स्वाभिमानी जीवनप्रवास

‘इतरांच्या आयुष्यापासून प्रेरणा घेत त्यावर कथा-कादंबऱ्यांची निर्मिती करणं हे काम खूप सर्जनात्मक आणि आनंददायी असतं.

डॉ. मंगला आठलेकरmangalaathlekar@gmail.com

स्वत:चंच जीवन जेव्हा लेखनसामग्री म्हणून आव्हान बनून समोर उभं राहतं, तेव्हा स्वत:बरोबरच एकूणच बाईच्या वेदनेला शब्दबद्ध करणारं साहित्य तयार होतं, हेच ‘मी’ आणि ‘ती’ला जोडणारं साहित्य लिहिणाऱ्या, ‘महाभोज’ सारखी कादंबरी लिहून स्त्रीला राजकारण काय माहीत,असं म्हणणाऱ्यांची वाचा बंद करणाऱ्या, स्त्री केवळ आई नसते, त्याहीपलीकडे तिचे जगण्यातले आनंद असू शकतात, हे ठामपणे ‘आपका बंटी’ या कादंबरीत मांडणाऱ्या, लेखनातून स्त्रीचं ताणेबाणे समर्थपणे रेखाटत ‘नई कहानी’ चळवळीच्या अध्वर्यू बनलेल्या, लोकप्रिय साहित्यिक असलेल्या आपल्या नवऱ्याची प्रतारणा सहन न होऊन त्याला घराबाहेर काढण्याची  हिंमत दाखवणाऱ्या, त्यासाठी समाजाची निर्भर्त्सना सहन करणाऱ्या, पण विलक्षण स्वाभिमानी आयुष्य जगणाऱ्या साहित्यिक मन्नू भंडारी यांचं नुकतंच निधन झालं.. एका समर्थ आयुष्याचा हा जीवनान्त अनेकींसाठी तितकाच समर्थ वारसा ठेवून जाणारा..   

‘इतरांच्या आयुष्यापासून प्रेरणा घेत त्यावर कथा-कादंबऱ्यांची निर्मिती करणं हे काम खूप सर्जनात्मक आणि आनंददायी असतं; पण स्वत:चंच जीवन जेव्हा लेखनसामग्री म्हणून आव्हान बनून समोर उभं राहतं, तेव्हा सावरणारे, सांभाळणारे, तसंच उद्ध्वस्त करून टाकणारे काही नातेसंबंध, काही संपर्क पुन्हा एकदा सारं आयुष्य नव्यानं जगायला भाग पाडतात.’

मन्नू भंडारी.

 जन्म ३ एप्रिल १९३१, भानपुरा, मध्य प्रदेश. संस्कृती, समाज, राजकारणासकट सारंच भवताल कवेत घेणाऱ्या ‘महाभोज’, ‘आपका बंटी’, ‘स्वामी’ सारख्या कादंबऱ्या आणि ‘मं हार गई’, ‘यही सच हैं’, ‘अकेली’सारख्या स्त्रीमनाचा शोध घेणाऱ्या पन्नासहून अधिक कथा लिहिणाऱ्या प्रतिभावान लेखिकेचं, मन्नू भंडारी यांचं नुकतंच, १५ नोव्हेंबर रोजी निधन झालं. त्यांचं आयुष्य म्हणजे एक स्वाभिमानी जीवनप्रवासच होता.

लहानपणापासून वादविवाद करण्याचं, बंडखोरीचं बाळकडू मिळालेल्या आणि पुरोगामी विचारांत वाढलेल्या मन्नूजींचं लेखन समाजव्यवस्थेवर कोरडे ओढणारंच असणार याचा प्रत्यय त्यांच्या साऱ्या लेखनात येतोच; पण ही बंडखोरी फक्त स्त्रियांच्या वंचनेच्या विरोधापुरती सीमित नव्हती. म्हणूनच फक्त स्त्रीवादाचा झेंडा हातात फडकावत स्त्रीवर होणारे अन्याय आपल्या लेखनात चित्रित करण्यात त्यांनी समाधान मानलं नाही. १९७७ ची आणीबाणी, झालेलं सत्तांतर आणि त्यानंतर जनता राजवटीत घडलेलं ‘बेलछी हत्याकांड’ही त्यांच्या लेखनात भेदक वास्तव बनून समोर आलं. स्त्रियांना राजकारणातलं काय कळतं, त्यांनी चूल आणि मूल यांतच समाधानी राहावं, त्यांच्या लेखनाचा परीघ त्यांच्या घरगुती अनुभवापाशीच संपतो, असं मानणाऱ्यांची वाचाच ‘महाभोज’सारखी राजकीय कादंबरी लिहून मन्नूजींनी बंद केली.

