‘‘आसावरी काकडे यांची कविता खोल जाणिवेची आणि चिंतनगर्भ आहे. आपल्या जाणिवा नेमक्या शब्दांत मांडण्याची हातोटी त्यांना लाभली होती, म्हणूनच मृत्यूबद्दलही त्या विलक्षण चिंतन मांडतात. जसं ‘कोण पेरतो उद्रेक, इंद्रियांच्या मातीमध्ये आणि जागता पहारा देतो कोण मनामध्ये?’ म्हणूनच त्यांच्या प्रत्येक संग्रहातून आपल्याला वेगळ्या आसावरी भेटत जातात.’’

आसावरी काकडे यांचं नुकतंच निधन झालं, त्यांना त्यांच्या मैत्रिणीने, डॉ. वृषाली किन्हाळकर यांनी वाहिलेली ही शब्दांजली…आधुनिक तंत्रज्ञानाचा अत्यंत सर्जक वापर करत आपल्या भावगर्भ शब्दांचं, आपल्या ता्त्विवक चिंतनाचं भांडार खुलं करत, नव्या-जुन्या पिढ्यांशी संवाद साधणारी आसावरी काकडे! १९९५ पासूनची माझी आणि आसावरीची मैत्री.

इतक्या वर्षांत तिला कधीही मी रागात बघितलं नाही, कधी कुणाबद्दल उणा शब्द तिने उच्चारला नाही. आणि स्वत:च्या लेखन- कर्तृत्वाबद्दल, स्वत:च्या पुरस्कारांबद्दल, मिळालेल्या सन्मानांबद्दल ती कधीही बोलली आठवत नाही. सदैव आस्थेने विचारत असायची, ‘‘नवं काय लिहीत आहेस?’’
ती होती एक नदी. शांत वाहणारी. एका काठावर तरल कविता आणि दुसर्‍या काठावर तत्त्वज्ञानाची सकारात्मकता.

अतिशय समृद्ध असं सृजनाचं हिरवंगार लेणं लेवून दोन्ही काठांना समृद्ध करत जाणारी अक्षरसरिता! कुठे अंगावर घेणारा खळखळाट नाही की कुठे जीवघेणे भोवरे नाहीत; सदैव उत्साहाने वाहणारी अशी ती एक वत्सल नदी होती. आसावरी काकडे हे नाव वाचल्याबरोबर चिंतनगर्भ कविता आठवू लागतात. साधारणत: १९९५-९६ च्या दरम्यान नांदेडला नगर परिषदेतर्फे कवी संमेलन भरलं होतं. त्यात आसावरी आली होती.

तिचा परिचय करून देताना कविवर्य रामदास फुटाणे म्हणाले होते की, मराठीतील महादेवी वर्मा असं ज्यांना आपण संबोधायला हवं, अशा आसावरी काकडे आपली कविता सादर करतील आणि नंतर आसावरीने ‘प्रार्थनेच्या उगमापाशी’ ही कविता सादर केली आणि निवेदकाचे शब्द मनोमन पटून गेले! खरोखरच आसावरीची कविता खोल जाणिवेची आणि चिंतनगर्भ आहे. आणि तिची कविता, प्रत्येक नव्या पुस्तकासोबत प्रगल्भतेची एक एक पायरी चढत गेलेली आहे.

‘आरसा’ या पहिल्याच कवितासंग्रहामध्ये आपल्या खोलवर जाणिवा नेमक्या शब्दांत मांडण्याची हातोटी आपल्याला साधलेली आहे हे तिने दाखवून दिलं होतं. पहिल्याच कवितासंग्रहामधली तिची कविता ‘मी तुला माझा अगदी माझाच असलेला आरसा दिला,तरी त्यात तुला तुझं रूप दिसेल.’याच संग्रहातील शेवटच्या कवितेतून ती विचारते,

‘शब्दात प्रकटणारी कविता नुसत्या डोळ्यांनी वाचणार्‍यांना कशी कळेल, सांग ना…’म्हणजे लेखनाच्या आरंभापासूनच ती किती खोल जाणिवेने, किती गांभीर्याने कवितेकडे पाहात होती, हे लक्षात आलं होतं.आसावरीची कविता समग्रपणे वाचल्यानंतर तिचा सदैव मृत्यूशी संवाद चालू होता, असं जाणवतं. पहिल्याच ‘आरसा’ या कवितासंग्रहात,‘पावलापावलाला जवळ असतोस,सावलीसारखा.

