|| मेघना वर्तक
रूथ बेडर गिन्सबर्ग या नावाला केवळ अमेरिके च्याच नव्हे, तर जगभरातीलच कायदे क्षेत्रात महत्त्वाचे स्थान आहे. आज अनेक बाबतीत स्वातंत्र्य अनुभवणाऱ्या स्त्रियांसाठी हा मार्ग तयार करून देणाऱ्या सुरुवातीच्या शिलेदारांपैकी रूथ या एक. स्त्री-पुरुष समतेचा पुरस्कार करणारे अनेक खटले गाजवणाऱ्या आणि अमेरिके च्या सर्वोच्च न्यायालयाच्या सहाय्यक न्यायाधीश म्हणून यशस्वी वाटचाल के लेल्या रूथ यांच्या निधनास आज (१८ सप्टेंबर) एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यांनी निर्माण केलेला समानतेचा कायदेशीर वारसा हा अति दूरगामी ठरला. त्यामुळेच त्यांची आठवण महत्त्वाची.          

एकविसाव्या शतकातील आजची स्त्री सुशिक्षित, वैचारिक स्वातंत्र्य, आत्मविश्वास, अशा अनेक गुणांनी संपन्न आहे; पण या स्त्री स्वातंत्र्यासाठी तिला खडतर प्रवास करावा लागला. एकोणिसाव्या शतकात स्त्री स्वातंत्र्याची चळवळ पाश्चिमात्य देशांत प्रथम सुरू झाली आणि हळूहळू त्याचे पडसाद जगभर उमटू लागले. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी स्त्रियांच्या हक्कांसाठी आपले आयुष्य वाहून घेतले. त्यातील एक स्त्री, जी लिंगभेदाच्या विरोधात आयुष्यभर लढली, ती म्हणजे अमेरिकेतील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व- रूथ बेडर गिन्सबर्ग, अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सहाय्यक न्यायाधीश (असोसिएट जस्टिस). या नावाने अमेरिकेला स्वातंत्र्य, समानता आणि संधी या तीन शब्दांचा अर्थ गिरवायला लावला. स्त्रीच्या समान हक्कांचा पुरस्कार करणाऱ्या या झंझावाती पर्वाचा १८ सप्टेंबर २०२० रोजी अस्त झाला. त्याला एक वर्ष पूर्ण होताना त्यांचे स्मरण करावेसे वाटते.

जोन रूथ बेडरचा जन्म १५ मार्च १९३३ रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात, न्यूयॉर्कमध्ये ब्रुकलिन या गावात झाला. रूथच्या जीवनावर आईच्या शिकवणुकीचा मोठा प्रभाव होता. तिची आई स्वत: शिकू शकली नाही, पण शिक्षणाचे बीज तिने रूथमध्ये रुजवले. मुलींनी शाळा-महाविद्यालयात जाणे, हे त्या काळच्या समाजप्रवाहाच्या विरुद्ध होते, पण रूथचा शिक्षणप्रवास जिद्दीने सुरूझाला. दुर्दैवाने स्कूल ग्रॅज्युएशनच्या आधीच तिच्या आईचे निधन झाले; पण त्याच वेळी आईचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा तिचा निश्चय पक्का झाला. रूथ बेडर यांच्या जीवनाला लागलेल्या एका मोठ्या वळणामुळे त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलले. अमेरिकेतील  ‘कॉर्नेल विद्यापीठा’त त्यांना पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि इथेच त्यांना उमद्या व्यक्तिमत्त्वाचा, पुरोगामी विचारांचा त्यांच्या आयुष्याचा जोडीदार मार्टिन भेटला. रूथ म्हणतात, ‘हा माझ्या आयुष्यात मला भेटलेला पहिला मुलगा होता, ज्याने ‘मला ‘ब्रेन’ आहे’ असे म्हणून माझ्या हुशारीचे कौतुक केले. रूथ यांचा आनंद वर्णनातीत होता. कारण तो काळच असा होता, की ‘स्त्री’ला बुद्धी असते, ती स्वतंत्र विचार करू शकते. हे स्वीकारार्ह्य नव्हते. त्यांचा हा आनंद तत्कालीन समाजाच्या मानसिकतेचे दर्शन घडवतो.

