जगणं बदलताना : कॉर्पोरेट सूनबाई

शिक्षणानं दिलेला आत्मविश्वास, कर्तृत्वानं दिलेलं आर्थिक स्वावलंबन आणि घरच्या प्रेमळ पाठिंब्याचं कवच घेऊन यशस्वी घोडदौड करणारी… कधी अमाप कौतुकास पात्र, तर कधी टीकेची धनी.

|| अपर्णा देशपांडे

स्त्रियांनी लग्नानंतर नोकरी पूर्णत: सोडून देणं किं वा घराला सोईची अर्धवेळच नोकरी करणं, हे आता तुलनेनं कमी दिसू लागलंय. बहुतेक मध्यमवर्गीय घरांमधील सूनबाई मोठ्या ‘कॉर्पोरेट’ कं पन्यांमध्ये नोकरीला असतात. त्यांचं करिअर त्यांच्यासाठी संसाराइतकं च महत्त्वाचं असतं. अशा सूनबाईच्या व्यग्रतेकडे पाहण्याचा सासरच्या माणसांचा दृष्टिकोनही बदलतोय. नाती म्हटली की कुरबुरी होणारच, पण त्या कुरबुरीही ‘मॅनेज’ करण्याचं कसब ऑफिसच्या कामाइतकं च अनेकींना लीलया जमू लागलं आहे.   

बदल हा समाजाचा प्रवाहीपणा दर्शवतो. मग त्या बदलाचे दूरगामी परिणाम कधी चांगले, कधी वाईट असणारच. आपल्या जगण्यातील सगळ्यांत मोठा बदल जर कौटुंबिक पातळीवर बघायचा असेल, तर तो आहे कुटुंबाचं विकेंद्रीकरण. त्याची कारणं असंख्य असली तरी अनेकदा त्याचं खापर घरातील सुनांवर फोडलं जातं. मुलाचं लग्न ठरवताना मुलगी शक्यतो नोकरी करणारी, उच्चशिक्षित, सुसंस्कारित, मिळूनमिसळून वागणारी आणि ‘मॉडर्न’ हवी असते, पण अशी ‘सर्वगुणसंपन्न’ मुलगी तिचे स्वत:चे ठाम विचार आणि तिची जीवनशैली कात टाकावी तशी संपूर्ण टाकून देऊन सासरी येऊ शकत नाही, हे कु णी लक्षात घेत नाही.

