|| आरती अंकलीकर-टिकेकर

‘‘घरात गाण्यासाठी पोषक वातावरण होतंच, पण गायिका म्हणून मी घडले ती माझ्या ‘पंचविशी’च्या काळातच. विशीच्याही आधीच संगीताकडे असलेला माझा कल माझ्या लक्षात आला होता. गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्या गाण्यानं भारावून जाऊन मी संगीताचं घराणं बदलण्याचा निर्णय घेतला. पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांच्याकडचं गाणंही थांबवलं. पण प्रामाणिकपणे मेहनत घेत गाणं आत्मसात करत राहिले. मला अगदी लहान वयापासून कर्तृत्वानं आणि मनानंही थोर असलेली मंडळी भेटली आणि त्यांच्या सावलीत मी घडत गेले. माझी स्वतंत्र ओळख तयार करण्याचा पाया घातला गेला ती विशीतली वर्षं मला म्हणूनच खूप महत्त्वाची वाटतात. ’’    

nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…
IPL 2024 Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs KKR: विराट-गंभीरची गळाभेट नाटक? सुनील गावसकरांच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष
career in singin
चौकट मोडताना : ‘छंद म्हणून हवा तेवढा जोपासा’
hardik pandya
रोहितचे मार्गदर्शन अजूनही महत्त्वाचे! चाहत्यांचा आदर, पण टीकेकडे लक्ष नाही; कर्णधार हार्दिकचे वक्तव्य

मी मूळची कर्नाटकातली. जन्म विजापूरचा. जन्म झाल्यानंतर वडिलांच्या नोकरीमुळे आम्ही मुंबईला आलो. माझी आई तर कानडीतून शिकलेली. मातृभाषा कन्नड आणि नातेवाईकही कन्नडभाषक. पण विजापूर हा सोलापूरला लागून असलेला जिल्हा असल्यामुळे तिथे मराठीचंही प्राबल्य होतं. मुंबईला आल्यानंतर आम्ही-       (मी आणि दोन भाऊ) मराठी माध्यमाच्या शाळेत जाऊ लागलो. घरामध्ये आध्यात्मिक वातावरण. काकडआरती, सकाळचं आणि रात्रीचं भजन सगळं कुटुंब मिळून गात असू. सगळेच गाणारे आणि सुरेल आवाजाचे. संगीताची उत्तम जाण असल्यानं गाणं भावपूर्ण व्हायचं.

 दररोज भजनं गात असल्यामुळे ते संस्कार माझ्यावर झाले. काका शास्त्रीय संगीत शिकत होते. मुंबईत माटुंग्याला विजया जोगळेकर आमच्या घराजवळच राहात होत्या. मी आठ वर्षांची असताना आई मला त्यांच्याकडे गाणं शिकण्यासाठी घेऊन गेली. पूर्वीची ‘किंग जॉर्ज मुलींची शाळा’ (आता ‘इंडियन एज्युकेशन सोसायटी’ची शाळा)  त्या शाळेमध्ये मी होते. प्राथमिक शाळेतले आगाशे सर साधनाप्रेमी, विद्याप्रेमी आणि मुलांवर बारीक लक्ष ठेवणारे उत्तम शिक्षक होते. कोणामध्ये गुणवत्ता आहे, याची उत्तम नजर त्यांच्याकडे होती. आमची संगीत नाटकं सर बसवत असत. मी आठ वर्षांची असताना त्यांनी ‘संगीत शारदा’ नाटकातील प्रवेश बसवले होते. नंतर चौथीत असताना ‘संगीत सुवर्णतुला’, ‘मानापमान’ नाटकही बसवून घेतलं. शाळेमध्ये सुरुवात झाल्यानंतर मग विजयाताई यांच्याशी माझी भेट झाली. गाणं जर उत्तम यायचं असेल तर डोळसपणे, चांगल्या गुरूकडे शिकून ते कमीत कमी शंभर वेळा म्हटलं गेलं पाहिजे, हे विजयाताईंनी मनावर बिंबवलं. पाच-दहा वेळा गाऊन पुरं पडत नाही. कसदार गाणं येण्यासाठी ते वारंवार म्हटलं गेलं पाहिजे,    हे शिकवलं.

