व्यवस्था

विभानं खाटेवर झोपलेल्या मुलीच्या अंगावरून हात फिरवला. नकळतपणे तिच्या डोळ्यांतील दोन आसवं मुलीच्या अंगावर पडली.

|| कल्पना नरांजे

पतीनं आत्महत्या के ली तेव्हा विभा कोसळलीच. त्या धक्क्यानं तिची मुदतीपूर्वीच प्रसूती झाली. इतके  दिवस ज्या घरात ती हसूनखेळून राहिली होती, ते घर तिच्या नवजात मुलीकडे पाहीना. सासू सारखा तिला माहेरी जाण्याचा तगादा लावू लागली; पण आईबाप तरी तिला घरी ठेवून घ्यायला तयार कसे होणार? अशातच सासूनं तिच्यापुढे एक विचित्र प्रस्ताव मांडला…

पहाटे  पाचच्या सुमारास इंदूनं विभाला आवाज दिला, तशी ती खाटेवर उठून बसली. ‘‘हो, उठते,’’ असं म्हणून पुन्हा खाटेवर लेटली. तेवढ्या वेळात इंदू दार उघडून अंगणात निघून गेली. सासरी परत जाण्याच्या धास्तीनं तशीही विभाला रात्रभर झोप लागलीच नव्हती. त्यामुळे तिला आता खाटेवरून उठावंसं वाटत नव्हतं. मनात विचारांची शृंखला सुरू होती. डोळे जळजळल्यासारखे वाटत होते. तरीही उठल्यावाचून गत्यंतर नाही, असं वाटून ती पुन्हा खाटेवर उठून बसली. काही वेळानंतर पुन्हा इंदू आत आली.  विभा तशीच बसून राहिलेली दिसली तशी ती चिडली.

‘‘अर्धा तास अगोदर उठवलं तरी ऐकू येत नाही तुले. आजय मुक्काम करायचा विचार आहे का?’’ तिच्याजवळ येऊन इंदू जोरात खेकसली.

‘‘मुक्कामाचं काय म्हणतेस आई… तिकडे परत जावंसं वाटतच नाही. कायमचं इथंच राहावं असं वाटते. जाऊन तरी काय आहे तिथं?’’

‘‘असं म्हणून कसं चालंल पोरी? आता तेच तुवं हक्काचं घर. लहान पोरगी आहे. तिच्यासाठी तरी तुले तिथं नादास लागन.’’ 

‘‘जीव आंबेपर्यंत कष्ट. वरतून सासूच्या शिव्या. पांढऱ्या पायाची म्हणून हिणवणं, याशिवाय काहीच नाही तिथं.’’ विभा उदासपणे बोलली.

‘‘तेच ते गाणं गाऊ नको नेहमीचं. पोरीबाळीचं माहेरपण चार दिसाचं. घरात तुही लहान बहीण लग्नाची आहे. तिचंही काही पाहा लागन का नाही? तुझ्या मागे लागून आमचं भलं होणार नाही. एकदा हात पिवळे करून दिले. आता तू आपलं पाहत बस.’’

‘‘खूपच त्रास आहे तिथं…’’ विभा रडकुंडीला येऊन बोलली.

‘‘शेवटचं सांगतो, जिथलं लाकूड तिथंच जळलेलं बरं. सातची मोटार आहे. तयारी कर आणि आपल्या घरी जा.’’ इंदू रागानं बोलली आणि पाय आपटत निघून गेली.

विभानं खाटेवर झोपलेल्या मुलीच्या अंगावरून हात फिरवला. नकळतपणे तिच्या डोळ्यांतील दोन आसवं मुलीच्या अंगावर पडली. मुलीनं कड फेरला, तसं तिला उचलून विभानं जवळ घेतलं. नाइलाजानं ती खाटेवरून उठली. अंगणात आली. आकाशाकडे बघितलं. आकाशात उधळलेला गुलाल तिला भकास जाणवू लागला. आता लवकरच सूर्य उगवणार. ऊन कडक होण्याआधी गावात पोहोचलं पाहिजे. मायबापाची इच्छा ठेवायची नसल्यावर तिथं लोळण घेण्यात काहीच अर्थ नाही, असं तिला वाटू लागलं. तिनं स्वत:ची आणि मुलीचीही तयारी केली. तिनं तयारी केलेली बघून इंदू आनंदली. तिला पोहोचवण्यासाठी बस स्टॅन्डपर्यंत आली. बस येताच मुलीसह विभा बसमध्ये जाऊन बसली, तसा तिचा निरोप घेऊन इंदू घराकडे परतली. इतर प्रवाशांबरोबर विभा खिडकीजवळच्या सीटवर मुलीला मांडीवर घेऊन बसली होती. बस तिच्या गावाच्या दिशेनं धावायला लागली. बसच्या वेगाबरोबर विभाचं मनही धावू लागलं. नकळतपणे भूतकाळात प्रवेशलं…

