आपुले लग्न पाहिले म्या डोळा!

आज मुलामुलींच्या दोघांच्याही नोकऱ्या दोघांनाही गरजेच्या असतात. मग शक्यतो घरापासून जवळच्या परिघातील जोडीदार शोधलेला बरा, अशी वेळ येते.

|| मंगला सामंत

आजच्या अत्यंत पुढारलेल्या, अनेक पर्याय हाताशी असलेल्या काळातही वय वाढत जाणाऱ्या कित्येक तरुण-तरुणींची अवस्था ‘माझे लग्न होईल का? आणि झाले तर टिके ल का?’ अशी चिंतातुर आहे. काळ बदलला तशी आर्थिक मिळकतीची गरज, राहणीमान, दैनंदिन गरजा ही परिस्थितीही बदलली. अशा स्थितीत वाढत्या अपेक्षांबरोबर इतरही अनेक मुद्दे आजच्या लग्नांमध्ये अडथळे ठरत आहेत. लग्न करायचे असणाऱ्या, पण तिशी उलटलेल्या तरुणी आणि पस्तिशी पार के लेले तरुण हे चित्र सामान्य वाटू लागलेल्या सध्याच्या काळात या अडचणींचा तारतम्याने विचार करणे गरजेचे झाले आहे. ‘लग्न कशासाठी?’ याचाही नेमका विचार व्हायला हवा. तुळशीच्या लग्नाच्या कथेच्या निमित्ताने आजच्या काळातील तुळशीच्या, वृंदेच्या लग्नाविषयी…                       

पुराणात तुळशीच्या लग्नाविषयी अनेक  कथा सांगितल्या जातात. त्यातली मी लहानपणी ऐकलेली एक कथा अशी, की तुळस हे प्राचीन काळच्या एका मातृगणाचे चिन्ह होते. तुळशीला संस्कृतमध्ये ‘वृंदा’ असे संबोधन आहे आणि हा मातृगण वृंदा या नावे ओळखला जात होता. या मातृगणाचा रहिवास उत्तरेकडे होता, जो प्रदेश आजही ‘वृंदावन’ या नावे ओळखला जातो. या वनात राहणारे स्त्री-पुरुष हे या वृंदा गणाचे सदस्य समजले जात होते. वृंदा गणातील एका स्त्रीने वृंदावनात आलेल्या कृष्णाला पाहिले आणि तिला त्याच्याशी विवाह करण्याची इच्छा झाली. कृष्णाने तिला तसे वचन दिले, पण ते कृष्णाच्या युद्धमग्न स्थितीमुळे पूर्णत्वाला गेले नाही. अखेर एक दिवस कृष्णाने तिला विवाहासाठी येईन, असे सांगितले. तिच्या मैत्रिणींनी तिच्या लग्नाची सर्व तयारी के ली, पण कृष्ण तिला दिलेल्या वचनाप्रमाणे येऊ शकला नाही. बराच काळ वाट पाहायला लागल्यामुळे निराश झालेल्या वृंदेने अखेर खड्डा खणून स्वत:ला जिवंत गाडून घेण्याचे ठरवले. कृष्ण द्वारकेहून निघाला होता, परंतु वृंदावन येथे पोहोचेपर्यंत ही वृंदा जमिनीत शिरलेली होती. तिचा केशसंभार तेवढा जमिनीवर दिसत होता. कृष्णाने वृंदेला वाचवण्यासाठी धावत येऊन तिचे केस धरले, पण वृंदा जमिनीत गेली, ती गेलीच आणि कृष्णाच्या हाती फक्त तिचे तुटलेले काही केस राहिले. त्याच्या हातात त्या केसांच्या मंजिऱ्या झाल्या. त्या जमिनीवर टाकून कृष्ण म्हणाला, ‘या ठिकाणी जे झाड उगवेल, तीच माझी वृंदा असेल आणि आजच्या दिवशी माझे या वृंदाशी लग्न होईल.’ कालांतराने तिथे तुळस उगवून आली. वृंदेने कृष्णाची वाट पाहण्याचा दिवस, तोच दिवस ‘तुळशीचा लग्नदिवस’ म्हणून मानला जातो आणि भारतीयांमध्ये त्या दिवसापासून लग्न मुहूर्त सुरू होतात, अशी ही कथा. कृष्ण आणि वृंदा यांचा विवाह घडून येण्यास तत्कालीन काळामध्ये त्यांच्या काही मोठ्या अपेक्षा नव्हत्या. त्यांनी एकमेकांची निवड केलेली होती. तरी भौगोलिक अंतर हा अडथळा ठरला. आज ही परिस्थिती नाही. तरी काही अडचणी आजच्या कृष्ण आणि वृंदा यांच्यासाठी इतक्या पेचीदार झालेल्या आहेत, की यातून कोण आणि कसा मार्ग काढणार हा प्रश्न पडावा.