 मी १२ वर्षांची असताना विजयाताई मला      पं. वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे घेऊन गेल्या. याचं कारण त्या वसंतराव यांच्याकडे शिकत असत. तेव्हा ‘दूरदर्शन’ सुरू झालं होतं आणि विजयाताई यांनी तिथे नोकरी सुरू केली होती. त्यामुळे मला शिकवायला त्यांना वेळ मिळेना. वसंतराव आग्रा-ग्वाल्हेर घराण्याचे होते. हा माझ्या जीवनातला एक वेगळा काळ होता. तिथे शुद्ध शास्त्रीय संगीताची तालीम मला मिळाली. ते शिस्तप्रिय होते. वक्तशीरपणा, रियाजाचं महत्त्व हे त्यांचे गुण होते. मितभाषी, पण कडक शिस्तीचे, असं त्यांचं वर्णन करता येईल. त्यांच्याकडे पाच वर्षं शिक्षण घेतल्यानंतर मी बाहेरच्या मैफली ऐकायला लागले. अनेक बैठका ऐकल्या.  वयाच्या सोळाव्या वर्षी मी किशोरीताई आमोणकर यांच्या अद्भुत गाण्यानं भारावून गेले. स्तिमित झाले. त्यांच्या आवाजाशी माझ्या आवाजाचं साधम्र्य आहे, असं वाटलं. त्यांची भावपूर्ण गायकी, सूक्ष्म स्वरसमूह या सगळ्यानं मी भारावले होते. त्यामुळे मी इच्छा प्रदर्शित करताच विजयाताईच मला त्यांच्याकडे घेऊन गेल्या. हा माझ्यासाठी वेगळ्या प्रकारच्या संघर्षाचा क्षण होता. किशोरीताईंकडे शिकायचं म्हणजे मला संगीताचं घराणं बदलून जयपूर-अत्रौली घराण्याची शैली अंगीकारायला लागणार होती. माझे तेव्हाचे गुरुजी वसंतराव हे माझ्याकडे अत्यंत विश्वासानं बघत होते. मी त्यांच्याकडे पुढची अनेक वर्षं शिकेन आणि त्यांची शिष्या म्हणून आग्रा-ग्वाल्हेर घराण्याची गायकी पुढे नेईन, असं त्यांना वाटत होतं. गुरु-शिष्याबरोबरच पिता-पुत्रीसारखंच माझं आणि वसंतरावांचं नातं होतं. त्यांच्या माझ्याकडून खूप आशा आणि अपेक्षा होत्या. पण दुसरीकडे माझी ओढ किशोरीताईंकडे होती. हा तणावच होता माझ्यावर. किशोरीताईंच्या संगीतात एक प्रकारची गूढता होती. पण त्या मला शिष्या म्हणून स्वीकारतील की नाही, हा प्रश्न होता. त्यांच्याकडे जातानासुद्धा धाकधूक होती. तिथे संगीत समीक्षक वामनराव देशपांडे होते. ताईंनी मला गायला सांगितलं, तेव्हा वामनरावांनीही माझं गाणं ऐकलं. ‘या मुलीला शिकवलंच पाहिजे,’ असं त्यांनी ताईंना सांगितलं. ताईंनी विजयाताईंसमोरच त्याला संमती दिली. संगीत हा आपल्या हृदयाचा आतला कोपरा असतो. छंद ही आपली आवडीची गोष्ट आणि ओळख असते. तो छंद जोपासत, त्याला खतपाणी घालणाऱ्या व्यक्तीबरोबरचं नातं आपुलकीचं, प्रेमाचं असतं. तो एक घट्ट धागा तयार झालेला असतो. हा धागा तोडून दुसरा धागा प्रस्थापित करणं ही अवघड गोष्ट होती. मात्र या भावनात्मक संघर्षामध्ये किशोरीताईंच्या गायकीची ओढ प्रबळ ठरली.

