‘जिथं व्यवहाराची भाषा मराठी नाही, अशा एका लहानशा गावात ते साहित्य संमेलन भरतं. तेही गेली पंचवीस वर्ष! मराठी भाषेचं त्यांना असलेलं कौतुक, मराठी साहित्याबद्दलची आस्था आणि मराठी टिकवण्याची त्यांची ऊर्मी अलौकिक आहे. त्यासाठीचं केलेलं कर्नाटक -निपाणीतल्या कारदगा गावाचं पर्यटन अविस्मरणीय तर ठरलंच, पण पुन्हा पुन्हा ते करायची इच्छा निर्माण करणारंही ठरलं..’ सांगताहेत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे.
प्रवास सर्वानाच करावा लागतो. लौकिक कारणांसाठी आणि अलौकिक कारणांसाठीसुद्धा. आध्यात्मिक अर्थानं म्हणाल तर आपण सगळेच प्रवासी असतो. अज्ञाताकडून अज्ञाताकडे असा हा आपला प्रवास सुरू असतो. दरम्यानच्या काळात आपण रेंगाळतो, थांबतो. सुखदु:खाचे सोहळे साजरे करतो. हा प्रवास आनंददायी आहे की दु:खदायी हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं.
हे आठवण्याचं कारण असं, की लेखक या नात्यानं मी काही प्रवास केला असल्यास आणि तो आनंददायी असेल तर त्याबद्दल मला लिहायचं आहे. एरवी मी गेलो असतो याची खात्री नाही, कारण व्यग्रता आणि व्यवधानं आपल्याला बांधून ठेवतात. पण विचारवंत लेखक सुनीलकुमार लवटे यांनी मला दूरध्वनीवरून असं सांगितलं, की ‘महाराष्ट्राच्या बाहेरील एका मराठी गावामध्ये गेली पंचवीस वर्ष मराठीचा जागर सुरू असून, मराठी भाषेच्या प्रेमाची ज्योत तिथं तेवत ठेवलेली आहे. तुम्हाला तिथं जायचं आहे, तेही अध्यक्ष या नात्याने.’ मी तत्काळ नकार दिला नसला, तरी होकारही दिला नाही. तेव्हा ते मला असं सांगत राहिले, की ‘तिथं दरवर्षी लोकवर्गणीतून साहित्य संमेलन घडवलं जातं. गाव महाराष्ट्राच्या बाहेरचं आहे. तालुका निपाणी, गावाचं नाव कारदगा. राज्य कर्नाटक. या वर्षीचं हे रौप्यमहोत्सवी वर्ष. तुम्ही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष आहात. पंचविसाव्या वर्षांच्या निमित्तानं तुम्ही तिथे यावं अशी त्या मंडळींची इच्छा असून तुम्ही तेथे गेलं पाहिजे असा माझाही आग्रह राहील. त्यांचं मराठी भाषेचं प्रेम लक्षात घेऊन तुम्ही तेथे गेलं पाहिजे..’ या आदेशवजा सूचनेवरून मी निघालो.
कोल्हापूरवरून निघालो. एक कानडी वळणाच्या नावाचं हॉटेल लागतं. सोबत असलेला कार्यकर्ता प्रचंड उत्तेजित. तो सवयीनं कानडीच बोलतो आहे. मग मराठी. मी विचारतोय, की हे सगळं दरवर्षी न चुकता का करता? तो गोंधळतो, मग हसतो. छातीला हात लावून म्हणतो, मराठी इथे आहे म्हणून. मी चकित. दुसऱ्या दिवशी सुनीलकुमार लवटे येतात. आमचा प्रवास सुरू होतो, कारदगा गावाकडे. हे ध्यानात ठेवून, की पेट्रोल कर्नाटकमध्येच भरायचं आहे, कारण सात रुपयांनी स्वस्त आहे!
