नरनिवृत्ती!?

स्त्रियांना रजोनिवृत्ती- अर्थात ‘मेनोपॉज’ येतो, तसा पुरुषांमध्ये खरेच ‘अँड्रोपॉज’, अर्थात ‘नरनिवृत्ती’ असते का? हे तपासण्याचे अनेक प्रयत्न झालेले असले तरी त्याबाबतचा पुरावा अद्याप अपुरा आहे. तरीही अनेक पुरुष या ‘नरनिवृत्ती’चे अनुभव रोजच्या जगण्यात घेतच असतात.

डॉ. शंतनू अभ्यंकरshantanusabhyankar@hotmail.com

स्त्रियांना रजोनिवृत्ती- अर्थात ‘मेनोपॉज’ येतो, तसा पुरुषांमध्ये खरेच ‘अँड्रोपॉज’, अर्थात ‘नरनिवृत्ती’ असते का? हे तपासण्याचे अनेक प्रयत्न झालेले असले तरी त्याबाबतचा पुरावा अद्याप अपुरा आहे. तरीही अनेक पुरुष या ‘नरनिवृत्ती’चे अनुभव रोजच्या जगण्यात घेतच असतात. वय झाले, हे समजण्यासाठी बाईसाठी तिची रजोनिवृत्ती हे लक्षण मानले जात असेल तर पुरुषांच्या त्या लक्षणाचे काय? ‘पुरुष दिना’ची (१९ नोव्हेंबर) यंदाची थीम आहे, ‘स्त्री-पुरुष सौहार्द’. म्हणूनच पुढचा ‘पुरुष दिन’ येईपर्यंत स्त्री आणि पुरुष यांच्या सौहार्दासाठी ‘स्त्रीधर्म’ आणि ‘पुरुषधर्म’ या संकल्पनांतील साम्यस्थळे शोधण्याचा हा प्रयत्न.     

नुकताच ‘जागतिक पुरुष दिन’

(१९ नोव्हेंबर ) साजरा करण्यात आला.  महिला दिनाचे हे नर रूप! ‘स्त्रियांनो, किमान या दिवशी तरी पुरुषांना जरा झुकते माप द्या!’ अशा अर्थाच्या असंख्य पोस्ट, विनोद समाजमाध्यमांतून पाहात होतो. ते सर्व पाहताना या दिवसाचा, त्यामागील उद्देशांचा अभ्यास करावासा वाटला.  बाल दिन बालांसाठी आणि फादर्स डे ‘फादरां’साठी; पण जे बालही नाहीत आणि फादरही नाहीत अशा पुरुषांचे काय? असा विचार ‘पुरुष दिना’मागे असावा!

 त्रिनिदादच्या जेरोम तिलकसिंग यांनी १९९९ पासून हा दिन साजरा करणे सुरू केले. १९ नोव्हेंबरच का? तर हा या जेरोम तिलकसिंग यांच्या वडिलांचा वाढदिवस म्हणून! आणि हो, १९८९ मध्ये, याच दिवशी, त्यांच्या देशाच्या फुटबॉल टीमच्या वर्ल्ड कपसाठीच्या निवडीमुळे  सारा देश एकवटला होता. दिवसाची निवड ही अशी तद्दन पुरुषी निकषांवर आणि पुरुषसुलभ गांभीर्याने झालेली आहे. आता हा पुरुष दिनाचा संसर्ग पसरू लागला आहे. या वर्षी ‘स्त्री-पुरुष सौहार्द’ अशी थीम आहे. सौहार्द म्हणजे मैत्रभाव वाढायचा, तर समानधर्मा भेटायला हवा. स्त्रीधर्म आणि पुरुषधर्म यात साम्यस्थळे शोधायला हवीत असे वाटले, म्हणजे पुढचा पुरुष दिन येईपर्यंत तो मैत्रभाव टिकता येईल. म्हणून हा लेखनप्रपंच.