मन्नूजींनी ‘महाभोज’ कादंबरी लिहिली, त्याला चाळीस वर्षांहून अधिक काळ लोटला; पण आजही ती कादंबरी वर्तमानाशी नातं सांगते. दलितांना जाळणाऱ्या माणसाची पॅरोलवर सुटका व्हावी, त्यानं निवडणूक नुसतीच लढवावी नव्हे; तर ती बहुमतांनी जिंकावी, सत्ताधारी आणि विरोधी दोघांनाही फक्त सत्ताप्राप्तीशीच देणंघेणं असावं, त्यासाठी दोघांनीही अत्यंत नीच पातळीवरचं, बीभत्स राजकारण खेळावं, हातातल्या भगवद्गीतेला मस्तकी टेकवत आणि भिंतीवरच्या महात्मा गांधींच्या फोटोसमोर नतमस्तक होण्याचं ढोंग करत बेशरमपणाचा कळस गाठावा, हे ‘महाभोज’मधून समोर येणारं साऱ्याच राजकीय पक्षांचं चरित्र! सामान्य माणसाला मोहरा बनवून सत्ता मिळवण्याच्या या निल्र्लज्ज खेळाचं अतिशय प्रभावी चित्र ‘महाभोज’मध्ये मन्नूजींनी उभं केलं आहे. प्रतिभावान लेखकाला विषयांची मर्यादा नसते, हेच त्यांनी जीवनाच्या विविध अंगांबरोबरच राजकीय परिस्थितीवर कादंबरीतून सिद्ध केलं.

एकीकडे ‘महाभोज’सारखी राजकारणावर कोरडे ओढणारी राजकीय कादंबरी, तर दुसरीकडे अंत:करणाचा वेध घेणारी ‘आपका बंटी’सारखी घटस्फोटित आईवडिलांच्या मुलाची फरफट चित्रित करणारी कादंबरी. दोन्हीही तितक्याच समर्थ! दोन्हीही वेगवेगळ्या अर्थानं मनाला व्यथित करणाऱ्या. घटस्फोट घेऊन परत दुसरं लग्न करत आपापल्या आयुष्याला स्थर्य प्राप्त करून देण्याच्या प्रयत्नात मुलाचं आयुष्य कसं विस्कटून जातं, त्याच्या अंतर्बाह्य़ जगण्याला कसे हादरे बसत राहतात, याचं मुलांच्या मानसशास्त्रीय अंगानं केलेलं विश्लेषण, हा तर ‘आपका बंटी’ या कादंबरीचा विषय आहेच, पण अशा प्रसंगात मुलाच्या आईची मन:स्थिती कशी कुणी विचारात घेत नाही, ती दुसरं लग्न करणार म्हटल्यावर तिच्यावर स्वार्थीपणाचं, अपराधी भावनेचं ओझं कसं टाकलं जातं, हेही मन्नूजींना तितक्याच प्राधान्यानं सांगायचं होतं. ‘बंटीची मानसिक कुतरओढ आणि त्यात त्याचं पुरतं भग्न होऊन जाणं या गोष्टी फक्त बंटीसाठीच वाचकांच्या डोळ्यांत पाणी आणत असतील, तर माझं हे पत्र योग्य पत्त्यावर पोहोचलं नाही, असं मी समजेन,’ असे उद्गार जेव्हा ‘आपका बंटी’वर आलेल्या प्रतिक्रियांनंतर मन्नूजींच्या तोंडून बाहेर पडतात, तेव्हा त्याचा अर्थ त्यांना फक्त बंटीबद्दल बोलायचं नाहीये, तर बंटीच्या आईबद्दलही बोलायचं आहे. स्त्री केवळ आई नसते, त्याहीपलीकडे तिचे जगण्यातले आनंद असू शकतात, मूल झालं की तिचं व्यक्ती म्हणून आयुष्य संपुष्टात आलं असं मानणाऱ्या समाजालाही मन्नूजी यातून काही प्रश्न करू इच्छितात हे महत्त्वाचं; पण समाजव्यवस्थाच इतकी बंदिस्त, की बंटीच्या आईबद्दल- शकुनबद्दल कुणालाही कणव वाटूच शकत नाही. काही वाटत असेल तर ती फक्त घृणा! मुलाच्या भविष्याचा विचार न करता दुसऱ्या लग्नाचं सुख शोधणाऱ्या शकुनबद्दल तीव्र तिरस्कार!

