scorecardresearch

Premium

कलावंतांचे आनंद पर्यटन : प्रत्यक्षाहुनि प्रतिमा सुंदर..

वेगळा निसर्ग, वेगळी लोकं, वेगळी भूमी- किंबहुना हाच खरा निसर्ग आणि याच निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी प्रवास, हे माझं एक कारण! वेगवेगळा निसर्ग आणि तिथली लोकं चित्राद्वारे अनुभवण्याचा माझा प्रयत्न असतो.

artist tourism painting
निसर्गचित्र काढताना लडाखमधील मुलांमध्ये रमलेले लेखक

‘माझा प्रवास चित्रांसाठी! रंगसाहित्य आणि मोजक्या कपडय़ांची बॅग भरून निघायचं, रिझव्‍‌र्हेशन न करता मिळेल त्या बसनं ठरलेल्या ठिकाणी जायचं. मिळेल तिथे राहायचं, मिळेल ते खायचं आणि निसर्ग न्याहाळत तो कागदावर उतरवायचा.. माझ्यातल्या चित्रकाराच्या या भटकंतीनं मला अंतर्मुख केलं आणि समृद्धही!’ सांगताहेत चित्रकार दत्तात्रय पाडेकर.

तशी प्रवासाची कारणं अनेक असतात. काही कामानिमित्त, काही हवापालटासाठी, काही खास पर्यटनासाठी.. वेगळा निसर्ग, वेगळी लोकं, वेगळी भूमी- किंबहुना हाच खरा निसर्ग आणि याच निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी प्रवास, हे माझं एक कारण! वेगवेगळा निसर्ग आणि तिथली लोकं चित्राद्वारे अनुभवण्याचा माझा प्रयत्न असतो.

Loksatta kutuhal The technology behind perfect intelligence
कुतूहल: परिपूर्ण बुद्धिमत्तेमागील तंत्रज्ञान
sun transit in aries or mesh these zodiac sign get happiness and money surya gocha
ग्रहांचा राजा सूर्य करणार मेष राशीत प्रवेश! ‘या’ राशींना मिळेल नशिबाची साथ; आयुष्यात होईल प्रगती, मिळेल भरपूर पैसा
Radical changes
गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत अमूलाग्र बदल! धातूऐवजी सिरॅमिक सांध्याचा वापर ठरेल फायद्याचा
Why do breasts itch?
स्तनांना वारंवार खाज सुटते? काय आहे त्यामागचे कारण? जाणून घ्या कशी मिळवू शकता ‘या’ त्रासातून सुटका

खरं म्हणजे माझा पिंड भटकण्याचा. भटकताना निसर्गचित्रण आणि व्यक्तिचित्रण करणं, हा माझा आवडता छंद. बालपणी उन्हाळय़ाच्या सुट्टीत, आजोबांच्या हातात हात देऊन डोंगरापलीकडे आत्याच्या घरी गेलो, तेव्हा खूपच मौज वाटली होती! डोंगर चढताना करवंदाच्या जाळय़ा, उंच वाढलेलं सुकलेलं गवत, लहानमोठे दगड, आजोबांनी शोधलेल्या खाचखळग्याच्या वाटेनं चालताना दमण्यापेक्षा पोटभर आनंदच झाला होता. कोरडे पडलेले ओहोळ, पसरलेलं पठार, टेकडय़ा, बोरी-बाभळीची वाकडीतिकडी झाडं आणि पायांत चप्पल नसताना चढून उतरलेला डोंगर. पुढे बोटा, अकलापूर, मंजंवाडी अशी अनेक छोटी छोटी गावं. तो मनात अजूनही रेंगाळणारा आठवणीतला पहिला प्रवास. पुढे कॉलेजमध्ये (सर. ज. जी. उपयोजित कला महाविद्यालय) शेवटच्या वर्षांत असताना सर्व मित्रांबरोबर ‘स्टडी टूर’ला जायचं ठरवलं. त्या वर्षी स्टडी टूर इंदोरला जाणार होती. ही सहल म्हणजे मित्रांबरोबर भटकंती आणि काम करायची संधी. ट्रेननं खांडवा, पुढे बसनं इंदोर असा प्रवास होता. इंदोर, उज्जैन महाकालेश्वर मंदिर, महेश्वर घाट, अहिल्याबाई होळकर वाडा, धार शहर, आजूबाजूचा परिसर थांबून पाहात पाहात स्केचिंग, निसर्गचित्रण करत करत प्रवासाचा आनंद घेत होतो. भरपूर निसर्गचित्रं आठ- दहा दिवसांत झाली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला स्केचिंगचं वेगळंच तंत्र सापडलं. आमचा इंदोरचा सर्व प्रवास बसनं होता. चालू बसमध्ये मी सर्व मुलांचं स्केचिंग केलं. चालू बसमध्ये स्केचिंग करताना बस ज्याप्रमाणे हलत होती किंवा धक्के बसत होते, त्याप्रमाणे पेन्सिलची रेषा करवतीप्रमाणे वक्र, वेगळीच येत होती. हे सर्व स्केचिंग फार वेगळय़ा प्रकारचं झालं.