१९५४ मध्ये रूथ यांनी कॉर्नेल विद्यापीठातून पदवी मिळवली. त्याच वर्षी त्यांचे मार्टिन यांच्याशी लग्न झाले आणि त्या ‘रूथ बेडर गिन्सबर्ग’ झाल्या; पण त्यांचे हे लग्न       १९५० च्या काळातील ‘टिपिकल’ लग्न नव्हते. मार्टिन स्वत: स्त्रीवादाचा पुरस्कार करणारे होते. त्यामुळे त्यांचे लग्न म्हणजे समान भागीदारी (इक्वल पार्टनरशिप) होती. हे लग्न आधुनिकता, समानता आणि पुढारलेले विचार यांचे प्रतीक होते. कुटुंब हे सर्वांचे आहे आणि म्हणूनच त्यांच्या घरात हे काम स्त्रीचे- हे पुरुषाचे, अशी वाटणी नव्हती. १९५५ मध्ये दोघांनी ‘हार्वर्ड विद्यापीठा’च्या विधि महाविद्यालयात आपले नाव नोंदवले. रूथ यांना पावलोपावली स्त्री-पुरुषांमधील भेदाला सामोरे जावे लागत होते. मानवनिर्मित खाचखळग्यांतून त्या धीराने मार्ग काढत होत्या. विधि महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षात असतानाच मार्टिन कर्क रोगाने आजारी पडले. हे आव्हानही त्यांनी मोठ्या धीराने स्वीकारले. आई म्हणून अपत्याची जबाबदारी, पत्नी म्हणून नवऱ्याची शुश्रूषा आणि विद्याध्ययन अशा तीन भूमिका त्या कौशल्याने पार पाडत होत्या. मार्टिन आजारी असल्यामुळे त्यांच्याही सर्व नोट्स त्या लिहून देत असत.

हार्वर्डमधील शिक्षणाच्या काळात त्यांना आणखी एका आव्हानाला सामोरे जावे लागले. त्यांना आपले मातृत्व लपवून ठेवावे लागले. त्यांच्या विद्यापीठात ५०० मुलगे होते आणि  मुली फक्त ९ होत्या. विद्यापीठाच्या अधिष्ठात्यांनीही त्यांना एकदा असे विचारले होते की, ‘तुला हा अभ्यास झेपणार नाही. तू एका मुलाची जागा का अडवतेस?’ पण एक ‘स्त्री’ विद्यार्थिनी काय करू शकते हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. हार्वर्ड विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या ‘हार्वर्ड लॉ रीव्ह्यू’ आणि ‘कोलंबिया लॉ रीव्ह्यू’ या दोन महत्त्वाच्या प्रकाशनांमध्ये सहभागी होणारी पहिली स्त्री, हा मान त्यांना मिळाला.

रूथच्या यशातील प्रत्येक टप्प्यावर मार्टिन यांचा महत्त्वाचा वाटा आहे. या कठीण काळात त्यांच्या संसाररथाची चाके एका समांतर रेषेवर चालत होती. मार्टिन तत्कालीन समाजाच्या विचारप्रवाहाविरुद्ध जात होते. रूथच्या आईने रूथ यांच्यात शिक्षणाचे बीज पेरले. त्यांनी स्वत: त्याला खतपाणी घालून जोपासले आणि मार्टिन यांनी त्याला आधार देऊन छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर केले! रूथ सर्वोच्च न्यायालयाच्या सहाय्यक न्यायाधीश झाल्या तेव्हा मार्टिन अभिमानाने म्हणाले होते, ‘तू कायद्याच्या क्षेत्रात प्रगती करत सर्वोच्च जागी पोहोचताना पाहणं, ही एक पर्वणीच होती.’ (‘What a treat, it has been to watch you progress to the very top of the legal world !’) लॉ स्कूलनंतर नागरी प्रक्रियेवर (सिव्हिल प्रोसीजर्स) तुलनात्मक अभ्यास करण्याचा प्रकल्प रूथ यांनी हाती घेतला. त्यासाठी स्वीडिश भाषा शिकण्यासाठी त्या काही काळ स्वीडनमध्ये राहिल्या. त्या काळात स्वीडनमध्ये स्त्रीवादाचा पुरस्कार सर्वत्र चालू होता. ‘स्त्री आणि पुरुष दोघांच्याही भूमिकेत तरतम नाही’ या स्वीडिश स्त्रियांच्या विचारांचा रूथ यांच्या विचारांवर खोलवर परिणाम झाला.

