मालती भोयरेकर
एखाद्या छोट्याशा प्रसंगातून एका दिव्य स्वप्नाचा ध्यास लागला की ते स्वप्न सत्यात उतरावं म्हणून माझ्यासारखी एक सामान्य गृहिणी किती धडपड करते, त्यासाठी आतापर्यंत किती प्रयत्न करते, ते मनापासून सांगावंसं वाटलं म्हणून हा लेखनप्रपंच.

१२ एप्रिलला आशाताई भोसले यांचं निधन झालं, ही माझ्या आयुष्यातली फारच मोठी दु:खद बातमी आहे. वयाच्या सहाव्या वर्षांपासून मी अक्षरश: जिवाचा कान करून त्यांची गाणी तन्मयतेने ऐकली आहेत. सर्व रसिक श्रोत्यांप्रमाणे मीही तेव्हापासून त्यांची ‘फॅन’ आहे.

आशाताईंनी खूप जणांच्या आयुष्यात त्यांच्या सुमधुर आवाजातील गाण्यांमुळे आनंद, मन:शांती दिलेली आहे. विशेषत: जेव्हा मन खूप उदास, दु:खी असतं, तेव्हा त्याचा विसर पडण्यासाठी त्यांचं गाणं ऐकल्यावर मन खूप प्रसन्न, शांत होतं. जगण्याला ऊर्जा मिळते. मलासुद्धा वारंवार त्याचा प्रत्यय येतो. आशाताईंनी प्रत्येक प्रकारची विविध भाषांतली गाणी गाऊन सगळ्यांनाच उपकृत केलं आहे. त्याबद्दल त्यांना शतश: प्रणाम.

धाराशिवमधल्या तुळजापूर तालुक्यातलं अणदूर हे माझं माहेर. माझ्या लहानपणी ते एक छोटं मागासलेलं खेडेगाव होतं. पण आईवडिलांचा त्या काळी संगीताचा आणि तबल्याचा शिकवणी वर्ग असल्यामुळे साहजिकच आम्हा भावंडांनाही संगीताची गोडी लागली होती. मला आजही स्पष्टपणे आठवतंय, मी तेव्हा सहा वर्षांची होते. एका छोट्याशा घटनेमुळे मला एका वेगळ्याच संगीताच्या दुनियेचा ध्यास लागला. त्याचं असं झालं, तेव्हा फार कमी लोकांकडे रेडिओ होते. माझ्या एका मैत्रिणीच्या घरी मी जेव्हा रेडिओवर पहिल्यांदा आशाताईंची, ‘दिन तैसी रजनी झाली गे माये’ ही विराणी ऐकली तेव्हा तत्पूर्वी कधीच न ऐकलेल्या या स्वर्गीय आवाजानं मी भान हरपून बसले होते. तेव्हा शरीरातून आनंदाच्या लहरी जात असल्याचा विलक्षण अनुभव येत होता.

गाणे संपले, तरी त्या अद्भुत अनुभवातून मला अक्षरश: बाहेर यावंसं वाटत नव्हतं. त्या वयात त्या गाण्याचा अर्थ कळत नव्हता तरी ते गाण्याचे स्वर मनावर फार परिणाम करून गेले. आयुष्यात पहिल्यांदा कानावर पडलेल्या या प्रभावी गाण्यामुळे त्यांच्या आवाजाची मोहिनी मनावर इतकी कोरली गेली, की आमच्या घरी जेव्हा रेडिओ आणला तेव्हापासून आशाताईंचं प्रत्येक गाणं मी जिवाचा कान करून ऐकत असे आणि रात्री कधीही त्यांना वा त्यांचा फोटोही न पाहिलेल्या मला त्यांना पाहिल्याची, बोलल्याची स्वप्नं सतत पडू लागली. प्रत्यक्ष ते शक्य नव्हतं, हे कळत होतं, पण ती काल्पनिक स्वप्नं हा त्या काळात माझा वैयक्तिक आनंदाचा ठेवा होता. दिवसभर मी त्या सगळ्या कल्पनेतल्या गोष्टी आठवून हवेतच तरंगत असायचे. ‘‘मनी वसे ते स्वप्नी दिसे…’’ अशीच तेव्हा अवस्था होती.