  एका उन्हाळय़ाच्या सुट्टीत कॉलेजच्या आम्हा निवडक चार विद्यार्थ्यांना शासनातर्फे अजिंठा इथल्या चित्रांच्या प्रतिकृती करण्यासाठी पाठवलं. तेव्हा तिथे रणरणतं ऊन होतं. अजिंठा इथे पोहोचल्यावर बाहेर मोकळय़ा जागेत बसून ३ बाय ४ चा कॅनव्हास फक्त भिंतीच्या आधारावर टेकवून चित्र रेखाटताना मनात अनेक विचार येत. आम्ही आता एवढय़ा उन्हात, वाऱ्यात ८ ते १० दिवस काम करताना केवढं कठीण जातंय. त्या काळी काहीच सोयी सुविधा नसताना एवढी जागतिक दर्जाची कलानिर्मिती त्यांनी कशी केली असेल? तिथली प्रत्येक कलाकृती वेगळी आणि दर्जेदार. मूर्तीमधील डौल, लय, भाव- दगड फोडून निर्माण केलेले.. सारं थक्क करणारं होतं. पुढे त्याच कॉलेजमध्ये ‘लेक्चरर’ झाल्यानंतर विद्यार्थ्यांबरोबर बऱ्यापैकी टूरला जाणं झालं. पंढरपूर, तुळजापूर, सोलापूर फिरताना विद्यार्थ्यांबरोबर निसर्गचित्रं, स्केचिंग, ड्रॉइंग करताना खूप मजा यायची.

 पुढे पुढे निसर्गचित्रं करण्याची ओढ आणि त्यासाठी वेगवेगळय़ा ठिकाणी जाणं, हे जणू ठरूनच गेलं. कॉलेजला मे महिन्याची सुट्टी पडली, की पुरेसं रंगसाहित्य, माऊंटबोर्ड, पेपर्स असं किट आणि मोजकेच कपडे घेऊन निघत असे. जी बस मिळेल त्यानं प्रवास करायचा. फक्त ठिकाणं ठरलेली असायची. कुठेही राहायची आणि मिळेल ते खायची तयारी ठेवायची. त्या वेळी राहाणं आणि खाणं महत्त्वाचं नव्हतं, काम करणं महत्त्वाचं होतं. दिवसभर फक्त काम करायचं असल्यामुळे भरपूर काम होत असे. एकदा पुणे, सातारा, वाई, सज्जनगड, एकदा नाशिक, त्र्यंबकेश्वर, पंचवटी, पांडवलेणी, आसपासची छोटी गावं.. अशी अनेक ठिकाणं. कधी डोंगरावरून, कधी पायथ्याशी बसून, कधी देवळाच्या परिसरात बसून, कधी पठारावर, जिथे मला काही तरी सौंदर्य टिपावंसं वाटलं तिथे बसून निसर्गचित्रं केली. खेडय़ांमध्ये नेहमी मदत करणारी लोकं भेटली. तिथली लोकं जवळची, निसर्गचित्रासाठीची ठिकाणं सुचवत, जिव्हाळय़ानं वागत. गड-किल्ल्यांवरही गेलो. सामान घेऊन चढणं, चढून वरून दिसणारं दृष्य पाहून श्रमपरिहार होत असे. पावसाळय़ात आजूबाजूचे हिरवेगार डोंगर, शेतं.. चित्रं रंगवत बसलं की काळोख कधी होत असे कळत नसे. अनेकदा गडावरच मुक्काम केला.

