मंगला गोडबोले

‘प्रवास नुसता आनंद देत नाही, किती गोष्टी दाखवत, शिकवत राहतो. दृश्य जगाच्या मागचं फसवं जग, वरवर आलबेल दिसणाऱ्या चित्रातली विसंगती आणि माणसाच्या वागण्याची अजब तऱ्हाही! माझेही लहानमोठे प्रवास मला असंच काही ना काही सांगत गेले. या ‘कवतुकां’साठीच परिभ्रमण करायला हवं..’

Shrawan 2024 Rashi Bhavishya
श्रावण सुरु होताच ‘या’ तीन राशींवर भोलेनाथांची कृपा बरसणार; दुःख- संकट वाटेतून होतील दूर, प्रचंड धनलाभाचा योग
mars saturn sextile What does this planetary movement mean for your zodiac sign magal shani sextile at 60 degree angle these zodiac sign will get rich soon
आता पालटणार ‘या’ राशींचे नशीब! १०० वर्षांनंतर शनि अन् मंगळाचा दुर्मीळ संयोग; अचानक होणार धनलाभ, तिजोरी भरणार?
loksatta ulta chasma
उलटा चष्मा: आता आम्हीही रडवणार…
are you addicted your favourite lip balm then read what doctor said
तुम्हालाही ओठांना सतत लिप बाम लावण्याचे व्यसन तर नाही ना? काय होतात परिणाम? वाचा डॉक्टरांचे मत….
Budh Gochar 2024
आजपासून ‘या’ ५ राशींचा सुवर्णकाळ सुरू, हाती येणार अमाप पैसा? बुधदेवाच्या कृपेने होऊ शकतात गडगंज श्रीमंत
My friend Half a century of friendship
माझी मैत्रीण : मैत्रीचं अर्धशतक!
lessons from spain picasso rashid khan and culture
अन्यथा : पिकासो, रशीद खान आणि संस्कृती ! स्पेनचे धडे : १
Loksatta editorial Horrific Murder In Vasai Boyfriend Stabs Girlfriend To Death With Iron Spanner
अग्रलेख: लक्षणाची लक्तरे..

आयुष्याच्या दीर्घ प्रवासात छोटय़ामोठय़ा देशीपरदेशीय प्रवासांच्या संधी याव्यात यात काय आश्चर्य? लाल डब्याच्या एस.टी.पासून विमानाच्या बिझनेस क्लासपर्यंत.. ‘कंडक्टेड टूर’च्या पर्यटन टोळीपासून परदेशात एकटीनं रस्ता शोधण्यापर्यंत.. होल्डॉल, टिफीन कॅरियर बाळगण्यापासून एका स्मार्टफोनवर निभवण्यापर्यंत.. सर्व प्रकारच्या प्रवासांचे अनुभव गाठीशी आहेत. यातल्या कशाशीही, शक्यतो, जुळवून घेण्याचं धोरण असल्यानं कुठलाच प्रवास सर्वस्वी वाया गेल्याची खंत नाही. दिवसेंदिवस यंत्रतंत्रामुळे, घर सोडण्यापूर्वीच, जाऊ तिथले रस्ते, पत्ते, हॉटेल, संभाव्य हवामान वगैरे कळून प्रवास ‘सोप्पे’ करण्याची सोय लाभते आहे पर्यटकांना. पण यातलं काहीही कळत नव्हतं तेव्हाही एकेका प्रवासात लख्खकन् काही कळून गेल्याच्या आठवणी आहेत. त्यातल्याच काही या सदराच्या निमित्तानं नोंदवाव्या म्हणते.

