संपदा वागळे waglesampada@gmail.com
काही जणांचे संसार हे त्यांच्या कुटुंबाच्या पलीकडे जाऊन समाजाला जोडून घेणारे, व्यापक कुटुंबाचे होतात. त्यातून ‘तू-मी’ हा भाव नाहीसा होतो आणि उरतं ते समाजाचं देणं. परस्परांवरील प्रेम, आदर आणि समाजासाठी काही करण्याची एकरूप जाणीव त्यांना अनुरूप ठरवते. अशाच काही जोडप्यांच्या या कथा स्वत:च्या पलीकडे जाणाऱ्या.. आणि प्रेमाचा वेगळा आदर्श निर्माण करणाऱ्याही.. या जोडप्यांविषयी येत्या १४ फेब्रुवारीच्या ‘व्हॅलेंटाईन डे’ अर्थात प्रेमदिवसाच्या निमित्तानं..




‘व.पुं.’चं एक प्रत्ययकारी वचन वाचनात आलं, ‘आयुष्यात फक्त एक क्षण भाळण्याचा, उरलेले सर्व सांभाळण्याचे’. केवढा अर्थ भरलाय या लहानशा वाक्यात! ‘भाळणं’ काम झालं की संपतं, पण ‘सांभाळणं’ अखेपर्यंत उरतं. भाळण्यात स्वार्थ आहे, सांभाळण्यात त्याग. भाळण्यात उपभोग आहे, सांभाळण्यात जपणं आहे. भाळणं सुरुवात असू शकते. पण सुखदु:खाच्या, स्वार्थाच्या पलीकडे जाऊन एखाद्याच्या हृदयात अखंड पाझरत राहणं हे सांभाळणं आहे. ‘भाळणं ते सांभाळणं’ हा
‘तो आणि ती’मधील प्रवास अलवारपणे होण्यासाठी ‘कागदावर’ची नाही तर ‘काळजावर’ची पत्रिका जुळावी लागते.
डॉ. अनिल अवचट यांनी अनुरूप या शब्दाची व्याख्या अतिशय समर्पक शब्दांत केलीय. त्यांनी लिहिलंय, ‘अनुरूप म्हणजे परिपूर्ण नाही, की आदर्शही नाही. अनुरूप ही होत जाण्याची प्रक्रिया आहे. अनुरूप होत जाणं म्हणजे जोडीदाराच्या आनंदासाठी निरपेक्षपणे काहीतरी करीत राहणं.’ या अर्थानं १०० टक्के अनुरूप ठरलेल्या काही जोडप्यांच्या सहजीवनाच्या या कथा १४ फेब्रुवारीच्या ‘व्हॅलेंटाईन डे’ अर्थात प्रेमदिवसाच्या निमित्तानं!
रिझव्र्ह बँकेत टायपिस्ट म्हणून काम करणाऱ्या कला महाजन (अनुश्री भिडे) या मुलीसाठी आई-वडिलांचं वरसंशोधन सुरू होतं. १९७९ चा तो काळ. परिस्थितीअभावी मॅट्रिकपर्यंतच शिकलेल्या या मनस्वी मुलीनं पाठची भावंडं मार्गी लागल्यावरच लग्नाला होकार दिला होता. पण या सर्वसामान्य मुलीची एक असामान्य अट होती. ती म्हणजे, ‘मी जे मिळवते आहे, त्यातील एक घास स्वत:साठी ठेवून बाकी सर्व गरजवंतांना वाटून टाकणार.
हे ज्याला मान्य तोच माझा जोडीदार.’ आश्चर्य म्हणजे अनुश्रीला तिच्या इच्छेसह सन्मानानं स्वीकारणारा तितकाच संवेदनशील माणूस भेटला. तो होता, रिझव्र्ह बँकेतच जनरल मॅनेजर (टेक्निकल) पदावर काम करणारा आनंद भिडे. दोघंही एकमेकांना गुणांनी ओळखत होती. मध्यस्थातर्फे हा पर्याय समोर आला आणि अनुश्रीला जे हवं होतं ते गवसलं.