महाराष्ट्राच्या बाहेरचं कारदगा हे मराठी गाव. संमिश्र भाषा. पण सर्वाना वाटणारं मराठीचं प्रेम. माझी अशी समजूत होती, की उत्साही मंडळी काहीएक उत्सव करतच असतात. हादेखील असाच काही उत्सव असू शकेल. पण ही समजूत तितकीशी खरी ठरली नाही. तिथं मी पाहिलं ते साहित्य संमेलन भव्य स्वरूपाचं होतं. ते इतकं मोठं असेल अशी माझी अपेक्षा नव्हती. हे संमेलन लोकवर्गणीतून भरवलं जातं. सामान्य मजूरसुद्धा आपल्या कमाईतली काहीएक रक्कम या संमेलनासाठी देतो आणि हा ग्रामोत्सव आहे असं मानतो. विशेष म्हणजे या संमेलनासाठी शासकीय अनुदान मिळत नाही. या गावातला प्रत्येक माणूस हा कार्यकर्ता आणि हा प्रत्येक घराचा उत्सव. तो अद्भुत सोहळा मी प्रत्यक्ष पाहिला, अनुभवला.
मला घ्यायला आलेल्या दोघा-तिघांपैकी एक कारखान्यातला श्रमकरी होता आणि त्याला साहित्याबद्दल आस्था होती. काही पुस्तकांची नावं माहिती होती. ती मंडळी माझ्याशी आणि आपसातदेखील मराठी बोलत असली तरी व्यवहारभाषा म्हणून ते कन्नड बोलत होते. मला भेटण्यात त्यांची एक असोशी मला जाणवली. एक उत्कटता जाणवली. अशी उत्कटता मला अन्यत्र सहसा अनुभवायला मिळालेली नव्हती. मी त्यांच्याबरोबर बोलत राहिलो, माहिती घेत राहिलो आणि चारचाकी वाहनातून काही अंतर प्रवास करत राहिलो.
संमेलनानिमित्त सगळय़ा गावाला जेवण आहे.. आम्हाला एका घरी नेण्यात आलं. खूप स्त्रिया राबत होत्या. तिथल्याच शेतातल्या खूपशा भाज्या होत्या. जेवणानंतर सर्व पुरुषांनी एकत्र होऊन एक प्रार्थना म्हटली. स्त्रियांना धन्यवाद दिले. माझ्यासाठी तो प्रकार नवीनच होता. मी ऐकत राहिलो.. प्रत्येक घरात उत्सव आणि सर्वत्र गर्दी. सर्वत्र रांगोळय़ा घातलेल्या. दिंडीला सुरुवात झाली होती. त्यानंतर आम्ही चित्ररथ पाहिले. या लोकांची नाळ मराठीशी जोडली गेलेली आहे. घोडय़ावर बसलेले शिवाजी महाराज आणि त्यांचा लवाजमा मी चकित होऊन पाहिला आणि मग ज्ञानोबा, तुकाराम महाराज, तुकडोजी महाराज, झाशीची राणी इत्यादी सर्व इतिहास आदरानं प्रवाहित होत राहिला. प्रघाताप्रमाणे दिंडी संपताना अध्यक्ष या नात्यानं त्यांनी मला थेट मंचावर नेलं. तिथं एक आनंददायक धक्का बसायचा होता. सामान्यत: प्रमुख मंचाला ऐतिहासिक किंवा धार्मिक व्यक्तींची नावं दिली जातात. मला ज्या प्रमुख मंचावर बसवण्यात आलं, त्या मंचाचं नाव ‘पैगंबरवासी न. नि. पटेल मंच’ असं होतं. मी तिथं थोडा चकित झालो. मुसलमान माणसाच्या नावानं साहित्य संमेलनाच्या मंचाचं नाव घ्यायचं आणि त्या मंचावरून हिंदू देवतांचं आवाहन करायचं ही कल्पना आपल्याकडे कदाचित स्वीकृत झाली नसती. पण तिथल्या संयोजकांनी कोणतीही भावना न बाळगता अगदी सहजपणे ‘खऱ्या भारताचं’ दर्शन घडवलं होतं.
न. नि. पटेल हे त्या गावातले मागच्या पिढीचे पहिले आय.ए.एस. अधिकारी. त्यांचा मुलगा मुंबईला डॉक्टर आहे. तोही उपस्थित होता. भावनावश झाला होता आणि त्यानं कारदगा गावच्या वाचनालयासाठी आपल्या वडिलांच्या संग्रहातली एकोणीस हजार पुस्तकं भेट दिली. ज्ञानार्जनासाठी धर्मभेद उपयोगाचा नसतोच. मी त्याच्या भावविवशतेकडे आणि कारदगा गावच्या गावकऱ्यांच्या सहज प्रवृत्तीकडे काहीशा चकित दृष्टीनं पाहात राहिलो. तिथं मला विद्वेषरहित भारत दिसायला लागला. तिथं आविर्भाव नव्हता, दिखाऊपणा नव्हता. सहज प्रवृत्ती दिसून आली.
