scorecardresearch

Premium

कॉम्प्रमाइझ नव्हे अ‍ॅडाप्टेशन

आई-वडिलांनी केलेल्या पायाभरणीवर स्वत:ला सिद्ध करण्याची इच्छा, धमक आणि कष्ट करण्याची तयारी त्याच्याकडे होती

कॉम्प्रमाइझ नव्हे अ‍ॅडाप्टेशन

|| डॉ. गौरी गोरे

माझ्या लग्नप्रवासात नाटक-सिनेमा-मालिकांमध्ये घडतात तशा टोकाच्या गोष्टी अजून तरी घडल्या नाहीत. आम्ही लग्न करायचं ठरवलं तेव्हा मी आणि माझा होणारा नवरा अद्वैत दोघंही वेगवेगळय़ा हॉस्पिटलमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत होतो. माझ्याबरोबर शिक्षण घेणाऱ्या आणि लग्न झालेल्या मैत्रिणींचे नवरे त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये किंवा व्यवसायात स्थिरावलेले होते. त्यांचं शिक्षण संपलं की नवऱ्याच्या गावाला जाऊन प्रॅक्टिस चालू करायची हे ठरलेलं होतं. आमचं असं काही नव्हतं.    

solapur rape victim girl, rape victim girl attacks on police constable
बलात्कार खटल्यात आरोपीला जामीन; संशयावरून पीडितेने दिली हवालदाराची सुपारी
showed the horoscope and asked how to convince an angry girlfriend they made jyotish unconscious and took away all the belongings from the house in kanpur
“रागावलेल्या प्रेयसीची समजूत काढण्याचा मार्ग सांगा” कुंडली दाखवण्याच्या बहाण्याने आले अन् ज्योतिषालाच लुटून गेले
crime news
बाणेरमधील धक्कादायक घटना; बहिणीला त्रास देणाऱ्या मेहुण्याचा खून करून तरुणाची आत्महत्या
rape complaint
नागपूर : बलात्काराची तक्रार देण्याची धमकी; फेसबुकवर ‘लाईव्ह’ करून तरुणाची आत्महत्या

‘‘आपल्या वडिलांच्या खुर्चीत जाऊन  बसायचं आणि त्यांच्याबरोबर प्रॅक्टिस पुढे चालवायची हा म्हटलं तर सोपा रस्ता घेण्याऐवजी त्याच स्पेशालिटीमध्ये असलो तरी मला ज्यात रस आहे त्या ‘सुपरस्पेशालिटी’ ब्रँचमध्ये मला पुढचं शिक्षण घ्यायचं आहे,’’ हा अद्वैतचा विचार मला खूप भावला. आई-वडिलांनी केलेल्या पायाभरणीवर स्वत:ला सिद्ध करण्याची इच्छा, धमक आणि कष्ट करण्याची तयारी त्याच्याकडे होती; पण याचाच अर्थ असा होता, की लग्नानंतरची ५ ते ६ वर्ष त्याचं शिक्षण चालू राहणार होतं. (वैद्यकीय शिक्षणाबद्दल सगळय़ांना माहिती असेलच असं नाही म्हणून सांगते, ‘एमबीबीएस’ पदवीपर्यंत वय २२-२३ वर्ष होतं, पदव्युत्तर शिक्षणासाठीचं एक वर्ष सरकारी घोळामुळे वाया गेलं आणि मग ३ वर्ष ट्रेनिंग, म्हणजे वय २६-२७ वर्ष. त्यानंतर ‘सुपरस्पेशालिटी’ला प्रवेश मिळायला १ वर्ष आणि पुन्हा पुढची ३ वर्ष ट्रेनिंग, हे व्हायला वय वर्ष ३०-३१. तिशी उलटेपर्यंत शिक्षणच चालू असतं. त्यानंतर प्रॅक्टिसला सुरुवात, मग कुटुंबाची स्थिरता!) कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करणारे समवयस्क मित्रमैत्रिणी, भावंडं भारतात किंवा परदेशात

४ ते ५ वर्ष नोकरी करून गुंतवणूक, घरखरेदी, मुलं अशी ‘मार्गाला लागलेली’ होती. अर्थात आमच्यापैकी कोणावरही कुटुंबाची आर्थिक जबाबदारी नव्हती; पण ‘पोस्ट-ग्रॅज्युएशन’नंतर प्रॅक्टिस चालू केलेल्या आमच्या इतर बॅचमेट्ससारखे आम्ही लगेच ‘स्टेबल’ होणार नव्हतो. माझं पदव्युत्तर शिक्षण झाल्यावर आम्हाला एक मुलगी झाली. त्यानंतर अद्वैतचं ‘सुपरस्पेशालिटी’ ट्रेनिंग चालू झालं. आई-वडिलांचा भक्कम आधार होताच. आम्ही दोघं ज्या कुटुंबांत वाढलो ती दोन्ही कुटुंबं आर्थिक, सामाजिकदृष्टय़ा जवळपास सारखीच  होती; पण सगळय़ात महत्त्वाचं म्हणजे कौटुंबिक मूल्यं समान होती. घरातल्या स्त्रीचं स्वतंत्र अस्तित्व आणि तिचं करिअर याचं पुरुषांइतकंच महत्त्व होतं. माहेरी आणि सासरी घरातली कामं पुरुषांनी करणं याचं अप्रूप नव्हतं. बाळाची जबाबदारी दोघांची आहे यात काहीच वाद नव्हता. पण अद्वैत पोस्ट-ग्रॅज्युएट (डीएनबी-मेडिसिन) डॉक्टर असला तरी आता तो ‘आँकोलॉजी’ मध्ये (कर्करोगशास्त्र) शिक्षण घेणारा  ‘शिकाऊ डॉक्टर’ होता. म्हणजे ‘अभी वो उसकी मर्जी का मालिक नाही था’! नवरा, बाप या भूमिका तीन वर्षांसाठी दुय्यम होत्या. सकाळी ७ वाजता तो घर सोडायचा, कारण त्याचे एक बॉस सकाळी लवकर राऊंडला यायचे. दिवसभर केमोथेरपीचे पेशंट बघणं, त्यांच्या प्रोसीजर्स करणं, हे झाल्यावर तो संध्याकाळी त्याच्या दुसऱ्या बॉसच्या ‘ओपीडी’ची वाट बघत थांबायचा. हे बॉस मुंबईतले अत्यंत व्यग्र डॉक्टर होते. त्यामुळे