गेली सुमारे तीन ते चार हजार वर्षं विवाह ही स्त्री-पुरुषांच्या सहजीवनाची रुळलेली समाजमान्य पद्धत आहे, हे आपण जाणतोच. मी पुण्यातील कर्वेनगरमध्ये असलेल्या हिंगणे संस्थेच्या कॉलेजमध्ये आयोजित ‘विवाह-समुपदेशक कोर्स’च्या, स्त्री-पुरुषांसाठी एक व्याख्यान द्यायला दरवर्षी जात असे. तिथे प्रत्येक बॅचला माझा पहिला प्रश्न असायचा की, ‘विवाह म्हणजे काय?’ त्यावर ‘विवाह ही शरीरसंबंधाची एक पद्धत आहे’, हे उत्तर सोडून सर्व प्रकारची उत्तरे मिळत होती. शरीरसंबंधाखेरीज कोणत्या वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून विवाहाकडे पाहिले जाते त्याचा मला मिळालेला तो अनुभव होता. जोडीदाराची निवड करताना कुणाला कशा पद्धतीने निवड करावीशी वाटेल, तो प्रत्येकाचा स्वत:चा निर्णय असतो. तसे स्वातंत्र्य जरी देऊ केले, तरी आपल्या आजूबाजूला अनेक तरुणांची लग्ने उशिरा घडताना वा लवकर मोडताना पाहून, निदान आपल्या या हयातीत आपले लग्न  होते आहे की नाही? आणि ते टिकेल की नाही?, या बेचैनीने पस्तिशीचे तरुण आणि तिशीच्या तरुणींना ग्रासले असल्याची परिस्थिती सभोवताली दिसत आहे.

 काळ बदलत गेला. एक काळ असा आला, की मुली पदवीपर्यंत शिकायला लागल्या. तत्पूर्वी कोणतेही शिक्षण झालेला, पण कमावता मुलगा सहज मान्य होत असे; पण मुलींच्या शिक्षणानंतर मात्र ‘आमच्या मुलीपेक्षा जास्त किंवा अमुक एक शिक्षण असलेला’ नवरा हवा, ही मागील काळापेक्षा वेगळी अट उदयास  आली. परंतु या काळातही नोकरी करणाऱ्या तरुणींची संख्या अल्प होती. त्या काळात- म्हणजे १९७० च्या दशकामध्ये २२ ते २५ वयापर्यंत मुलींची, तर

२६ ते ३० पर्यंत तरुणांची लग्ने होऊ लागली. म्हणजे आधीच्या काळातील १८ ते २२ वर्षं हे मुलींच्या लग्नाचे वय तिच्या पदवीनंतर पुढे सरकले. त्यानुसार तरुणांचेही वय पुढे गेले होते. १९८० च्या अगोदर नोकरी करणाऱ्या तरुणींची संख्या कमी असल्यामुळे अनेकींना नवऱ्याच्या नोकरीप्रमाणे कुठेही जाता येत होते. पुढे मुलींनी स्वावलंबी असावे या योग्य कल्पनेतून नोकरी करणाऱ्या तरुणींची संख्या गेल्या चाळीस वर्षांत खूप वाढलेली दिसते. याच कालखंडात भारताच्या लोकसंख्येने कोटीचे शतक ओलांडले. वाढलेल्या मनुष्यसंख्येमुळे एकूण जगण्याची स्पर्धा पेटली. शिक्षण सार्वत्रिक झाले. निव्वळ पदवी परीक्षा आणि नंतर मास्टर डिग्रीसुद्धा नोकरी मिळवण्यास अपुऱ्या ठरू लागल्या. त्यात इंटरनेटची भर पडल्यावर जो तो एका पदवीनंतर इतर अनेक पदव्या मिळवण्याच्या मागे लागला. त्यातून ठळकपणे काय घडलं असेल, तर विवाहात चांगल्यात चांगले स्थळ मिळवण्याची नवी स्पर्धा दोन्ही बाजूंनी सुरू झाली. ‘मुलीला स्वयंपाक आला की पुरे’ या अपेक्षेचा काळ मागे पडून, ‘मुलाला स्वयंपाक येतो का’ हा काळ सुरू झाला.

