रामदास भटकळ

‘‘विनोबांच्या मौनाच्या दिवशी त्यांना भेटल्यामुळे त्यांचं बोलणं न ऐकता आल्याची वाटलेली खंत आणि बाबा आमटेंना भेटायला गेल्यावर ते आनंदवनात नाहीत हे समजून झालेली निराशा, ही माझी ‘गांधीयात्रे’ची पहिली खेप. पण नंतर त्यांना जवळून अनुभवता आलं. गांधीजींचा संदेश जगणाऱ्या माणसांना भेटून नवा दृष्टिकोन प्राप्त करण्यास अशी सुरुवात झाली आणि ‘पवनार’, ‘आनंदवन’, ‘लोकबिरादरी’ ते गडचिरोलीमधलं ‘सर्च’ ही माझी आवडती स्थळं झाली..’’

couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
Solapur Murder wife, Solapur, Murder second wife,
सोलापूर : तीन घरांच्या दादल्यात आर्थिक कारणांवरून दुसऱ्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेल्या चाकूसह पती पोलिसांत हजर
in Pune Unborn Child Dies as Pregnant Woman Beaten by a neighbor One Arrested
पुणे : शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू
A minor girl commits suicide due to not being able to bear the pain of menstruation Mumbai
मुंबई: मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या

शाळा-कॉलेजच्या दिवसांनंतर मी विरंगुळा म्हणून सहलीला फारसं गेलो नाही. प्रवास देशापरदेशांत भरपूर केला, पण तो कामानिमित्त. माझी एक मैत्रीण माझ्या प्रवासांना‘भटकळणे’ म्हणायची! म्हणजे काम आणि प्रवासाची गंमत यांची युती.

मी निघालो होतो नागपूरला, तिथे ‘पॉप्युलर’ची शाखा सुरू केल्यापासून अधूनमधून फेऱ्या व्हायच्याच. त्या दिवशी गाडीच्या डब्यात ‘साधना’चे यदुनाथ थत्ते आणि ‘माणूस’चे श्री. ग. माजगावकर हे श्रेष्ठ पत्रकार भेटले. बोलता बोलता ते म्हणाले, की ते वर्ध्याला उतरून आधी पवनारला विनोबाजी भावेंना नमस्कार करून मग वरोऱ्याला बाबा आमटे यांना भेटायला आनंदवनात जाणार आहेत. ‘तुम्हीही येता का’ विचारल्यावर मी नाही म्हणणं शक्यच नव्हतं. विनोबाजींना भेटण्याची ही पर्वणी होती. मी माझा बेत बदलून त्यांच्याबरोबरच वर्ध्याला उतरलो. तिथून अर्ध्या तासाच्या अंतरावर पवनार. पवनार आश्रमाला ती माझी पहिली भेट होती. ‘सेवाग्राम’जवळच असताना विनोबाजींचा आश्रम वेगळा का, याची तेव्हा कल्पना नव्हती. विनोबाजी जेव्हा आजारी पडले तेव्हा हवापालट म्हणून गांधींनी त्यांना अनेक थंड हवेची ठिकाणं सुचवली; परंतु विनोबांनी सेवाग्रामहून जवळच सहा मैलांवर पवनार ही जागा पसंत केली. त्यामुळे  परंधाम आश्रमाला स्वतंत्र महत्त्व आलं.

विनोबाजी तिथेच होते, पण तो नेमका त्यांच्या मौनाचा दिवस होता. या दोघा पत्रकारांना त्यांना काही विशेष विचारायचं होतं. ते काम पाटी-पेन्सिलच्या सहाय्यानं त्यांनी उरकलं. मला रस होता विनोबाजींचा आवाज ऐकण्यात. त्यांना बोलायला लावणं अशक्य होते आणि त्यासाठी एक दिवस राहणं मला अशक्य होतं. त्यांच्या दर्शनावरच समाधान मानावं लागलं, तरीही जे मानसिक समाधान मिळालं ते अपूर्व होतं.

