|| किशोर खैरनार

जे. कृष्णमूर्ती आनंदालाच सुखाचे नाव देत सुखाचा शोध घ्यायला सांगतात. हे सुख तेव्हाच लाभते जेव्हा दु:खाची अनुभूती होते. पण ही अनुभूती, आनंदाची आणि सुखाची भावना फार वेळ टिकत नाही. असे का? शाश्वत सुख किंवा शाश्वत आनंद असे काही जगात आहे का? नक्कीच आहे. ही शाश्वतता जेव्हा गवसते, तेव्हा आनंद हा स्थायिभाव होऊन जातो!.. जे. कृष्णमूर्ती यांच्या सुखाच्या व्याख्येवरचं हे मुक्त चिंतन..

How To Make Juice Premix Recipes To Save Money
१ वर्ष टिकणारी फळांच्या सरबताची पावडर बनवून संत्री, कलिंगडाचा आस्वाद हवा तेव्हा घ्या; वेळ, पैसे वाचवणारा Video पाहा
Bird Flu Outbreak Signs & Symptoms, Treatment
बर्ड फ्लूचा धोका वाढला! चिकन खाण्याआधी ‘ही’ काळजी घ्याच; डॉक्टरांनी सांगितली आजाराची लक्षणे व उपचार
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
a father beat child for his betterment by his shoes watch viral video of fathers love
लेकाच्या भल्यासाठी वडिलांनी दिला चोप, बुटाने धू धू धुतले, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “वडिलांचे असे प्रेम…”

मानवी जीवन हे खूप वैविध्यपूर्ण आहे. अनेक प्रकारच्या सुखदु:खांनी ते भरलेले आहे. माणसाला जे हवेहवेसे वाटते ते मिळाले, की तो स्वत:ला सुखी समजतो. पण ते जर नाही मिळाले किंवा जे नकोनकोसे वाटते ते मिळाले, की तो दु:खी होतो. मनुष्य हा सातत्याने सुखाचा पाठपुरावा करत असतो, पण सुख नेहमी त्याच्यापासून दूर पळत असते. याउलट मनुष्य नेहमी दु:खापासून दूर पळण्याचा प्रयत्न करत असतो, पण दु:ख हे त्याचा सातत्याने पाठलाग करत राहते.

मनुष्य सुखात असतो तेव्हा त्याला त्याची फारशी कदर नसते, परंतु तो जेव्हा दु:खी होतो, तेव्हा आपण किती सुखी होतो हे त्याला जाणवायला लागते. त्यामुळेच सुखाचा दीर्घ काळ हा आपल्याला अत्यंत अल्प वाटतो, तर दु:खाचा अल्प काळही आपल्याला प्रदीर्घ वाटतो. सुखाचे क्षण कसे निघून गेले हे आपल्याला कळतदेखील नाही; उलट दु:खाचा काळ हा संपता संपत नाही. सुख आपल्याला इतके हवेसे वाटत असते, की कितीही मिळाले तरी ते कमीच वाटते. याउलट थोडेसे दु:खदेखील आपल्याला पर्वताएवढे वाटते. सुख हे मनोरंजन, करमणूक, समाधान, तृप्ती, सुख-संवेदन, संतुष्टी, सुखोपभोग, विषयवासना, मौज-मस्ती, नशा, उल्हास, आनंद, उत्तेजना, इत्यादी स्वरूपांत आपल्या जीवनात व्यक्त होत असते. तर दु:ख हे नेहमी वेदना, पीडा, असहाय्यता, असमाधान, अतृप्ती, असंतोष, चिंता, काळजी, भीती, शोक, व्यथा, खेद, वैषम्य, संताप, मनस्ताप, इत्यादी स्वरूपांत व्यक्त होत असते. अशा प्रकारचे सुख-दु:ख हे काळाच्या कक्षेत येते. एखाद्या गोष्टीचा वारंवार उपभोग घेण्याने त्यातून वाटणारे सुख हे कालांतराने कमी होत जाते आणि मन उपभोगाची अन्य साधने शोधायला लागते. दु:खाचीही तीव्रता कालांतराने कमी होत जाते; म्हणूनच काळाला दु:खावरचे औषध मानले जाते.     

