जगणं बदलताना : बॅचलर अन् स्पिन्स्टर पार्टीचा मोह

थोडं सजावटीचं सामान, चित्रविचित्र तोकडे कपडे आणि चमकीचा फवारा उडवायची प्लास्टिकची बंदूक.

|| अपर्णा देशपांडे

शहरांत, उत्तम कमावणाऱ्या तरुणांमध्ये एखाद्याचं लग्न ठरलं की, ‘पट्ट’मित्रांना (किं वा मैत्रिणींना) ‘बॅचलर’ पार्टी देणं अपरिहार्य असल्यासारखी एक प्रथाच हल्ली पडून गेली आहे. लग्नापूर्वी फक्त के ळवण जेवलेल्या त्यांच्या पालकांना मात्र ती विचित्र वाटते. म्हणजे मुलांनी मजा करायला त्यांचीही ना नाहीये; पण ‘बॅचलर पार्टीत घडणारं काही बाहेर सांगायचं नसतं,’ हा बंद दाराआडचा प्रकार त्यांना काळजीत टाकतो. हा ट्रेंड, त्यानिमित्तानं प्रचंड पैशांचा चुराडा आणि त्यातला अल्पजीवी आनंद, या पालकांच्या गळी न उतरणाऱ्या सूत्राचा त्यांच्या दृष्टिकोनातून थोडा विचार करून पाहू या…          

मनोरंजन, मजा आणि धुंदी यांचं काही मोजमाप असतं का हो? काय केलं आणि किती पैसा ओतला म्हणजे अमुक एक मनोरंजन होतं? उन्मादाची तमुक एक नशा चढते? अशी याची परिभाषा ठरवता येते? मुळीच नाही! असं काही एकक अजून तरी बनवलं गेलेलं नाही आणि भविष्यात होणेही नाही, कारण सगळ्यांची मनोरंजनाची साधनं आणि मजेच्या व्याख्या सारख्या नसतात.

शेतात भुईमूग उपटून खाण्यातसुद्धा खूप मजा असू शकते, जी एखाद्याला पंचतारांकित मेजवानीतही कदाचित मिळणार नाही. मग प्रश्न हा निर्माण होतो की, आनंदाची परम अनुभूती मिळवताना त्याची कारणं, आपल्या मर्यादा, नीतिमत्तेची चौकट, याचं भान कोणी आणि कसं ठेवायचं? प्रवाहाबरोबर राहावं लागतं, मान्य आहे; पण प्रवाहाबरोबर वाहवून जाणं बंधनकारक नाहीये ना! असं काहीसं वाहवून जाण्याचं उदाहरण म्हणजे लग्न होण्यापूर्वीच्या मुलामुलींच्या ‘बॅचलर’ आणि ‘स्पिन्स्टर’ किंवा ‘बॅचलरेट’ पाट्र्या. रूढार्थानं गृहस्थाश्रमात प्रवेश करण्यापूर्वीच्या संक्रमणाच्या काळात अशा पाट्र्या करणं ही आज लग्नविधीसारखी आवश्यक (!) बाब झालेली आहे (अर्थात याला अपवाद आहेतच.).

आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींचं लग्न होण्याआधी त्यांच्याबरोबर निवांत वेळ घालवायला मिळावा, पुन्हा इतक्या वारंवार भेटी होऊ शकणार नाहीत म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन कौतुक करावं, वैवाहिक आयुष्यातील काही रोमांचक गोष्टींवर खुली आणि दिलखुलास चर्चा व्हावी, होऊ घातलेल्या नवरा किंवा नवऱ्या मुलीच्या हळुवार भावनांना थोडं खतपाणी घालावं आणि त्यांच्या आवडीचं जेवण द्यावं, इतका सरळ सोपा उद्देश असेल तर अशा मेजवान्यांचं स्वागतच आहे. पण बऱ्याचदा असं होतं नाही. पाश्चिमात्य संस्कृतीची नक्कल करत वरचेवर त्याचं स्वरूप काहीसं उत्छृंखल होत चाललंय. वागण्यातील मोकळेपणा आणि बीभत्सपणा यांच्यातील फरक ज्या तरुणांना समजतो, तिथे फारशी काळजी करण्याची गरज नसते. पण मुळात प्रश्न हा आहे की ‘स्टॅग नाईट’ आणि