क्षणाक्षणाला जाणवत असतोस,श्वासासारखा.तरीही पुन्हा पुन्हा नव्यानेभेडसावतोस,माध्यान्हीच्या भुकेसारखा.’अशी मृत्यूशी मैत्रभावाने बोलणारी कविता वाचल्यानंतर मला दचकायला झालं होतं. अगदी अलीकडे प्रकाशित झालेलं तिचं पुस्तक ‘मी, माझ्या डायरीतून’ हे वाचल्यानंतर लक्षात आलं की, लग्नानंतरच्या पहिल्याच वर्षी तिच्या मेंदूमध्ये एक गाठ झाली होती आणि तेव्हापासूनच मृत्यू तिला भेडसावत होता.

जीवन आणि मृत्यूबद्दल तिचं अष्टौप्रहर चिंतन चालू असावं. उमलण्याचे, सुकण्याचे, नव्याने पुन्हा उगवण्याचे, नवा उत्साह अंगात भरून नवं काही तरी करण्याचे, सदैव आशा जागृत ठेवण्याचे म्हणजेच अप्रत्यक्षपणे जन्म-मृत्यूचे विविध संदर्भ तिच्या समग्र लेखनात जाणवत राहतात.‘घेऊन वादळी वसा
रिकामा पसा ठेवुनी जाते,अंधार दावुनी नवा,व्यथांचा दिवा लावूनी जाते, गात्रांतिल हलवुन प्राण घालुनी आण कशी उन्मळते?


का अशी लकाकून वीज उडवूनी नीज हरवुनी जाते?’ ‘आरसा’ कवितासंग्रहातील ही आणखी एक विचारगर्भ कविता. आसावरीची तत्त्वज्ञानाची बैठक पक्की होती. तुकारामांचा ‘लाहो’ शब्द तिच्या अत्यंत आवडीचा. याच नावाचा तिचा एक कवितासंग्रहदेखील आहे. त्याचबरोबर तुकारामांना तिने लिहिलेले अत्यंत सुरेख असे पत्रही आहे, त्या पत्रामधला तिचा स्वत:चा तुकारामांच्या आकलनाचा प्रवास तिने अत्यंत प्रांजळपणे आणि परखडपणे मांडलेला आहे, तुकाराम महाराजांना समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

असेच ‘योगवसिष्ठ’ या पुस्तकाबद्दल तिने लिहिलेला एक लेख मुळातून वाचण्यासारखा आहे. ती कोणतीही गोष्ट अतिशय टप्प्याटप्प्याने, व्यवस्थित समजावून सांगायची एखाद्या लेखांमधून. त्या अर्थी ती एक उत्तम शिक्षिका होती. रामायण आणि महाभारतातील दुर्लक्षित दोन गोष्टींवर तिने दोन कवितांमधून प्रकाश टाकलेला आहे. एक म्हणजे शूर्पणखा. तिच्या मनाला काय वाटत होतं याबद्दलची अत्यंत सुरेख कविता तिने लिहिलेली आहे. अशा अर्थाने शूर्पणखेचा विचार केलेला नव्हता; हे ती कविता वाचल्यानंतर लक्षात येतं.

ती कविता अशी आहे, ‘काय माझा गुन्हा रामा मला तुझा मोह झाला मन उघडे मी केले राग आला सौमित्राला. लंकापती भ्राता माझा, मीही सामान्य नव्हते. गेले असते माघारी, नाही म्हणायचे होते. पण उठला त्वेषाने कुलवंत राजपुत्र.नाक छेदून बाणाने मला केले विटंबित. काय आदर्श घातला, त्रेतायुगात भावांनी. स्त्रीला विद्रूप करणे, गिरविले पुढीलांनी.