आपल्या जीवनात सातत्याने व्यक्त होणारी ही सुख-दु:खाची जोडी परस्परविरोधी वाटत असली तरी प्रत्यक्षात मात्र त्यांचे स्वरूप एकच आहे. कारण हवीशी वाटणारी गोष्ट नकोशी झाली, की सुखाचे रूपांतर दु:खात होते आणि नकोशी वाटणारी गोष्ट हवीशी वाटायला लागली, की त्याच दु:खाचे रूपांतर सुखात होते. जेव्हा आपण सुखासाठी एखाद्या गोष्टीवर अवलंबून राहायला लागतो- मग ती गोष्ट एखादी वस्तू असेल अथवा एखादी व्यक्ती असेल, तेव्हा ती गोष्ट सुखापेक्षा अधिक महत्त्वाची होते. त्या गोष्टीवर आपण आसक्त होतो, त्यासंबंधी आपल्यात स्वामित्वाची भावना निर्माण होते, जी पुढे दु:खाला कारणीभूत होते. सुखदु:खाच्या या जोडीतील सुख हे नेहमी दु:खाच्या छायेत वावरत असते. जिथे हे सुख संपते, तिथे दु:ख आपली वाट पाहत असते. त्यामुळेच सुख आणि दु:ख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. यातून मग प्रश्न उद्भवतो, की अशा प्रकारचे सुख आहे का, की जे दु:खाच्या विरुद्ध नाही; किंबहुना त्याचा दु:खाशी काहीही संबंध नाही, जे काळाच्या कक्षेत येत नाही? अशा शाश्वत आणि कालातीत सुखाचा मानवाने नेहमीच शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. पूजा-अर्चा, आराधना, उपासना, तपश्चर्या, कर्मकांड, परोपकार, इत्यादी अनेक गोष्टींद्वारे त्याने या शाश्वत सुखाप्रत येण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु सुख ही एक मिळवायची गोष्ट असते, की सूज्ञपणे जगण्याच्या परिणामस्वरूप ती येते?   

सुख हे शोधता येते का? सुखाचा शोध हा नेहमी सुखसदृश वाटणाऱ्या विचलन आणि उपभोगाकडे नेत असतो. सुख-संवेदन (प्लेजर) आणि सुख (हॅपीनेस) यात काय संबंध आहे? सुख म्हणजे सुख-संवेदनाचा पाठपुरावा आहे का? कारण सुख-संवेदनाचा पाठपुरावा म्हणजे वासनापूर्ती, समाधान, उपभोग, मनोरंजन,

उद्दीपन, ज्यातून आपण पुन्हा त्या सुख-दु:खाच्या जोडीकडेच येतो. त्यामुळे आपण जोपर्यंत या सुख-दु:खाच्या द्वैतामधून बाहेर येत नाही, तोपर्यंत आपण त्या शाश्वत सुखाप्रत येऊ शकत नाही.