स्त्रीला व्यक्ती म्हणून एक स्वतंत्र अस्तित्व आहे आणि हा विचार या प्रतिगामी समाजाच्या मनात रुजलाच पाहिजे, स्त्रीकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदललाच पाहिजे, ही मन्नूजींना लागलेली आस होती. म्हणूनच  शरतचंद्र चटोपाध्याय यांच्या ‘स्वामी’ (शरतचंद्र यांच्या ‘स्वामी’ कथेचं  त्याच नावाच्या चित्रपटाच्या पटकथेसाठी मन्नू भंडारींनी केलेलं पुनर्लेखन, जे पुढे शरतचंद्रांच्या कथेवर आधारित कादंबरी म्हणून स्वतंत्रपणे प्रसिद्ध झालं) कथेवर जो चित्रपट निघाला, त्याचा शेवट पत्नी पतीच्या पायावर डोकं टेकते, या प्रसंगानं करण्यास मन्नूजींनी तीव्र विरोध दर्शवला होता. त्यांचं त्यावरून बासूदांशी (दिग्दर्शक बासू चटर्जी) जोरदार भांडणही झालं होतं. त्या बासूदांना म्हणाल्या होत्या, ‘मिनीला घनश्यामच्या पायावर लोटांगण घालायला लावण्याची काय गरज होती? पतीपत्नीतला परस्परांविषयीचा आदर आणि प्रेमच दाखवायचं होतं, तर ती त्याच्या मिठीतही सामावून जाऊ शकत होती. जसं मी माझ्या कादंबरीत दाखवलं होतं.’ स्त्रीची जागा पुरुषाच्या पायाशी आहे, हा पुरुषाच्या मनातला अहंभाव दूर व्हायला हवा, ही धारणा आपल्या लेखनामागे असताना ‘स्वामी’ चित्रपटाचा शेवट परत त्याच अहंभावाला खतपाणी घालून व्हावा, ही गोष्ट मन्नूजींना अखेपर्यंत त्रास देत राहिली.

 समाजातील ढोंग, दुटप्पीपणा, लबाडी, संस्कृतीरक्षणाचं स्त्रीच्या डोक्यावर दिलेलं ओझं, समाजानं माजवलेलं नीतीचं अवडंबर, पुरुषाला झुकतं माप देणारे सामाजिक कायदे, या साऱ्याची मन्नूजींना असलेली चीड आणि त्याचबरोबर अशा समाजमनाची घडण समजून घेण्यासाठी आवश्यक असलेली निरीक्षणशक्ती आणि आकलनक्षमता, यामुळेच तत्कालीन ‘नयी कहानी’ या चळवळीच्या त्या अध्वर्यू बनल्या.