ट्रेननं आम्ही वरोऱ्याला गेलो. आनंदवन तिथून जवळच. आम्ही आनंदवनात पोहोचलो, तेव्हा बाबा (आमटे) सोमनाथला गेल्याचं कळलं. त्या दिवसांत फोनची सुविधा आजच्यासारखी नव्हती. या दोन ज्येष्ठ पत्रकारांनी बऱ्याच गोष्टी गृहीत धरल्या असाव्यात. साहजिकच आम्ही सोमनाथकडे मोर्चा हलवला. आता नेमकं आठवत नाही, पण बहुधा मधुभाई पंडित आम्हाला तिथे घेऊन गेले असावेत. आनंदवनातल्या रहिवाशांना पुरेसं धान्य स्वत: पिकवण्यासाठी पुरेशी जागा वरोऱ्याजवळ नव्हती. काही अंतरावर सोमनाथला शेतीसाठी त्यांना काही एकर जागा मिळाली. सोमनाथला बऱ्याच मोठय़ा जागेत आनंदवनाला लागणारं धान्य आणि इतर उत्पन्नं पिकवली जात होती. बाबा तेव्हा हिंडतेफिरते होते. सोमनाथला त्यांनी आम्हाला बरे झालेले कुष्ठरोगी तिथल्या शेतीविषयीचे सर्व निर्णय घेऊन उत्तम पिकं कशी काढतात ते दाखवलं. बरा होऊनही घरातल्यांना नकोसा झालेला प्रत्येक माणूस आपल्यासारख्या माणसांपेक्षा अधिक पातळीवरील सर्जनात्मक काम करू शकतो याचा हा पुरावा होता. जेवायला बसताना मी पोरकटपणे समोर दिसेल त्या खुर्चीवर बसायला गेलो, तर त्यांनी मला थांबवलं. ते म्हणाले, की ती जागा साधनाताईंची ठरलेली आहे. शक्यतो जेवताना आम्ही दोघं शेजारी बसायचं हा एक आमचा अलिखित नियम आहे. त्या प्रौढ दांपत्याची ही प्रेम करण्याची तऱ्हा पाहून गंमत वाटली. माझ्या दृष्टीनं त्या दोघांबरोबर जेवण्याची संधी मिळणं हेच अपूर्वाईचं होतं. त्यांचा दुसरा शेजार मात्र अधिक बुचकळय़ात टाकणारा होता. त्यांच्या राहाण्याच्या जागेच्या बाजूलाच एका पिंजऱ्यात त्यांचा नवा स्नेही वावरत होता. त्यापूर्वी बिबटय़ा पाहिले होते ते राणीच्या बागेत आणि सर्कशीत; पण हा पिंजऱ्यात असला तरी त्यांचा मित्र दिसत होता. मग बाबांनी त्यांच्या आवेशपूर्ण पद्धतीनं त्यांच्या शिकारीच्या शौकापासून तो बिबटय़ाशी झालेल्या दोस्तीपर्यंत त्यांची आणि बिबटय़ाची प्रेमकहाणी सांगितली. बाबा रानात शिकारीसाठी जायचे. एकदा एक बिबटय़ा त्यांच्या समोर आला आणि कुणी काही हिंस्र करण्याऐवजी ते एकमेकांकडे टक लावून पाहात राहिले. दोघंही नजर काढेनात की हात उगारेनात. यातून त्यांचं नातं बदललं आणि हा बिबटय़ा त्यांचा प्रेमळ शेजारी बनला. विनोबांची एकुलती मौनांकित भेट अपूर्ण राहिली आणि त्यानंतर विनोबाजी भेटले फक्त त्यांच्या लेखनातून आणि विश्राम बेडेकरांनी त्यांच्यावर केलेल्या माहितीपटातून. बाबांना मात्र बऱ्याच वेळा भेटण्याची संधी मिळाली.