  गावातील मुलींचा ओढा शहरातील सासर शोधण्याकडे राहिल्यामुळे गावातील तरुणांचे लग्न कसे व्हावे, हा गावातल्या सर्वच जातीवर्गांत आता कायमचा बनून राहिलेला प्रश्न आहे. गावाकडील मुली शहराकडे जाऊ पाहात आहेत आणि शहराकडील मुली गावाकडे येऊ पाहात नाहीत, या दुहेरी पेचात राज्यभरातील मुख्यत्वे ग्रामीण भागांतही, असे किती तरी तरुण आहेत, जे वाढत्या वयातही लग्न होण्याची वाट पाहताहेत. शहरातल्या शहरात आणखी काही वेगळ्या समस्या असतात. जसे, मुंबईत मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे अशा  रेल्वे लाइन्स आहेत. सध्या बहुसंख्य मुली नोकऱ्या करतात. त्यामुळे ज्या रेल्वेने त्यांचे घर गाठणे त्यांना सोयीचे असते, त्या बाजूकडील नोकरी लग्नाआधीच सुरूझालेली असते. त्यात मुलाचे स्थळ दुसऱ्या रेल्वे लाइनजवळचे असेल किंवा एकूण तिच्या नोकरीच्या ठिकाणाहून व पालकांच्या घरापासून लांब असेल, तर तिला ते स्थळ पसंत असूनही स्वीकारणे अवघड असते. याबाबत तरुणींशी बोलले असता त्यांचे असे म्हणणे असते की, ‘एक तर आम्हाला लग्नानंतर घर तर बदलावे लागतेच, ते मान्य; पण सासर ऑफिसपासून लांब आहे, म्हणून नोकरीच सोडून देणे आम्हाला शक्य नसते, कारण तरुणांइतकेच श्रम, वेळ, पैसा आमचा व आमच्या पालकांचा आमच्यावर खर्च झालेला असतो. मग ती नोकरी कशी सोडणार? नोकरी पुन्हा मिळणेसुद्धा सोपे राहिलेले नाही. शिवाय मुलांनाही हल्ली नोकरी करणारी पत्नी लागते. त्यात सासर लांब असेल, तर ते घर गाठण्यासाठी दोन लोकल बदला किंवा एक लोकल, नंतर बस किं वा रिक्षा, असा प्रवास करा, हे मुंबईच्या गर्दीत त्रासदायक असते. आम्हाला आमच्या दर महिन्याच्या शारीरिक त्रासाचे, पुढे येणाऱ्या गरोदरपणाचे, बाळंतपणाचेसुद्धा भान ठेवावे लागते.’ मुली सांगत असलेली ही कारणे त्यांच्या जागी बरोबरच म्हणावीत अशी. या तरुणींना या सर्व परिस्थितीमुळे अनेकदा पसंत असलेले, अनुरूप स्थळसुद्धा सोडून द्यावे लागलेले आहे. तरुणींची ही बाजू बरोबर असली, तरी त्यामुळे लग्नाचा प्रश्न अधिक कठीण होऊन बसलेला आहे, हे सध्याचे वास्तव आहे. त्यामुळे अनेकदा तर विवाहेच्छुक वधू-वराच्या ऑफिसचा मध्य साधून नवा फ्लॅट पाहावा आणि इतर काही अपेक्षांवर पाणी सोडावं, अशी त्यांना तयारी करावी लागते. ती न केल्यास लग्न जुळत नाही.