आनंद भिडे हे त्या काळचे ‘व्हीजेटीआय’चे इंजिनीअर. गरिबीतून स्वकर्तृत्वावर वर आलेले. त्यांनी अनुश्रींचा देण्याचा धर्म आपला मानला. त्यांच्या आनंदात आपलं सुख शोधलं. हळूहळू दुधात साखर विरघळावी तसा दोघांच्या जगण्याचा उद्देश एक होत गेला. भिडे दाम्पत्यानं आजवर किती विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केलीय याची गणतीच नाही. आणीबाणीच्या प्रसंगी अर्ध्या रात्री उठवू शकतात अशा शंभरएक संस्था त्यांच्याशी जोडलेल्या आहेत. सरव्यवस्थापकपदावरून निवृत्त झालेल्या आणि आता-आतापर्यंत विविध बँकांना सल्ला माहिती देणाऱ्या आनंद भिडे या बुद्धिमंताचं अत्यंत साधं घर बघून येणारा अवाक् होतो. फक्त गरजेपुरत्या वस्तू! कसलाही संचय नाही. अनुश्री तर तीन साडय़ांव्यतिरिक्त चौथी साडी ठेवत नाहीत. नवी आली, की आधीची एक देऊन टाकायची हा नियम. प्रवास कायम सार्वजनिक वाहनानं. चमचमीत खाण्याची इच्छा सहसा होत नाही. कधी झालीच, तर तेवढे पैसे (म्हणजे वडा-पाव खावासा वाटला तर १५ रुपये) एका वेगळय़ा पर्समध्ये टाकायचे, की पोट भरतं. या पद्धतीनं तरुणपणापासून साठलेले लाखभर रुपये त्यांनी काही वर्षांपूर्वी एका संस्थेला दान केले. करोनानं मांडलेल्या उद्रेकात पहिल्या वर्षी जेव्हा असंख्य बळी घेतले, ते पूर्ण वर्ष अनुश्री यांना नीट जेवणच गेलं नाही. ताट वाढलं की त्यांच्या डोळय़ांसमोर उपाशीपोटी चालत गावाकडे जाणारी माणसं येत. मग खाण्याची इच्छाच मरत असे. याच कळवळय़ातून त्यांनी रस्त्यावर राहणारे भिकारी, भटके यांच्या लसीकरणासाठी पुण्यातील एका संस्थेला लाखो रुपये दिले. पत्नीच्या प्रत्येक कृतीला आनंद भिडे यांची संमती असते, सोबत असतेच. चार वर्षांपूर्वी पुण्यातील चिथाडे पती-पत्नींनी सियाचीनमधील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लँट बसवण्यासाठी मदतीचं आवाहन केलं होतं, तेव्हा अनुश्री यांनी आपले सर्व दागिने (मंगळसूत्रासह) विकून ते चार लाख रुपये त्या निधीत जमा केले. दोन वर्षांपूर्वी अनुश्रींच्या मनात मृत्युपत्र करावं असं आलं, तेव्हा पत्नीचं मन ओळखणारे आनंद भिडे म्हणाले, ‘अगं मरणोत्तर कशाला.. जे काही आहे ते आताच तुझ्या हातानं वाटून टाक.’ झालं, पडत्या फळाची आज्ञा घेऊन अनुश्रींनी बँकेतील त्यांच्या सर्व ‘फिक्स डिपॉझिट’ खाती मोडली आणि ते दीड कोटी रुपये वंचितांच्या झोळीत पडले.