‘मेनोपॉज’ म्हणजे काय, हे सर्वज्ञात आहे. सर्वश्रुत तरी आहेच आहे. भर थंडीत घाम फुटण्यापासून ते अंगभर गरम वाफा जाणवण्यापर्यंत किंवा नैराश्यापासून ते मन:स्थितीच्या चढ-उतारापर्यंत अनेक गोष्टींतून अनेकींना जावे लागते. याचे मुख्य कारण स्त्रीबीजग्रंथीतून होणारा स्त्रीरसांचा (फीमेल सेक्स हॉर्मोन्स) निर्झर आटणे आणि मुख्य परिणाम म्हणजे जननक्षमता संपणे. पुरुषांचेही वय वाढते. पुरुषरस निवळतात; पण जननक्षमता अचानक संपतबिंपत नाही. थोडी मंदावते; पण अखेपर्यंत तेवत राहते. म्हणूनच जराजर्जर पुरुष बाप झाल्याच्या बातम्या आपल्याला अधूनमधून वाचायला मिळतात. एरवीही स्त्रीबीजनिर्मिती महिन्यातून एकदा, तर पुरुषबीजनिर्मिती सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. शनिवारी हाफ डे, एखाद्या जयंतीला सुट्टी, वगैरे भानगड नाही!  पण वय वाढल्यावर पुरुषरस (अँड्रोजेन्स) निवळल्यावर पुरुषांना नाही का काही त्रास होत? होतो ना. वय वाढलं, की पुरुषांतदेखील अनेक बदल दिसायला लागतात. शारीरिक आणि बौद्धिक थकवा, नैराश्य, चिडचिडेपणा, विस्मरण, स्नायू रोडावणे, पोट सुटणे, केस विरळ होणे, कामेच्छा कमी होणे, वगैरे. लिंगवैदूंच्या जाहिरातीच्या भाषेत सांगायचे तर, ‘पूर्वीचा जोम आणि जोश’ आता राहात नाही. कमीअधिक प्रमाणात सर्वानाच हे अनुभव येत असले, तरी सुमारे २ ते ५ टक्के पुरुषांत त्रासदायक प्रमाणात ही लक्षणे दिसतात. 

स्त्रियांचे एक बरे आहे, पाळी बंद होणे हे ऋतुनिवृत्तीचे, वय झाल्याचे एक व्यवच्छेदक लक्षण आहे. एक पूर्णविराम. पुरुषांमध्ये असा पूर्णविराम आढळत नाही. स्वल्पविराम, अर्धविराम, उद्गारवाचक चिन्ह, मधूनच प्रश्नचिन्ह, असे करत करत वाक्य जारी राहते. ते संपतच नाही; पण स्त्रियांमध्ये जसा ‘मेनोपॉज’ (ऋतुनिवृत्ती) तसा पुरुषांमध्ये ‘अँड्रोपॉज’ (नरनिवृत्ती) असतो का? किंवा का असू नये? किंवा असणारच की! अशी चर्चा सतत चालू असते; पण ‘अँड्रोपॉज’ची नेमकी आणि सर्वमान्य व्याख्या अजूनही नाही. मुळात ‘अँड्रोपॉज’ असा शब्द वापरावा, की त्याला अन्य काही नाव द्यावे, हेही अजून ठरलेले नाही. काहींच्या मते तर  ‘अँड्रोपॉज’ हा शब्द निव्वळ ‘मेनोपॉज’ला खुन्नस म्हणून काढला आहे! तर काही म्हणतात, ‘‘मेनोपॉज’च्या मानाने ‘अँड्रोपॉज’ हा अघळपघळ प्रकार असल्याने त्याकडे फारसे गांभीर्याने कुणी पाहातच नाही. गरीब बिच्चाऱ्या पुरुषांना कुढत कुढत, मन मारून जगावे लागते.’ जे बदल होतात ते वयानुरूप होतात? वाढत्या ‘स्ट्रेस’मुळे होतात? जाडगुलेपणामुळे होतात? की सोबतच्या मधुमेहामुळे? की इतर औषधांमुळे? की फक्त आणि फक्त ‘नरनिवृत्ती’मुळे आहेत? हा गुंता अजून सुटलेला नाही.

 बरेचसे पुरुषत्व ‘टेस्टोस्टेरोन’ या पुरुषरसाशी निगडित असते. वयाबरोबर तो कमी होतो. यांना मेंदूकडून येणारे प्रोत्साहनपर संदेश कमी होत जातात. या संदेशांना प्रतिसाद अशक्त होतो. त्यामुळे टेस्टोस्टेरोन कमी निर्माण होते. इतकेच काय, वयाबरोबर शरीराकडून टेस्टोस्टेरोनला मिळणारा प्रतिसादही कमी कमी होत जातो. शरीरसुद्धा ‘आज वेडय़ा पूर्वीची ती प्रीत तू मागू नको’ असे काही तरी म्हणत असते. टेस्टोस्टेरोन बद्ध (९८ टक्के) आणि मुक्त (२ टक्के) अशा दोन्ही अवस्थांत आढळते. पैकी बद्ध ते निरुपयोगी, मुक्त तेवढे उपयोगी. हे मुक्त टेस्टोस्टेरोन आणि त्याची इतर कार्यप्रवण (जैवोपलब्ध- बायोअव्हेलेबल) रूपे महत्त्वाची आहेत. वयाबरोबर मुक्त टेस्टोस्टेरोनमध्ये वार्षिक १ टक्का घट होत राहते. काही औषधांचा सहपरिणाम म्हणून आणि वाढत्या वयाशी संबंधित निरनिराळ्या आजारांमध्येही मुक्त टेस्टोस्टेरोन कमी होते. पैकी आटोकाट प्रयत्नाने आवर्जून आटोक्यात ठेवावा असा घटक म्हणजे पोटाचा वाढता घेर.