आज मुलामुलींच्या दोघांच्याही नोकऱ्या दोघांनाही गरजेच्या असतात. मग शक्यतो घरापासून जवळच्या परिघातील जोडीदार शोधलेला बरा, अशी वेळ येते. अर्थात जवळच्या परिसरातील जोडीदाराकडून अन्य अपेक्षा पूर्ण होतात असे नाही. त्यामुळे तसाही निवडीस वेळच  लागतो. तसेच लग्न जमावे म्हणून समाधानकारक पगाराची नोकरी मुलीने सोडणे हे तर धोक्याचेच वाटते. काही कारणाने विवाह नाही टिकला, तर त्या मुलीच्या बाजूने कोण उभे राहणार? तिच्या भवितव्याचे काय? हा आजच्या काळातला मोठा प्रश्न. त्यामुळे तसा सल्लाही आजच्या तरुणींना कोणी देऊ धजणार नाही, अशी परिस्थिती आहे. पतीच्या पगाराकडे पाहून मुलीने नोकरी सोडावी, असे म्हणायला त्याआधी त्यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण व्हावे लागते; पण ते स्थळे पाहून जमवलेल्या लग्नाआधी कसे निर्माण व्हावे?  लग्न होऊन दोन-तीन वर्षांनी हा विश्वास निर्माण झाला म्हणून, वा अपत्य संगोपनातल्या अडचणीमुळे नोकरी सोडणाऱ्या आजही अनेक जणी दिसतात. पण भविष्यात तसे करावे लागल्यास फक्त नवऱ्याच्या पगारात भागू शकेल काय, हा प्रश्न तरुणींना लग्नाआधीच सोडवायचा असतो. म्हणून अनेकदा त्या स्वत:चा पगार अगदी ५० हजार रुपये महिना असा असेल, तरी नवऱ्याचा पगार त्याहून जास्त हवा, अशी अट घालतात. पुरुष स्त्रीपेक्षा वेतनात श्रेष्ठ हवा, ही पारंपरिक भावना सहसा इथे नसते; परंतु भविष्यकाळाचा विचार आजच्या तरुणी लग्नाआधीच करतात. हा पगाराच्या समीकरणाचा मुद्दाही लग्न लांबवण्यास कारणीभूत ठरतो. तरुणींच्या अपेक्षेपेक्षा कमी पगार असणाऱ्या तरुणांची स्थळे त्यांना सोडून द्यावी लागतात.

खरं तर एखाद्या तरुणाच्या इतर बाबी तिला पसंत पडणाऱ्या असल्यास, आपण पुढे नोकरी सोडलीच तर नवऱ्याच्या पगारात भागवू शकणार नाही का?, हा विचार तरुणींनी करावयास हवा. परिस्थिती नेहमीच बिकट असेल असे काही ठरलेले नसते; पण अलीकडे मध्यमवर्गीय तरुण-तरुणींचे पगार सरसकट महिना ३० हजार रुपयांच्या वरच असल्यामुळे त्यांच्या खर्च करण्याच्या सवयी ‘हायफाय’ झालेल्या असतात. त्याच्यापेक्षा तिचा पगार जास्त असेल, तर कधी तो नकार देतो आणि कधी ती नकार देते. थोडक्यात, पालकांच्या अपेक्षेनुसार आपल्या मुलामुलींचे उच्च पगार व हुद्दा हे लग्न जुळण्याचे हुकमी एक्के  न होता, ते लग्नातील महत्त्वाचे अडसर झालेले सध्या दिसत आहेत.

