|| प्रा. मीनल येवले

uran, fishers, financial crisis
मत्स्यसंपदा घटल्याने लाखो मच्छीमारांवर आर्थिक संकट
children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
A minor girl commits suicide due to not being able to bear the pain of menstruation Mumbai
मुंबई: मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास

आजही गावांमध्ये अनेक ठिकाणी दिसणाऱ्या मातीच्या चुली सारवण्यापासून त्यावर खरपूस भाकऱ्या भाजण्यापर्यंत तिच्याशी पूर्वापार जोडलं गेलेलं स्त्रीचं नातं खास आहे. आता चुलीची शेगडी झाली, पण स्वरूप बदललं तरी स्त्रीचा तिच्याशी ऋणानुबंध आहेच. खचणं, झिजणं हा मातीचा धर्म! म्हणूनच चुलीचे कानेकोपरे लिंपत राहावे लागतात आणि गिलाव्यानं ती होत राहते पुनर्नवी. तसंच असतं का बायकांचं जगणं? वाट्याला येणारी दु:खं स्त्री मुकाट्यानं सोसते; पण नव्यानं उगवणाऱ्या पहाटेबरोबर जगण्याचं रोज नवं बळही आणते.   

‘घरोघरी मातीच्या चुली’ ही म्हण ऐकत आपण लहानाचे मोठे झालो.  त्याचा मथितार्थ वेगळा असला, तरी वाचार्थाने पाहिलं तर किती सार्थ आहे ना ही म्हण! पहाटे उठल्यापासून रात्रीपर्यंत आईसारखं चूलच तर आपलं भरणपोषण करत होती, ऊब देत होती. त्या दगडाच्या, मातीच्या चुलीशिवाय कोणे एके काळी तरी दुसरं कोणतंही साधन नव्हतं. काळ बदलत गेला, मातीच्या चुलीला गॅसवर चालणाऱ्या धातूच्या शेगडीचा पर्याय आला.  गतिमान झालेल्या जगण्यासाठी, शहरी जीवनमानासाठी गॅसची शेगडी उपयोगाची ठरू लागली. बघता बघता ग्रामीण संस्कृतीतही ती रुळली, रुजली; पण म्हणीतली सार्थकता आजही कायम आहे आणि ती राहणारच, कारण ती अर्थवाही असून सामान्य माणसाच्या जगण्याचे अनेक संदर्भ तिच्या पोटी दडलेले आहेत.

वर्षानुवर्षांपासून वाफाळलेल्या गरमागरम चहानं पहाटेची सुरुवात करण्याची सवय आपल्या अनेक पिढ्यांच्या अंगी पक्की मुरली. त्यासाठी पहाट झाल्यापासून घरातल्या कर्त्या पुरुष वर्गाच्या हाती गरम चहाचा कप देता यावा, यासाठी किती तरी वेळेआधी घराघरांतल्या गृहिणीचं चुलीला आंजारणं, गोंजारणं सुरू होई. कधी हे काम काही घरातले बापेही करत. एकदा का घराघरांतून असा ‘यज्ञ’ पेटला, की सारं निरेपिरे होईपर्यंत तो धगधगतच असायचा. दूध, चहा, आंघोळीचं पाणी, रांधण, यातून मग तिला दुपारपर्यंत तरी काही उसंत मिळायची नाही; पण कष्टाळू, मजुरी करणाऱ्या आयाबायांना घरातलं भराभर उरकू न कामावर जावं लागत असल्यामुळे स्वयंपाक झाल्यावर चूल एकदाची निवली की पुन्हा सांजेलाच पेटणार. घरात लहान पोरंबाळं असली, तर आईचा जीव टांगणीला लागायचा. त्यांच्या दिवसभराच्या भाजीभाकरीची झाकझूक करून तिचा जीव दिवसभरासाठी निश्चिंत होई.

परंपरागत भारतीय पुरुषप्रधान व्यवस्थेत स्त्रियांचं कार्यक्षेत्र ‘चूल आणि मूल’ इथवर मर्यादित होतं. शेतीप्रधान समाजव्यवस्थेत एकत्र कुटुंबपद्धती अस्तित्वात असल्यानं दोन-चार पिढ्यांचे सदस्य एकत्र राहात. घराबाहेरची कामं पुरुष सांभाळत असल्यामुळे लेकरं सांभाळण्याचं आणि भाकरी बडवण्याचं काम स्त्रियांचं! एकूणच स्त्रियांचं जगणं बराच काळपर्यंत या चुलीभोवतीच गुरफटलेलं होतं.