मुक्तता ही प्रयासातून, झगडण्यातून येत असते का, की मुक्तता ही आत्मबोधातूनच शक्य आहे? आत्मबोध म्हणजे आत्म्याचा बोध नव्हे, तर आपल्या दैनंदिन जीवनाचा, जे आपण रोज जगतो त्या जीवन-प्रक्रियेचा बोध, त्या जगण्याचे आकलन. आपले अस्तित्व हे जरी निसर्गदत्त असले तरी आपल्या जीवनातील परिस्थिती ही आपल्या जगण्यातूनच तयार झालेली असते. त्यामुळे आपल्या जीवनात बदल हा आपल्यालाच घडवून आणावा लागतो, कोणतीतरी बाह्य शक्ती तो घडवून आणेल अथवा कालपरत्वे तो आपोआप घडून येईल अशी अपेक्षा बाळगणे व्यर्थ आहे. निसर्गातील घडामोडी या निसर्ग-नियमांनुसार चाललेल्या असतात आणि हे नियम           अस्तित्वात आलेल्या प्रत्येक जीवावर बंधनकारक असतात. हे नियम मानवनिर्मित नियमांप्रमाणे तोडता येत नाहीत; या नियमांमुळे उद्भवणारे परिणामही टाळता येत नाहीत. केवळ आकलनाद्वारेच या नियमांच्या बंधनकारक परिणामांतून बाहेर पडता येणे शक्य आहे. जीवनाचा बोध हा कोणत्याही ग्रंथाच्या आधारे, कोणत्याही गुरूच्या अधिकाराद्वारे होऊ शकत नाही, तर तो जीवनाच्या अवलोकनातूनच शक्य आहे. आणि हे अवलोकन प्रत्येकाने स्वत:नेच करायचे आहे.

माणसाची मानसिकता हीदेखील निसर्गाची देणगी नसून सभोवतालच्या परिस्थितींना तोंड देताना निर्माण झालेली आंतरिक परिस्थिती होय. त्याच त्या प्रकारची आंतरिक परिस्थिती पुन:पुन्हा निर्माण होत राहिली, की तो आपला स्वभाव बनतो. हा स्वभावच आपल्या वागण्यातून व्यक्त होत असतो. स्वभाव एकदा तयार झाला, की तो बदलणे फार कठीण असते. बाह्य परिस्थिती कितीही बदलली तरी स्वभाव हा थोडा फेरबदल करून तिच्याशी जुळवून घेत असतो व म्हणूनच त्यात मूलभूत बदल घडून येत नाही. त्यामुळे मानसिकता बदलायची असेल, तर दिलेल्या बाह्य परिस्थितीत विशिष्ट आंतरिक परिस्थितीच का निर्माण होते हे समजावून घेणे आवश्यक ठरते. 

माणसाचे ठरावीक चाकोरीतील जगणे हा त्याच्या संस्कारबद्धतेचा परिणाम असतो. संस्कारांनी बांधलेला मनुष्य हा कधीच स्वतंत्र नसतो. हे संस्कार म्हणजे त्याने स्मृतीरूपाने साठवलेल्या ज्ञानाचा परिणाम असतो. हे संचयित ज्ञानच त्याच्या सर्व क्रिया-प्रतिक्रियांचा, त्याच्या विचारांचा स्रोत असते. व्यवहारात जेथे आवश्यक आहे तेथेच फक्त विचाराचा वापर करणे गरजेचे आहे. अन्यथा विचार कधी शांत असतात का? विचार हा जाणूनबुजून शांत करता येत नसतो, तर तो आपोआप, कोणत्याही कारणाशिवाय शांत होणे आवश्यक असते. कोणत्याही संस्कारबद्धतेशिवाय केवळ निसर्गनियमांना अनुसरून जेव्हा जगणे सुरू होते तेव्हा विचार हा नैसर्गिकरीत्या त्याच्या स्वाभाविक स्थानी स्थिरावतो आणि शांत होतो. पूर्ण स्वातंत्र्य हा वैश्विक व्यवस्थेचाच एक भाग असतो. विश्वातील प्रत्येक गोष्ट, ती जशी आहे तशी असण्यास स्वतंत्र असते. निसर्गनियम हेदेखील या वैश्विक सुव्यवस्थेचाच भाग आहेत. मनुष्य जेव्हा हे निसर्गनियम झुगारून जगण्याचा प्रयत्न करू लागतो तेव्हा ते नियम बंधनकारक बनून त्याला नको असलेली परिस्थिती निर्माण करतात, जी मग दु:खाचे कारण बनते. खरे स्वातंत्र्य हे निसर्गनियम झुगारण्यात नसून सूज्ञपणे त्यांचे पालन करण्यात आहे. निसर्गाने मानवाला विचार करण्याची क्षमता दिली, त्याबरोबरच ती कशाही प्रकारे वापरण्याचे पूर्ण स्वातंत्र्यही दिले. मानवाने त्याच्या अज्ञानातून या विचारशक्तीचा वाटेल तसा वापर केला आणि नको असलेल्या परिस्थिती स्वत:वर ओढवून घेतल्या. या परिस्थितींमधून बाहेर पडायचे असेल, तर मानवाला विचार कोठे वापरायचा आणि कोठे नाही हे शिकायला हवे.

