकाळ नवाच संघर्ष घेऊन उजाडली. सकाळी झोपेतून उठल्यानंतर स्नेहाच्या लक्षात आले की, तिला काहीच दिसत नाही. पुन्हा परिस्थितीशी झुंज सुरू झाली. ‘स्नेहांकुर’ टीमने पुढच्या आठ मिनिटांत स्नेहाला नेत्रतज्ज्ञ डॉ. शशिकांत पाचारणे यांच्याकडे नेले. तिथून पुढल्या वीस मिनिटांत मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. राहुल धूत यांच्याकडे पोहोचलो. त्यांनी ताबडतोब ‘एमआरआय’ करण्यास सांगितला. त्यातून कळले की, जबर मानसिक धक्क्याने तिची दृष्टी गेलीय पण उपचाराने ती पूर्ववत होणार होती. हे दोन्ही दिवस वेगाने धावाधाव केल्यामुळे स्नेहाच्या आयुष्यात आलेला अंधार दूर झाला. पण मुख्य प्रश्न होता स्नेहाला सांभाळण्याचा. कोणाचीही तशी इच्छा नाही. अखेर ‘स्नेहालय’च्या ‘मनीषा अकादमी’ या स्पर्धा परीक्षा केंद्राने तिला आश्रय दिला. या परीक्षा देत आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या स्नेहाला ‘स्नेहालय’ परिवाराने सामावून घेतले आहे.

पुरुषांच्या लग्नाच्या खोटय़ा वचनांना भुलून शरीरसंबंधासाठी तयार होणाऱ्या अनेक मुलीचे भवितव्य असे अंधकारमय होते आहे. त्यांनी वेळीच सावध व्हायला हवे हे सांगण्यासाठी स्नेहाचे उदाहरण पुरेसे बोलके आहे.