काही निराधार तर काही निष्कांचन आज्या. काही सुखवस्तू असूनही घरपण हरवलेल्या. अशा सगळ्या आज्यांचं घर म्हणजे ‘दिलासा.’ ज्योती पाटकर यांनी टिटवाळ्यात उभारलेला हा ‘दिलासा’ ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान फुलवत आहे. रक्ताच्या नात्यांनी दूर सारलेल्या या आजीं-आजोबांना स्वत:चं घर मिळालंय.टिटवाळा. मुंबईलगतच्या या गावात एक छानसा बालिकाश्रम आहे. त्या बालिकाश्रमाच्या अंगणात एकदा चौघीजणींनी प्रवेश केला. हळूहळू दबकत त्या आत आल्या. बालिकाश्रमाच्या प्रमुख ज्योती पाटकर बाहेर डोकावल्या तर त्या चौघींनी झाकलेल्या पदराखालून त्यांचे जेवणाचे डबे बाहेर काढले आणि अजिजीने विचारले, ‘‘ताई, आम्ही इथे सावलीत बसून हा डबा खाऊ शकतो कां?’’ नीटनेटक्या दिसणाऱ्या उतारवयाच्या त्या चौघींची त्यांना दया आली. ज्योतीताईंनी त्यांना आत घेतलं. प्यायला पाणी दिलं. चौघी समाधानाने जेवल्या. भर उन्हाच्या परत निघाल्या. निघताना म्हणाल्या, ‘थँक्स तुम्ही आम्हाला बसू दिलंत इथे. आम्ही रोज जेवायला दोन तास इथे आलो तर चालेल का?’’ आता मात्र ज्योती पाटकरांचं कुतूहल चाळवलं. त्यांनी चौघींना बोलतं केलं आणि त्यांच्याकडून जे कळलं ते धक्कादायक होतं. त्या चौघी मध्यवर्गीय कुटुंबातल्या. त्यांच्या घरातील माणसं नोकरीधंद्यासाठी सकाळी घर सोडतात ते रात्री घरी परततात. दिवसभर घरात कोणीच नाही. अशा वेळी या वृद्धांना घरात एकटं ठेवणं मुलांच्या जिवावर येतं. कधी कोणी चुकून मुख्य दरवाजाच उघडा ठेवतं तर कोणाच्या हातून गॅस अथवा नळ उघडा राहतो. त्यापेक्षा सकाळच्या प्रहरी जेवणाचा डबा त्यांच्या हातांत देऊन, घराला कुलूप घालून त्यांना दिवसभर बाहेर ठेवणं घरच्या माणसांना कमी धोक्याचं व अधिक सोयीचं वाटत असावं. हे ऐकल्यावर ज्योतीताईंच्या विचारांना चालना मिळाली. त्यांनी एक सर्वेक्षण केलं तेव्हा असे अनेक ज्येष्ठ दिवसभर बागेत, सार्वजनिक जागी किंवा देवळाच्या बाकडय़ांवर बसून वेळ काढतात व रात्री घरी परततात असं त्यांच्या लक्षात आलं. काहींना घरच्यांनी हॉटेलची जेवणाची कुपन्स देऊन त्यांच्या पोटाची सोय केलेली असते. पण त्यांच्या थकल्या शरीराला कुठे पाठ टेकावीशी वाटली तर? अशा वेळी पुरुषमंडळी बागेतल्या बाकांवर विश्रांती घेऊ शकतात. नैसर्गिक विधींसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांत जाऊ शकतात, पण अशा स्त्रियांनी काय करावं? कुठे जावं? अशा निवारा हरवलेल्या स्त्रियांना आसरा देण्याच्या हेतूने ‘दिलासा डे केअर सेंटर’ची स्थापना झाली. ज्योती पाटकर सांगतात, ‘‘हे सुरू करण्यापूर्वी मी ३० तासांचं एक काऊन्सेलिंग मॉडय़ुल तयार केलं. त्यांतून सुरवातीलाच सहा सेवाभावी स्त्रियांचा एक गट तयार झाला. समाजाचे प्रश्न कसे हाताळावे हे सांगताना मी मुद्दाम ज्येष्ठ नागरिकांवर भर दिला. मुळात निराधार ज्येष्ठ स्त्रियांसाठी काम करणाऱ्या संस्था फारशा नाहीत. म्हणूनच आम्ही हे सेंटर सुरू केलं आणि जसजशा समस्याग्रस्त स्त्रिया इथे येत गेल्या, तसतसं आमच्या कामाचं स्वरूप व्यापक होत गेलं. प्रत्यक्ष सेंटर सुरू करण्याआधी जागा शोधण्यात खूप वेळ गेला. नंतर गावापासून दूर ही जागा मिळाली. ती भाडय़ाने घेतली. इथे मातीचे अक्षरश: ढिगारे होते. ते उपसून जागा स्वच्छ केली आणि सेंटर सुरू केलं. सुरुवातीपासून सुनीता दिडे, माधवी देवांग, सीमा घैसास या सहकारी मिळाल्या. त्या इथल्या ज्येष्ठ महिलांची काळजी घेण्यापासून इस्पितळात भरती केलेल्या वृद्धांना चहा-जेवण पुरवण्यापर्यंत सर्व कामं सेवाभावी वृत्तीने करतात.