कर्नाटकात राहणाऱ्या आणि मराठी माणसांनी लिहिलेल्या अकरा ग्रंथांचं प्रकाशन माझ्या हस्ते होणं, हा आणखी एक चकित करणारा प्रसंग होता. त्यांच्या पुस्तकांमध्ये मागच्या काही वर्षांतला दडलेला इतिहास होता. भाषावार प्रांतरचना होत असताना काय अनुभव आले, माणसं कशी वागली, कशी जगली, त्यांच्या सोयरिकी कशा झाल्या, शिक्षणाची प्रथा आणि पद्धती कशी होती इत्यादींबाबत बरंच काही या पुस्तकांमधून दडलेलं होतं. एका ब्याण्णव वर्षांच्या शिक्षकानं ‘माझा जीवन प्रवास’ हे पुस्तक स्वत: उपस्थित राहून प्रकाशित केलं. मी त्यांच्या ताठ बांध्याकडे, स्वच्छ वाणीकडे पाहात राहिलो. कोल्हापूर संस्थानच्या अनेक आठवणी त्यांच्याकडे होत्याच. आपला सामाजिक आणि ऐतिहासिक वारसा अशा पद्धतीनं जपला जातो आहे हे पाहणं आनंदाचं होतं. पाठोपाठ परिसंवाद आणि चर्चासत्रं हा भाग साहित्य संमेलनामध्ये असतोच. तिथली चर्चा वृत्तीगांभीर्यानं झडत राहिली आणि विविध विषयांवरचे परिसंवाद रंगत राहिले. मला जे बोलायचं होतं ते मी बोललो. मराठी आणि कानडी असा काही विद्वेष नसतो हेही सांगितलं. (पण ते त्यांना मान्यच होतं.) भाषा एकमेकांना जोडते, जगायला शिकवते, तोडत नाही, समृद्ध करते, हे मी सांगितलं. (तेही त्यांना आधीच माहीत होतं!) महावीर पाटील हे गृहस्थ अनेक वर्षांपासून या साहित्य संमेलनाची धुरा सांभाळत आहेत. या मंडळींना कानडी येतं आणि मराठी तर त्यांची मातृभाषा आहेच. कर्नाटकातलं सरकार त्यांच्याकडे कोणत्या नजरेनं पाहतं आहे याबद्दल त्यांनी मला काहीही सांगितलं असलं तरी तिथं भाषिक भांडण नाही. पायाभूत सुविधांसाठी संघर्ष नाही. पंचवीस वर्ष झाली. दरवर्षी, खंड न पडू देता तिथं मराठी साहित्य संमेलन भरवलं जातं. यंदाचं रौप्यमहोत्सवी वर्ष. सगळय़ा गावानं स्वत:ला झोकून दिलेलं. सगळय़ा गावानं स्वत:ला सहभागी करून घेतलेलं.
उत्सव असला तरी मनोरंजनासाठी उत्सवी स्वरूप नाही. ज्ञानसंवर्धनासाठी सतत प्रयत्न चाललेला. त्यांना मराठीची संस्कृती टिकवायची आहे. त्यांना मराठी जिवंत ठेवायची आहे आणि तिथं ते काम अखंडपणे चालू आहे. मी पाहात राहिलो, ऐकत राहिलो. काही अंशी नवल करत राहिलो. ‘का करता हे सगळं?’ असं विचारीत राहिलो. ते हसत राहिले. त्यांच्या दृष्टीनं हे सहज, स्वाभाविक असं कार्य होतं. त्यांच्या अस्तित्वातून उगवून आलेलं कार्य होतं. कृतक आविर्भावातून केलेलं कार्य नव्हतं. तिथं मराठी सहजपणे जगते आहे. मराठीची ज्योत तिथं तेवते आहे. एका वेगळ्या प्रदेशातला हा माझा प्रवास खूप काही वेगळं देऊन गेला. गर्दी अविश्वसनीय. सहभाग अविश्वसनीय. चर्चा उच्च कोटीच्या. आणि इतकं सगळं होत असताना महाराष्ट्रानं मात्र विशेष दखल न घेणं.. हे सगळं माझ्या मनात येत राहिलं. हे आनंदाचं पर्यटन खरं तर संपलं नाहीच. ते सुरूच आहे..