या दाम्पत्याला एक मुलगी, जावई आणि दोन नातवंडं आहेत. लेक डॉ. अश्विनी आणि जावई डॉ. अभय मराठे लहान मुलांचे डॉक्टर आहेत. दानाची परंपरा पुढे नेत आहेत. आज भिडे दाम्पत्य ठाण्यात मुलीच्या शेजारी, पण स्वतंत्रपणे राहत आहे. एकमेकांना समजून घेणं हा दोघांचा स्थायिभाव असल्यानं काही बाबतींत मतभिन्नता असूनही त्यांच्यात आजवर एकही वादविवाद झालेला नाही. उदा. अनुश्री देवभोळय़ा, तर आनंदराव नास्तिक. पण घरातील कृष्णजन्म, रामजन्म, गणेश जयंती या उत्सवांत बाजारातून फुलं आणून सुरेख आरास करण्याचं काम त्यांचं! न बोलता प्रेम करत राहाणं हा त्यांचा वसा. गरिबांना पुरेसं अंथरूण-पांघरूण मिळत नाही, म्हणून थंडीतही फक्त पायांचं मुटकुळं करून झोपणाऱ्या अनुश्रींना जाग येते, तेव्हा त्यांच्या अंगावर शाल पांघरलेली असते! रात्री जेवल्यावर कधी त्या संस्थांचे पत्रव्यवहार वाचत बसल्या की न सांगता मागची आवराआवर, झाकपाक होऊन जाते. तेही अगदी सहज. न बोलता भरभरून प्रेम करणाऱ्या आपल्या जोडीदाराविषयीच्या भावना व्यक्त करताना अनुश्री म्हणतात, ‘नसेल कधी आणला गजरा माझ्यासाठी, पण आयुष्यच सुगंधित केलं सतत राहून पाठी।’ त्यांचं हे आयुष्य असंच सुगंधी राहो.
समाजकार्यासाठी जीवन वाहून घेतलेले सदाशिव चव्हाण आणि आपल्या या जोडीदाराचं जीवनव्रत अखंड सुरू राहावं यासाठी त्यांच्या पाठीशी कणखरपणे उभ्या राहिलेल्या सहधर्मचरिणी शिल्पा, यांच्या सहजीवनाची कहाणीही प्रेरणा देणारी! धुळे जिल्ह्यातील मालपूर हे सदाशिव यांचं गाव. वडील कीर्तनकार, गाडगेबाबांचे शिष्य. त्यामुळे शिक्षण आणि समाजसेवा ही मूल्यं लहानपणीच अंगी रुजली. परिणामी ‘एम.ए.’- ‘बी.एड.’ झाल्यावर त्यांनी आठ वर्ष पूर्ण वेळ विद्यार्थी परिषदेसाठी काम केलं. त्यानंतर मुंबईतील एका सामाजिक संस्थेसाठी काम करत असताना त्यांची शिल्पा यांच्याशी मैत्री झाली. शिल्पांनी मनातल्या भावना सांगितल्यानंतर सदाशिव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले,
‘मी आयुष्यभर नाममात्र जीवनवेतनावर दु:खितांसाठी, शोषितांसाठी काम करत राहाणार. तुझी कोणतीही हौसमौज मी पुरी करू शकणार नाही. उलट मलाच तुला सांभाळावं लागेल..’ या सगळय़ाची कल्पना शिल्पांना होतीच. त्यांनी या शिवाची शक्ती होण्याचं ठरवलं. उदरनिर्वाहासाठी बँकेत नोकरी सुरू केली. २००८ च्या जानेवारीत लग्न झालं आणि लगेच परीक्षेचा क्षण आला. सदाशिवनी आपल्या काही मित्रांसह दोन अल्पवयीन मुलींची वेश्या वस्तीतून सुटका केली. फूस लावून पळवून आणलेल्या या मुली होत्या मेघालयातल्या. त्यांना जवळचं असं कोणीच नव्हतं. मग प्रश्न आला, की या मुलींना कुठे ठेवायचं? सदाशिवनी शिल्पांना विचारलं आणि त्यांनी क्षणार्धात उत्तर दिलं, ‘त्यांना आपल्या घरी घेऊन या.’ अशा प्रकारे लग्न झाल्या झाल्या शिल्पा दोन किशोरवयीन मुलींच्या आई झाल्या. या मुली त्यांच्या घरी तीन वर्ष राहिल्या. शिल्पांनी त्यांना लिहायला-वाचायला शिकवलं. त्यांचे वडील उत्तम िशपी काम करत. त्यांच्याकडे त्या मुली शिवणकामही शिकल्या. आज त्या दोघी लग्न करून आपापल्या घरी सुखात आहेत.