‘हेन-डू’ नावानं फार पूर्वी परदेशात सुरू झालेल्या, काहीसा स्वैरपणा अपेक्षित असलेल्या पाट्र्यांचं आपण अनुकरण केलंच पाहिजे का? लग्न म्हणजे सुखासीन आयुष्याचा शेवट असल्यासारखं लग्नाच्या दिवसाआधी सगळी मौजमजा करून घेऊ, अशा भावनेतून अशी पार्टी ठरवण्याचा प्रघातच पडलेला दिसतो.

मुंबईत राहणाऱ्या दीपाताईंना आपल्या तरुण मुलीच्या खोलीत काही वस्तू दिसल्या. थोडं सजावटीचं सामान, चित्रविचित्र तोकडे कपडे आणि चमकीचा फवारा उडवायची प्लास्टिकची बंदूक. त्यांच्या चेहऱ्यावर काळजीची रेघ उमटली. नुकतीच एक दिवसाच्या ट्रिपवरून आलेली कन्या आपला फोन बाहेर पलंगावर ठेवून स्नानगृहात गेली होती. न राहवून त्यांनी तिचा मोबाइल हातात घेतला आणि पाहातच राहिल्या… त्यांची मुलगी आणि इतर दहा-बारा मुली यांच्या पार्टीचे फोटो होते. आणि गंमत म्हणजे सगळ्या मुली एकसारख्या गडद लाल बिकिनीमध्ये होत्या. दीपाताईंना पोहण्याच्या कपड्यांबद्दल आक्षेप नव्हता, आक्षेप होता तो त्या कपड्यांच्या डिझाइनवर आणि मुलींच्या एकूण आविर्भावावर. त्यांना ते बघून कसंतरीच झालं. पार्टी पोहण्याच्या तलावाशेजारी आयोजित केली असणार हे दिसतच होतं. बाजूलाच टेबलावर काचेचे पेलेही फोटोत चकाकत होते. दुसऱ्या एका फोटोत सगळ्या जणी अत्यंत टिचक्या कपड्यांत मॉडेलसारख्या ‘पोझ’ देऊन उभ्या होत्या. पाठीमागे भिंतीवर लिहिलं होतं- ‘एन्जॉय बीफोर इम्प्रिझनमेंट!’. एका मुलीच्या गळ्यात एक रुंद कापडी पट्टा होता, त्यावर लिहिलं होतं- ‘माय स्पिन्स्टर पार्टी’. दीपाताईंना आता अर्थबोध झाला. लेक तिच्या मैत्रिणीच्या लग्नाआधी दिल्या जाणाऱ्या पार्टीसाठी म्हणून आपल्याला सांगूनच गेली होती, हेही त्यांच्या लक्षात आलं. पण ‘स्पिन्स्टर पार्टी’ म्हणजे असं काही असेल किंवा नेमकं काय असतं, याची त्यांना आधी कल्पना आली नव्हती.

त्या तिथे उभ्या असतानाच मुलगी बाहेर आली. दीपाताईंना खूप अवघडल्यासारखं झालं, तरी त्यांनी विचारलंच, ‘रितू, तुम्ही पियूच्या पार्टीला गेला होता ना? हे असेच फोटो सोशल मीडियावर टाकले की काय?’

‘तू आधी माझा फोन देतेस का आई? फोनला पासवर्ड ठेवलेलाच बरा असतो,’ लेक शांतपणे म्हणाली. ‘हे बघ, हल्ली लग्नाआधी अशाच पाट्र्या होतात.’

‘काय गं हे? लग्न म्हणजे काय जेलमध्ये जाणं असतं का? आणि ती मैत्रीण तर तुझ्याबरोबर ऑफिसमध्येच असणार आहे ना? म्हणजे भेटी होतच राहतील की तुमच्या. लग्नाआधी मैत्रिणीला छान कौतुकाचं केळवण करावं. छानसा स्वयंपाक करावा, तिच्या सुखी आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करून तिला ओवाळावं, शक्य असेल तशी प्रेमाची भेटवस्तू द्यावी… तुम्हाला मजा करायला कारणंच हवी असतात. हवं तर बाहेर साधीशी पार्टी करावी. ते सोडून तुम्हाला हा असा नंगानाच का करावा वाटतो?’ दीपाताई भडकल्या होत्या.