भारतीय वंशाचे मूळ खान्देशातले जगन्नाथ वाणी. आता कॅनडात स्थायिक झालेले सांख्यिकी. कॅनडातील ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’चे कार्यकर्ते. त्यांना भारतातल्या उत्कृष्ट समाजकल्याणाचं काम करणाऱ्या संस्थांसाठी कॅनडातून मदत आणावी अशी इच्छा निर्माण झाली. कॅनडा हे संघराज्य. तिथल्या कायद्यांनुसार एक डॉलर संस्थेनं जमा केल्यास तिथलं ‘प्रोव्हिन्शियल’ शासन तेवढीच रक्कम त्यात घालायचं अणि त्यांचं मध्यवर्ती शासन त्याचे एकास चार करत असे. याचा फायदा घेऊन भारतात चांगलं काम करणाऱ्या संस्थांना भरघोस आर्थिक मदत करणं शक्य होतं. त्यांनी विदर्भातल्या संस्थांबद्दल बरीच माहिती जमवली होती. अनुदानासाठी योग्य संस्था कोणत्या ते प्रत्यक्ष पाहण्यासाठी त्यांना त्यांपैकी काही संस्थांना भेट द्यायची होती. त्यांच्या निमंत्रणावरून त्यांच्याबरोबर आम्हीही ही यात्रा करायचं ठरवलं. लैला (पत्नी लैला भटकळ) आणि मी स्वतंत्रपणे ट्रेननं वर्ध्याला जाऊन काकावाडीत थांबलो. वाणी तिथे कार घेऊन आले आणि आम्ही पुढे निघालो.

 वर्ध्याहून वरोरा तसं जवळच आहे. गेल्या वेळेला मी बाहेरूनच सोमनाथकडे वळलो होतो. या वेळी आत जाऊन सर्वाशी परिचय करून घेतला. आनंदवनाबद्दल ऐकून होतो, पण महारोग्यांच्या आधारगावाचं खरोखर आनंदवन झालेलं प्रत्यक्ष पाहणं हा एक वेगळाच अनुभव होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या मध्यवर्ती कट्टय़ावर एक फलक होता, त्यावर आमच्यासारखे पाहुणे, जे त्या दिवशी येणार होते त्यांची नावं लिहिली होती. एखाद्या व्यवस्थापकीय संस्थेला शोभेल अशा पद्धतीनं काम होत होतं. दुसरी गोष्ट लक्षात आली, ती बाबांच्या कुटुंबातील सर्वाचं सहकार्य. डॉक्टर-वकिलांची मुलं आपल्या आईवडिलांचा व्यवसाय पुढे चालवतात. कलावंतांच्या मुलांमध्ये जन्मजात ती कला उतरू शकते. यशस्वी उद्योग वंशपरंपरेनं चालू राहिलेले मी पाहिले आणि अनुभवले. अनेक जण घरच्या कामात सामील होताना दिसतात; पण ते सुखवस्तू पद्धतीचं काम किंवा ज्या कामात कमाई आणि प्रगती शक्य आहे अशा उद्योगांत. इथे कामाचं स्वरूप खडतर असलं तरी सेवा करणं हे मुलांनी गोड मानून घेतलेलं कर्तव्य. शहरी प्रलोभनं शून्य. बहुतेक रहिवासी रोगग्रस्त किंवा नुकतेच बरे झालेले; पण त्यांनी धडधाकट माणसांपेक्षा अधिक काम केलेलं पाहणं हाच खजील होण्याचा, तरी आनंदाचा परमोच्च क्षण! आमटे कुटुंबातली माणसं आनंदवनात गुंतली होतीच, पण मुख्य म्हणजे तिथल्या सगळय़ांचंच एक कुटुंब झालं होतं. आम्ही सगळे एकत्र जेवायला बसलो. ही नेहमीचीच तऱ्हा. इतकी समानता नांदताना मी कधी पाहिली नव्हती. कुटुंबीय, पाहुणे आणि तिथले कार्यकर्ते, सर्व त्या एकत्रित ‘कम्युनिटी किचन’मध्ये. नंतर कधी तरी पुन्हा गेलो असता बाबांची सून भारतीताईंनी (भारती विकास आमटे) सांगितलेली एक हकिकत आठवली. मुलं शाळेबद्दल बोलताना मित्रांच्या आयांनी केलेल्या पदार्थाबद्दल काहीशा आसुसलेल्या स्वरात बोलायची, तेव्हा त्यांच्यासाठी वेगळं काही करताना त्यांना छोटेसं बंडच करावं लागलं! 