 तरुण-तरुणींची आर्थिक स्थिती बळकट असणे, या मुद्द्याला सध्या महत्त्व आल्यामुळे रंग, रूप, रुबाब हे ‘इम्प्रेशन’चे मुद्दे दुय्यम ठरवण्याची वेळ अनेकदा येते. सध्या शिक्षण व कमावतेपण याबाबत प्रथम विचार करावा लागतो. मग विवाहेच्छुक वर-वधू गावातील की शहरातील, ही प्राथमिक माहिती मान्य झाली, की मग एकमेकांना ‘पाहण्याचा’ प्रसंग येतो. तरुणीला ‘सुंदर’, तर तरुणाला ‘स्मार्ट’ हा शब्द वापरला जातो. आपण कितपत स्मार्ट/ सुंदर आहोत, याची कल्पना प्रत्येकाला हवी आणि तितकीच अपेक्षा जोडीदाराविषयी बाळगली, तर विचारात समतोल राहतो. देखणा जोडीदार प्रत्येकाला हवा असतो; पण दोघांच्या रूपामध्ये फार फरक असेल, तर पुढे संशयकल्लोळ सुरू होऊ शकतो, हेही लक्षात ठेवलेले बरे. जोडीदार अगदीच विजोड असू नये, इथपत आग्रह ठीक आहे. तसेच दोघे एकाच शहरातील असतील, तर दोघांची नोकरीची ठिकाणे घरापासून किती दूर-जवळ आहेत याची चिकित्सा करावी लागते. तिथे जमत नसेल, तर मग तरुण निदान घरकामात तिला मदत करणार का? त्याला पुढे अपत्याच्या संगोपनात मदत करायला आवडेल का? हे मुद्दे तरुणीला चाचपून पाहावे लागतात. नोकरीवाली बायको हवी किंवा वेळ आली तर तिनेच  नोकरी सोडायची, या सर्वच मुद्द्यांचा काथ्याकूट केल्याशिवाय, लग्न हे जमण्याच्या ‘रेषेवर’ येत नाही. या अपेक्षा जुळवताना दुसऱ्याशी किंवा दुसऱ्या घरात जुळवून घेण्याचे (अ‍ॅडजस्ट करण्याचे) वय हळूहळू निघून जात असते. तसेच वय वाढता वाढता प्रत्येकाची मते ठाम बनत जातात. स्वभावात लवचीकता शिल्लक राहत नाही. याचीच परिणती आपण घटस्फोटात झालेली पाहतो.

ज्या पालकांना एकच मुलगी किंवा दोन्ही मुली असतात. त्या मुलींना आपल्या आई-वडिलांची उतारवयातील काळजी असू शकते. त्यामुळे तिने जर आपल्या नवऱ्यासाठी ‘त्याने माझ्या घरी राहावे,’ अशी अट घातली, तर  मुलांना ‘घरजावई’ बनणे हे अपमानास्पद (?) वाटते

किं वा आवडत नाही. तसेच आजच्या तरुणींनी ‘घर-सून’ बनण्यास नकार देण्याचा काळही सुरू झालेला आहे. त्यांना सुरुवातीपासूनच वेगळे राहायचे असते. म्हणजे सासरी इतरांबरोबर जुळेल याची खात्री त्यांना नाही. मग लग्नाआधी स्वतंत्र फ्लॅट घेणे आले, त्याचे हप्ते आले, म्हणजे पगाराच्या दोन्हीकडून मोठ्या अपेक्षा आल्या, तर काही तरुणांना पालकांपासून वेगळे राहणे, ही  भूमिका चालत नाही. त्यामुळे तिथेही फिस्कटते. अनेकदा मुलींना पालकांच्या मोठ्या दोन-तीन बेडरूमच्या घराची सवय असते आणि मुलगा एका बेडरूमच्या घरात राहात असतो. त्यामुळे तसे घर मिळेपर्यंत वाट बघण्याची काही तरुणींची भूमिका त्यांचे लग्न लांबविते. हे सर्व कमीच म्हणून की काय, कुंडली हा मुद्दा अजून चालू असलेला दिसतो. कशात काही खोड काढता येत नाही, तर मग दोघांच्या वयातील एका वर्षाचा फरक कमी वाटतो किंवा अर्ध्या इंचाने उंच पाहिजे होता, यावरून नकार देण्याचा प्रश्न ‘जन्मपत्रिका’ सहज सोडवते. मुख्य म्हणजे, सुरुवातीला तरुण-तरुणींच्या पालकांना लग्न जुळवण्याचा फार उत्साह असतो. त्यामुळे पत्रिकेवरून नकार देण्याचे काम ते हिरिरीने करतात.