‘नयी कहानी’ या नावानं सुरू झालेल्या िहदी नवकथेच्या या चळवळीतलं मन्नूजींचं योगदान खूपच मोठं होतं. निर्मल वर्मा, भीष्म सहानी, राजेंद्र यादव, कमलेश्वर यांच्या बरोबरीनं मन्नूजींकडेही या चळवळीचं श्रेय जातं.      १९५० च्या दरम्यान स्वतंत्र भारतात वेगानं होऊ लागलेल्या शहरीकरण आणि औद्योगिकीकरणानं समाजात अनेक नवे प्रश्न निर्माण व्हायला लागले होते. सामाजिक अंगानं बदल होऊ घातले जात असताना नवे विचार, नवे दृष्टिकोन, नवनवे वादंग अपरिहार्य होते. स्त्री नोकरीसाठी बाहेर पडू लागली होती. घर आणि बाहेरचं जग यात तिची तडफड होऊ लागली होती. या सगळ्याला कथेच्या रूपानं व्यक्त होण्याची संधी ‘नयी कहानी’ या नवकथेच्या चळवळीनं दिली. या चळवळीची एक जनक म्हणून मन्नूजी ओळखल्या जात होत्या. अर्थात या चळवळीतला त्यांचा सहभाग केवळ इतरांना प्रोत्साहन देण्यापुरताच नव्हता, तर लंगिक नातेसंबंध,स्त्री-पुरुष समता, समाजात स्वत:चं स्वतंत्र स्थान निर्माण करण्याची आस बाळगणारी, पण त्याच वेळेस रूढी-परंपरांत पिचून गेलेली स्त्री, हे सारे विषय मन्नूजींच्या स्वत:च्या लेखनाचाही गाभा बनून राहिले.

स्वातंत्र्याचा खरा अर्थ जिला कळला आहे, सामाजिक नीतिमत्तेचं भंपक अंतरंग जिच्या लक्षात आलं आहे, पुरुषाच्या मनातली स्त्रीवरच्या स्वामित्वाची भावना जगाच्या अंतापर्यंत कदाचित तशीच राहणार आहे, हे वास्तव जिनं अवतीभवती तीन पिढय़ा बघितलं आहे आणि ‘लग्न’ या संस्थेवरचा विश्वासच उडावा अशी घोर प्रतारणा स्वत:च्या लेखक नवऱ्याकडून- राजेंद्र यादव यांच्याकडून वारंवार जिच्या वाटय़ाला आलेली आहे, अशा मन्नूजींना आयुष्यातली जमेची बाजू म्हणून प्रतिभेची साथ लाभली आणि त्यांनी स्वत:बरोबर एकूणच बाईच्या वेदनेला शब्दबद्ध केलं. सामाजिक व्यवस्थेनं दिलेली अस्वस्थता, अशांतता आणि त्यानं निर्माण केलेले अनेक बंडखोर प्रश्न कोणताही आक्रस्ताळेपणा न करता आपल्या लेखनातून त्यांनी समाजासमोर ठेवले. 

स्त्री ही खरी तर जन्मजात सशक्त, बंडखोर! परिस्थिती कितीही प्रतिकूल असो, ही आपली मुळं जमिनीत रोवून ठाम उभी राहणार! पण समाजानं तिला चहूबाजूंनी कोंडीत पकडून जेरीला आणलं. भारतीय समाजात स्त्री विवाहित असो, अविवाहित असो, विधवा असो वा परित्यक्ता असो.. तिच्या पारडय़ात बाई म्हणून जन्माला आल्याचं दु:ख असलंच पाहिजे यासाठी भारतीयच नव्हे, तर दुनियाभरचे समाज नेहमीच कटिबद्ध राहिले आणि हीच दुखरी नस मन्नूजींना आयुष्यभर छळत राहिली. त्यांच्या लेखनातून ठणकत राहिली.