स्वीडनहून परतल्यानंतर त्या रटगर्स विद्यापीठाच्या लॉ स्कूलमध्ये प्रोफेसर म्हणून काम करूलागल्या. तेव्हाही लिंगभेदामुळे त्यांना आपले गरोदरपण सर्वांपासून लपवून ठेवावे लागले; पण हार न मानता, येणाऱ्या अनुभवातून त्या कणखर होत गेल्या. १९७२ मध्ये कोलंबिया लॉ स्कूलमध्ये रूथ यांची प्रोफेसर म्हणून नियुक्ती झाली. लवकरच ‘एसीएलयू’मधील (अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज युनियन) प्रकल्पाच्या त्या ‘जनरल कौन्सल’ झाल्या. लिंगविषमतेच्या विविध प्रकरणांत रूथ सर्वोच्च न्यायालयासमोर लढल्या. काही प्रकरणे अमेरिकेच्या न्यायक्षेत्रात मैलाचा दगड ठरली. १९७२ मध्ये रूथ यांनी ‘एसीएलयू’मध्ये समाजातील स्त्री-पुरुषांच्या दैनंदिन जीवनातील कार्यात्मक फरक नाहीसे करणारे, मूलगामी स्वरूपाचे असे ‘विमेन्स राइट्स प्रोजेक्ट’ सुरू करण्यात पुढाकार घेतला होता.

रूथ यांनी स्त्रियांच्या समान हक्कांसाठी कायदाच बदलला असे नव्हे, तर समाजातील स्त्री-पुरुषांच्या मूलभूत भूमिकेतही फरक घडवले. एक घटना सांगता येईल. स्टीफन व्हिजनफिल्ड या व्यक्तीच्या बायकोचे बाळंतपणात निधन झाले. स्टीफनला बाळाचे संगोपन करावयाचे होते म्हणून त्याने ‘सोशल सिक्युरिटी’कडे मदतीसाठी अर्ज केला; पण तेव्हा त्याला उत्तर मिळाले, की एखादी विधवा या मदतीसाठी पात्र आहे, विधुर नाही. रूथ यांनी हे प्रकरण हाती घेऊन युक्तिवाद केला, की ‘कुटुंब सर्वांचे आहे. हे काम आईचे, हे वडिलांचे, अशी कामाची वाटणी करणे बेसनदशीर (असंवैधानिक) आहे. या वाटणीमुळे स्त्रीला समान हक्काच्या पाऊलवाटेवरून चालता येणार नाही. ती पिंजऱ्यात कोंडली जाईल. तिची अवस्था स्वातंत्र्य हरवलेल्या पक्ष्यापेक्षा वेगळी नसेल. तसेच स्त्री-पुरुष यांच्यातील असमानतेमुळे पुरुषांचेही नुकसानच होत आहे.’ रूथ यांचा हा युक्तिवाद अतिशय गाजला. त्या खटला जिंकल्या आणि न्यायशास्त्राच्या इतिहासात लिंग समानतेची, स्त्रियांच्या हक्काची नोंद झाली.

रूथ यांनी जस्टिस म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केल्यानंतरचा महत्त्वाचा व प्रसिद्ध खटला म्हणजे ‘युनायटेड स्टेट्स विरुद्ध व्हर्जिनिया’. ‘व्हर्जिनिया मिलिटरी इन्स्टिट्यूट’मध्ये स्त्रियांना प्रवेश नव्हता. रूथ यांनी याविरुद्ध जोरदार आवाज उठवला आणि त्यात त्या यशस्वी झाल्या. त्यांनी हा क्रांतिकारक निर्णय दिला, ज्याचे पडसाद जगभर उमटले. अमेरिकी स्त्रीचाच नव्हे, तर हळूहळू जगभरातील स्त्रियांना त्याचा फायदा झाला. वकिली करत असताना त्या आपल्या मुद्द्याचे समर्थन शांतपणे, निर्भीडपणे, पण अतिशय परखड शब्दांत करत असत. वक्तृत्व शैली, आत्मविश्वास, मुद्देसूद मांडणी आणि बुद्धिवादी युक्तिवाद, यामुळे अमेरिकेच्या न्यायक्षेत्रात त्या यशाच्या शिखरावर पोहोचल्या.