१९६३-६४ चा सुमार. आमचं मुंबईकर कुटुंब महाबळेश्वरला गेलं होतं. चौफेर, खास महाबळेश्वरी ‘हिरवी माया’ पसरली होती. पण तेव्हा तरी परिसरात झाडांवर ठळक रंगीबेरंगी फुलं आलेली नव्हती. तरी ‘केट्स पॉइंट’ला गेलो, तर दुरून एक मोठंसं झाड लालकेशरी फुलांनी बहरलेलं दिसलं. आसपास थोडी माणसांची वर्दळ. ती त्यांच्या नादात, झाड आपल्या नादात. फुलांच्या ओढीनं त्या पठाराच्या जवळजवळ जातोय तो कुणीतरी हटकलं, ‘‘उधर नही. शूटिंग शुरु हैं.’’ एक उडत्या चालीचं गाणं आणि पाच-सात मोठय़ा छत्र्यांखाली बसलेले माणसांचे घोळके या त्याच्या खुणा. मध्येच कण्र्यामधून दोनचार घोषणा झाल्या, ‘कॅमेरा रोलिंग’ वगैरे झालं आणि एका छत्रीखालून अभिनेत्री राजश्री (व्ही. शांतारामांच्या कन्या) ठुमकत त्या झाडाजवळ जाऊन त्याला बिलगल्या. अचानक झाडावर- म्हणजे फक्त झाडावरच झारीतला पाऊस पडायला लागला. त्यामुळे मॅडमच्या अंगावरती काही फुलं पडली. त्यांनी लडिवाळ तक्रार केल्यासारखा अभिनय केला (असावा), अचानक ‘कट्.. कट्.. कट्..’ असे आवाज आले आणि वेगानं त्या माघारी फिरून छत्रीत शिरल्या. ‘ह्योच ख्योळ’ पुन्हा पुन्हा पाच-सातदा सुरूच राहिला. ‘झारीतला शुक्राचार्य’च फक्त माहीत असणारी आम्ही पोरंटोरं झारीतल्या पावसाकडे ‘नेत्रांची निरांजनं’ वगैरे करून बघत राहिलो.

चित्रपटांच्या त्या मयसृष्टीचं कहर आकर्षण असल्यामुळे ‘काय पाऊस.. काय फुलं.. काय राजश्री.. सगळंच ओक्के!’ असं होऊन गेलं होतं आम्हाला. पुढे साहजिकच चिकाटी संपली. दुसऱ्या दिवशी वडिलधाऱ्यांकडे हट्ट धरून पुन्हा त्याच जागी गेलो, तर पुरता सीन ट्रान्सफर झालेला! लाल फुलाचं झाड गायब. छत्र्या.. पाऊस.. खाली पडलेली फुलं.. सगळं गायब. काल ‘ओक्के’मध्ये असलेलं सगळं ओकंबोकं झालेलं. घनघोर निराशा आली. इतकं सगळं लटकं आणि क्षणिक असतं सिनेमाचं जग? पुढे कधीतरी तो विश्वजीत-राजश्री अभिनीत ‘सगाई’ नामक चित्रपट प्रदर्शित झाला. त्यात ते लाल फुलांचं झाड पडद्यावर पाच सेकंदही दिसलं नसावं! मनात घट्ट अढी बसली. या चित्रपटसृष्टीतलं सौंदर्यही खोटं.. निसर्गही खोटा.. भावना तर खोटय़ाच.. त्यावर खराखरा जीव जडवावा का? का ते तेवढय़ाच वजनानं घ्यावं?

ही ‘पडद्यावरची देवता’ दिसण्याचा अनुभव आला, तसाच पुढे एकदा प्रत्यक्ष देवतेसमोर उभं ठाकण्याचा योगही आला. त्याचं असं झालं, की गाव- रत्नागिरी. मी एका कार्यक्रमासाठी गेले होते. सकाळभर औपचारिक कार्यक्रमानं गांजले असल्यामुळे संध्याकाळी दोन तास फिरण्यासाठी एक रिक्षा ठरवली होती. रिक्षात बसले तेव्हा आकाश निरभ्र होतं. पावसला पोहोचले तेव्हा त्यात ढगांची शतपावली सुरू झाली. पुढे रिक्षा दामटली, तर घनघनमाला नभी दाटलेल्या आणि काही मिनिटांमध्येच धुवांधार वृष्टी सुरू. अंधार दाटला, दिवे गेले, रस्ते वाहू लागले. रिक्षातून बाहेरचं दिसेनासं झालं. मीच काय, स्थानिक रिक्षावालाही घाबरला. रस्ता चुकला. पुढे एके ठिकाणी समोर झाड पडल्यामुळे रस्ता बंद झाला. आता फक्त रिक्षा बंद पडायची बाकी होती, म्हणजे भीतीनं माझं हृदयही बंद पडलं असतं! उजवीकडे वाहत्या शेतातून एक पायवाटवजा रस्ता आणि त्याच्या टोकाला किंचितसा उजेड दिसला. आसऱ्याची अंधुक आशा पालवल्यानं रिक्षावाल्यानं रिक्षा त्या रस्त्यावर घातली. महत्प्रयासानं ती त्या प्रकाशिबदूपर्यंत नेली, तर ते एक बुटकं, छोटं दगडी देऊळ होतं. आत देवीची मूर्ती आणि दगडाच्या आडोशाला खापरात लावलेला तेलाचा दिवा होता. मूर्तीच्या गळय़ात एक चुरगळलेला हार. नावगाव कळायला मार्ग नव्हता. अचानक वीज चमकली. तिच्या प्रकाशात मूर्तीमागच्या भिंतीवर खडूनं लिहिलेलं देवीचं नाव दिसलं आणि दचकायला झालं. आमच्या कुटुंबाच्या कुलस्वामिनीचं ते नाव होतं! तिचं नाव घरातल्या मोठय़ांच्या बोलण्यात ऐकलं होतं, लग्नकार्याच्या कुंकुमपत्रिकेवर छापलेलं पाहिलं होतं. पण प्रत्यक्ष गाठभेट ही त्या संध्याकाळचीच. नंतरच्या विजांच्या कडकडाटात खूपदा त्या मूर्तीकडे, मूर्तीच्या डोळय़ांकडे नजर गेली. सुस्वरूप. परत निघेपर्यंत त्या नजरेनं मला सोबत केली. पुढे घरी परतल्यावर यावर खूपच भाष्यं ऐकता आली. मी भाग्यवान असून देवीनंच मला बोलावलं, आता मी हे ऋण फेडण्यात पुढाकार घ्यावा, वगैरे वगैरे. ज्या देवीचं मी कधीच, काहीच केलं नाही, साधी धूळभेटही घेतली नाही, ती आवर्जून मला(च) बोलवेल यावर माझा विश्वास नव्हता, नाही. पुढे तिचं नवं मंदिर उभारल्यावरही तिथे जावंसं मला वाटलं नाही. तरीही तो काही वेळ त्या दगडी नजरेनं मला आश्वस्त केलं होतं हे विसरता येत नाही. संगती कशी लावावी हे कळत नाही. का सगळय़ाची संगती लावणंच असंगत म्हणावं?