 ‘मी मानसी. एक व्यवस्थापकीय अधिकारी आणि एका सुशिक्षित घरातील सून. शिक्षणानं दिलेला आत्मविश्वास, कर्तृत्वानं दिलेलं आर्थिक स्वावलंबन आणि घरच्या प्रेमळ पाठिंब्याचं कवच घेऊन यशस्वी घोडदौड करणारी… कधी अमाप कौतुकास पात्र, तर कधी टीकेची धनी. आधुनिकतेच्या रसात घोळून निघालेली, पण परंपरेची कास सोडता कामा नये, असा दबाव झेलणारी. संसार नीट सांभाळून प्रगती करायची आहे ना, मग त्यासाठी लहानमोठ्या तडजोडी मान्य करणारी. घरात ज्येष्ठ मंडळी असली की मुलांची आणि त्यांच्या संस्कारांची काळजी नसते. कधी कधी त्यावरून किंचित मतभेदही होतात, पण ते चालायचंच! घरातील मोठी मंडळी जाणूनबुजून काही त्रासदायक वागत नाहीत, मान्य. तरीही कधीकधी त्रास होतोच! आता परवाचीच गोष्ट. नवऱ्याच्या- सुमितच्या ऑफिसमध्ये मोठी समस्या निर्माण झाली होती. रात्री घरी जाऊन एकत्र जेवताना चर्चा करू आणि मार्ग काढू, असं आम्ही ठरवलं. बाकी मंडळी झोपली, पण बाबा नेहमीप्रमाणे उशिरा जेवणारे, त्या दिवशीही न ऐकता हट्टानं जेवायचे थांबले होते. एरवीही त्यांच्या उशिरा जेवण्यामुळे मला अडकून पडावं लागतं, पण त्या दिवशी त्यांच्या समोर असण्यामुळे सुमितची खूप घुसमट झाली. कसेबसे चार घास खाऊन तो मनातलं न बोलता तसाच झोपी गेला. जगण्यातील सगळेच ताण काही आई-वडिलांपर्यंत नेता येत नसतात. अशा वेळी ओझं असह्य होऊन काही वाईट घडलं तर?  या विचारांनी थरकाप होतो. कधी कुणी ऑफिसची मित्रमंडळी भेटायला आली, तर आजींना बाहेरचा टी.व्ही.वरचा कार्यक्रम सोडून आत जायचं नसतं. कारण आतल्या खोलीत आजोबा त्यांच्या आवडीचे कार्यक्रम बघत असतात. मग येणाऱ्यांना तिथे बसायला अवघडल्यासारखं होतं. मोठ्यांना त्यांच्या जुन्या सवयी मोडणं अवघड जातं हे स्वाभाविक आहे. पण असं आहे, तर मग घरात नवीन आलेल्या सुनांनी त्यांच्या २५-२६ वर्षांच्या सवयी लगेच बदलून सासरची जीवनशैली आत्मसात करावी, ही अपेक्षाही चुकीचीच ना?  मला वाचनाची प्रचंड आवड आहे. एक विशिष्ट वर्तमानपत्र आणि एक बिझनेस मासिक मी लग्नाआधी नेहमी वाचत होते. सकाळी लवकर हातात आलेला कोऱ्या पेपरचा एक वेगळाच करकरीत सुगंध असतो. लग्नानंतर सासरी आधीच दोन वेगळी वृत्तपत्रे येत असल्यानं माझं लाडकं वर्तमानपत्र बंद केलं, पण आता ऑफिसमध्ये जाण्यापूर्वी तेही वाचायला वेळ मिळत नाही  आणि मी नोकरीहून परत येईपर्यंत त्याची पानं वेगवेगळी होऊन चुरगळलेल्या अवस्थेत आजोबांच्या खोलीत पडलेली असतात. माझं मासिक नवीन पत्त्यावर मागवताना सासरे म्हणाले होते, ‘इतकं आहे ना वाचायला, मग अजून पुन्हा काही नको.’ बौद्धिक खाद्यावर गदा आलेली बघून मला फार वाईट वाटलं होतं तेव्हा. एक वर्षभर बाहेरच्या व्यावसायिक जगाशी तुटल्यासारखं वाटलं. वर्षभरानं मात्र मी कुणालाही न विचारता ते पुन्हा सुरू केलं. पाण्याचा प्रवाह आपल्या मनाप्रमाणे वळवून घेण्यासाठी तसा मार्ग बनवावा लागतोच. थोडा वेळ लागला तरी मार्ग मिळतो हे नक्की. अनुरूप भावना असल्या की कुठल्याही कृतीचा बाऊ वाटत नाही. स्वत:च्या सवयी आणि शैलीकक्षेच्या बाहेरचं जगणं नको, म्हणूनच कदाचित काही मुलींना स्वतंत्र राजाराणीचा संसार हवासा वाटत असणार, असं जाणवत राहतं मात्र.’

–  रेणू आणि रोहननं नवीन फ्लॅट घेतला आणि रोहनच्या आईवडिलांना आग्रहानं तिथे बोलावून घेतलं. रेणू-रोहननं सामंजस्यानं ठरवून टाकलं होतं, की  फ्लॅटच्या कर्जाचे पूर्ण हप्ते रेणू तिच्या पगारातून भरणार आणि बाकी खर्च रोहनच्या पगारातून होईल. नात्यात कुणी भेटलं, की रोहनची आई कौतुकानं सांगे, ‘आमच्या रोहननं बघा किती मोठा फ्लॅट घेतलाय! हप्ते फेडणं, बाकी खर्च करणं, सगळं सगळं बघतो हो तो!’ रेणू त्यांच्याबरोबर असतानाही त्यांनी कधीच तिचा उल्लेखही केला नाही, याचं तिला नेहमीच वाईट वाटे. हे मुद्दाम जाणीवपूर्वक केलं असं नाही, तर घरातील कर्ता हा ‘पुरुषच’ असतो ही मानसिकता त्याला कारणीभूत असावी.