लग्न होऊन सासरी आली तेव्हा विभाचं वय एकवीस वर्षांचं होतं. सुखी संसाराची स्वप्नं उराशी बाळगून तिनं सासरचा उंबरठा ओलांडला होता. तिचा पती भूपालच्या डोळ्यांत तिच्याकरिता प्रेमच प्रेम आहे, असं तिला जाणवू लागलं. त्या प्रेमात ती चिंब चिंब झाली. नवतीची नवलाई संपली आणि भूपाल कुठल्या तरी चिंतेत असतो, असं तिला जाणवू लागलं. ती त्याबद्दल त्याला विचारायची; परंतु काही तरी बहाणा करून तो वेळ मारून न्यायचा. आपल्या चिंतेचं कारण आपल्या नववधूला कळू नये याची पुरेपूर काळजी तो घेत होता. दिवस जसजसे जात होते तसतशी भूपालच्या उदासीत भरच पडत होती. लग्नाला एक वर्ष झाल्यानंतर त्याच्या उदासीचं कारण तिच्या लक्षात यायला लागलं. सतत दोन वर्षांच्या नापिकीमुळे कुटुंबावर बँकेचं, त्याबरोबरच खासगी सावकाराचं कर्ज होतं. भूपालचे वडील अशक्त असल्यामुळे त्यांच्याकडून शेतीची फारशी कामं होत नव्हती. त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान असलेला त्याचा भाऊ पूर्णपणे व्यसनाधीन झाला होता. रात्रंदिवस दारू प्यायल्याशिवाय त्याला दुसरं काही सुचत नव्हतं. त्यामुळेच घरात अथवा शेतात त्याचा कुठलाच उपयोग नव्हता. उलट त्याच्या उदरनिर्वाहाची सोय भूपालला करावी लागत होती. पावसाळ्याची सुरुवात झाल्यावर सावकाराकडून कर्ज घेऊन भूपालनं शेतात कपाशी आणि सोयाबीनची लागवड केली होती. सुरुवातीला पाऊस योग्य वेळी, योग्य प्रमाणात पडू लागला. त्यामुळे पीक जोमानं वाढायला लागलं. पीक हातात येण्याची वेळ होताच मात्र अचानक परतीच्या पावसाचा जोर वाढला. त्यामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालं. सोयाबीन काळी पडून दाण्यांना कोंब फुटले, तर कपाशीची बोंडं झडली. फुटलेला कापूस मातीमोल झाला. त्यामुळे या वर्षी हाती फारसं काही लागलं नाही. शेती तोट्याची ठरली. दिवाळीनंतर एक दिवस सावकार घरी आला. तो वसुलीसाठी आलाय हे भूपालनं ओळखलं. सावकाराला बघताच त्याचा जीव खालीवर होऊ लागला. त्यानं सावकाराला बसायला सांगितलं, जवळ होते ते सर्व पैसे त्याच्या स्वाधीन केले; पण सावकाराचं समाधान झालं नाही. तो भूपालला घालूनपाडून बोलू लागला, अपमान करू लागला. वडिलांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सावकारानं त्यांच्या कानाखाली एक थप्पड मारून त्यांना बाजूला केलं. त्याचं जोरजोरात शिव्या देणं सुरू होतं. घरासमोर लोक जमले. कोणी मनातल्या मनात भूपालची फजिती बघून हसू लागले, तर कोणी सहानुभूती दर्शवून हळहळ व्यक्त करू लागले. सावकारानं शिव्या देणं थांबवावं म्हणून त्यानं त्याचे पायही धरले; परंतु सावकाराला त्याची दया आली नाही. त्यानं ठोकर मारून त्याला बाजूला केलं. शिव्यांची लाखोली वाहात धमकावून तो निघून गेला. विभा हे सारं लाचारपणे बघत होती; परंतु त्यास तिचा काही इलाज नव्हता.  सावकार निघून गेल्यानंतरही भूपालचं शरीर थरथरत राहिलं. मनात न्यूनगंडाचा खोल खोल खड्डा पडला होता. विभा त्याला समजावण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत होती; परंतु तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. त्याच अवस्थेत त्यानं हात-पाय धुऊन कपडे बदलले आणि घराबाहेर पडला. त्यानं शेतातल्या चिंचेच्या झाडाला फास लावून आत्महत्या केल्याची बातमीच थेट विभाच्या कानावर आली. ती बातमी ऐकताच ती कोसळली. त्या धक्क्यानं तिची मुदतीपूर्वीच प्रसूती झाली. तिला मुलगी झाली. पतीच्या आत्महत्येमुळे मुलीच्या जन्माचं तिला अजिबात कौतुक नव्हतं. तिची सासू तर त्या नवजात मुलीकडे बघतही नव्हती.