१९८० मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जिमी कार्टर यांनी कोलंबिया डिस्ट्रिक्टच्या ‘यूएस कोर्ट ऑफ अपील्स’वर त्यांची नियुक्ती केली. या पदावर रूथ यांनी १३ वर्षे काम केले. त्यानंतर १९९३ मध्ये अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी त्यांची नियुक्ती अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात ‘असोसिएट जस्टिस’ (सहाय्यक न्यायाधीश) म्हणून केली. त्या वेळी भाषणात आपल्या आईविषयी कृतज्ञता व्यक्त करताना रूथ म्हणाल्या, ‘ज्या काळात स्त्री स्वत:ची महत्त्वाकांक्षा पूर्ण करू शकेल आणि ज्या काळात मुलांइतकेच मुलींचेही स्वागत होईल, त्यांना समान हक्काने जगता येईल, अशा काळात जगण्याचे माझ्या आईचे स्वप्न होते आणि मी आता त्या जगात उभी आहे. मी तो काळ जगते आहे. मी देवाची ऋणी आहे.’ या पदावर त्या २७ वर्षे कार्यरत होत्या. १९९९ मध्ये रूथ यांना ‘जेंडर इक्वॅलिटी’ (लिंग समानता) आणि ‘सिव्हिल राइट्स’ (नागरी हक्क) या क्षेत्रातील योगदानाबद्दल अमेरिकन बार असोसिएशनचा Thurgood Marshall ’ हा पुरस्कार मिळाला.

१८ सप्टेंबर २०२० पर्यंत, आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी न्यायालयातील एकही ‘ओरल आग्र्युमेंट’ चुकवले नाही. त्यांना कर्क रोग होऊन केमोथेरपी चालू असताना, तसेच २०१० मध्ये जेव्हा पती मार्टिन यांचे निधन झाले, तेव्हाही त्यांच्या कामात खंड पडला नाही. रूथ अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या दुसऱ्या स्त्री जस्टिस म्हणून कार्यरत होत्या. मार्गात येणाऱ्या अनेक अडचणींना तोंड देत, लिंगभेदांविषयीचा कायदा बदलून कायदेशीर नियमावली तयार करण्यात त्या यशस्वी झाल्या. ध्यानी-मनी-स्वप्नी त्या जस्टिस म्हणूनच जगत होत्या.

स्त्रीच्या समान हक्कांसाठी सुरू केलेल्या युद्धामधील त्या जणू प्रमुख योद्धा होत्या. अतिशय गंभीर मुद्दासुद्धा हलक्याफु लक्या सहजतेने मांडण्यात त्यांचा हातखंडा होता. म्हणूनच त्यांचे चाहते त्यांना गमतीने ‘नटोरियस आरबीजी’ असे म्हणत असत. वयाच्या       ८० व्या वर्षापर्यंत त्या सर्व वयोगटांतील स्त्रियांसाठी जणू ‘रॉकस्टार’ झाल्या होत्या. रूथ प्रसिद्ध माहितीपटाचा विषय झाल्या, जीवनचरित्रपटाच्या नायिका झाल्या, ‘टाइम’ मासिकाच्या मुखपृष्ठाच्या ‘स्टार पर्सनॅलिटी’ झाल्या. २०१६ मध्ये स्वत:च्या अनुभवांवर लिहिलेले त्यांचे ‘माय ओन वर्ड’ हे पुस्तक ‘न्यूयॉर्क टाइम्स’चे सर्वाधिक खपाचे पुस्तक ठरले.

स्त्रीच्या समान हक्कांसाठी सुरू केलेल्या लढ्याच्या शिल्पकार, अमेरिकेची न्यायव्यवस्था ऐतिहासिक उंचीवर नेणाऱ्या रूथ यांची न्यायाची पेटती मशाल जरी आज लौकिक अर्थाने विझली असली, तरी संपूर्ण स्त्री जातीवर त्यांनी पसरवलेला समानतारूपी प्रकाश स्त्रियांच्या कर्तृत्वातून चमकत आहे. सन्मानाने जगणाऱ्या स्त्रीचे असामान्य कर्तृत्व हीच रूथ बेडर गिन्सबर्गना खरी श्रद्धांजली ठरेल.

meghana.sahitya@gmail.com