‘शी! काय बोलतेस तू हे आई! तुम्हा लोकांचं एन्जॉयमेंटशी काय वाकडं आहे मला समजतच नाही. आम्ही किती स्ट्रेसफुल लाइफ जगत असतो! थोडा वेळ काय रिलॅक्स झालो, की लगेच तुम्हाला काळजीनं कापरं भरतं. काहीही चुकीचं केलेलं नाहीये आम्ही. ते ग्लासेस दिसतायत ना… कोल्ड्रिंक्सच आहेत त्यात. दारू नाही प्यायलो आम्ही! चिल आई!’

‘कुठल्याही वाईट नशेची कमान नेहमी चढती असते बाई. आणि वर वर चढतच गेलो तर विनाशाकडे वळणारी असते. त्यासाठी ती नशा दारूचीच असावी लागते असं काही नाही. आमच्या आयुष्यातसुद्धा खूप वेगवेगळ्या पातळ्यांवर संघर्ष होते, आजही आहेत. मग आम्हाला नाहीत का ‘स्ट्रेस’?’ दीपाताईंच्या बोलण्याकडे कानाडोळा करत लेक निघून गेली. जागरण झाल्यानं तिला झोपेची गरज होती. पण आजच्या मुलांचा ‘सेलिब्रेशन’च्या नावाखाली होणारा बेहिशेबी खर्च बघून दीपाताई चिंतेत पडल्या होत्या. त्या विचारात पडल्या, ‘राहाण्यावागण्यात इतकी मोकळीक आहे यांना, तरीही सगळं सिनेमातल्यासारखं करून बघण्याची हाव का? ‘मनासारखं’ वागायला मिळणं म्हणजे बेफाम होणं असतं का? त्या पार्टीच्या ठिकाणी इतर किती लोक असतील, स्टाफ असेल, इतक्या मुली अशा जमल्या असताना त्यांचं लक्ष वेधलं गेलंच असणार. हल्ली लोकांचे कॅमेरे सतत तयारच असतात हे कसं समजत नाही या मुलींना? मुळात सतत बाहेरचं खाणं होतच असताना पुन्हा अशा पद्धतीच्या सवंग उत्सवाची गरजच काय?’

सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीला असणाऱ्या ऋत्विकच्या मित्राची ‘बॅचलर पार्टी’ करून तो दुपारी घरी आल्यावर प्रशांतरावांनी त्याला अजिबात न टोकता आपला व्यवहार सुरू ठेवला. ऋत्विक स्वत:च आदल्या दिवशीच्या पार्टीबद्दल सांगू लागला. ‘बाबा, ते रीसॉर्ट मस्त आहे बरं का! आपली एक दिवसाची फॅ मिली ट्रिप छान होईल तिथे.’

‘अरे व्वा! काल मन्याची बॅचलर पार्टी झाली ना रे? कसली मजा केली असेल ना तुम्ही?’ विषय खणायला बाबांनी सुरुवात के ली.

‘सॉलिड! कसला बुडवला मन्याला! लग्न करतोय लेकाचा, मग काय!’ इति चिरंजीव.

‘त्याचं चारेक महिन्यांचं सेव्हिंग उडवलं असेल नाही? नुकताच फ्लॅट घेतलाय ना त्यानं?’

बाबांचा रोख ओळखून ऋत्विक थोडासा वरमला. म्हणाला, ‘पार्टी तर व्हायलाच हवी ना बाबा!’

‘करावी की पार्टी. त्याबद्दल काही नाही. पण मन्याची आर्थिक अवस्था सध्या नाजूक आहे ना! आणि मी ऐकलंय, की अशा पार्टीत नृत्यांगनाही बोलावतात, पोल डान्स वगैरे होतो, कधी बार डान्सर असतात, त्यांच्यावर पैसे उधळले जातात… आणखीही काय काय होतं म्हणे. खरंच असं असतं का रे?’ प्रशांतरावांनी विषय मुद्द्यावर आणला.

‘पण आम्ही काल असं काही केलं नाहीये बाबा!’