भूपाल गेल्याबरोबर सासूसासऱ्यांच्या तिच्याबरोबर असलेल्या वर्तनात आमूलाग्र बदल झाला. कधीकाळी तिचं कौतुक करणारे तिला पांढऱ्या पायाची म्हणून हिणवू लागले, तिचा छळ करू लागले. तिनं कायमचं माहेरी जावं, असंही त्यांना वाटू लागलं. ही कायमची माहेरी गेली तर घरातलं खाणारं एक तोंड कमी होईल आणि  मुलीवर होणारा खर्चही कमी होईल, असं त्यांना वाटत होतं. भूपाल गेल्याबरोबर विभाचं विश्वच बदलून गेलं होतं. मानसन्मान तर दूरच, परंतु साधं माणूस म्हणूनही तिला जगू दिलं जात नव्हतं.

विभाची बस शिरशीच्या बस थांब्यावर थांबली. लोकांचा कलकलाट वाढला तशी ती भानावर आली. सहा महिन्यांच्या मुलीला कडेवर घेऊन कपड्यांची पिशवी सांभाळत बसमधून उतरली आणि दु:खी मनानं घराच्या दिशेनं चालू लागली. चालतानाही मनात धाकधूक होतीच. विभा अंगणात येताच सासू शालू हिच्यावर तिची नजर पडली. विभा दृष्टीस पडताच तिची तळपायातली आग मस्तकात गेली आणि ती तिच्यावर खेकसली. ‘‘एवढ्या लवकर वापस यायचं कोणतं काम होतं? अजून महिनाही व्हायचा हाय. मायबापाच्या जिवावर आलं वाटते पांढऱ्या पायाच्या मायलेकी पोसाचं. आली आमच्या उरावर बसून खायले. दोघीही मायलेकी खायले काळ अन् भुईले भार!’’

शालूचं बडबडणं सुरूच होतं. सर्व ऐकून घेण्याशिवाय विभाकडे पर्याय नव्हता.

‘‘पेरणीची घात आल्यावर मजुरीला जाऊन पोट भरीन आपलं आणि आपल्या पोरीचं.’’ विभा हिमतीनं बोलली.

‘‘तू मजुरीले गेल्यावर हिला कोण पाहील? माहा कामाधंद्याचा लेक खाल्ला तिच्या जन्मानं.’’ सासू म्हणाली.

मायबापही ठेवून घ्यायला तयार नाहीत हे कसं सांगावं? नशिबाचे भोग. दुसरं काय? शेतकऱ्याची विधवा म्हणून सारं भोगलं  पाहिजे, असा विचार विभाच्या मनात तरळला. विचार करता करताच ती आत आली. सासूचं तिला घालूनपाडून बोलणं चालूच राहिलं.

काळ मार्गक्रमण करीत होता. उन्हाळा अंतिम टप्प्यात आला होता. नदीनाले कोरडे झाले असले तरीही गावातील काही झऱ्याच्या विहिरींमध्ये थोडंफार पाणी शिल्लक होतं. काळ पुढे पुढे सरकत असला तरी विभाचा छळ संपण्याचं नाव घेत नव्हता. शालू तर अशुभ मानून नातीला हातही लावत नव्हती. विभाला टोचून बोलणं, उपाशी ठेवणं सुरू होतं. पावसाळा सुरू झाला. पेरणीचा हंगाम आला. आपण मजुरीला जायला लागल्यावर सासूचा राग निश्चितच कमी होईल, या आशेवर विभा जगत होती.

एक दिवस सायंकाळी जेवण आटोपल्यानंतर विभाचे सासूसासरे ओसरीत बसले होते. तिनं दोघांच्याही खाटा अंगणात अंथरून दिल्या. आपलीही वाकळ घरात अंथरली. त्यावर पोरीला झोपवलं आणि भांडी घासण्यासाठी घराच्या मागच्या अंगणात निघून गेली. तेवढ्यात शालूनं तिला आवाज दिला. हातातलं काम टाकून धावत ती ओसरीत आली.

‘‘बस.’’ शालू मृदू स्वरात बोलली. सासूचा बदललेला स्वर बघून विभाला आश्चर्य वाटलं. भूपालच्या आत्महत्येनंतर ती कधीही तिच्याशी प्रेमानं बोलली नव्हती.