थोडक्यात, तरुण-तरुणींची निव्वळ शैक्षणिक समान पात्रता पाहणे, हाही काळ मागे पडला. काही काळापूर्वी, पत्नीचे उच्च शिक्षण सांगता येणे, यामुळेसुद्धा पुरुषाची पत वाढत होती. आताच्या काळात पत्नी नोकरी करते आणि तिचा हुद्दा, या गोष्टी त्या स्त्रीबरोबर तिच्या पतीलाही समाजात वावरताना गौरवाच्या वाटतात. अर्थात यात चुकीचे काहीच नाही उलट कौतुकाचेच; पण त्यावरून आपली प्रतिष्ठा ठरवण्यामुळे लग्नप्रश्न गंभीर होत चाललेले आहेत.

 लग्नाविषयी खुली चर्चा करायला हल्ली अगदी ‘व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप’सुद्धा तयार झालेले आहेत. अशी काही ग्रुप्समध्ये चालणाऱ्या चर्चा लक्षात घेण्यासारख्याच आहेत. एका तरुणीला ‘नोकरी नाही’ म्हणून नकार देताना एक तरुण आपले विचार या ग्रुपवर टाकतो, की ‘माझं घर, माझी शेती, माझी गुंतवणूक, माझी मिळकत, माझी कार असताना, पत्नीला मी फुकट का पोसावे?’ या मेसेजमध्ये तो पत्नीचे गर्भारपण, बाळंतपण, अगदी बाळाचे डायपर, हे सर्व खर्चही टाकतो. म्हणजे विवाह जमण्याबाबत अपेक्षा इतक्या टोकाच्या आणि स्वकेंद्रित झालेल्या आहेत, की पुरुषाला स्वत:चा वारस मिळावा, हा विवाहाचा मूळ उद्देश आणि तो वारस पत्नीमुळे त्याला मिळू शकतो, ही जाणीवसुद्धा आज राहिलेली  नाही का? स्त्रीने वारस द्यायचा,त्यांची काळजी घ्यायची आणि पतीने तिची सर्वांगीण जबाबदारी घ्यायची, या भावनेतून (किंवा व्यवहारातून) खरे तर विवाहाची निर्मिती झाली असे मानले जाते. ती योग्य म्हणता येत नसली, तरी मागील अनेक शतकांपासून ते गेल्या  ७०-८० वर्षांपूर्वीपर्यंत बहुसंख्य स्त्रिया याच कारणाने कमावत्या नव्हत्या; पण पैशांवरून अडवून आपल्या पत्नीचा अपमान करणारे काही नवरे होतेच. म्हणून मधल्या काळात या अन्यायग्रस्त स्त्रिया प्रथम नोकरीत शिरल्या. मग त्यातून पुढे सर्वच मुली-तरुणी नोकऱ्या  करू लागल्या; पण मग परिस्थितीनुसार झालेली ‘कमावती स्त्री’ हा पतीचा हक्क कधीपासून झाला? सध्या ‘वारसासाठी विवाह’ अशीही कल्पना शब्दश: राहिलेली नाही. स्त्री-पुरुषांनी एकमेकांना आयुष्यभर साथ देणे आणि जबाबदारी घेणे असा विवाहाचा आजचा सुसंस्कृत अर्थ आहे आणि तो तसाच असायला हवा. तरी ‘पत्नीला फुकट का पोसू?’ अशी  मानसिकता असणाऱ्या पुरुषाचे लग्न जमण्यास वेळ तर लागेलच, पण ते मोडायलाही वेळ लागणार नाही, हे लक्षात ठेवलेले बरे. कारण नोकरी करणाऱ्या तरुणींच्याही काही अपेक्षा असणारच. संसाराचा समभार त्याने पेलणे तिलाही अपेक्षित असेलच.