चित्रकार मित्रांबरोबर हरिद्वार, हृषीकेश, जोशी मठ, बद्रीनाथ, केदारनाथ- खास निसर्गचित्रणासाठी गेलो. पोस्टर कलर, वॉटरकलर, पेस्टल कलर, अ‍ॅक्रॅलिक, स्केचपेन, अशा अनेक माध्यमांत काम केलं. आजूबाजूचा परिसर, छोटी गावं फिरलो. तिथे नद्या खूप आहेत. थंडगार पाणी, भरपूर थंडी, धर्मशाळेत राहणं- सारं मजेशीर होतं. जोशी मठ ते केदारनाथ पायी प्रवास. आजूबाजूला बर्फ पडलेला, भरपूर थंडी आणि पाठीवर सामानाचं ओझं. काही सामान तिथेच एका छोटय़ाशा चहाच्या टपरीत ठेवलं होतं. परतून आल्यावर पाहिलं, तर सामानाला कुणीही हात लावला नव्हता. सच्ची आणि साधी माणसं. ‘टाइम्स ऑफ इंडिया’त असताना एक महिना सुट्टी घेऊन एका मित्राबरोबर श्रीनगर, लेह, लडाख, असाच रिझव्‍‌र्हेशन न करता प्रवास केला. जम्मूपर्यंत ट्रेन, पुढे सर्व बसनं प्रवास. जो परिसर आवडला, तिथे थांबलो. निसर्गचित्रं काढली. जिथे पाणी होतं, तिथे गावं होती. इतर ठिकाणी रखरखीत. लडाखचं जीवन अतिशय कठीण. तरीही लोकं खूप आनंदी. मदत करणारी. लडाखी लोकांची वैशिष्टय़पूर्ण वेशभूषा आणि चेहरे पाहून त्यांची व्यक्तिचित्रं करावीशी वाटली. त्यांना बसण्याची विनंती केली, की ते कशाचीही अपेक्षा न ठेवता ‘मॉडेल’ म्हणून तास-दोन तास आनंदानं बसत! २० बाय ३० इंच आकाराच्या माऊंटबोर्डवर पोस्टर कलरनं मी अनेक व्यक्तिचित्रं रंगवली. त्यात वयस्कर स्त्री-पुरुष, तरुण, मुलांची व्यक्तिचित्रंसुद्धा केली. त्यांचे जाडजूड कपडे, चेहऱ्यावरचे निरागस भाव, स्त्रियांच्या गळय़ात रंगीबेरंगी मण्यांच्या माळा, विशिष्ट प्रकारची टोपी, सारं काही व्यक्तिचित्रणासाठी खूप सुंदर. कुठेही रस्त्याच्या कडेला ‘आऊटडोअर’ बसून, आजूबाजूला बघणाऱ्यांची गर्दी, त्यात व्यक्तिचित्रण करण्याची मौज काही वेगळीच!

  असंच एकदा बंगळूरुला गेलो होतो. मोठय़ा शहरांमध्ये कुठेही कशाचंही म्युझियम असेल तर ते मी आवर्जून पाहतो. तिथे विश्वेश्वरैया म्युझियम पाहण्यासाठी गेलो होतो. संग्रहालयात समोरच ‘ब्लॅक ग्रॅनाइट’मध्ये केलेला विश्वेश्वरैया यांचा अप्रतिम अर्धपुतळा आहे. हे कलात्मक शिल्प पाहून मी भारावून गेलो. ते शिल्प बंगळूरुमधील प्रसिद्ध शिल्पकार देवलकुंडा वाडिराज यांनी केल्याची माहिती मिळाली. त्यांचा पत्ता शोधून मी त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेलो. तेथे अनेक विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्टोन कार्विग’चे धडे घेत होते. पारंपरिक पद्धतीनं अप्रतिम दगडी कोरीव काम करणारे ते शेवटचे शिल्पकार असावेत. ‘म्हैसूर पॅलेस’ ही ऐतिहासिक वास्तू पाहिली. त्यात चित्र-शिल्पांचा अप्रतिम कलासंग्रह आहे. प्रसिद्ध चित्रकार एस. एल. हळदणकर यांचं ‘लेडी विथ द लॅम्प’ हे जलरंगातलं अप्रतिम चित्र इथे आहे.