स्त्रीस्वातंत्र्याचे वारे वाहू लागले. घराघरांत बंदिस्त असलेल्या स्त्रीच्या मनात जोतिबा-सावित्रीनं शिक्षणाचा दीप उजळवला आणि मग चूल-मूल सांभाळूनही ती हळूहळू स्वत:च्या अस्मितेसाठी, घराबाहेरच्या अंगणात मुक्त श्वास घेण्यासाठी धडपडू लागली. तिथपासून सुरू झालेला असा तिचा आजवरचा प्रवास. आता ती घर आणि बाहेर अशा दोन्ही आघाड्या समर्थपणे पेलत आहे; पण स्त्रीच्या स्वातंत्र्याचा कितीही उच्चार होत असला, तरी मैलोगणती दूर असलेल्या खेड्यापाड्यांतील माताभगिनी आजही शिक्षणापासून, स्वातंत्र्यापासून बऱ्याच दूर आहेत. अजूनही बऱ्याच ग्रामीण, आदिवासी आणि काही प्रमाणात शहरी भगिनींच्याही वाट्याला आलेलं ‘चूल-मूल’ संपलेलं नाहीच. स्वरूप बदललं, मूळ भाव तोच आहे. ‘अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर…’ प्रत्यक्षात चुलीजवळ बसून रांधत असताना बसणाऱ्या चटक्यांचा आणि संसारात तडजोडी करताना सोसाव्या लागणाऱ्या तापव्यापाचा मेळ घालत, निरक्षर, परंतु प्रतिभावंत असलेल्या बहिणाबाई चौधरींनी रचलेलं स्त्रीजन्माचं सोसणं, भोगणं व्यक्त करणारं हे काव्य म्हणूनच तर असतं आयबायांच्या ओठांवर!

घरातली चूल असते मातीची. खचणं, झिजणं हा मातीचा धर्म! चुलीचे कानेकोपरे लिंपत राहावे लागतात, तिला गिलावा करावा लागतो आणि मग ती होत राहते पुनर्नवी. या चुलीसारखंच असतं का बाईचं जगणंही? तिच्या वाट्याला येणारी दु:खं, कष्ट, अभाव, व्यथा, वेदना ती मुकाट्यानं सोसते. लेकरांसाठी, त्यांच्या भविष्यासाठी नव्यानं उगवणाऱ्या पहाटेबरोबर ती जगण्याचं रोज नवं बळ आणते.

गावात पुढील शिक्षणाची सोय नसल्यानं ‘बी.ए.’नंतर १९८५ ला नागपुरात मी काकाकाकूंकडे शिकायला आले. काकूच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच इथे मी गॅसशेगडी हाताळत होते. मजा, धास्ती आणि कौतुक असे सुरुवातीचे संमिश्र भाव संपून लगेच मग त्याची सवयच होऊन गेली. हवं तेव्हा कळ फिरवली की  भर्रकन चहा, कमी वेळात स्वयंपाक आणि इतरही बऱ्याच गोष्टी. सगळं किती सोयीचं.

  गावी असेपर्यंत तरी आमच्या सुर्जी अंजनगावातल्या मातीच्या घरात चुलीशिवाय पर्यायच नव्हता. दारातून प्रवेश केल्यावर छोटं अंगण, त्यापुढे बऱ्यापैकी मोठी, लांब टिनाची ओसरी. ती ओसरी म्हणजेच आमचं स्वयंपाकघर. स्वयंपाकघर बंदिस्त असं नाहीच. मातीची अंगणाला अर्ध्यापर्यंत चढवलेली भिंत नि त्याला लागून आतल्या बाजूनं चुलीची जागा. उल्यासह असलेली एक मोठी चूल नि तिच्याच बाजूला पुन्हा एक छोटी चूल. त्याला ‘इटोला’ म्हणत. जास्तीचा स्वयंपाक, वा एकाच वेळी वेगळे काही पदार्थ करायचे असतील तर तो पेटवला जाई. एरवी वापरात हीच मुख्य चूल.