हे सेंटर सुरू झालं आणि एका दयनीय अवस्थेतील वृद्धेला पोलिसांनी दाखल केलं. ही मध्यमवर्गीय कुटुंबातील स्त्री, वय वर्षे अठ्ठय़ाहत्तर? तिचा जमीनजुमला मुलाने आणि सुनेने हडप केला आणि आईचे हाल करायला सुरुवात केली. हाल कसले? अनन्वित छळच! कामावर जाईपर्यंत तिला एका खोलीत डांबून ठेवायचे. जाताना तुझा चहा तू करून घे सांगायचं. पण घरांतलं सगळं दूधच संपवून टाकायचं. तिच्यासाठी जेवण करून ठेवायचं नाही. वर तिला गॅसला हात लावू नको अशी सक्त ताकीद द्यायची. एक दिवस कडेलोट झाला. तिला शौचाला लागलं असताना तिला स्वयंपाकघरात कोंडून ठेवलं. त्या दिवशी त्यांची जी अवस्था झाली, त्यामुळे सामान्य माणूसही अस्वस्थ होईल. त्या दिवशी त्या नेसत्या वस्त्रानिशी घराबाहेर पडल्या. दिवसभर उपाशीपोटी रस्त्यावर राहिल्या. रात्री त्या पोलिसांना सापडल्या. त्यांनी त्यांना ‘दिलासा’त आणून सोडलं. तेव्हापासून त्या इथेच आहेत. अशाच एक दावडे आजी! वय पंचाहत्तर. दिसायला तरतरीत. कामसू. नवरा अकाली गेला. मुलं नाहीत. तरुण वयापासून घरोघरी राहून त्या घरकाम करीत. पण वयपरत्वे घरकाम झेपेनासं झालं. तसं कामं मिळणं बंद झालं. गाठीशी फारसा पैसाही नाही आणि हातात कामही नाही. कुणीतरी त्यांना ‘दिलासा’चा मार्ग सांगितला. त्या इथे आल्या. ‘दिलासा’मध्ये अशा निराधार, निष्कांचन स्त्रियांना काही काळापुरता निवारा दिला जातो व त्यानंतर त्यांना निराधारांसाठी असलेल्या वृद्धाश्रमात पाठवलं जातं. सध्या समाजात एक असा मोठा स्त्रियांचा वर्ग आहे, ज्यांनी सत्तर-ऐंशीच्या दशकांत एखाद्या खाजगी कंपनीत नोकरी केलेली आहे. त्या आजवर स्वतंत्र राहिलेल्या आहेत. पण त्या अविवाहित वा घटस्फोटित आहेत. त्यांना मुलं नाहीत. नातलग त्यांची जबाबदारी घेत नाहीत. अशीच एक अविवाहित आजी माया, वय वर्षे अठ्ठय़ाहत्तर! जहांगीर आर्ट गॅलरीत नोकरीला होत्या. त्या काळात खाऊनपिऊन सुखी होत्या. निवृत्तीनंतर त्यांना चारपाच लाख रुपयांचा फंड मिळाला. मधल्या काळांत वेगवेगळी आजारपणं उद्भवली आणि ही साठवलेली गंगाजळी संपली. घरभाडं थकल्याने घरमालकाने त्यांना सामानासकट घराबाहेर काढलं. निष्कांचन अवस्थेत त्या ‘दिलासा’त दाखल झाल्या. नोकरीच्या काळांतले इंदिरा गांधी वगैरेंसोबतचे फोटो त्यांच्याजवळ आहेत. अभिमानाने सगळय़ांना दाखवणे एवढीच त्यांच्या आयुष्यातली जमापुंजी उरली आहे. त्यांचं उरलेलं आयुष्य चांगलं जावं यासाठी त्यांचं आजारपण औषधोपचारांचा खर्च करावा लागणार आहेच. तो कसा करावा असा प्रश्न ज्योतीताईंपुढे आहे. ‘दिलासा’च्या कार्याची माहिती कळल्याने अनेक वेळा पोलीस अथवा इतर संस्था निराधार ज्येष्ठांना इथे पाठवतात. अशीच एक वृद्धा सध्या इस्पितळात उपचार घेत आहे. नवरा नाही. मुलं नाही. नातेवाइकांशी संबंध तोडलेत. एकटीच राहते. हळूहळू एकाकीपणामुळे नैराश्येत गेली. दिवसभर दार उघडलं गेलं नाही म्हणून शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलवलं. त्यांनी दरवाजा फोडला तर ती निपचित पडलेली आढळली. पोलिसांनी तिला ‘दिलासा’त आणलं. तिच्याकडे पैसा असूनही मृत्युपत्र न केल्याने तो अडकून पडलाय. सध्या तिचा खर्च ‘दिलासा’ करत आहे. पण पुढे तिची व्यवस्था कशी करायची हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न आहे.