२००४ मध्ये माझ्या एकल प्रदर्शनाच्या निमित्तानं इंग्लंडला जाणं झालं. तिथे दोन महिने राहिल्यामुळे ठरवून एक एक ठिकाण वेळ देऊन पाहता आलं. तिथे चित्र-शिल्पांची सर्व मोठमोठी संग्रहालयं- नॅशनल गॅलरी, नॅशनल पोट्र्रेट गॅलरी, टेट ब्रिटन गॅलरी पाहिली. अल्मा-टाडेमा, सरजट, वॉटरहाऊस, डेगास यांसारख्या अनेक जागतिक दर्जाच्या थोर चित्रकारांची ‘ओरिजनल’ चित्रं बघताना हरवून गेलो. मार्बल, ब्राँझमधली अप्रतिम शिल्पं पाहताना थक्क व्हायला होतं. सर्व चित्रं-शिल्पं कितीही वेळा पाहिली, तरी पुन्हा पुन्हा पाहावीशी वाटतात आणि प्रत्येक वेळेला त्यातून काही तरी नवीन सापडत जातं. इंपिरियल वॉर म्युझियममध्ये जॉन सिंगर सरजट या चित्रकाराची जलरंगातली बरीच चित्रं आहेत. तैलरंगातलं एक अतिशय मोठं चित्र अप्रतिम आहे. ‘गॅस’ हे चित्र सुमारे ८ बाय २० फूट लांबीचं आहे. त्यात अनेक फिगर्स आहेत.

म्युझियममध्ये पालक आपल्या मुलांना चित्र दाखवायला घेऊन येतात. मुलं शांतपणे, एकाग्रतेनं चित्रं पाहतात. तसंच शाळेतल्या मुलांना शिक्षक चित्रं दाखवायला घेऊन येतात. तिथे मुलांना चित्रांचं रसग्रहण करून चित्रं कशी बघायची ते समजावून सांगितलं जातं. कलेची जाण तिथे लहान वयापासूनच जोपासली जाते. कलावंताला आणि कलेला तिथे खूप मान, महत्त्व दिलं जातं. रॉयल अकॅडमीमध्ये तर किती तरी चित्रकारांची मोठमोठी पूर्णाकृती शिल्पं इमारतीवर लावलेली आहेत. सर्व शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी अनेक शिल्पं आणि स्मारकं उभारलेली आढळतात. सर्व शिल्पं कलात्मक आणि उच्च दर्जाची आहेत. तिथे ब्राँझमधील शिल्पांना बटबटीत रंग दिला जात नाही. त्यामुळे ती शिल्पं अधिक कलात्मक वाटतात. ते कलेचं जतन आणि संवर्धन उत्तम प्रकारे करतात हे आपल्याला जाणवतं.  रस्त्यावरून चालताना अनेक गोष्टी आपलं लक्ष वेधून घेतात. आजूबाजूचा स्वच्छ परिसर, दुकानांच्या देखण्या पाटय़ा, काचेमधून दिसणारी वस्तूंची मांडणी- त्यातून त्यांची कलेची दृष्टी जाणवते. भव्यदिव्य, पण कलात्मक वास्तू, वास्तूमध्ये किंवा आजूबाजूला कलात्मक शिल्पासाठी मुद्दाम तयार केलेली जागा, हे सर्व आपल्याला खिळवून ठेवणारं आणि कलेच्या जाणिवा प्रगल्भ करणारं आहे. २००९ मध्ये इटलीतील फ्लॉरेन्स इथे गेलो.