निसर्गाचं असंच एक रौद्रभीषण रूप सिक्कीमच्या प्रवासात समोर आलं. खळाळती तिस्ता नदी, भव्य डोंगरकडे, जटिल खोल दऱ्या आणि दूर कुठेतरी चमकणारी गूढ बर्फाळ शिखरं.. आम्ही प्रवासी त्यात पूर्ण गळपटलो होतो. पण आमचा टॅक्सीवाला त्यात नव्हताच जसा काही. त्याच्या रेडिओवर अभिनेता डॅनी डँग्झोपा हे स्टेशन लागलेलं! तो ‘डॅनीसरांचा गाववाला’ होता म्हणे. टॅक्सी चालवता चालवता आमच्या टूरगाईडचं जोडकाम करणारा हा पठ्ठय़ा वारंवार डॅनीजींचं नाव घेत होता. ‘गहरी खाई हैं’ म्हणता ‘‘डॅनीजी सरळ स्वत:च्या हेलिकॉप्टरमधून ओलांडतात बरं ती!’’ ‘‘एवढय़ा थंडीत घोडे रुबाबदार कसे म्हणून काय विचारता?.. अहो, डॅनीजींच्या ‘अस्तबल’मध्ये याहून भारीभक्कम घोडे आहेत.’’ ‘‘तो डोंगरकडा ना? डॅनीजींनी फलाण्या सिनेमात त्याच्यावर पाय रोवून सॉल्लिड फायटिंग केलीये!’’ असा सारखा जप सुरू. ‘‘सद्गृहस्था, तुझ्या डॅनीजींच्या मागे सहज म्हणून विराट निसर्ग वगैरे दिसतोय, त्याबद्दल थोडंसं बोलता येईल का रे?’’ मी हलकेच सुचवलं, तर तो उसळलाच. ‘‘नदी का क्या मॅडमजी? पुर्खोसे कितनों को या नदीनं गिळलं, डोंगरदऱ्यांनी गायब केलं. एकटे डॅनीजीच तर यांच्या छाताडावर पाय रोवून उभे राहिले, त्यांना दाद द्यायला नको?..’’ त्याची पोटतीडिक माझ्या शहरी, सुरक्षित निसर्गप्रेमाला एक प्रकारची चपराकच ठरली. तेव्हापासून निसर्गाचे एकतर्फी गोडवे गाताना जीभ कचरते.