त्यांच्या ‘नशा’ या कथेची नायिका विवाहित आहे. नवरा दारुडय़ा, रोज मारहाण करणारा, तिच्या श्रमांवर जगणारा आणि तरीही त्याला सोडायला काही ती तयार नाही. त्याला खाऊपिऊ घालण्याची, त्याला सांभाळण्याची जणू नशा तिला चढली आहे. ‘अकेली’ कथेतली नायिका परित्यक्ता आहे. नवऱ्यानं आपल्याला टाकलं आहे, तो दुसरं लग्न करतो आहे, अशा परिस्थितीत त्याच्या लग्नाचं निमंत्रण आलं, म्हणजे अजून त्याच्या मनात आपल्यासाठी कुठे तरी जागा आहे की काय, या भावनेनं ती फुलून गेली आहे. ‘दीवार, बच्चे और बारिश’मध्ये स्वतंत्र वृत्तीनं जगू पाहणाऱ्या, आईबापाच्या रागाकडे आणि पाहणाऱ्यांच्या डोळ्यातल्या तिरस्काराकडे बेशक कानाडोळा करून स्वत:ला हवं तसंच वागणाऱ्या मुलीच्या निमित्तानं तिची झाडाझडती घेण्यासाठी इतर बायकांची पंचायत जमते आहे. काही तरी सनसनाटी माहिती मिळावी म्हणून आतुरलेल्या या बायका दुसऱ्याच्या घरातल्या भानगडीमध्ये स्वत:ची दु:खं विसरून गेल्या आहेत.

कसल्या मुशीतून घडल्या असतील या भारतीय स्त्रिया! त्याग, सेवा, सर्वस्वाचं बलिदान, स्वत:चं पूर्णत: समर्पण.. या संस्कारांनी किती खोलवर मूळ धरलं आहे स्त्रियांत! मन्नूजींची कथा स्त्रीच्या या विविध रूपांचा शोध घेते. समाजानं प्रस्थापित केलेले नीतिनियम स्त्रीच्या एकूणच मानसिकतेवर प्रचंड दबाव आणतात. स्त्रीनं विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडायचं नाही, पुरुष मात्र लग्नाची बायको घरात ठेवून बाहेर हवे तेवढे संबंध प्रस्थापित करू शकतो. स्त्रीला एकाच वेळी दोन पुरुषांचं आकर्षण वाटता कामा नये, पुरुषाला मात्र एकाच वेळी अनेक स्त्रिया आवडणं हे त्याच्या नर असण्याचं नसíगक अंग, ज्याचा गर्वही तो मिरवतो! पुरुषानं करिअरसाठी पंख पसरून दूर झेप घ्यावी, स्त्रीनं मात्र घर सांभाळून मग फावल्या वेळेत जमेल ते करावं. भाषिक आविष्काराबाबतही पुरुषाला हे भलं मोठं स्वातंत्र्य! स्त्रीनं मात्र बोलताना मर्यादेचा भंग होईल असे शब्द उच्चारता कामा नयेत. स्त्री म्हणून मन्नूजी हे अवतीभवती पाहात होत्याच, शिवाय त्यांचा स्वत:चा अनुभवही काही याहून फारसा वेगळा नव्हता.

‘यही सच हैं’ या कथेत एका तरुणीच्या मनात दोन पुरुषांविषयी निर्माण झालेलं आकर्षण आणि अत्यंत तरलपणे दैनंदिनीच्या आकृतीबंधात केलेली त्याची मांडणी असो वा ‘विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडल्यास कोणताही पुरुष आपलं घर मोडत नाही की आपल्या पत्नीला सोडत नाही, पुरुष वाढतच जातात, संपन्न होतात. आयुष्य उद्ध्वस्त होतं ते त्याच्या प्रेमात पडलेल्या स्त्रीचं. मग ती पत्नी असो वा पत्नीच्या बरोबरीनं बाळगलेली प्रेयसी असो.’ या शब्दांत ‘स्त्रीसुबोधिनी’मध्ये विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडणाऱ्या स्त्रीची नायिकेनं केलेली कानउघडणी असो.. मन्नूजींच्या साऱ्याच कथांत त्यांच्या आतला ‘मी’ बाहेरच्या अनेक ‘मीं’शी एकरूप होताना दिसतो. मन्नूजींच्या शब्दांत सांगायचं झालं, तर ‘हे सगळे बाहेरचे ‘मी’, आतल्या ‘मी’शी अखंडपणे काही ना काही नातं जोडत राहतात आणि आतल्या ‘मी’चं ओझं माझ्या निर्मितीक्षमतेला आव्हान देत अखेरीस एका नव्या निर्मितीला जन्म देतं.’

