गौरी साठे

मला जेव्हा नवीन मोबाइल घेण्यासाठी आम्ही दुकानात गेलो होतो, तेव्हा मी मुलाला म्हटलं होतं, ‘‘अरे, तो स्पर्शाचा फोन मला घेऊ नको बरं का!’’ दुकानदारासकट सर्वजण हसत होते. मला मात्र ओशाळल्यासारखं वगैरे वाटत नव्हतं. कारण मला ‘टच स्क्रीन’ मोबाइल मुळी नकोच होता!
याचं कारण म्हणजे मनात भीती होती. मोबाइलला हात लागून किंवा पर्समध्ये कोणत्या तरी वस्तूचा स्पर्श होऊन तो मोबाइल चालू होईल, वाजायला लागेल असं मला वाटे! अर्थात मुलानं मात्र मला ‘टच स्क्रीन’च घेतला, कारण तेव्हा मला राजस्थानला ट्रिपला जायचं होतं. कॅमेरा न्यायला नको असेल तर मोबाइलचा पर्याय चांगला होता. म्हणून मुलानं मला फोटो काढायला शिकवलं. ट्रिपमध्ये मी फोटोही काढले, पण मला ते पाठवता कुठे येत होते! ते तंत्र काही मी शिकले नव्हते. मग आमचा फोन झाला की सून विचारे, ‘‘फोटो काढले का? आम्हाला पाठवा ना..’’ पण पुढची पाटी कोरीच होती! म्हणजे माझ्याकडे स्मार्टफोन होता, पण मी तो स्मार्टपणे वापरत नव्हते. ट्रिपहून आल्यावरसुद्धा मी स्मार्टफोन साध्या फोनप्रमाणेच वापरत होते.

IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”
girls presents old famous advertisement video goes viral on social media
90’s चा काळ कधी परत येणार नाही! तरुणींनी दाखवली जुन्या लोकप्रिय जाहिरातींची झलक, Video एकदा पाहाच
people washing plates in fountain in wedding
Viral Video : लग्नात सजावटीसाठी लावला होता पाण्याचा कारंजा, पण लोकांनी जेवणाची ताटं धुतली, एकदा व्हिडीओ पाहाच
supriya sule, ajit pawar, sunetra pawar
“दुसऱ्यांच्या घरात मी कशाला डोकावू?”, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे

पण म्हणतात ना, गरज ही शोधाची जननी आहे! संकटातच चांगली संधी शोधायची असते, तसं झालं माझं. मार्च २०२० मध्ये टाळेबंदी सुरू झाली. कुठे जाणं नाही, आपल्याकडे कुणी येणार नाही, घरातली माणसं (सून आणि नातवंडं) तिच्या माहेरी अडकून बसली. ‘वाचक मंच’ बंद झाला, ग्रंथालय बंद. पुस्तकं वाचायला मिळेनात.. आणि एक दिवस आमच्या ‘अभिव्यक्ती वाचक मंचा’च्या ग्रुपवरून एक मेसेज आला, की आता दर आठवडय़ाला आपली आभासी मीटिंग ‘गूगल मीट’ किंवा ‘झूम’ ॲपवरून होईल.

आता मात्र मला स्मार्टफोन स्मार्टपणे वापरणं गरजेचं होतं. गूगल मीट किंवा झूमसाठी ‘फोर-जी’ फोन आवश्यक होता. माझं कार्ड फोर-जी होतंच. लेकानं मला नवीन हँडसेट ऑनलाइन मागवून दिला आणि मी वाचक मंचाची मीटिंग ‘जॉइन’ करू लागले. वाचन आणि श्रवणाची भूक भागली. मैत्रिणी स्क्रीनवर दिसू लागल्या. संभाषणाचा आनंद मिळू लागला. मीटिंगच्या आधी वाचनासाठी काही धुंडाळणं, लिहिणं सुरू झालं. मीटिंगची वाट पाहणं, त्यासाठी मोबाइल फुल चार्ज करून ठेवणं सुरू झालं. दुसरीकडे यूटय़ूबवर रेसिपी बघणं, पदार्थ करून बघणं, त्यांचे फोटो काढणं, मैत्रिणींना फोटो पाठवून शाबासकी मिळवणं हे उद्योगही सुरू झाले. म्हणजेच मी आता ‘स्मार्ट’ होऊ लागले होते!