निसर्गाचं क्रौर्य फिकं पडेल असं माणसांमधलं क्रौर्यही एका प्रवासातच दिसलं. तो प्रवास होता २ नोव्हेंबर १९८४ रोजी पठाणकोट विमानतळापासून पठाणकोट रेल्वे स्टेशनवर पोहोचण्याचा आणि पुढे पठाणकोट-दिल्ली-पुणे रेल्वेनं पूर्ण करण्याचा. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली तेव्हा आम्ही दोन मुलांसह श्रीनगरमध्ये फिरत होतो. कुजबुज, ट्रान्झिस्टरवर बातम्या ऐकणं, दुकानं बंद होणं, इतकीच प्रतिक्रिया होती तिथे. २ नोव्हेंबरला पठाणकोट विमानतळावर उतरलो, तर बाहेर चौफेर पोलीस. घाईघाईनं बंद गाडीत कोंबून आम्हाला पठाणकोट रेल्वे स्थानकावर आणलं, तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूंना जाळपोळीची दृश्यं होती. पठाणकोट रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी. मध्येच झुंडीनं येणारी माणसं, ‘मारो-काटो’ वगैरे घोषणा आणि त्या थांबवणारे पोलीसही. रेल्वे अनेक तास उशिरानं सुटली तेव्हा स्थानकावरच्या सर्व सोयी पूर्ण कोलमडल्या होत्या. आरक्षण धाब्यावर बसवून कुणीही, कुठेही चेंगराचेंगरी करत होतं. वाटेत सोनपत-पानपत-अंबाला वगैरे स्टेशनांच्या बाहेर आसपास जाळपोळीची दृश्यं. नंग्या तलवारी हाती धरून धावत सुटलेली माणसं. आमच्या गाडीत, वरच्या बर्थवर, पांघरुणात वगैरे लपून बसलेले सरदारजी आणि त्यांना खेचायला, मारायला उठलेली बाहेरची टोळकी. रेल्वेच्या आत-बाहेर सर्वत्र भयग्रस्तता. उलटसुलट बातम्या. ‘प्रवासी गाडय़ा बंद पडल्या’, ‘इतकी माणसं मारली’, ‘झुग्ग्याझोपडय़ा बेचिराख’.. अक्षरश: जीव मुठीत धरून आम्ही गाडीतले प्रवासी दिल्लीला आलो, तर दिल्ली रेल्वे स्थानक आर्मी कॅम्पसारखं झालेलं होतं. शस्त्रधारी पोलीस जागोजागी उभे. गाडीच्या आमच्या डब्यात, शेजारच्या डब्यात, पॅसेजेसमध्ये, दरवाजांमध्ये, दिसेल तिथे शिरून ते विध्वंसाच्या खुणांचा मागोवा घेत होते. पॅसेजमधल्या, वरच्या बर्थवरच्या जखमी माणसांना, त्यांच्या तुटक्या-मोडक्या सामानासह बाहेर काढत होते.

आमच्या दिल्ली-पुणे परतीच्या प्रवासाच्या शक्यता आजमावण्यासाठी माझे पती डब्यातून उतरले, तर आमचा १०-११ वर्षांचा मुलगाही त्यांच्याबरोबर बाहेर पडला. ते दोघं थोडेच फिरले असतील नसतील, एवढय़ात पोलिसांनी त्यांची पुनश्च डब्याकडे रवानगी केली. पण तेवढय़ा वेळात जो काही ‘खूनखराबा’ मुलाला दिसला, तो त्याला खोलवर ‘लागला’ असणार. पुढच्याच डब्याच्या दरवाजाजवळ एक आडदांड अर्धमृत किंवा मृतदेह रक्ताच्या थारोळय़ात आडवातिडवा पडलेला बघून तो अंतर्यामी ‘हलला’ असणार. तेव्हा आणि पुढचे कित्येक दिवस कधीही या प्रवासाचा विषय निघाला, की तो कावराबावरा होऊन विचारे, ‘‘आई, पण त्या बुवानं काय केलं होतं गं? त्यालाच का मारला?..’’ एरवी, वयाच्या त्याच्या टप्प्यानुसार मारामाऱ्या, लढाया, शस्त्रं, ढिशाँव ढिशाँव, तगडक्- तगडक्, ठो-ठो-ठो, वगैरेंत खूप रमणाऱ्या, त्यावरून कधी कधी माझी बोलणी खाणाऱ्या मुलाला हा प्रश्न डसावा, ‘त्या बिचाऱ्यानं काय केलं होतं?’ हे विचारावंसं वाटावं, यानंही मला आश्वस्त वाटायचं. अजून तरी सगळं संपलेलं नाहीये, असा छुपा दिलासा मिळायचा.
कोणत्याही प्रवासाचा शेवटचा टप्पा सहसा कंटाळावाणा असतो. सुरूवातीची उमेद नसते. कधी एकदा घर गाठतोय असं होतं. पण एका कंटाळवाण्या प्रवासाचा शेवटचा टप्पा मात्र फारच आनंददायी झाल्याची आठवणही आहे! नागपूरहून रेल्वेनं येत होते. गाडीला उशीर झाला होता. बडनेऱ्यापासून रखडत रखडत नगर स्टेशनवर येईपर्यंत तीन-चार तासांनी गाडी मागे पडली होती. डबे गलिच्छ झालेले, पाणी संपलेलं, प्रवासी चिडचिडे झालेले. हे कमी म्हणून की काय, पण नगर स्टेशनवर, आर्मीत भरती होण्यासाठी निघालेल्या तरुणांच्या झुंडीच्या झुंडी डब्यात शिरल्या. स्टेशनवर त्यांना निरोप देण्यासाठी आलेल्यांची गर्दी. डब्यांमध्ये दिसेल ती जागा बळकावण्याची या तरुणांची घाई. बरोबर सामानाची बोचकी, थैल्या, बॅगा वगैरे वगैरे.. कोणाच्याही जागेवर कोणीही बसतंय, सामान कोंबतंय, असा सावळा गोंधळ! गाडी हलली, माणसं सामावली, सामानाची ओढाताण सुरूच होती. तेवढय़ात माझ्यासमोरच्या बाकावर बसायला बघणाऱ्या एका तरुणाच्या भल्या मोठय़ा थैलीनं तोंड वासलं आणि तिच्यात वरवर कोंबलेल्या वस्तू धडाधड खाली पडल्या. काही वह्या, पुस्तकं, मोजे, टोप्या असा माल होता. तो तरुण ओशाळून, काहीतरी करून हा पसारा आवरून ठेवायचा खटाटोप करू लागला. त्याच्या बरोबरचा त्याच्यावर खेकसला, ‘‘कुठलं काय काय कबाड आणलंयस रे तू?’’