‘‘कोणतं काम होतं?’’ विभानं उभ्याउभ्याच भीत भीत विचारलं.

‘‘तू अगोदर बस, मग सांगतो.’’ सासरे बोलले. तशी विभा सासूशेजारी बसली.

‘‘तुयामागचा हा वनवास संपवावा असं वाटते पोरी.’’ शालू प्रेमळपणे बोलली. तशी आश्चर्यचकित होऊन विभा तिच्याकडे बघतच राहिली.

‘‘कसा काय?’’ तिनं साशंकतेनं विचारलं.

‘‘भूपाल जाऊन सहा महिने झाले…’’ सासरे थंडपणे बोलले. तशी दु:खाची जोरदार कळ तिच्या मनात दाटून आली. नकळतपणे डोळ्यांच्या कडा ओलावल्या.

‘‘आपल्या दीपकचं वय लग्नाचं झालं. दोघा भावांत दोनच वर्षांचं अंतर होतं. आता गाजावाजानं लग्न करण्याची आपली ऐपत  नाही.’’

‘‘होय तुमचं बरोबर आहे.’’ स्वत:ला सावरत ती बोलली.

‘‘मी काय म्हणतो, ते ध्यान देऊन ऐक. कर्जापायी भूपाल गेला. त्याच्या जिवाचा मोबदला म्हणून भेटलेले सरकारी एक लाख रुपये कर्ज फेडण्यातच गेले. तरीही अजून काही कर्ज बाकी आहे. म्हणून आमचं मत आहे, दुसऱ्या कोणाची लेक घरात आणण्यापेक्षा तूच दीपकसंग पाट लावून घे. पोरीले बाप भेटन. एक गोष्ट स्पष्टच बोलतो, आपलं सहा एकर वावर जस्संच्या तस्सं राहील. त्याचे तुकडे पडणार नाहीत.’’ शालू पुढेही बोलत होती, पण तिचं बोलणं ऐकून विभाच्या मनात खोल खोल खड्डा पडत होता. ती आतून तुटायला लागली होती. भूपालचा चेहरा डोळ्यांपुढे तरळला.

ती एकाएकी बोलली, ‘‘नाही आत्याबाई, असं कराले सांगू नका. दीपक भाऊजी माया लहान भावासारखे आहे.’’

‘‘अव भवाने, इथं नातं नाही व्यवहार पाहा लागते.’’

‘‘तरीपण आत्याबाई दीपक भाऊजीले स्वत:चीच सुद राहत नाही. मग बायकोले कसे पोसन? कुठंही दारू पिऊन पडून राहते. कोणतीही पोरगी घरात आली तरी तिचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही.’’

‘‘कोणतीही पोरगी नाही, आम्ही तुही गोष्ट करून राहिलो. तुले पहिलेसारखी या घरात इज्जत पाहिजे असन तर हो म्हण.’’

‘‘ते शक्य नाही आत्याबाई. आगीतून निघून मी फुफाट्यात शिरणार नाही. मी आहे तशीच भूपालची विधवा म्हणून ठीक आहे. मजुरी करून जगवीन पोरीले, पण असं करणार नाही. मामाजी, तुम्ही तरी समजवा आत्याबाईले.’’

‘‘माया समजवण्याचा प्रश्नच कुठे येते? ती म्हणते ते बरोबरच आहे. घरातली शेती एकत्रित ठेवण्यासाठी तिनं शोधलेला उपाय बरोबर आहे.’’

‘नवऱ्याचा कर्जानं जीव घेतला, आता व्यवस्था आपलाही जीव घ्यायला निघाली वाटतं…’ विभा स्वत:शी पुटपुटली.

‘‘आता शेवटचं सांगतो, पाट करासाठी तयार हो, नाही तर कायमचं माहेरी तोंड काळं कर. मायबाप ठेवत नसेल तर पोरीले घेऊन एखाद्या कोरड्या विहिरीत जीव दे.’’ संतापून शालू  बोलत होती. तिचा अवतार उग्र दिसत होता. आता हिच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही असं वाटून ती उठली. आत येऊन मुलीशेजारी येऊन लेटली. झोपण्याचा प्रयत्न करीत होती खरी, परंतु झोप पापण्यांमधून डोळ्यांत शिरण्यास तयार नव्हती.