सामाजिक कामाच्या निमित्तानं सदाशिव डोंगरी बालसुधारगृहाच्या संपर्कात आले. त्यामुळे घरातील त्रासाला कंटाळून पळून आलेल्या किंवा पळवून आणलेल्या, फुटपाथ अथवा रेल्वे फलाटावर राहणाऱ्या, व्यसनाधीनतेनं आणि शिक्षणाअभावी कस्पटासमान जीवन जगणाऱ्या, भटक्या, बेघर अल्पवयीन मुलांच्या खूप मोठय़ा दुनियेशी त्यांचा परिचय झाला. या मुलांसाठी काम केलं पाहिजे असं त्यांना तीव्रतेनं वाटू लागलं. अल्पावधीतच त्यांचा विचार निश्चयात बदलला. या मुलांच्या पुनर्वसनाचं शिवधनुष्य त्यांनी उचलण्याचं ठरवलं आणि समविचारी सहकाऱ्यांसह २०१० मध्ये ‘जीवन संवर्धन’ संस्थेची स्थापना झाली.
रेल्वे प्लॅटफॉर्मवर राहणाऱ्या बेघर मुलांशी मैत्री करावी, या हेतूनं प्रथम या मुलांना ती आहेत तिथेच जाऊन शिकवण्याची योजना सुरू झाली. विठ्ठलवाडी, कल्याण, भांडुप आणि सीएसएमटी अशा चार स्थानकांत हे प्रयोग चालू झाले. या कामात सुट्टीच्या दिवशी शिल्पाही सहभागी होत असत. पण दोन-तीन वर्षांत लक्षात आलं, की या मुलांचा निवास बदलला, आजूबाजूचं वातावरण पूरक झालं, तरच परिवर्तन होऊ शकेल. त्या दृष्टीनं शोध घेऊन २०१४ मध्ये टिटवाळय़ाला एका सहृदय व्यक्तीनं वापरण्यासाठी दिलेल्या जागेवर ५ ते १२ वयोगटांतील २२ मुलांना घेऊन त्यांना घडवण्यास सुरुवात झाली. समाजाचं पाठबळ, कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांचं नि:स्वार्थी योगदान या बळावर संस्थेची पावलं ध्येयाच्या दिशेनं पडू लागली. आज ‘जीवन संवर्धन’मध्ये टिटवाळा आणि ठाणे अशा दोन्ही ठिकाणी मिळून १७०च्या वर मुलंमुली नवं आयुष्य जगत आहेत. प्रेम आणि सन्मान मिळाल्यानं त्यांनाही नवसंजीवनी मिळाली आहे.
एक तपाचा हा प्रवास पावलोपावली परीक्षा पाहणारा होता. संस्थेतली बरीचशी मुलं वेश्या वस्तीत वा फुटपाथवर राहणाऱ्या पालकांची. त्यांना प्रयासपूर्वक समजावून, तर कधी दटावून आणलेली. पण कधी कधी हे पालक ‘आपला भीक मागण्याचा हक्काचा स्रोत’ बंद झाल्यानं आपल्या मुलांची मागणी करण्यासाठी येत. तेव्हा मुलांवर आजवर घेतलेली मेहनत मातीमोल होणार या भीतीनं भावनाप्रधान सदाशिव अस्वस्थ होत. अशा अवघड परिस्थितीत त्या पालकांना गोड शब्दांत, पण अधिकारवाणीनं समजावून परतवण्याचं महाकठीण काम शिल्पांनी केलं. याबरोबर सदाशिवना वेळोवेळी सावरणं आलंच. ‘फॅशन डिझायिनग’ या आपल्या छंदाचं करिअरमध्ये रूपांतर करण्यासाठी आणि त्याबरोबर ‘जीवन संवर्धन’ला वेळ देता यावा म्हणून शिल्पांनी चार वर्षांपूर्वी, म्हणजे २०१७ मध्ये आपली बँकेतली नोकरी सोडली. स्वत:चा व्यवसाय सांभाळून आता त्या संस्थेचं कार्यालयीन कामकाज, आर्थिक व्यवहार बघतात. चव्हाण दाम्पत्याची तेरा वर्षांची मुलगी गार्गीदेखील तिच्या खाऊच्या पैशांतून दर वाढदिवसाला संस्थेला आवर्जून देणगी देते. तिच्याकडे पूर्ण लक्ष देण्यासह शिल्पांनी सासूबाई आणि आपली आई या दोघींचीही जबाबदारी घेतली आहे. केवळ दु:खाच्या नव्हे, तर आनंदाच्या क्षणीही सदाशिव यांचं सोबत नसणं त्यांनी जाणीवपूर्वक स्वीकारलंय. ‘शिल्पा म्हणजे फक्त माझाच नाही, तर आमच्या संस्थेचाही पाठकणा आहे’ हे सदाशिव यांचे उत्कट शब्द त्यांच्या जीवनातील त्यांचं स्थान सांगून जातात. त्यांचं हे परस्परांना समजून घेणारं सहजीवन तितकंच उत्कट राहो.