‘‘मी नाही रे! आमच्या आईचा आग्रह. लांब जातोयस, एकला जातोयस पहिल्यांदा, ही पुस्तकं ठेव सोबत म्हणून. घरची आठवण आली की एखाददा वाचावं हे!’’ असं म्हणून तो लगबगीनं सगळं सावरायला लागला.. आणि क्षणभर मला गांगरल्यासारखं झालं. त्या पुस्तक पसाऱ्यामध्ये माझं ‘झुळूक’ हे पुस्तक होतं! इतरही दोनचार होती, पण माझं पुस्तक होतं. त्याला त्याच्याशी काही देणंघेणं नव्हतं. तो कदाचित ते वाचणारही नसेल. कदाचित त्या वेळी त्या आईच्या हाताशी तेवढंच पुस्तक असेल. सगळय़ा शक्यता मान्यच होत्या मला. तरी, कुणाला तरी कधीतरी आपल्या आठवणी जागवायला, माझं पुस्तक मदत करण्याची शक्यता वाटावी, हा केवढा दिलासा होता मला!.. पुण्याला पोहोचेपर्यंत, माझ्यापुरतं, त्या गाडीचं पार ‘विमान’ झालं. मेलेला उंदीर शेपटीला धरून उचलावा तशी ती पुस्तकं पिशवीत टाकण्याबद्दल मी त्याला मनोमन माफ तर केलंच, उलट उतरताना, त्याला त्याच्या पुढची प्रवासासाठी तोंडभरून शुभेच्छा दिल्या. प्रवासाचं सुख हे नेहमी डब्याच्या क्लासवर आणि एअरकंडिशनरच्या गारव्यावर थोडंच अवलंबून असतं?..
माझ्या प्रवासाच्या आठवणींमध्ये अशी काही संस्मरणं वर येतात, तेव्हा समर्थ रामदास सहजच स्मरतात. त्यांनी म्हटलं होतं,

‘सृष्टीमध्ये बहुलोक परिभ्रमणें कळे कवतुक
नाना परीचे विवेक आढळो येती।।’

माणसं, माणसांचे व्यवहार, देश-काल-परिस्थितीमधली साम्यं आणि फरक, निसर्ग, त्याचे विभ्रम आणि त्यांच्याशी होणारा माणसांचा संवाद यांची अपेक्षित आणि अगदी अनपेक्षित ‘कौतुकं’ प्रवास जेवढी दाखवतो तेवढी अन्य कुठेच, कधीच दिसत नाहीत. याला पूर्वअट एकच.
अधूनमधून तरी, स्वत:च्या कौतुकातून अंमळ बाहेर पडण्याची तयारी बाळगायला हवी! मग ‘पहावं’ तेवढं कमीच!