पहाटेला चूल पेटवणं म्हणजे एक मोठा कार्यक्रमच. उन्हाळ्यात वा कोरड्या दिवसांत तुराटी, पऱ्हाटीची मूठ लावून, कागदाच्या सहाय्यानं चूल सहज शिलगावली जाई.      पाण्या-पावसाच्या दिवसांत चूल पेटवणं म्हणजे भारीच काम. सर्दावलेल्या तुराट्या-पराट्या पेटवण्यासाठी मग जाड्या काडीला चिंधी गुंडाळायची, ती रॉकेलच्या बाटलीत बुडवायची, त्या टेंभ्याच्या सहाय्यानं मग हळूहळू चुलीतल्या मुठीनं पेट घेतला की हळूच एक एक लहानशी इंधनाची काडी सरकवायची. बायांचा भरपूर वेळ आणि कौशल्य या कामी लागायचं. घराघरांतून हीच कसरत चालायची.

धन्य त्या मायमाऊल्या ज्यांनी गजबज गोकुळाला न कुरकुरता सजवलं, वाढवलं, घडवलं. तेव्हा लेकरांची संख्याही प्रत्येक घरी जरा अधिकच असायची. आम्ही आठ बहीण-भावंडं. एक बहीण आजीकडे राहात असली तरी आम्ही सात जण होतोच. आई शेतात जात नव्हती; पण सडा-सारवणापासून विहिरीचं पाणी काढण्यापर्यंतची सारी कामं तिला घरीच करावी लागत. भवतालच्या प्रत्येकच बाईचं जगणं कष्टमय होतं. मला कळायला लागलं तेव्हापासून आईच्या बरोबरीनं ताई घरकामात मदत करताना दिसायची. चहा, पाणी, नंतर आंघोळीचं पाणी असं सुरू असतानाच सर्वांत प्रथम आई वरण रांधायची. डाळीला एक उकळी आली की उल्यावर अगदी मंद आचेवर ती शिजत राहायची. तोवर आईची आंघोळ, तिचं नऊवारी नेसणं, कपाळाला  कुंकू लावणं, की मग उरला स्वयंपाक. कधी भाकरी, कधी पोळ्या. आई पूर्ण हातावर थापूनच मोठी, गोल भाकरी करायची. तव्यावरून मग ती शेवटी चुलीतले कोळसे समोर ओढून परायाशी भाजली जायची. मस्त गाभेदार जाडसर पोपड्याची भाकर. मला त्या ताज्या भाकरीचा तेल-मीठ लावून राखेवर भाजलेला पोपडा खूपच आवडायचा. ताजी भाकर खाणं जिवावर येई. शिळी भाकर आम्हा सगळ्याच भावंडांना विशेष आवडायची!

गोवऱ्यांच्या राखेत भाजलेले रोडगे (ज्याला कुठे पानगे म्हटलं जातं, कुणी छोट्या आकारातल्या पानग्यांना बिट्ट्या म्हणतात.) दर सोमवारी ठरलेले. आई तेल, मीठ, ओवा घालून घट्टसर मळलेल्या अदलीभर कणकेचा एकेक रोडगा करायची. वरणाच्या सतलीवर प्रथम रोडग्याचा बाह्य भाग वाफेनं थोडा कडकसर झाल्यावर, गोवऱ्यांच्या गरम राखेत आई तो रोडगा दाबून ठेवायची. आतपर्यंत शिजताना त्याला चांगले दीड-दोन तास तरी लागतातच. दोन रोडगे आतमध्ये गरम चुलीत, एक-दोन चुलीच्या तोंडाशी, असे ते हळुवार शिजून यायचे. सोबतीला वरण आणि कोहळ्याची वा वांग्याची भाजी, असा सर्वांच्या आवडीचा खास मेनू ठरलेला. सोमवारी आई-बाबांचा उपवास. त्यांना रात्री जेवायचं नसल्यामुळे रोडग्यांनी आमची रात्रीचीही सोय होऊन एखाद्या दिवशी आईला स्वयंपाकाला आराम मिळायचा.

आमचा परिसर कंदाच्या लागवडीसाठी प्रसिद्ध.  घरातल्या टोपलीत कंद हमखास असायचेच. स्वयंपाक झाल्यावर चुलीतल्या गरम राखेत आई कंद घालून ठेवायची. तो राखेत भाजलेला, गुलाबीसर झालेला कंद त्यातील पाणी आटून गेल्यानं फारच गोड  लागायचा. ओल्या भुईमुगाच्या शेंगांच्या दिवसांत पाणी तापवायच्या जाड पितळेच्या कळशीत मीठ घालून उकडलेल्या शेंगांची चव अजूनही जिभेवर आहे. चुलीत भाजलेली मक्याची कणसं, वाटाण्याच्या शेंगा, अशा आजोबांच्या शेतातल्या रानमेव्यावर बालपण पोसलं गेलं. चिंचा खाऊन झाल्यावर चिंचोके जमा करून, चुलीतल्या गरम राखेत भाजलेले चिंचोके कंपासपेटीत वा खिशात भरून त्याचं मैत्रिणींमध्ये ‘शेअरिंग’ चालायचं.