५ वाजताच्या ‘ओपीडी’ला ते रात्री ९ वाजता यायचे. मग ओपीडी, त्यांच्या रुग्णांची राऊंड संपून अद्वैत १ ते १:३० वाजता घरी यायचा. परत सकाळी ७ ला घरून निघायचा. माझी वैद्यकीय प्रॅक्टिससुद्धा नवीनच होती. कधी तो घरी असताना मला ‘इमर्जन्सी’साठी जावं लागायचं. सोशल सर्कल, बाहेर फिरायला जाणं, आठवडा सुट्टी, असं फारसं काही नव्हतं तेव्हा!

नवरा-बायको म्हणून फार ‘स्पेस’ आणि वेळ मिळण्याची अपेक्षासुद्धा करणं शक्य नव्हतं. दिवसभरात जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा फोन आणि मेसेज करून आम्ही संपर्कात राहायचो. कौटुंबिक समारंभ, विशेषत: मुलीला कुठे न्यायचं असेल, तर अद्वैतला जमलं तर येईल, नाही तर मी प्रॅक्टिसची वेळ जमवून जायचं हे ठरलेलं.

अशी तीन वर्ष गेली. तो डीएनबी (आँकोलॉजी) पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाला. मग या काळात आम्ही तडजोड केली का? त्या शब्दात नकारात्मक भाव असल्यानं मी म्हणेन आम्ही ‘कॉम्प्रमाइझ’ नाही केलं, तर ‘अ‍ॅडाप्टेशन’ – परिस्थितीशी जुळवून घेत पुढे गेलो.  मुलं किती? दोन मुलांमध्ये अंतर किती? हे निर्णयसुद्धा परीक्षा कधी/ एका प्रयत्नात पास होतो की नाही यावर ठरलं. दुसऱ्या क्षेत्रात काम करत असतो तर कदाचित हे निर्णय वेगळे असते आणि काही इतर गोष्टींमध्ये जुळवून घ्यावं लागलं असतं. आता दहा वर्ष आम्ही दोघं प्रॅक्टिसमध्ये आहोत. काही दिवशी फक्त काही मिनिटं एकत्र घालवतो. घरातल्या छोटय़ा गोष्टींपासून महत्त्वाच्या प्रश्नांबद्दलचं बरंच बोलणं व्हॉट्सअ‍ॅपवर होतं किंवा एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाताना फोनवरच बोलतो. संध्याकाळी एकाच क्लिनिकमध्ये शेजारी शेजारी असलो, तरी दहाच मिनिटं कॉफी प्यायला भेटतो; पण दोघंही काम थांबवून तेवढा वेळ काढतोच. आमची ही गोष्ट वैद्यकीय व्यवसायात व्यग्र अशा, तरुण आणि कुटुंबाचा विचार करणाऱ्या इतर अनेक जोडप्यांची प्रातिनिधिक कहाणी आहे. माझ्या व्यवसायाच्या निमित्तानं नवीन लग्न झालेली जोडपी भेटतात, लग्नाच्या वयाच्या मुली, ‘लिव्ह-इन रीलेशनशिप’मध्ये असलेली जोडपी भेटतात. ‘कमिटमेंट’ची भीती, संयमाचा अभाव किंवा संयम का पाळायचा असाच मूलभूत प्रश्न आणि त्यांच्या वेळापत्रकात बसलं की पुढच्या सगळय़ा गोष्टी लगेच झाल्या पाहिजेत अशी इच्छा, नव्हे अट्टहास, यामुळे आर्थिक, शैक्षणिकदृष्टय़ा अतिशय चांगल्या स्थितीत असलेली मुलं-मुलीही समाधानी नसतात, दु:खीच असतात. हल्ली एकंदरीतच माणसांमधला संघर्ष वाढला आहे. लग्न करावं की नाही? लग्न टिकवलंच पाहिजे का? त्यासाठी किती ‘तडजोड’ करायची? व्यक्तिस्वातंत्र्य मोठं, की काही वेळा आपल्या जोडीदाराचा ‘चॉइस’ मान्य करणं जास्त बरोबर? स्वाभिमान कुठे संपतो आणि अहंकाराची (इगो) सुरुवात कुठे होते? हे खूप गुंतागुंतीचे प्रश्न आहेत. प्रत्येकानं आपलं उत्तर शोधायचं.  छोटय़ातल्या छोटय़ा गोष्टींचा विचार कराच, बट डोन्ट लूज साइट ऑफ द बिग पिक्चर!

drgoregouri@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Author dr gouri gore comarticle adaptation not compromised akp

First published on: 19-02-2022 at 00:03 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×