म्युनिकहून छोटय़ा विमानानं फ्लॉरेन्सला जाताना त्या विमानातून दिसणारं दृष्य खूपच नयनरम्य होतं. आल्पस्च्या पर्वतरांगा, त्यावर पडलेला पांढराशुभ्र बर्फ, मध्येच हिरवट रंग, घरं, नद्या, शेतं.. खूपच देखणं दृष्य होतं ते! फ्लॉरेन्स शहर शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे. शहरभर जागोजागी शिल्पकलेचे उत्तम नमुने आहेत. अनेक इमारतींवर मोठमोठी कलात्मक शिल्पं. तिथल्या ‘बारझेलो’ म्युझियममधली ब्राँझ, मार्बल, टेराकोटा, अशी विविध माध्यमातली शिल्पं अप्रतिम आहेत. ‘अ‍ॅकॅडेमिया’ गॅलरीत मायकेल एन्जेलो यांचा जगप्रसिद्ध ‘डेव्हिड’ पाहिला. मार्बलमधलं हे सुरेख शिल्प. तिथे मायकल एन्जेलो यांची मार्बलमधली पाच अपूर्ण शिल्पंही आहेत. शिल्पाची सुरुवात कशी करतात, चीझल कसं करतात, याचा आपल्याला थोडा अंदाज येतो. सांता क्रोचे चर्चचं अतिभव्य सिलिंग, प्रचंड मोठा हॉल, त्यामध्ये थोर लोकांची शिल्पं, सारं काही अभ्यासण्यासारखं आहे. तिथला जगप्रसिद्ध ‘डोमो’ पाहिला. भिंतींवर, घुमटावर एकमेकांत गुंफलेली प्रसंगचित्रं, शिल्पं, हे अतिशय कठीण काम थक्क करणारं आहे. भव्य देखणा पिटी पॅलेस, ऐसपैस भरपूर जागा, बागा, मध्ये मध्ये अनेक कलात्मक शिल्पं पाहात पाहात पॅलेसमध्ये पोहोचलो. तिथे प्रसिद्ध चित्रकारांची चित्रं, शिल्पं होती. शिवाय कोरीव काम केलेली टेबलं, खुर्च्या, घडय़ाळं, काचसामान, सारं कलात्मक वैभव पाहून आपण चक्रावून जातो.

फ्लॉरेन्समधल्या दगडी रस्त्यांवरून चालताना आजूबाजूच्या कलात्मक वास्तू, त्यातून बाहेर आलेली, कोनाडय़ात रचलेली शिल्पं, त्यावर पडलेला छाया-प्रकाश आपल्याला थबकायला लावतो. चौकांमधली शिल्पं- घोडेस्वार, योद्धे, रीलीफ वर्क, आजूबाजूची सजावट.. त्या कलाकारांच्या कल्पनाशक्तीला, कारागिरीला सलाम. तिथे मी स्केचिंग केलं. तिथे कलाकाराबद्दल खूप आदर आहे. आपल्याला निवांतपणे काम करता येतं.   २०१२ मध्ये पॅरिसला जाण्याचा योग आला. प्रत्येक चित्रकाराचं स्वप्न असतं, की पॅरिसला जाऊन ‘लुव्र’ म्युझियम पाहावं. जगातल्या सर्वात मोठय़ा संग्रहालयांपैकी एक. याच म्युझियममध्ये महान चित्रकार लिओनाडरे द विंची यांचं जगप्रसिद्ध चित्र ‘मोनालिसा’ आहे. अनेक पर्यटक केवळ ‘मोनालिसा’ चित्र पाहण्यासाठी येतात, फोटो काढतात आणि निघून जातात. त्यामुळे त्या दालनात गर्दी असली, तरी दर्दी लोकं इतर दर्जेदार कलाकृतींचा आस्वाद घेत असतात. आम्ही ‘लुव्र’ म्युझियमच्या अगदी जवळ राहात असल्यामुळे मला ते दररोज सकाळपासून बंद होईपर्यंत सतत आठ दिवस पाहता आलं. भव्यदिव्य, लांबरुंद म्युझियम, लांबच लांब रांगा, अफाट दर्जेदार चित्रं-शिल्पसंग्रह.. पाय थकतात, पण मन मात्र ताजंतवानं होतं.

  पर्यटनामुळे मला खूप काही शिकता आलं. खूप काही, अजून चांगलं काम करण्याची ऊर्जा निर्माण झाली. परदेश पर्यटनामुळे माझ्या कलेच्या जाणिवा विस्तारल्या, खूप प्रेरणा मिळाली. परदेशात कला जोपासली जाते, कलेचा आदर केला जातो. जगभरातले लोक इथे कलेचा आस्वाद घ्यायला येतात. निश्चित जागतिक दर्जाची कला इथे पाहायला मिळते. कॉलेज जीवनापासून कलेच्या अभ्यासासाठी सुरू झालेलं हे पर्यटन आजपर्यंत सुरूच आहे. त्यानं माझं कला जीवन समृद्ध केलं!

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Artist tourism painter dattatray padekar wandering of the painter nature for pictures chaturang article ysh

First published on: 07-10-2023 at 00:04 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×