भौतिक पातळीवर, रोजच्या व्यवहारात विचाराचा वापर हा सयुक्तिक आहे, योग्यच आहे. परंतु विचार हा जेव्हा मानसशास्त्रीय क्षेत्रात प्रवेश करतो तेव्हा तेथे तो मानसशास्त्रीय काळ निर्माण करतो. हा मानसशास्त्रीय काळ, काळाचा केवळ आभास असतो, ज्यातून  कोठेतरी पोहोचण्याची कल्पना, कोणीतरी बनण्याची आशा, काहीतरी मिळवण्याचा हव्यास आणि या सर्वाशी संलग्न असलेली वैफल्याची भावना, इत्यादी आपल्या आत निर्माण होत असतात. ही सर्व मानसशास्त्रीय काळाचीच रूपे आहेत, ज्यातून ‘मी’ किंवा ‘अहं’चा जन्म होतो. मानवी दु:खाचा स्रोत म्हणजे हा ‘मी’पणाच आहे. कारण हा ‘मी’च, ही व्यक्ती, हा इगो, हा अहं, म्हणत असतो, की मी सुखी आहे, मी दु:खी आहे, मी एकाकी आहे, मी चिंतातुर आहे. आपल्या दैनंदिन जीवनात विविध रूपाने व्यक्त होणाऱ्या या ‘मी’चे सातत्याने केलेल्या अवलोकनाद्वारे जेव्हा आकलन होते, तेव्हा या ‘मी’चे अस्तित्व संपुष्टात येते. जेव्हा हा ‘मी’च नसतो तेव्हा त्यातून निर्माण होणाऱ्या या

सुख-दु:खाच्या द्वैताचाही अंत होतो.

मनुष्याच्या जीवनातील व्यक्तिगत सुख-दु:खाचा अंत होणे आवश्यक आहे. कारण जेथे दु:ख आहे, स्वकेंद्रितता आहे, तेथे प्रेम आणि त्यासोबत येणारी प्रज्ञा असू शकत नाही. जेव्हा या गोष्टींचा अंत होतो, तेव्हा त्यातून मोकळी होणारी ऊर्जा एका वेगळय़ाच प्रकारच्या भावनिक उत्कटतेला (पॅशन) जन्म देते. जेव्हा ही भावनोत्कटता सर्व गोष्टींच्या बाबतीत कार्यशील होते, तेव्हा ती करुणेचे रूप घेते. आणि करुणा (कम्पॅशन) ही खऱ्या प्रेमाची सुरुवात असते. असे करुणामय मनच सामूहिक दु:खाला सामोरे जाऊ शकते आणि त्यासंबंधी योग्य ती कृती करू शकते. प्रेम हे आंधळे नसते, तर प्रेमसदृश वाटणारी आसक्ती ही आंधळी असते. प्रेमाची एक वेगळीच प्रज्ञा असते जेव्हा ही प्रज्ञा आपल्या जीवनात कार्यशील होते तेव्हा सूज्ञपणे जगण्याचा मार्ग मोकळा होतो. या सुज्ञपणे जगण्याच्या परिणामस्वरूप जे सुख निर्माण होते ते शाश्वत असते. हे सुख ‘मी’च्या विघटनकारी क्रियाकलापांचा परिणाम नसतो, तर सूज्ञपणे जगण्यातील आनंद असतो. जीवन मग सातत्याने चाललेला संघर्ष नसतो, तर तो निरंतर प्रवाहित होणाऱ्या सुखाचा झरा असतो.             

keducationc@gmail.com