१८ ते ५० वयोगटातल्या पीडित महिलांसाठी तात्पुरत्या निवास व्यवस्था आहेत. (रँ१३ र३ं८ ऌेी) पण पीडित ज्येष्ठ महिलांसाठी अशी सोय नाही. कामते आजी वय वर्षे ७५. कामते आजोबांचं वय ८०. ते सतत पत्नीला शिवीगाळ करायचे. तिच्यावर संशय घ्यायचे. त्यांनी या वयांत जुन्या गोष्टी उकरून तिला घराबाहेर काढलं. कामते आजींना सर्वानी पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यांचा केविलवाणा प्रश्न, या वयांत ही असली तक्रार घेऊन मी पोलिसांत कशी जाऊ? या वयांत हातात पैसा नाही. हक्काचं छप्पर नाही. छळ असह्य़ झाल्यावर त्या ‘दिलासा’त दाखल झाल्या. अशा छळणूक होणाऱ्या वृद्धांसाठी ‘दिलासा’मध्ये एक समुपदेशन केंद्र चालवले जाते. तिथे अशा असह्य़ छळ सोसलेल्या अनेक जणी येतात. त्यांचं म्हणणं असतं, ‘मी खूप वर्षे संसारात छळ सोसलाय. आता मला नाही सहन होत. आता गाठीशी थोडाफार पैसा आहे. आता मला एकटीला राहायचंय. शांत आयुष्य जगायचंय.’’समुपदेशन केंद्राकडे काही मजेदार केसेसही येतात. मुलाचं वय ६५. आई नव्वदीची! हिंडती फिरती. मुलावर विश्वास नाही. बँकेचे व्यवहार स्वत: बघते. तिला बँक जवळ पडावी म्हणून लेकाने तिचे पैसे जवळच्या बँकेत हलवले तर मुलाने आपले पैसे खाल्ले असा आईने गावभर पुकारा केला. अनेक कारणांनी आईच मुलाला बदनाम करते. शेवटी ‘दिलासा’मधील समुपदेशन केंद्रात आई व मुलाला एकत्र बसवून सगळी वस्तुस्थिती सांगितली तेव्हा ती शांत झाली. अशीच एक स्मृतिभ्रंशाची केस पोलिसांनी ‘दिलासा’त आणली. लॅमिंग्टन रोडला राहणारी ही सुखवस्तू वृद्धा! तिला धड पत्ताही सांगता येत नव्हता. ज्योतीताईंनी हिकमतीने तिचा पत्ता शोधला. त्या पत्त्यावर मुलाशी संपर्क साधला. मुलगा, सून, नातू तिला न्यायला आले. पण तिचा एकच हट्ट! ‘‘मैं कायदे से आई हँू! मैं यही रहुंगी!’’ तिला इथलं वातावरण इतकं आवडलं की तिची एका दिवसात सगळय़ांशी गट्टी झाली. ती इतरांना सांगत होती, ‘माझं पाच खोल्यांचं घर आहे. पण माझ्याशी बोलायला तिथे कोणी नसतं. मला कंटाळा येतो.’एकूणच ‘दिलासा’तील वातावरण कुणालाही आवडावं असंच आहे. इथल्या आजी सांगतात, ‘हे आमचं घर आहे! घरी गेलो तरी कधी एकदा इथे येतो असं आम्हाला होऊन जातं. इथे धडधाकट ज्येष्ठ भगिनींना स्वयंपाक घरात हवं ते करून इतरांना देण्याची पूर्ण मुभा आहे. त्या सगळय़ाजणी मिळून गाणे गातात. भजनं म्हणतात. रजिस्टरमध्ये कुठे जातात याची नोंद करून फिरायला जातात. बाजारात जातात. सगळय़ाजणी ठरवून नाटक-सिनेमा, पिकनिकला जातात. तेराही जणी एकत्र कुटुंबासारख्या राहतात. रुसतात. भांडतात. पुन्हा गळय़ात गळे घालतात. कदाचित त्यांना दिलं गेलेल्या स्वातंत्र्यामुळे हे घराबाहेरचं घर त्यांना आपलं वाटतं! इथल्या चार आजी हिंडत्या-फिरत्या असताना अचानक वारल्या. तेव्हापासून या सगळय़ा जणी म्हणतात, ‘ही वास्तू चांगली आहे. इथे मृत्यू झटपट येतो, पण तो समाधानाचा असतो.’ संपर्क- ज्योती पाटकर, सुदामा स्मृती, हनुमान नगर, प्रगती महाविद्यालयाजवळ, डोंबिवली (पू.) पिन कोड- ४२१ २०१ दूरध्वनी-०२५१-२८८३१२४ jyoti_30@yahoo.com इ-मेल-info@parivartanmahila.org