नोकरी करणाऱ्या सुना सकाळी घाईघाईनं आपला डबा घेऊन बाहेर पडतात. आपल्या मागे घरातील बारीकसारीक कामंदेखील आपल्या सासूसासऱ्यांना थकवणारी असतात, याची त्यांना पूर्ण जाणीव असते. सगळी कामं ‘आऊटसोर्स’ करून ज्येष्ठ मंडळींनी स्वत:ला सुख लावून घ्यावं आणि पर्यायानं  सुनेलाही आराम मिळू द्यावा, अशी त्यांची इच्छा असते. कधी अचानक ऑफिसमध्ये मीटिंग ठरली की बाहेर खाणं होतं, घरचं अन्न उरतं, ज्येष्ठ मंडळींना ते आवडत नाही; पण आजच्या कॉर्पोरेट जगात क्लायंटबरोबर बाहेर जेवणं ही सामान्य बाब आहे.

– तनू ऑफिसमधून थेट गावातच वेगळ्या राहणाऱ्या सासू-सासऱ्यांकडे गेली होती. ‘मनासारखं स्वतंत्र, अडचणीला एकत्र’ या मानसिकतेवर त्यांचा विश्वास होता. आत जाताना ती दारातच थबकली. आई आणि अण्णांमध्ये पैशांवरून काही तरी वाद सुरू होता. काय झालं असणार ते चाणाक्ष तनूच्या लगेच लक्षात आलं.  जरा वेळानं ती सासूबाईंकडे गेली. ‘‘आई, आज सॅलरी जमा झालीये माझी. म्हटलं, तुम्हाला एक मस्त, भारीची साडी घ्यावी.’’ तनू म्हणाली.

‘‘छे गं, किती साड्या आहेत माझ्याकडे! आणखी नको बाई.’’

‘‘बरं, मग हे पाच हजार राहू द्या तुमच्याकडे. तुम्ही नागपूरला जाताय ना ताईंकडे, तर नातवंडांसाठी कपडे, खेळणी घेऊन द्या तिथे आणि तिथून मावशीकडेही जा. मी तिकीट काढते तुमचं.’’ सुनेनं आपल्या मनातलं ओळखलं म्हणून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.

‘‘तुझ्या सासऱ्यांनी कधीच मला हातात पैसा राहू दिला नाही गं. चार पैशांचाही लगेच हिशोब मागत असत. मुलगा कमावता होईपर्यंत सारखे त्यांच्यापुढे हात पसरावे लागले मला.’’      ‘‘इथून पुढे कधीच ही वेळ नाही येणार तुमच्यावर. मी तुमच्या नावानं दर महिन्याला पैसे जमा करीन आणि तुमच्याजवळ तुमचं कार्ड देऊन ठेवीन. मुलगी मानता ना मला, मग अजिबात संकोच करू नका.’’ तनू म्हणाली. आर्थिक परावलंबित्व स्त्रीला दुर्बल बनवतं, याची जाणीव होती तिला.

– रेवा नीरववर चिडली होती. ‘सुनेची आई तिच्या संसारात लुडबुड करते’, अशी तक्रार नीरवची आई कु णाकडे तरी फोनवर करत असताना तिनं ऐकलं होतं.  रेवा म्हणत होती, ‘‘मला जन्मापासून घरात ‘ए.सी.’ची सवय आहे, पण तुमच्याकडे अजिबात ए.सी. वापरत नाहीत. मला उकाड्याचा त्रास होतो, अंगावर पुरळ येतं. मी सहज बोलताना आईला म्हणाले, तर तिनं वाढदिवसाला ए.सी. भेट दिला. तुला त्यात काही गैर वाटलं नाही, पण तुझ्या आईचं त्यावरून बिनसलं. माझी आई लुडबुड करतेय म्हणाल्या. आता याला लुडबुड म्हणायचं का?’’

‘‘अगं, तू सरळ मोकळेपणानं माझ्या आईशी बोल ना, की तुला उष्णतेचा त्रास होतो म्हणून.’’

‘‘बोलले आहे मी. आणि काय रे, गेल्या कित्येक पिढ्या ‘मुलाच्या आई’च्या म्हणण्याला केवढा मान होता. सगळं त्यांच्याच मर्जीनं चालायचं. सासूच्या मताविरुद्ध जराही काही होत नसे. तेव्हा हा ओरडा कधी झाला नाही. मग एखादी छोटीशी गोष्ट मुलीच्या आईनं, तेही भल्यासाठी सुचवली तर लगेच ती लुडबुड? संसार मोडेल इतकी मोठी बाब नाहीये ना ही?’’

नीरवला हसूच आलं. ‘‘अगं, कुठला मुद्दा कुठे नेतेस! बरं, ठीक आहे. मी बोलतो आईशी. समजून घेईल ती. काळजी नको करू.’’ त्यानं शांतपणे विषय मिटवला. नीट विचार न करता ‘मुलीची आईच तिचा संसार मोडायला कारणीभूत असते,’ असं बेजबाबदार विधान कुणी करू नये, हे त्याचंही मत होतं.