यथावकाश शिक्षण संपल्यावर आणि लग्न झाल्यावर मी लातूरला हीच स्वप्नं बरोबर घेऊन संसारात रमले. पण मनात एकच तीव्र इच्छा होती, की काही तरी चमत्कार घडून त्यांची भेट व्हावी. तेव्हा मी भरतकामही करत असे. योगायोगाने मी एकदा साडीवर ‘कर्नाटकी कशिदा’चं भरतकाम करत असताना ‘दूरदर्शन’वर नेमकी आशाताईंची, ‘रेशमाच्या रेघांनी…’ ही लावणी लागली. तेव्हा ुविजेसारखा एक विचार मनात चमकून गेला, की त्या गाण्यातील वर्णनाप्रमाणे साडी तयार करून आशाताईंना दिली तर…? हा विचार इतका उत्साहवर्धक होता की लगेच बाजारात जाऊन कोसा सिल्कची साडी, रंगीत दोरे आणून नक्षी तयार केली. खूप मेहनत घेऊन सहा महिन्यांत ती साडी पूर्ण केली. त्यावर गाण्याच्या वर्णनाबरहुकूम लाल काळ्या धाग्यांनी ‘कर्नाटकी कशिदा’, ‘राघू मोरांची जोडी’, ‘फुलवेलाची नक्षी’ असे पूर्ण साडीच्या काठावर हातांनी भरतकाम केलं. मग त्या साडीचं छायाचित्र आणि अत्यंत तळमळीनं लिहिलेलं पत्र आशाताईंच्या पत्त्यावर पाठवलं. उषाताई, हृदयनाथजींना एका कार्यक्रमात प्रत्यक्ष भेटून दिलं. पण माझं स्वप्न काही तेव्हा पूर्ण झालं नाही. अर्थात माझ्यासारखे असे अनेक सामान्य रसिक अशी स्वप्नं पाहतच असतात. त्यांच्या पयंर्त पोहोचण्याचा प्रयत्न करतच असतात, मी स्वतःची समजूत घातली.

काही दिवसांनी आम्ही लातूरहून पुण्यात स्थायिक झालो तेव्हा भेट होण्याची शक्यता निर्माण झाली. पिंपरी चिंचवड येथे भरणार्‍या साहित्य संमेलनाला आशाताई येणार असल्याचं कळलं तेव्हा आम्ही मोठ्या आशेने त्या कार्यक्रमाला गेलो. खूप कडेकोट बंदोबस्तात त्या आल्या, जेव्हा मी त्यांना अगदी जवळून प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा मी उत्साहाने भान विसरून ‘आशाताई’ असं मोठ्यानं ओरडलेही. अशा ‘विचित्र’ प्रेक्षकांचीही त्यांना सवय असेलच. त्या खाली बघून जात होत्या. माझा धीर सुटत चालला होता. नंतर तिथल्या संयोजकाला खूप विनंती करून त्यांच्या खोलीत प्रवेश मिळवला. धडधडत्या अंत:करणाने मी त्यांना साडी देण्यासाठी जवळ जाऊन म्हणाले, ‘‘आशाताई, मी तुमच्यासाठी ही साडी तयार करून आणली आहे…’’ तेव्हा त्या वर न बघता, ‘‘कार्यक्रमानंतर…!’’ हा एकच शब्द बोलल्या. कारण त्या गाणं वाचण्यात, गुणगुणण्यात व्यग्र होत्या. परंतु तो कार्यक्रम खूपच लांबल्यामुळे उशीर झाला आणि आम्हाला तसंच घरी परतावं लागलं. मला खूप वाईट वाटलं.

त्यानंतरही ओळखीच्या व्यक्तींमार्फत केलेल्या प्रयत्नांचाही काही उपयोग झाला नाही. पण त्यांना प्रत्यक्ष अगदी जवळून पाहिलं आणि त्या एक शब्द तरी माझ्याशी बोलल्या याचं मला थोडं समाधान वाटलं. ही दोन्ही स्वप्नं पूर्ण झाली; पण साडी देण्याचं स्वप्न?

एकदा माझ्या स्वप्नात मी त्यांना ती साडी नेसून, ‘रेशमाच्या रेघांनी…’ हे गाणं गाताना पाहिलं होतं. या स्वप्नामुळे मी बेहद खूश झाले होते. प्रत्यक्ष असं घडणं शक्य नाही, अशी मला खात्री होऊ लागली होती. काही काही गोष्टींचा योगच जुळून यावा लागतो, तसं घडलंच असतं तर माझ्यासारखी भाग्यवान मीच होते. जवळजवळ तीस वर्षांपूर्वी तयार केलेली ही साडी पाहिली की ही केलेली सगळी मेहनत, आटापिटा आठवतो.

आशाताई मुळातच रसिकांशी फार सहृदयतेने वागणार्‍या होत्या. सगळ्यात मिसळणार्‍या, आपुलकीने विचारपूस करणार्‍या होत्या. म्हणून माझ्यासारख्या सामान्य व्यक्तींनाही असं धाडस करावंसं वाटत होतं. त्यांनी आपल्याला केव्हाही ऐकायला तयार ठेवलेली त्यांची गाणी ऐकण्यातच समाधान, आनंद मानायला हवा, असंच आता वाटतं. तो अमूल्य ठेवा तर कुणी आपल्यापासून कधीच हिरावून नेणार नाही.

म्हणूनच… मी त्या गेल्या तेव्हा दूरचित्रवाणीवर त्यांचं शेवटचं दर्शन घेऊन त्यांच्यासाठी खास तयार केलेल्या त्या रेशमांच्या रेघांच्या साडीकडे पाहून मनसोक्त रडले…