काही तरुण-तरुणी मॅरेज ब्युरोमध्ये अनेक वर्षं नाव नोंदवून असतात. तरुणीने पंचविशीपर्यंत किंवा तरुणाने तिशीपर्यंत जे मुद्दे मनात धरून एखादा जोडीदार सुरुवातीला नाकारलेला असतो, तसे स्थळ पुढील वाढलेल्या वयात सहसा पुन्हा लाभत नाही. वयाप्रमाणे शरीर बेडौल होत जाणं, केस विरळ होणं. अनेकांनी अशा प्रकारे चाळिशी ओलांडली, अशीही उदाहरणे आहेत. जितके लग्न उशिरा, तितकी पुढे अपत्य होऊ देण्याचीसुद्धा मग घाई होते. ज्यामुळे पतीपत्नीचे मौजमजेचे दिवस त्यांना जे लाभले पाहिजेत, त्यांच्या नात्यात मोकळेपणा आला पाहिजे, त्यापासून ते वंचित होतातच; पण अपत्याची घाई करावी लागल्यामुळे, त्यासंबंधीच्या जबाबदारीचे आणि पुढील आर्थिक नियोजन करण्यास, त्यांना वेळही पुरेसा मिळत नाही. हे सगळे मुद्दे गंभीर आहेत. ते पाहता मुलामुलींना सुचवावेसे वाटते, की आपल्या सहजीवनाचा तरुण, आनंदी काळ असा वाया जाऊ देऊ नका. याकरिता आपली जोडीदाराकडून सर्वांत महत्त्वाची अपे

क्षा काय आहे, तीस प्राधान्य देऊन, ती जर एखाद्या स्थळामुळे पूर्ण होणार असेल, तर बाकी रंग, रूप, नोकरी, पगार, शिक्षण, राहते घर, या कशात जमेल तिथे मुलामुलींनी तडजोड केलेली बरी. अपेक्षा ठीक आहेत, पण त्यांचे ‘अटी’त रूपांतर झाले, की ‘समस्या’ ठरलेल्याच. खरे तर विवाहात दोघांची विचारसरणी जुळणे अंतिमत: महत्त्वाचे असते. आज तर दोघांची समान ‘राजकीय विचारसरणी’सुद्धा महत्त्वाची झालेली आहे! आपल्या समान-विचारांच्या मित्रमैत्रिणीबरोबर आपली मैत्री घट्ट असते. मग ‘विवाह’ हे तर मैत्रीचेच विस्तारित रूप आहे. एकमेकांशी जुळवून आणि एकमेकांच्या अडचणी समजून घेण्याचा स्वभाव जर नसेल, तर रंग, रूप, उंची, पगार, शिक्षण याचा पतीपत्नीचे नाते टिकवण्यासाठी काहीही उपयोग होत नाही, असा इशारा वाढलेले घटस्फोट देत असतात.

आजच्या  लग्नाळू समाजाचे हे चिंताजनक चित्र आपल्यासमोर आहे. पुराणातील वृंदेचे लग्न आजही अनेक शतके भारतात काही जातीजमातींत लावले जात असले, तरी त्या वृंदेची एकच निवड ठरलेली होती; पण आजचे अनेक कृष्ण आणि अनेक वृंदा यांच्यापुढे मात्र मुबलक स्थळे निवडीसाठी आहेत. नातलग, मध्यस्थांनी दोन-पाच स्थळे आणण्याचा काळ मागे पडला. आता नव्या तंत्रज्ञानामुळे समोर असंख्य स्थळे, त्यातून न संपणारी तुलना,

‘फ्रें डशिप’मध्ये अडकलेली मानसिकता आणि त्यामुळे लग्नाला उशीर ठरलेला, असे सध्याचे लग्न-सूत्र आहे. आवडलेल्या जोडीदाराकडून नेमका नकार येत राहावा, यामुळे थोडा त्रासलेला, अपेक्षाभंग झालेला, हा तरुण वर्ग जणू ‘आपुले लग्न पाहिले म्या डोळा’ या प्रतीक्षेत उभा आहे. याबाबत दुसऱ्या कोणावर  टीका करण्यापेक्षा किंवा परिस्थितीवर चिडचिड करण्यापेक्षा, अटींच्या जाळ्यात अडकून न राहता आपापल्या अपेक्षांमध्ये मुलामुलींनी वेळेत तडजोड करणे, हा शेवटी योग्य वयात विवाह जमण्याचा एकमेव मार्ग उरतो.

 (लेखिका विवाह मंडळावर सल्लागार  आणि समुपदेशक आहेत.)       

mangalasamant20@100410502586953489896

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Author mangala samant article condition of many young people will i get married akp