‘पण अशा एखाद्या पार्टीत तू कधी होतास का?  बघ मित्राच्या नात्यानं विचारतोय. नसेल सांगायचं तर नको सांगूस!’

थोडं घुटमळत ऋत्विक म्हणाला, ‘हो. जिनीतच्या पार्टीत आली होती एक डान्सर. सगळे तिच्याच भोवती नाचत होते. काही जणांनी पैसेही उधळले. पार अर्धमेले होऊन जागा मिळेल तिथे आडवं होईपर्यंत ढोसली. मी मात्र झोपून गेलो रात्री दोनलाच.’  त्यानं स्पष्टीकरण दिलं.

‘तुला तिच्यासोबत बेधुंद व्हावं असं नाही वाटलं?’ बाबांनी नेमका प्रश्न पुढे के ला.

‘हे काय प्रश्न विचारताय बाबा? मला नाही आवडलं ते. तुम्ही काळजी नका करू… वाहावणार नाही काही मी. आम्ही काय लहान आहोत का आता?’

‘तेच तर! लहान नाहीच आहात. संसारात कर्तेपणाची भूमिका निभावायची वेळ आलीये ना तुमची. मग कोणत्या बाबींवर कुठे थांबायचं हे समजलंच पाहिजे. धुंदी अनुभवावी जरूर, पण गर्तेत न ढकलणारी धुंदी! समृद्ध करणारी धुंदी अनुभवावी रे! तू मागे एका सॉफ्टवेअरवर काम करत होतास, रात्रंदिवस तीच कामाची नशा होती तुला. आणि तुला आवडतही होतं ते. प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर  सरळ मोठ्या पोस्टवर गेलास. ती तुझी नशा आवडली आपल्याला! त्या वेळी मी स्वत: तुझ्यासोबत एक पेग घेतला होता आठवतंय? पहिल्यांदा! आयुष्याची गाडी अगदीच ‘सो कॉल्ड’ आदर्शवादी जीवनशैलीवर, संथ चालावी, असा अट्टहास करण्याची गरज नाही. क्वचित कधी वारू वेगात धावला तर चालेल, पण लगाम आपल्या हाती असावाच! आता एक करा… मन्याचा खर्च सगळ्यांनी थोडा थोडा वाटून घ्या.’ म्हणत प्रशांतरावांनी पेपर डोळ्यासमोर धरला.

दीपाताई आणि प्रशांतराव हे नव्या विचारांच्या पालकांचं प्रतिनिधित्व करतात. मुलांनी लग्नाआधी पाट्र्यांत किंचित मोकळीक घेण्यास त्यांची हरकत नाहीये. अशा पाट्र्या म्हणजे लगेच ‘संस्कृतीचा ऱ्हास’ वगैरे सोवळेपणाचा आव आणून ते ओरडाओरडा करत नाहीयेत. पण आपल्या मुलांना ते खरंच इतकं गरजेचं वाटत आहे का? यातून खरोखरच आनंद मिळतो का? तो किती काळ टिकतो? प्रचंड रक्कम मोजून आयोजित केलेल्या अशा पाट्र्यांतून नेमकं काय साध्य होतं? आणि होत नसेल तर का होतात या पाट्र्या? फॅशन म्हणून? की इतर लोक करतात म्हणून? की मुळातच कधीतरी थोडंसं सैल वागून बघू अशी यांची आतून इच्छा असते म्हणून?  हे प्रश्न या पालकांना नक्कीच सतावतात.

गमतीनं असं म्हटलं जातं, की बॅचलर पार्टीत जे होतं ते कधीच बाहेर बोललं जात नाही. यात काही तथ्य नाही असं  जरी आपण समजून चाललो, तरी न बोलता येण्यासारखं किंवा लपवावं असं काही का केलं जातं? समाजाच्या चालीरीती, पद्धती, यात उद्याच्या चांगल्यासाठी होणाऱ्या बदलांचं स्वागतच आहे. पण मोहाच्या निसरड्या रस्त्यांवर जाण्याचा मोह टाळता  आलाच पाहिजे.

adaparnadeshpande@gmail.com  

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Author aparna deshpande jagna badalta article allure of the bachelor and spinster party akp