संसार सुखाचा होण्यासाठी गरज असते, ती एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या मनांची. बाकी गोष्टी मग नगण्य ठरतात. ‘एकाची कमतरता जर दुसऱ्याची ताकद असेल, तर दोघं मिळून परिपूर्ण’ हे समीकरण भारती आणि संतोष या जोडीकडे पाहताना तंतोतंत पटतं. अपंगत्वामुळे आत्मविश्वास गमावलेल्या भारती पाडळकर आणि त्यांच्यामधील सुप्त गुण ओळखून त्यांच्या पंखात बळ देणारे संतोष भामरे यांच्या प्रेमकहाणीस निमित्त ठरला तो त्यांनी सुरू केलेला ‘अँडॉर्न ग्राफिक्स’ हा लहानसा व्यवसाय.
संतोष यांचा पिंड कलाकाराचा. त्यामुळे कायद्याचं शिक्षण घेतलं तरी सनद मिळेपर्यंत अर्थार्जनासाठी त्यांनी घरच्या घरी स्क्रीन पिंट्रिंगचा व्यवसाय सुरू केला. त्यांना एका मदतनीसाची गरज होती. पोलिओमुळे लहानपणीच डाव्या पायातील ताकद हरवलेल्या भारती ‘बी.ए.’ झाल्यावर नोकरीच्या शोधात होत्या. आणि अशा वेळी या दोघांची गाठ पडली. भारती यांची पाटी एकदम कोरी होती. त्यांना इंग्रजी बोलण्याचा सराव नव्हता. ग्राहकांशी कसं बोलायचं याचीही माहिती नव्हती. पण त्यांच्यापाशी काही असामान्य गुण होते. ते म्हणजे जिद्द, चिकाटी आणि कामाप्रति संपूर्ण समर्पण. या सामर्थ्यांवर त्या शिकत गेल्या. संतोष यांनी या हिऱ्याला पैलू पाडले. कामातले सर्व बारकावे शिकवले. तीन-चार महिन्यांतच भारतींनी एवढी प्रगती केली, की संतोषनी वकिली सुरू केल्यावर त्या एकहाती व्यवसाय सांभाळू लागल्या. अर्थात कोर्ट संपल्यावर आणि शनिवार-रविवार त्यांची साथ होतीच. दोघांच्या कष्टानं व्यवसाय बहरू लागला. वाढता पसारा पाहून संतोष सनद परत करून पूर्ण वेळ व्यवसायात आले. त्यांनी स्क्रीन पिंट्रिंगपासून कॉम्प्युटराईझ्ड ऑफसेट पिंट्रिंगपर्यंत लागणारी सर्व अद्यावत यंत्रसामग्री खरेदी केली. कंपनीचे गाळेही वाढत गेले. अचूक काम आणि ग्राहकांना दिलेला शब्द पाळून मिळालेली विश्वासार्हता यामुळे नावाजलेल्या कंपन्या काम देण्यासाठी येऊ लागल्या. भारतींची विलक्षण धडाडी पाहून संतोषनी त्यांना व्यवसायात भागीदारी देण्याचा पहिला मोठा निर्णय घेतला. दोन वर्षांपूर्वी काहीतरी काम मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या भारती एका कंपनीच्या मालक झाल्या. १९८६ मध्ये राष्ट्रपती डॉ. ग्यानी झैलसिंग यांच्या हस्ते मिळालेल्या यशस्वी उद्योजिका पुरस्कारानं त्यांच्या कर्तृत्वावर मोहर उमटली. तरीही स्वत:ची शारीरिक दुर्बलता उमजून भारतींनी संतोषबाबत ‘घट्ट मैत्री’ यापलीकडचा विचार केला नव्हता. पण संतोष यांच्या मनात प्रेमाचा अंकुर रुजला होता. धटधाकट व्यक्तीपेक्षा कामात हजारपटीनं सक्षम असलेल्या भारतींनी संतोष यांचं मन जिंकून घेतलं होतं. खरं तर पोलिओमुळे भारतींना