प्रेम मागितले तरी, विद्रुपता स्त्रीच्या भाळी. प्रेम अव्हेरीले तरी, तिच्यावर हीच पाळी.’शूर्पणखा ही रावणाची बहीण, आजपर्यंत क्वचितच कोणाच्या कवितेमध्ये नायिका म्हणून आली असेल. ‘ती एक भिल्लीण’ या कवितेत महाभारतात, दुर्योधनाने लाक्षागृहाला आग लावली होती, त्या प्रसंगाचा संदर्भ आहे. पांडव आणि कुंती यांना वाचवण्यासाठी नाहक जळून खाक झालेल्या त्या निष्पाप भिल्लीणीचा आणि तिच्या पाच मुलांचा विचार आजपर्यंत कवितेत कधी आला नव्हता.

आसावरीचं हे वैशिष्ट्य आहे. ‘प्रभाते मनी’ हे तिचं पुस्तक असंच एक वेगळेपण सांगणारं. यात ‘चांगदेव पासष्टी’बद्दलचं तिचं आकलन आहे. ‘गीता आणि आपण’ यावर ती सविस्तर बोलते. तुकोबांचा आकांत प्रवास हा तर मुळातूनच वाचण्यासारखा आहे .हिंदीवरचं आसावरीचं प्रभुत्व सर्वश्रुत आहे. ‘इसीलिए शायद’ या तिच्या कवितासंग्रहातील ‘हर तुफान’ ही कविता.

हर तुफान, हमेशा खत्म नही करता हमे। कभी कभी वह पत्तों जैसे उडाकर पहुंचा देता है वहां, जहां पहुंचने के लिये, शायद हमे कई साल गुजारने पडते। या कवितेतला आशावाद किती लोभस आहे! कमी शब्दांत मोठा आशय, मोठा जीवनानुभव व्यक्त करण्याची आसावरीची हातोटी विलक्षण होती.
‘असो नसो आत शब्दाई व्हावे पालखीचे भोई प्रस्थानाची कासया घाई निमंत्रणाआधी’ असं लिहून गेलेली आसावरी, अशी कशी अचानकच निघून गेली आपल्यातून? समजत नाही.

तिच्याच शब्दांना ती का बरं जागली नाही? ‘दोन प्राणात असते फक्त त्वचेचे अंतर बाहेरचा प्राणवायू प्राण आत आल्यावर’ काय सखोल चिंतन आहे हे आयुष्याबद्दलचं!! ‘भेटे नवी राई’ या तिच्या कवितासंग्रहामध्ये ‘एक दिवस’ ही एक कविता आहे. या कवितेमध्ये शेवटी ती असं म्हणाली आहे,
‘माझ्या भोवती हात पाय नाक डोळे त्वचा आणि त्यांचे रंगीबेरंगी विभ्रम यांचं एक रिंगण.

मी शोधलेली प्रत्येक फट बुजवत प्रत्येक रिंगण मला आत आत ढकलत राहतं. पण यांचा पराभव अटळ आहे…यांच्या डोळ्यासमोर यांना ओलांडून बाहेर पडेन मी एक दिवस कोणाला कळणारही नाही…’ मृत्यूबद्दल हे किती विलक्षण वेगळं असं चिंतन आहे हे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये आयुष्याचा किती सहज स्वीकार आहे आणि मृत्यूचा सुद्धा.

बिंदिया सुब्बा या नेपाळी लेखिकेच्या ‘अथाह’ कादंबरीचा ‘अथांग’ या शीर्षकाने आसावरीने अनुवाद केलाय. ही कादंबरी मनोरुग्णालयाच्या पार्श्वभूमीवरची आहे. मन विस्कटून गेलेल्या, वास्तव जगाशी संपर्क तुटलेल्या लोकांची ही कहाणी आहे. आसावरीचा अनुवाद अत्यंत सहज आणि थेट झालेला आहे.

‘मी, माझ्या डायरीतून’ हे तिचं पुस्तक म्हणजे तिची जीवनदृष्टी आणि तिचा स्वत:शी चालणारा संघर्ष, सतत स्वत:ला तासून काढत आपल्या मर्यादांची उचित जाणीव मनात ठेवणं, हे सगळं डायरी वाचल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येतं. ‘ईशावास्यम इदम सर्वम् – एक आकलन प्रवास’ हे पुस्तक तर तिच्या वैचारिक प्रवासाचा एक अत्यंत मोठा टप्पा होता.‘स्त्री असण्याचा अर्थ’ हा तिचा एक अत्यंत उल्लेखनीय असा कवितासंग्रह.