मन्नूजींचं लेखन त्यांच्या अंतर्वश्विाशी असं निगडित होतं. म्हणूनच त्यांच्या ‘एक कहानी यह भी’ या आत्मचरित्रात लागलेला आत्मस्वर त्यांच्या सगळ्या लेखनावर स्वच्छ प्रकाश टाकतो. वयाच्या सोळाव्या वर्षीच जी मन्नू कॉलेज व्यवस्थापनाच्या विरोधात कॉलेजसमोरच्या चौकात साऱ्या मुलींना एकत्र बोलावून सभा घेते, भाषणं करते, बंडाचा झेंडा हातात  घेते, नव्या विचारांच्या चळवळींशी जिची नाळ जणू जन्मत:च जुळलेली आहे, ती आपल्या पुढच्या आयुष्यात अन्याय-अपमान सहन करत मुकाटय़ानं जगेल हे संभवतच नाही. राजेंद्र यादव यांच्यासारख्या नवविचारांच्या साहित्यिकाशी तिचं लग्न झालं खरं, पण आपला नवरासुद्धा पत्नीचा अपवाद करूनच स्त्रीमुक्तीच्या गर्जना करतो आहे, हे तिच्या लक्षात आलं. तिच्या स्वतंत्र विचारांना अधिक मोकळीक मिळण्याऐवजी त्याला लगामच घातला गेल्याचा धक्कादायक अनुभव तिला आला आणि तिच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ झाली.

लेखक म्हणून ‘घर आपली घुसमट करतं’ म्हणत घराबाहेर स्वच्छंदी जीवन जगणाऱ्या, आपल्या विवाहबाह्य़ संबंधांबाबत मन्नू यांना अंधारात ठेवणाऱ्या आणि ‘पुरुष’ म्हणून हवं तेव्हा घरी येत घरातल्या साऱ्या सुखसुविधांचा फायदा घेणं हा आपला हक्क समजणाऱ्या राजेंद्र यादवांना सुरुवातीला ‘‘राजेंद्रजी, तुम्ही तुमच्यासाठी एक महिन्याच्या आत दुसऱ्या घराची सोय करा, कारण यापुढे आपल्याला एकत्र राहणं अशक्य आहे. बरं होईल.. आपण वेगळे राहिलो, तर तुम्हीही स्वतंत्र व्हाल आणि मलाही ताणरहित आयुष्य जगता येईल.’’ अशा संयमी शब्दांत आणि नंतर ‘‘आता पहिल्यासारखं या घरात येण्याचा प्रयत्नही करू नका. वारंवार चालणारा हा तुमचा तमाशा मला आता असह्य़ झाला आहे. लवकरात लवकर घर शोधा आणि या घरातून निघून जा,’’ असं म्हणत त्यांनी अखेरीस त्यांना घराबाहेरचा रस्ता दाखवला. पुरुष आपल्या बायकोला घराबाहेर घालवू शकतो, पण भारतीय समाजात स्त्री आपल्या हिमतीवर पुरुषाला घरातून बाहेर काढू शकते, हा त्याच्या पुरुष असण्याचा केवढा तरी अपमान! त्याची शिक्षा म्हणून मन्नूजींच्या वाटय़ाला समाजाची निर्भर्त्सना आलीच. आयुष्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या आणि अभिन्न घटनांना आत्मकथेत जागा असलीच पाहिजे, असं म्हणत कोणाचाही मुलाहिजा न बाळगता आपल्या प्रतिभावंत लेखक नवऱ्याचं दुटप्पी जगणं वाचकांसमोर ठेवणाऱ्या, आपल्या विचारांना कृतीची जोड देणाऱ्या, आपल्या तात्त्विक भूमिकांशी सदैव प्रामाणिक राहणाऱ्या आणि या सगळ्याचं लख्ख प्रतिबिंब ज्यांच्या लेखनात उमटलं आहे अशा मन्नूजींच्या खडतर, पण विलक्षण स्वाभिमानी जीवनप्रवासाला अनेक सलाम!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Author dr mangala athalekar self respect life journey ysh

ताज्या बातम्या