कंबरेपासूनच विकलांगता आली होती. त्यामुळे मूल होण्याची शक्यताही धूसर होती. हे समजूनही संतोष आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्या हरखून गेल्या. स्वप्नातही विचार केला नव्हता ते सुख आपणहून भारतींच्या दारी आलं होतं. भावनेच्या भरात वचन देणं सोपं, पण ते निभावणं महाकठीण. मात्र संतोष यांनी ‘कमी तिथे मी’ ही भूमिका घेत त्यांचा संसार सुखाचा केला. जे काम करणं भारतींना जड जाईल, ते संतोष आधीच करून टाकत असत. प्रत्येक सणसमारंभ त्यांनी भारतींसह साजरा केला. त्यांच्या प्रेमात इतकी ताकद होती, की जे अशक्य वाटत होतं तेही शक्य झालं. दोघांना मुलगी झाली. तेजल. भारतींच्या गरोदरपणात तर संतोषनी त्यांना फुलासारखं जपलं. तेजल झाल्यावर तिला उचलून घेणं भारतीला शक्य नसायचं. तिला मांडीवर आणून दिल्यावरच भारती तिला दूध पाजू किंवा भरवू शकत असत. त्यामुळे तेजल चालायला लागेपर्यंत आणि पुढेही अनेकदा संतोषनीच आई आणि वडील दोघांचीही भूमिका व्यवसाय सांभाळून निभावली. कुशाग्र बुद्धीची तेजल ‘आयआयटी मुंबई’मधून ‘बी.टेक.’ करुन ‘पीएच.डी.’साठी अमेरिकेत गेली आणि पुढे तिथेच स्थायिक झाली आहे. तिला आपल्या आईच्या असामान्य कर्तृत्वाचा आणि तिची सावली बनलेल्या वडिलांचा खूप अभिमान आहे. २०११ मध्ये तेजल अमेरिकेत गेल्यावर भारतींनी व्यवसाय आवरता घेण्याचा निर्णय घेतला. संतोष यांची पावलंही पुन्हा वकिलीकडे वळली. मात्र भारती आजही स्वस्थ बसलेल्या नाहीत. त्यांनी गरजू, गरीब मुलांना विनामूल्य शिकवण्याचं व्रत घेतलंय. त्यांनी इतरांसाठी काम करणं सुरु केलं आहे. भारतींचं एकच म्हणणं असतं,
‘तू सोबत असलास की
मला माझाही आधार लागत नाही
तू फक्त बरोबर रहा,
मी दुसरं काही मागत नाही’
असंच आणखी एक उद्यमी जोडपं. जखमी, अंध, अपंग प्राण्यांकरिता स्वत:चं आयुष्य पणाला लावणारे गणराज जैन आणि त्यांच्या या जगावेगळय़ा वेडासह त्यांना आणि त्याच्या शंभरहून अधिक मुक्या पिलांना ममतेनं सांभाळणाऱ्या, अपंग प्राण्यांची माऊली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ.अर्चना जैन यांच्या सहजीवनाची कहाणी ‘अर्पित होताना विकसित कसं व्हावं’ ते शिकवून जाते. दोघंही मूळचे कोकणातील महाडचे रहिवासी. शाळा-कॉलेजपासूनच त्यांची मैत्री होती. नेहमी स्वत:आधी दुसऱ्याचा विचार करणारे गणराज, शांत, सोज्वळ वृत्तीच्या अर्चना यांना आवडले आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. ‘बी.ए.एम.एस.’ झालेल्या अर्चनांनी लग्नानंतर (जून २००७) ‘एम.डी.’ करून स्वत:ची प्रॅक्टिस सुरू केली, तर गणराज ‘बी.ए.’, ‘एम.ए.’नंतर छोटे-मोठे व्यवसाय करू लागले. याबरोबर सर्पमित्र, प्राणीमित्र म्हणूनही ते धडाडीनं कार्यरत होते.