बँकेचं ‘एटीएम कार्ड’ होतं, पण ते मी फार कमी वापरत असे. आता ते कार्ड मोबाइलला लिंक केलं. पोस्टाचे एजंट ‘आर.डी.’चे पैसे नेण्यासाठी घरी येत असत. पण टाळेबंदीमुळे त्यांचाही फोन आला, की पैसे ‘जी-पे’ने पाठवा. मग जी-पे ॲप डाऊनलोड केलं. पैसे पाठवले, पण मनात धाकधूकच होती. लगेच बँकेचा रक्कम डेबिट पडल्याचा मेसेज आला. पण पैसे नक्की पोस्टाच्या एजंटलाच मिळाले असतील ना, अशी एक शंका मनात डोकावली. इतक्यात एजंटचा पैसे मिळाल्याचा ‘इमोजी’चा अंगठा आला. फोन खरंच किती स्मार्ट आहे याचा प्रत्यय आला. मीही स्मार्ट होऊ शकते असा आत्मविश्वास वाटू लागला आणि मोबाइल आपलासा वाटू लागला.

मोबाइल रिचार्ज करणं, वीजबिल भरणं, प्रॉपर्टी टॅक्स भरणं, आपल्या ग्रुपमध्ये कुणाचा वाढदिवस असला किंवा काही कारणानं कॉन्ट्रिब्युशन (वर्गणी) गोळा करायचं असेल, तर पैसे ‘ट्रान्सफर’ करणं, ही कामं मी आता न घाबरता करते. ‘फेसबुक’वर अकाउंट उघडल्यापासून अनेक जुन्या मित्रमैत्रिणी भेटू लागल्या. तशा माझ्या बऱ्याच मैत्रिणी स्मार्टफोन वापरतात, पण पैसे पाठवणं, उबर किंवा ओला ऑटो बुक करणं, वेगवेगळय़ा कारणांसाठी ग्रुप तयार करणं, त्याची ॲडमिन होणं, या कामात आमच्या ग्रुपमध्ये मी हुश्शार मानली जाते!

एकदा आमच्या ग्रुपनं एकेक पदार्थ घेऊन सारसबागेत एकत्र जमायचं ठरवलं. कुणी कोणता पदार्थ आणायचा ते गुलदस्त्यात होतं. मी खरवस करून न्यायचं ठरवलं. खरवस सगळय़ांना आवडणारा! सगळे एकदम खूश होणार याची खात्री होती. पण माझा पाय मुरगळला आणि चालताच येईना. खूप वाईट वाटलं. खरवसाकडे बघून तर रडूच यायला लागलं. पण विचार केला, की रडायचं नाहीच. स्वत:शी मस्त शीळ घातली आणि ऊ४ल्ल९ अॅप डाउनलोड केलं. मैत्रिणी सारसबागेत गणपतीसमोरच्या दारानं डावीकडे उतरून हिरवळीवर जमणार होत्या. तोच पत्ता ‘डन्झो’ला सांगितला आणि खरवसाचं पार्सल धाडून दिलं. मी येणार नसल्याचं मुद्दामच कळवलं नाही. सर्व मैत्रिणी वाट पाहातच असणार हे माहीत होतं. डिलिव्हरी बॉयला सारसबागेतल्या हिरवळीवर ६५-७० वर्षांची फुलपाखरं बागडताना (लंगडताना!) सहज सापडली. त्यानं पार्सल सुपूर्द केलं. सर्व चिरतरुण मंडळींनी चिवचिवाट करून खरवसाचा फडशा पाडला असणार. मैत्रिणींच्या चेहऱ्यावरचा आनंद मला घरात बसूनही दिसत होता. इतक्यात फोन वाजला. मला वाटलं, मैत्रिणीचाच फोन असणार. पण फोन त्या डिलिव्हरी बॉयचा होता. ‘‘हॅलो मॅडम, मी असं पार्सल बागेत पहिल्यांदाच डिलिव्हर केलं. आज मला सारसबागेतल्या सिद्धिविनायकाचं दर्शन घडलं. म्हणून तुम्हाला धन्यवाद!’’ स्मार्टफोनचा स्मार्ट वापर करून एखाद्या अपरिचित व्यक्तीलाही आपण आनंद देऊ शकतो, याचा प्रत्यय आला. फोन ऐकून मी एकटीच गालातल्या गालात हसत होते. मैत्रिणींच्या आनंदी चेहऱ्यांबरोबरच आता मला डिलिव्हरी बॉयचा आनंदी चेहराही समोर दिसत होता! ही सगळी स्मार्टफोनची किमया. मी ‘स्मार्ट’ झाले होते!
sathegouri9@gmail.com