या कवितासंग्रहामध्ये ती असं म्हणते की, ‘स्त्री असणं म्हणजे सहवेदना प्रेम तितीक्षा पुरुषही पेलू शकतो असं स्त्रीपण जशी स्त्री निभावतेय सहज पुरुषपण!’‘वाळू वरती इमले रचूनी निघून जावे श्वासांवरती कविता लिहूनी निघून जावे. रंगांचा कल्लोळ माजला चित्रामध्ये चित्रावरती सही करून निघून जावे.’‘भेटे नवी राई’ या तिच्या कवितासंग्रहामधल्या या कवितेत जसं ती म्हणाली, अगदी तसंच ती निघून गेली.

हल्ली या पाच-सहा वर्षांत तिला चित्रं काढण्याचा छंद जडला होता. सुंदर चित्रं काढायची ती. हल्ली तिने नवे नवे रंग, नवे ब्रश, नवे स्केच पेन जमवले होते आणि ‘लॅपटॉप’वर चित्रं काढण्यात ती फारच तरबेज झाली होती. अशीच ती अगदी काल चित्रावर सही करून निघून गेली आहे…
तिची चित्रं, तिच्या कविता, तिचे शब्द, तिचा विचार, तत्त्वज्ञान आणि तिची प्रत्येकाप्रति असलेली सहृदयता, प्रत्येक लिहित्या हाताला प्रेरणा देणारी आसावरीची ती हाक, ते आश्वासक शब्द आता ऐकू येणार नाहीत.

निसर्गाबाबतचं एक सजग कुतूहल, पंचमहाभूतांना समजून घेण्याचा तिचा विचार आणि जीवनाबद्दल, मृत्यूबद्दलचं तिचं चौफेर चिंतन, शब्दांवर असलेली तिची हुकूमत आणि तिचं अफाट वाचन अन् प्रत्येक वाचनानंतर तिने केलेला एक स्वतंत्र विचार, तिचं स्वत:चं एक तत्त्वज्ञान. तिच्या प्रत्येक पुस्तकांमधून आपल्याला वेगळी अशी आसावरी भेटत जाते. मराठी साहित्याला समृद्ध करून गेलेली ही कवयित्री अचानकच आपला निरोप घेऊन गेली.

कालपर्यंत निसर्गाच्या छोट्याशा हालचालीतूनही, एक जीवनविषयक विचार मांडणारी आसावरी आज एकदम मूक झाली आहे. ‘कोण पेरतो उद्रेक इंद्रियांच्या मातीमध्ये आणि जागता पहारा देतो कोण मनामध्ये? ही तिची एक महत्त्वाची कविता. माझी अत्यंत आवडती. मानवी जगण्यातील विकारांवर आणि स्खलनशीलतेवर नेमकं भाष्य करणारी. आसावरीने मुक्तछंद, गझल, अभंग, लयबद्ध अशा सगळ्या प्रकारांत कविता लिहिल्या.

अत्यंत कमी शब्दांत गहन अर्थ सांगणारी ही तिची आणखी एक कविता, मला आवडणारी, ‘घरंगळावेसे वाटले की कसे कुठूनही ओघळते पाणी…
आपण मात्र बंदिस्त देहाच्या आकारात.’या देहाच्या आकारात बंदिस्त राहण्यात तिची बहुदा तगमग होत असेल, म्हणूनच ती आता मुक्त झाली आहे देहाच्या आकारातून. पण ती आहे. तिच्या कवितांमधून, तिच्या विचारांमधून तिचं एकेक पुस्तक उघडलं की ती आपल्याला भेटत राहील.

‘धुन विलक्षण साद घालते एकसारखी अपुर्‍या श्वासांना माझ्या ती पेलत नाही. किती दूरवर धावायाचे, या गाडीला इंधन संपत आले, तरीही थांबत नाही.’ १६ मार्च २०२६ च्या रात्री, दहा वाजता तिने या कवितेत व्यक्त केलंय तसं, इंधन संपलं…! कोणती तरी अनामिक धून तिला ऐकू आली…! मात्र तिच्या अपुर्‍या श्वासांना ती पेलता आली नाही…! आणि ती विलक्षण धून ऐकत ऐकत,आसावरी अशा प्रवासाला निघून गेली; जिथून माघारी येणं शक्य नाही…