किशोरीताई यांच्याकडे माझा प्रवास खडतर होता. याचं कारण गायकीमध्ये पहिला आकार लावणं, साडी नेसून तंबोरा वाजवून गाणं, प्रभावी व्यक्तिमत्त्वासमोर शरण जाणं आणि स्वत:ला सिद्ध करण्याची इच्छा जिवंत ठेवणं अवघड जात होतं. आपला मेंदू, गळा आणि अस्तित्व गुरूच्या ताब्यात द्यायचं. गुरू एखादं आवर्तन घ्यायला लावतो तेव्हा सिद्ध करण्याची इच्छा प्रबळ ठेवणं आणि त्यांचं ऐकताना पुन्हा शरण जायचं, हे माझ्यासाठी अवघड होतं. गुरूनं असंच असावं. चांगला आवाज लागल्याशिवाय पुढे जायचं नाही, हा ताईंचा नियम होता. त्यामुळे मलाही आवाजाच्या लगावामध्ये, विचारप्रक्रियेमध्ये, रागमांडणीमध्ये बदल करावे लागले. ताईंचं गाणं भावपूर्ण, तरल, बुद्धिप्रधान आणि त्यासाठी अत्युत्तम गळ्याची गरज असलेलं, सगळ्या अंगाच्या सखोल अभ्यासाची गरज असलेलं, असं वैशिष्ट्यपूर्ण होतं. त्या सांगीतिक विचारांचा ‘नायगरा’ असल्यासारख्याच होत्या. त्यामुळे त्यांच्याकडे गेल्यानंतर डोळे दिपल्यामुळे स्वत:ला सिद्ध करणं कठीण वाटत होतं. आत्मविश्वासानं त्यांच्यासमोर गायला भीतीच वाटायची.

 मी ‘रुईया’ महाविद्यालयात होते आणि मला गणित घेऊन पदवी संपादन करायची होती. मात्र, वर्गाची वेळ अशी होती, की मला गाण्याचा रियाझ करायला मिळत नव्हता. गणित की गाणं, या द्वंद्वामध्ये मी गाण्याची निवड केली. सहा महिन्यांनंतर ‘पोद्दार’ महाविद्यालयामध्ये वाणिज्य शाखेसाठी प्रवेश घेतला. मी ‘सी.ए.’ म्हणजे सनदी लेखापाल व्हावं अशी आईची इच्छा होती. गाण्याचा रियाज करताना मी आईसमोर बसत असे. उत्तम शिक्षण घेतलं पाहिजे, हा तिचा अट्टहास होता. तर, वडिलांना मी गाणं शिकावं असं वाटत होतं. जे वलय आपल्या संगीताला आज आहे, त्या मानानं तेव्हा गाण्याला कमीच वलय होतं. तरीसुद्धा माझ्या घरी शास्त्रीय संगीताला महत्त्व होतं.

  किशोरीताईंकडे शिकायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्याकडे रघुनंदन (पणशीकर) शिकत होता. विजयाताईदेखील ताईंकडे शिकायला येत होत्या. त्यामुळे किशोरीताईंच्या अनेक मैफलींना मागे तानपुऱ्याला विजयाताई आणि मी साथ केली आहे. अशा तीन पिढ्यांतील कलाकारांची मैफल असायची. त्याच काळात १९८० मध्ये मला ‘नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आटर्स’ची (एनसीपीए) केसरबाई केरकर शिष्यवृत्ती मिळाली होती. त्यापूर्वी सरकारच्या संगीत शिष्यवृत्ती आणि पारितोषिकंही मिळाली होती. त्यामुळे पुढची वाटचाल निश्चित करण्यासाठी पाठबळ लाभलं. गाण्याची परीक्षा म्हणजे वर्षभरात आठ राग शिकण्याचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा. त्यामध्ये केवळ औपचारिकता राहते. तसं न करता मी गायन कलेवर लक्ष द्यावं, ही इच्छा असल्यामुळे वसंतरावांनीही मला कटाक्षानं गांधर्व महाविद्यालयाची एकही परीक्षा देऊ दिली नव्हती.