एकूण आश्रमासारखंच जीवन; पण बहुतेक आश्रमांत एक नकारात्मक वातावरण असतं. आनंदवन इथली ऊर्जा अविश्वसनीय होती. इतक्या प्रकारचे व्यवसाय इथे चालत होते. यांपैकी एकही मला जमला नसता. मी इथे राहायचं ठरवलं (आणि प्रत्येकाला तात्पुरता तरी तसा मोह व्हायचाच), तर मी हवा तो उद्योग सुरू करू शकलो असतो. प्रश्न इथल्या लोकांना सामावून घेण्यासारखं काय करता येईल हाच होता. कदाचित त्यांच्याकडून शिकून घेऊन काही करावं लागलं असतं. जवळच्या प्रांगणात वरोरा गावातल्या लोकांना सहलीसाठी येण्याची सोय होती. ज्या लोकांना वाळीत टाकलं जायचं त्यांच्या जागेत जीव रमवण्यासाठी गावातले लोक आनंदानं यायचे हा पैलू हृदयस्पर्शी होता. 

तिथून आम्ही सोमनाथला गेलो. मी पहिल्यांदा गेलो तेव्हा बाबा आणि साधनाताई यांच्यातच मग्न होतो. या वेळी जी महारोगमुक्त माणसं ही शेती सांभाळतात त्यांच्याकडून सारं समजावून घेताना शेतीविषयी बरंच काही पहिल्यांदाच कळत होतं. शेतीचं व्यवस्थापन हा एक फार व्यामिश्र विषय आहे. त्यात निसर्गाशी जुळवून घेत शास्त्रीय ज्ञानाचा उपयोग करावा लागतो, दीर्घकालीन नियोजन करावं लागतं आणि तरीही क्षणाक्षणाला जागरूक राहावं लागतं, हे जाणवू लागलं. शेतीचं प्रशिक्षण न घेतलेली आणि काही तर शेतीचा पूर्वानुभव नसलेली मंडळी हे सारं जिद्दीनं करत होती.

बाबा कामासाठी नवीन दिशा शोधत असायचे. हेमलकसाला ते पोहोचले तेव्हा आजूबाजूच्या आदिवासींना शाळा नाही, उपचारासाठी सोय नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी धाकटय़ा प्रकाशच्या नेतृत्वाखाली ‘लोकबिरादरी’ची स्थापना केली. विकासभाऊ डॉक्टर झालेले, पण त्यांची वृत्ती इंजिनीयर असल्यासारखी. प्रकाश डॉक्टर, शिवाय तिथल्या आदिवासींची गरज म्हणून शिक्षणाकडेही लक्ष देणारे. त्या जंगलात त्यांनी हॉस्पिटल तयार केलं होतं. ऑपरेशन थिएटर हे शहरांसारखं सुसज्ज. फक्त त्या आदिवासींना ऑपरेशननंतर स्वत:च्या कुटुंबीयांबरोबर घरचं अन्न शिजवून खायला आवडायचं. तेव्हा शहरांत काही हॉस्पिटल्सच्या खोल्या हॉटेलसारख्या सुसज्ज असतात, तशा इथे जाणिवपूर्वक केल्या नव्हत्या. तिथल्या मुलांसाठी शाळाही सुरू केली होती आणि काही रांगडी मुलं निरनिराळय़ा खेळांतही प्रावीण्य दाखवत होती.