पण अमुक इतक्या प्रमाणात टेस्टोस्टेरोन घटले म्हणून तमुक लक्षणे उद्भवली, असा एकास एक परिणाम इथे दिसत नाही. त्यामुळे नेमके संशोधनही जिकिरीचे आहे. जर का टेस्टोस्टेरोनच्या कमतरतेमुळे इतके सगळे होत असेल, तर ती कमतरता भरून काढणारी तारुण्याची गुटिका असायला हवी; पण प्रामाणिकपणे सांगायचे तर नरनिवृत्तीच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या प्रत्येक पुरुषाच्या सहजपणे हातावर टेकवता येईल अशी गुटिका नाहीये. ज्यांचे अगदीच अडले आहे अशांना प्रायोगिक तत्त्वावर, साधकबाधक विचार करून टेस्टोस्टेरोन देता येते. थेट टेस्टोस्टेरोनच्या गोळ्या विशेष उपयोगी पडत नाहीत. गोळीतले टेस्टोस्टेरोन शरीरात पोहोचायच्या आधी यकृतात (लिव्हरमध्ये) खल्लास केले जाते. असे होऊ नये म्हणून काही खास प्रकार वापरावे लागतात. इंजेक्शन, जेल आणि पॅच (चिकटपट्टी) अशा स्वरूपामध्येही हे उपलब्ध आहे; पण या साऱ्याच्या सुयोग्य डोसबाबत आणि सुयोग्य कालावधीबाबत अजूनही संदिग्धता आहे. आधी ते काही कालावधीपुरते देऊन, त्यानंतर त्याचे परिणाम आणि सहपरिणाम पाहात पाहात, आवश्यकतेनुसार ते चालू ठेवावे लागते. उदाहरणार्थ- प्रोस्टेट वाढणे आणि प्रोस्टेटचा कर्क रोगदेखील टेस्टोस्टेरोनशी संबंधित असतो. त्यामुळे टेस्टोस्टेरोन द्यायचे झाले तर ‘पीएसए’ (प्रोस्टेट स्पेसिफिक अँटिजेन) आणि इतर तपासण्या करून दमादमाने द्यावे लागते. टेस्टोस्टेरोनमुळे चरबीचे प्रमाण कमी होते, हिमोग्लोबिन वाढते (कधी जरा जास्तच वाढते), स्नायू जरा पीळदार होतात, काही महिने औषधे घेतली तर हाडांची घनताही वाढल्याचे आढळते. एकूणच बरे वाटायला लागते. कामेच्छासुद्धा वाढते; पण काम-गिरी मात्र पूर्ववत होईल असे नाही, कारण ती बिघडण्यासाठी इतरही अनेक कारणे असतात (मधुमेह, तंबाखू वगैरे). गरजेनुसार याबरोबर ते जगप्रसिद्ध ‘व्हायग्रा’ही देता येते. टेस्टोस्टेरोनचे असे अनेक इच्छित परिणाम दिसत असले, तरी त्याने ईप्सित साध्य होते का? म्हणजे नरनिवृत्ती सुखावह होते का? ते सरसकट सगळ्यांना द्यावे का? हे प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. यासाठीचा पुरावा तसा लेचापेचा आहे.

थोडक्यात, ‘नरनिवृत्ती’ असतेही आणि नसतेही! त्याला उपचार आहेतही आणि नाहीतही! मुळात स्त्रियांचे सगळेच गहन आणि गूढ असते असा समज आहे; पण पुरुषांची ‘ही’ भानगड अजून भल्याभल्यांना उलगडलेली  नाही.

स्त्री-पुरुष सौहार्दासाठी एवढे साम्य सध्या रग्गड!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Author dr shantanu abhyankar retirement ysh

ताज्या बातम्या