या कामात त्यांना कधी श्वानदंश झाला, तर कधी सर्पदंश! एकदा तर ‘इंडियन कोब्रा’ या महाविषारी नागाला पकडत असताना तो गणराजना डसला. डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी केलेल्या अतितातडीच्या उपचारांमुळे गणराज वाचले. २ सप्टेंबर २०१३ हा तो दिवस! आश्चर्य म्हणजे रुग्णालयातून बाहेर आल्याआल्याच त्यांनी ठरवलं, की हा जो पुनर्जन्म मिळालाय तो जखमी, अनाथ प्राण्यांच्या सेवेसाठीच कारणी लावायचा. या निश्चयाची परिणिती म्हणजे त्यांनी सुरू केलेलं ‘सफर’ हे जखमी प्राण्यांवर मोफत उपचार करणारं केंद्र. हे पाऊल उचलताना अर्थात अर्चनांची साथ होतीच. या केंद्रातून साडेचार हजारांपेक्षा जास्त प्राण्यांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. गणराजना कोब्रादंश झाल्यानंतर १४ व्या दिवसाची गोष्ट. एका ठिकाणाहून अजगर घरात शिरलाय असा फोन आला आणि गणराज त्याला वाचवायला लगेच निघाले. तेव्हा द्विधा मन:स्थितीत असलेल्या अर्चनाला त्यांनी समजावलं, ‘गाडी चालवताना अपघात झाल्यास माणूस गाडी चालवायची थांबवत नाही. थोडी जास्त काळजी घेईन, पण मला हे काम सोडायचं नाहीये..’ तेव्हा अर्चना क्षणार्धात म्हणाल्या, ‘ठीक आहे. पण तुला एकटय़ाला पाठवून मी घरी शांत बसूच शकणार नाही. त्यामुळे यापुढे शक्य तितक्या रेस्क्यू ऑपरेशन्सना मी तुझ्याबरोबर येईन..’ आणि अर्चना त्वरित त्यांच्याबरोबर निघाल्या. आजवर अनेक संकटांना सामोरं जात असताना हा सोबत राहण्याचा धर्म त्या गेली १५ वर्ष निभावताहेत. महाडमधील त्यांचं घर म्हणजे भोवताली प्राण्याचं वसतिस्थान आणि मधोमध यांचं! ही गावाबाहेरील जागा घेताना त्यांनी आपली गाडी, तसंच घरातलं सर्व सोनंनाणं पणाला लावलं. अगदी अर्चनांचं मंगळसूत्रसुद्धा. त्या वेळी त्यांच्याजवळ ४५ गाई आणि इतर अनेक प्राणी होते. गाईंसाठी त्यांनी शेड तर बांधली, परंतु आडोशाला िभत नसल्यानं वेडावाकडा पाऊस आला की गाई भिजत. नवीन बांधकाम करायला पैसेही नव्हते. तेव्हा एका तिरमिरीत गणराजनी ठरवलं, की घरातलं काही फर्निचर, सोफासेट इ. सामान विकायचं आणि त्या मुक्या जीवांची चांगली सोय लावायची. त्या वेळीही अर्चनांचं एकच वाक्य होतं, ‘तुला हे योग्य वाटतंय ना.. मग करू या..’ इतकंच बोलून अर्चनांनी कपाटातील सर्व सामान, कपडे बोचक्यात बांधून ते रिकामं करून दिलं. ‘सफर’ हे उपचार केंद्र अनेक वर्ष चालवल्यावर अपंग प्राण्यांना अखेपर्यंत राहता यावं यासाठी कायमस्वरूपी निवारा व्यवस्था उभारण्याची गणराज यांची इच्छा होती. तेव्हा ‘हा प्रकल्प जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तो मुंबईच्या जवळपास नेण्याचा प्रयत्न कर’ असं एका मित्रानं त्यांना सुचवलं. गणराज यांनी सर्व संसार बदलापूरजवळील चामटोली गावात हलवण्याचा निर्णय घेतला. त्या वेळीही कोणताच प्रश्न उपस्थित न करता अर्चना जम बसलेली आपली ओपीडी सोडून जोडीदाराच्या इच्छेसाठी नव्या विटी-दांडूसह नवा डाव खेळण्यास सज्ज झाल्या.