पण आम्ही सगळय़ात चकित झालो तिथले प्राणी पाहून. प्रकाशभाऊ तर बिबटय़ाबरोबरही  मित्राप्रमाणे बागडायचे. सोमनाथला बाबांचा मित्र बिबटय़ा पाहिला होता. इथे पाहतो तो बापसे बेटा सवाई! प्रकाशभाऊंनी या मैत्रीचं रहस्य सांगितलं. प्राण्यांशी खेळायला सुरुवात झाली, ती तिथले आदिवासी एक माकडाचं पिल्लू घेऊन आले तेव्हा. ते प्राणी मारून खायचे, पण (मृत आईला) बिलगलेलं पिल्लू त्यांनी ‘डाकतरसाहेबां’कडे आणून दिलं. यातून हा प्राणिसंग्रह जमत गेला. ज्यांना आपण हिंस्र प्राणी समजतो, त्यांना ‘या माणसाचा आपल्याला धोका नाही आणि हा माणूसही आपल्याला घाबरत नाही’ याची खात्री पटली की ते आपले दोस्त होतात. ऐकावं ते नवलच! महारोग्यांना आपलं मानणारे विकासभाऊ आणि प्राण्यांशी दोस्ती करणारे प्रकाशभाऊ हे फक्त बाबा आणि साधनाताई यांच्या पोटीच जन्माला येऊ शकतात. 

तिथून निघालो ‘सर्च’च्या शोधात. ही वसाहत महत्त्वाची असूनही जागा शोधायची धडपड अशासाठी, की डॉ. अभय बंग आणि राणी बंग यांची ही संस्था गडचिरोलीहून काही अंतरावर आहे. या संस्थेचं रूप फार वेगळं आहे. प्रामुख्यानं हे संशोधन केंद्र आहे. इथे निरनिराळय़ा नैसर्गिक आणि समाजशास्त्रीय क्षेत्रांत काम करणारे बरेच शास्त्रज्ञ काम करतात. अत्यंत शास्त्रशुद्ध संशोधन करून त्यांनी बालकुपोषणासंबंधी अत्यंत उपयुक्त माहिती आणि त्यावरच्या उपाययोजना यांसंबधीचे अहवाल तयार केले होते.

अभय बंग हे ठाकूरदास बंग यांचे चिरंजीव. हे कुटुंब गांधीवादी म्हणून प्रसिद्ध आहे. ‘सर्च’मध्ये पाहतो तो दोन्ही प्रकारचं काम चाललं होतं. डॉ. बंग हे वैद्यकशास्त्रात प्रत्यक्ष काम करणारे, शिवाय व्यसनमुक्तीच्या कामात गुंतलेले. व्यसनमुक्तांनी केलेला एक कार्यक्रम आम्ही पाहिला. बाबांच्या कामाहून या कामाची पद्धत वेगळी होती. आजूबाजूच्या खेडय़ांतील लोकांना वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून त्यांच्यापैकीच काही स्त्रियांना किमान प्रशिक्षण देण्याची व्यवस्था ‘सर्च’मध्ये केली होती; पण या सर्वाचं स्फूर्तिकेंद्र एकच होतं- गांधीविचार. 

एकाच प्रवासात इतकं सारं पाहणं, पचवणं सोपं नव्हतं. ‘खेडय़ात चला’ हे गांधीबाबा का सांगायचे हे काहीसं लक्षात येत होतं आणि एखाद्या सहलीपेक्षा जास्त आपण काही करू शकत नाही याबद्दल अपराधी वाटायचं. नुसती काही आर्थिक मदत करून ही जाणीव कमी होत नसे. ही ‘गांधीयात्रा’ मी पुन:पुन्हा केली. विशेषत: माझ्या मुला-नातवंडांनी हे सारं अनुभवावं म्हणून आणि स्वत:ला आपल्या कर्तव्याची जाणीव होत राहावी म्हणूनही..