 महाविद्यालयीन काळात मला माझा जन्माचा जोडीदार उदय (टिकेकर) भेटला. माझे      सासू-सासरे दोघेही गायक होते. सासूबाई    सुमती टिकेकर जयपूर घराण्याची गायकी      कमल तांबे यांच्याकडे शिकल्या होत्या. सासरे बाळासाहेब टिकेकर यांनी काणेबुवा यांच्याकडे ग्वाल्हेर घराण्याचं शिक्षण घेतलं होतं. शेवटपर्यंत ते दोघंही गात होते. उदय त्या काळात तबलावादक होता. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये तो अभिनय करीत असे. त्यानं मला प्रोत्साहन दिलं. हे नवं प्रकरण उघडलं गेल्यामुळे तो काळ सुंदर होता. किशोरीताईंकडे शिकणं हे तर अविस्मरणीयच होतं. जाहीर कार्यक्रम होत असल्यामुळे सासूसासऱ्यांनी माझं गाणं ऐकलं होतं. मी सून होणार हे जरी त्यांना माहीत नव्हतं, तरी एक आश्वासक गायिका म्हणून त्यांना मी माहीत होते. मैत्रीण म्हणून मला नेहमीच प्रोत्साहन देण्याचं काम उदयनं केलं. अनेक स्पर्धांमध्ये त्यानं माझ्या गाण्याला तबल्याची साथ केली. अभिनयामध्ये त्याचं तबलावादन मागे पडलं. तो काळ वेगळा असल्यामुळे आमच्या मैत्रीला माझ्या घरातून विरोध होता. घरातून विरोध, उदयशी सुंदर मैत्री, किशोरीताईंकडे शिकणं, अशी सगळी भावनात्मक आंदोलनं सुरू होती. दोन वर्षं किशोरीताईंकडे तालीम झाल्यानंतर ‘बी.कॉम.’ची परीक्षा असल्यामुळे मनात पुन्हा द्वंद्व सुरू झालं. महाविद्यालय सोडून केवळ गाणं करावं, असं ताईंचं म्हणणं होतं. पण एकच वर्ष उरल्यामुळे मी शिक्षणाला प्राधान्य दिलं. पण, त्या वेळी गाणं शिकण्याला प्राधान्य द्यायला हवं होतं, असं आता मला मागे वळून पाहताना वाटतं. कारण ताईंकडे जाणं थांबवल्यानंतर दीड वर्षं मला फार मानसिक त्रास झाला. त्यांच्या अद्भुत गाण्यानं भारावून जाण्याची सवय या काळात पूर्णपणे तुटली. त्यांच्या मैफली, रेकॉड्र्स, ध्वनिफिती मात्र ऐकत असायचे. मी त्यांच्याकडे जात नसले तरी माझं संगीत शिकणं सुरूच होतं.

 मी बारावीत असताना श्रीधर फडके यांच्याशी माझी ओळख झाली होती. श्रीधरजींनी ‘दूरदर्शन’साठी कार्यक्रम केला होता, त्यामध्ये मी गायले होते. सामान्य माणसाच्याही मनाला भिडलेलं ‘मी राधिका’ घडण्याचा मोठा प्रवास आहे. वयाच्या तेविसाव्या वर्षी मी आणि उदय विवाहबद्ध झालो. ‘एनसीपीए’ची शिष्यवृत्ती मिळाली तेव्हा पु. ल. देशपांडे- म्हणजे भाईकाका तिथे संचालक होते. पुलंनी केलेल्या काही कार्यक्रमांमध्येही मला गायला मिळालं. ते, आरोळकर बुवा, पं. मल्लिकार्जुन मन्सूर शिकवायला येत असत. त्यातून मला आत्मविश्वास मिळाला. पं. जितेंद्र अभिषेकीबुवा यांनी माझं गाणं ऐकलं होतं. त्यांनी ‘मत्स्यगंधा ते महानंदा’ या कार्यक्रमातली काही नाट्यगीतं मला शिकवली. त्यांच्या कार्यक्रमात मी गात असे. ‘नाट्यदर्पण’ कार्यक्रमात मी गात असताना