मनात विचारांचं काहूर माजलं होतं. ‘भूपालनं असा जिंदगीचा डाव अर्ध्यावर सोडून जायला नको होतं. दोघांनी मिळून विचारविनिमय केला असता, तर कसंही करून, मोलमजुरी करून कर्ज फिटलं असतं. शेती विकून, कर्ज फिटून, मोलमजुरी करून कसंही जगलो असतो. आपला छळ झाला नसता. पोरगी अनाथ झाली नसती. दीपक आपल्या भावासमान. त्याच्याबद्दल असा विचार कधी मनात आला नव्हता. सासूनं हा भलताच प्रस्ताव आपल्यासमोर ठेवला. काय करावं… अडकित्त्यात सापडलेल्या सुपारीसारखी आपली अवस्था झाली. उद्यापर्यंत होकार कळवला नाही, तर आपल्या छळात वाढच होईल. घरातून हाकलूनही देण्यात येईल. मग पोरगी घेऊन कुठे जायचं? माहेरी आधार असता, तर तिथे राहून आपल्या हक्कासाठी लढता आलं असतं. मजुरी करून मायलेकींना स्वाभिमानानं जगता आलं असतं…’

तेवढ्यात काही तरी जोरदार आदळल्याचा आवाज आला. तशी ती विचारांच्या विळख्यातून बाहेर आली. दार उघडून, दाराच्या फटीतून बाहेर बघितलं. दीपक दारूच्या नशेत धुंद होऊन ओसरीत येऊन पडला होता. सासूचं खाटेवरूनच त्याला शिव्या हासडणं सुरू होतं. तिनं दार टेकवलं व पुन्हा आपल्या ठिकाणी येऊन बसली. ‘अशा बेवड्याबरोबर संसार… नकोच. त्यापेक्षा मरण बरं.’ असं क्षणभरातच तिला वाटून गेलं. ती तशीच काही वेळ बसून राहिली. पुन्हा दार उघडून बघितलं. झिरो लाइटच्या प्रकाशात दीपक जिथे पडला होता तिथेच झोपी गेलेला दिसला. त्याच्याभोवती देशी दारूचा भपकारा येत होता. सासूसासरे अंगणात झोपी गेले होते. ते सर्व बघून ‘तो’ अविचार  तिच्या मनात डोकावला. झोपलेल्या मुलीला छातीशी कवटाळलं, तिला कडेवर घेऊन उभी राहिली आणि दार उघडून अंगणात येऊन अंगणाला असलेल्या काटेरी कुंपणाला असलेली ताटी तिनं उघडली. रस्त्यावर आली. अर्धचंद्राच्या प्रकाशात गावाबाहेर जाणाऱ्या रस्त्यानं रात्री दोन वाजताच्या सुमारास ती चालू लागली. गावाबाहेरील कधीही न आटणाऱ्या विहिरीजवळ आली. आता आकाशातील चंद्रावर ढगाचा तुकडा आडवा आला होता. त्यामुळे सर्वत्र अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं. केवळ मिणमिणते तारे आकाशात होते. ‘पोरीला घेऊन कोरड्या विहिरीत जीव दे.’ सासूचे शब्द तिच्या कानात घुमायला लागले. ती विहिरीच्या कठड्यावर चढली. चिमुकल्या मुलीला छातीशी कवटाळलं. तेवढ्यात मुलगी जागी झाली. रडू लागली. ‘आता हिच्या रडण्याला काहीच अर्थ नाही… आता तर सारं सोडायची वेळ जवळ आली,’ असं वाटून तिनं मुलीला विहिरीतील काळोखात सोडलं. काळोखात मुलगी पाण्यात गटांगळ्या खाऊ लागली. तिचं रडणं अस्फु ट ऐकू  येऊ लागलं… आणि अचानक विभाचं मातृहृदय कळवळलं. असं करायचा आपल्याला काय अधिकार? व्यवस्थेनं आपल्यावर जी परिस्थिती आणली त्यात हिचा काय दोष? हिला का म्हणून शिक्षा? मी हतबल झालेय, पण हरले नाही. मी मरणार नाही. स्वत:च्या कष्टांवर जगेन… या पोरीसकट जगेन…

क्षणार्धात विभाच्या मनात किती तरी विचार विजांसारखे चमकू न गेले आणि तिनं धाडकन विहिरीत उडी टाकली. पाण्यात पडल्यामुळे घुसमटून, घाबरून रडणाऱ्या मुलीला कु शीत घेऊन शांत करत विभा विहिरीच्या काठाला धरून वर आली…

 इकडे विहिरीतील जळ शांत शांत होत गेलं…

kalpanamalode80@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Author kalpana naranje article husband commits suicide she gave birth prematurely due to shock akp

Next Story
लढा दुहेरी हवा!
ताज्या बातम्या