थोडक्यात, चूल म्हणजे घराचा आत्मा! चुलीशिवाय घराची कल्पनाच संभवत नाही. ती अग्निदेवता, अन्नदात्री. मानवाला अग्नीचा शोध लागला नि जगणं अधिक सोयीचं होत गेलं. कालांतरानं आपल्या बुद्धीचा वापर करून मानवानं अग्नीला चुलीच्या आश्रयानं संयमित केलं आणि हवं तसं, हवं तेव्हा तिला तो उपयोगात आणू लागला. त्याचं सारं जगणं चुलीवरच विसंबून. म्हणून चुलीची पूजा केली जाते. आईचा दररोज एक नैवेद्य  चुलीसाठी असायचाच. नवीन चूल वापरण्यास सुरुवात करण्यापूर्वी गृहिणी हळदी-कुंकू लावून तिची पूजा करते. आजही लग्नसमारंभात घरच्या बाईनं चुलीची पूजा केल्याशिवाय आचारी स्वयंपाकाला सुरुवात करीत नाहीत. विदर्भात लग्नघरी शुभकार्याची सुरुवात करताना अजूनही मातीच्या चुली घडवल्या जातात.

आमच्या गावात घराघरांत चुली बांधण्यासाठी गढीची पांढरी माती वापरली जायची. वर्षानुवर्षांपासून वापरूनही ती पुरतच आली आजवर. घरोघरी याच मातीच्या चुली असायच्या. गढीच्या मातीपासून बनवलेली चूल चांगली घोटीव, चोपडी होते, चुलीला उल जात नाही, असा अनुभवातून आयाबायांचा समज झालेला होता. आईच्या हातची चूल रेखीव, आटोपशीर. चूल आणि उल्यातलं अंतर, उल्यावरच्या भांड्याला नीट जाळ लागावा म्हणून आतून ठेवलेली माया, याचा आईला चांगलाच हुनर असावा, कारण बऱ्याच आजूबाजूच्या घरी तिच्याच हातच्या चुलीचा मुहूर्त असायचा. घरच्या बाईनं चुलीसाठी ओटा घालून ठेवल्यावर तिच्यात चूलपण आणण्यासाठी आईसुद्धा दुपारच्या वेळी हौशीनं जायची.

बाईपण वाट्याला आलेल्या प्रत्येकच मुलीची या चुलीशी जाणत्या वयापासूनच नाळ जुळत जाई. आठवीपासून भाकरी करून बघायची हौस. माझ्या शिकत्या हाताच्या त्या छोट्या छोट्या, जाड्याभरड्या, कडक भाकऱ्या भाऊ लोकांना विशेष आवडू लागल्यामुळे मग मला भाकरी करायला अधिकच मजा वाटायची.

   अकरावीत गेल्यापासून माझं सकाळचं कॉलेज असल्यानं पहाटे उठून चूल पेटवण्याचं काम आपोआपच माझ्याकडे आलं. निदान एक दिवसाआड तरी चूल सारवली पाहिजे, सणाच्या दिवशी तर सारवूनच चूल पेटवायला हवी, असा आई आणि ताईचा नियम; नव्हे दंडकच. चूल सारवण्यासाठीसुद्धा गढीची पांढरी मातीच वापरली जायची. वर्षभरासाठी माती भिजवून तिचे गडे केलेले असायचे. एक गडा भिजवायचा. चूल सारवण्यासाठीचं भांडं वेगळं, पोतेरा वेगळा. चुलीचा उला आतून सारवताना हात चांगलाच काळा व्हायचा; पण नेम चुकवून चालायचं नाही. रात्रीच्या स्वयंपाकानंतर पहाटेपर्यंत चूल थंड झाली असली, तरी तिच्यात ऊब मात्र कायम असायची. सारवतानाचं तिचं पोतेऱ्यातली ओल शोषून घेणं, सर्र करून तिच्यातून निघणाऱ्या वाफा, अंधार-उजेडाच्या त्या निवांत प्रहरी घर झोपलेलं असतानाचा तिचा नि माझा चाललेला नि:शब्द संवाद…

आजही आठवतं सारं… चूल सारवतानाचा तो वेगळा गंध अजूनही मनात भरून राहिला आहे!

minalyeole01@gmail.com