– घरून काम करणाऱ्या प्रज्ञाला ऑफिसची एक अत्यंत महत्त्वाची मीटिंग होती. ती मीटिंगची तयारी करत असतानाच घरी पाहुणे मंडळी आली. तिचा नवरा समीरही घरातूनच काम करत होता. ‘‘प्रज्ञा, खाली येतेस का जरा? पाचच मिनिटं ये.’’ आईंनी हाक मारली. प्रज्ञाला मीटिंगमधून त्यांना उत्तरही देता आलं नाही. तिची मनात घालमेल सुरू झाली. म्हणून समीर पटकन उठून खाली गेला. पाहुण्यांनी विचारलं, ‘‘पाच मिनिटंही जमत नाही का रे तिला? तू तर आलासच ना?’’ समीरनं तिची बाजू सांभाळली. त्याला कल्पना होती, की व्यावसायिक जगात जबाबदारी स्त्री-पुरुष बघून येत नसते. मग ती स्त्री कुणाची सून असो नाही तर आई!

–  नुकतंच लग्न झालेल्या नित्याकडे एकदम आनंदाचं वातावरण होतं. ‘‘आज नवीन सूनबाईच्या हातची भाजी होऊन जाऊ देत!’’ काकांनी उत्साहात म्हटलं आणि सगळ्यांनी त्यांना दुजोरा दिला. नामवंत मॅनेजमेंट स्कू लमधून व्यवस्थापन शिकून, लठ्ठ पगाराची नोकरी करणाऱ्या नित्याला ही परिस्थिती ‘मॅनेज’ करणं जमलं. यूट्यूबवर बघून, नवऱ्याला हाताशी घेऊन तिनं भाजी केली आणि सगळ्यांच्या कौतुकाचा विषय बनली. ‘‘उत्तम स्वयंपाक करणं हे नक्कीच कौशल्याचं काम आहे आणि अशा अन्नपूर्णांचा मी आदर करतो; पण उच्च व्यावसायिक महत्त्वाकांक्षा ठेवणाऱ्या स्त्री-पुरुष मंडळींना पोट भरण्याइतपत स्वयंपाक करता आला तरी चालेल हे माझं मत आहे.’’ नित्याचे सासरे म्हणाले आणि नित्यानं कृतज्ञतेनं त्यांच्याकडे बघितलं.

आई किंवा सासूबाई यांचा काळ आणि आजचा काळ यात प्रचंड तफावत आहे. त्या वेळच्या जगण्याची भाषाच वेगळी होती. सून कमावणारी असली, तरी स्वायत्ततेचा अभाव होता. जबाबदारी आणि अपेक्षांचं कधी न उतरणारं जू होतं मानेवर. पंखांना आणि स्वप्नांना मर्यादा होत्या. आजचा काळ त्या तुलनेत सुवर्णकाळ म्हणावा असा आहे. अमाप संधी, उपलब्धता, स्वातंत्र्य, नात्यातील मोकळेपणा, सगळं काही आहे. इतकं सगळं जर अनुकूल आहे, तर प्रत्येकच घरात निरामय, निखळ आणि सगळं काही ‘परफेक्ट’ आहे का? साहजिकच उत्तर येईल- ‘नाही!’ नातं कुठलंही असो, त्यात मतभेद  हे असणारच. त्यामुळे सुनेचं सासरच्या मंडळींशी शंभर टक्के पटलंच पाहिजे, हा विचार अत्यंत आदर्शवादी होईल. मतभेद असणारच, पण घरात प्रेम, आदर, विश्वास आणि सामंजस्याचा डोह असेल, तर छोट्यामोठ्या कुरबुरीनं तो गढूळ होत नाही. दोन अगदी वेगळ्या कुटुंबांना एकत्र आणणारा साकव सकारात्मक विचारांनी सांधलेला असेल, तर या डोहातील गाळ खोल तळाशी राहील, पण त्यातील पाणी असेल स्वच्छ, निरामय!

adaparnadeshpande@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Author aparna deshpande jagna badalta article managing officer daughter in law in an educated household akp

Next Story
धनसंपदा : आर्थिक नियोजन- जाणा पैशाचे मोल
ताज्या बातम्या