डॉ. वसंतराव देशपांडे आले होते. तिथे त्यांचा नुकताच सत्कार झाला होता. माझं गाणं ऐकून खूश झालेल्या वसंतरावांनी त्यांना मिळालेला हार माझ्या गळ्यात घातला आणि आशीर्वाद दिले. मोठ्यांनी जेव्हा दाद दिली, तेव्हा अजून मेहनत करून संगीतामध्ये प्रगल्भता मिळवावी ही इच्छा प्रबळ झाली. पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांच्याकडेही मी काही काळ शिकले.

 किशोरीताईंकडे मी १९८० ते १९८२ या काळात गाणं शिकले होते. त्यांच्याकडे जाण्याचं थांबवल्यानंतर मी पुन्हा माझा आत्मविश्वास मिळवला आणि जोमानं गाणं सादर करू लागले. वयाच्या विसाव्या वर्षी अण्णांनी- म्हणजे पं. भीमसेन जोशी यांनी मला १९८३ मध्ये ‘सवाई गंधर्व संगीत महोत्सवा’त गायनाची संधी दिली होती. सवाई गंधर्व महोत्सवात इतक्या मोठ्या संख्येनं उपस्थित श्रोत्यांसमोर गाणं हा माझ्यासाठी वेगळाच अनुभव होता. अण्णांनी मला रात्री नऊची वेळ दिली होती. त्यामुळे मी त्या वेळेला अनुसरून काही राग गाण्याचं योजलं होतं. नंतर मला बारा वाजताची वेळ देण्यात आली. प्रत्यक्षात मध्यरात्री दोन वाजता स्वरमंचावर येण्याची संधी मिळाली. वेळ जसजशी पुढे गेली तसतसे मी ठरवलेले राग गाण्याची वेळ निघून गेली होती. त्या वेळी मला फार राग येत नव्हते, पण मी ‘जोगकंस’ गायले होते. त्याला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली होती. पु. ल. देशपांडेंनी नानासाहेब देशपांडे यांच्याकडे पुण्यात माझं गाणं केलं होतं. त्या गाण्याला गानहिरा हिराबाई बडोदेकर, वामनराव देशपांडे, दत्तोपंत देशपांडे असे पुण्यातील दिग्गज श्रोत्यांमध्ये होते. वसंतरावांनी मला काही राग माणिक वर्मा यांच्याकडे शिकण्याचा सल्ला दिला. पं. सी. आर. व्यास यांच्या कार्यक्रमामध्येही मी गायले. अशा मोठ्या कलाकारांकडून खूप काही शिकता आलं.

 ‘गद्धेपंचविशी’चा काळ म्हणजे स्वत:चे निर्णय घेण्याचा आणि त्याचे बरेवाईट परिणाम झेलण्याचाही. माझ्या बाबतीत असे निर्णयाचे प्रसंग बरेच आधीच आले. पण त्यांनी मला गायिका म्हणून अधिकाधिक शिकवलं. आपला संगीताकडे असलेला कल ओळखून त्यास मेहनतीनं खतपाणी घालायला हवं, याची जाणीव मला या काळात झाली, आपलेपणानं शिकवणारी मोठी माणसंही भेटत गेली. मला गायिका म्हणून उभं राहण्याचा आत्मविश्वास देणारी ही अशीच अविस्मरणीय वर्षं आहेत.

शब्दांकन – विद्याधर कुलकर्णी

vidyadhar.kulkarni@expressindia.com