दोघांच्या अविरत कष्टानं नव्या जागी ‘पाणवठा’ हा अपंग प्राण्यांचा भारतातील पहिला अनाथाश्रम आकाराला आला. अर्चनांनी वांगणी येथे नव्यानं प्रॅक्टिस सुरू केली. सर्व गोष्टी मार्गी लागत असतानाच पुन्हा एकदा परीक्षेची वेळ आली. २६ जुलै २०१९च्या काळरात्री बदलापूरमधील उल्हास नदीला लोटलेल्या महापुरानं होत्याचं नव्हतं झालं. २५ पिंजरे वाहून गेले, शेड पडली, २२ प्राणी मृत्युमुखी पडले. त्या वेळी हताश होऊन आश्रम बंद करून गावी परत निघालेल्या गणराजना अर्चनांनी धीर दिला, पुन्हा उभं केलं. त्या म्हणाल्या, ‘आता उरलेली, भयभीत झालेली आपली पिल्लं तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलीयेत. त्यांना ‘यापुढे मी तुम्हाला सांभाळू शकत नाही’ हे सांगण्याची तुझ्यात हिम्मत आहे का? नाही ना? मग उठ आणि कामाला लाग. मी तुझ्या बरोबर आहे.’ अर्चनांच्या आश्वासक शब्दांनी गणराजना थोडा धीर आला. शिवाय ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमामुळे समाजाकडून बळ मिळालं आणि ‘पाणवठा’ पुन्हा एकदा कार्यरत झाला.
आज या आश्रमात १०७ अपंग, अंध, अनाथ प्राणी कायमस्वरूपी मुक्कामाला आहेत. या सर्वाचा आणि जैन कुटुंबाचा खर्च अर्चनांच्या दवाखान्यातून निभावतो. रुग्ण तपासणी करता करता वांगणी परिसरातील आदिवासी समाजासाठी तसंच स्त्रियांच्या आरोग्यासाठी त्यांची विविध शिबिरं, व्याख्यानं सुरू असतात. त्या एक निष्णात डॉक्टर असल्या, तरी घरी परतताच त्यांची भूमिका बदलते. त्यानंतर ही माऊली गोठय़ाच्या साफसफाईपासून शेणाच्या गोवऱ्या थापेपर्यंत सर्व कामात गर्क असते. त्यांची शाळेत जाणारी दोन मुलंही ‘पाणवठय़ा’च्या कामात जमेल तशी मदत करतात. पतीच्या आनंदात आपला आनंद शोधणाऱ्या अर्चनांचं ‘व्हॉट्सअॅप स्टेटस’ न बोलता बरंच काही सांगून जातं..
‘मीच ओलांडले मला..
सोबतीस माझा सखा,
त्याच्या कृतार्थ डोळय़ात..
झुले उंच माझा झोका’ परस्परांसाठी समर्पित जीवन जगणाऱ्या या ‘व्हॅलेंटाइन्स’कडे पाहताना वाटतं, प्रतिपिंड (अँटिबॉडीज) काय केवळ लसीकरणातून तयार होतात? नव्हे, संकटांवर मात करत प्रेमानं साथ निभावण्यासाठीची प्रतिपिंड तर अशा विलक्षण व्यक्तींना बघताना, वाचताना, समजून घेताना आपल्या शरीरात आपोआप बनत जातात!