काळीजनाते!

अगदी नववीपर्यंतच शिक्षण झालेल्या सलमा आपल्या लिखाणानं आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहोचल्या आहेत.

|| ऋता ठाकूर

‘इरंधम नामशीन कधाई’ या तमिळ कादंबरीच्या ‘मध्यरात्रीचे तास’ या  मराठी अनुवादास नुकताच ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ जाहीर झाला. या कादंबरीच्या मूळ लेखिका सलमा या स्त्रियांचा संघर्ष प्रखर शब्दांतून मांडणाऱ्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या लेखिका-कवयित्री म्हणून प्रसिद्ध आहेत. स्त्रीनं लेखिका असण्याचं त्यांच्या दृष्टीनं काय महत्त्व आहे? तिला तिच्या भावना व्यक्त करण्यासाठी किती अडथळे पार करावे लागतात? हे त्यांच्याशी बोलल्यावर उलगडतं. प्रत्येक स्त्रीच्या व्यथा-वेदनांना जणू आपल्या लेखनातून मूर्तरूप देत सलमा यांनी प्रत्येकीशी काळीजनातं जोडलं आहे.

 ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ जाहीर झाले, वर्तमानपत्रात बातमी झळकली, मराठीसाठी लेखिका-अनुवादकार सोनाली नवांगुळ यांना आणि संस्कृतसाठी डॉ. मंजूषा कुलकर्णी यांना हा पुरस्कार जाहीर झाला. या दोन हुशार स्त्रियांशी बोलायलाच हवं, असा विचार मनात आला. त्यांच्या मुलाखती घ्यायची व त्यांच्यावर लिहायची संधीही मला मिळाली. तरीही अजून काही तरी राहिलंय, असं वाटत होतं. मन अपूर्ण गोष्ट शोधत होतं. त्याच वेळी, सोनाली यांनी ज्या कादंबरीचा अनुवाद करून ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ लिहिली, त्या मूळच्या तमिळ कादंबरीची लेखिका सलमा आणि ‘इरंधम नामशीन कधाई’ या कादंबरीविषयी माहितीही मिळाली. साहजिकच सलमा यांच्याशी बोलण्याचा मोह झाला आणि मी तो टाळला नाही.

 जेव्हा मी ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ वाचत होते तेव्हापासूनच या          लेखिके विषयी आत्मीयता वाटू लागली. त्यांच्याविषयी कु तूहल जागृत होऊ लागलं. स्त्रियांसाठी लिहिणारी, त्यांचे प्रश्न मांडणारी, समाजाच्या दृष्टीनं बंडखोर लेखिका, कवयित्री, जिला कुटुंबाच्या, समाजाच्या भीतीनं बाथरूममध्ये कविता लिहाव्या लागल्या. ती बंडखोर स्त्री कशी असेल? तिला आधी स्वत:शीच लढावं लागलं असेल, नंतर कुटुंबातील रूढी-परंपरा, अंधश्रद्धांशी, नंतर समाजानं स्त्रियांवर जी दडपशाही लादली आहे त्याविरुद्ध. असा प्रदीर्घ संघर्ष असणारी सलमा मला का आवडणार नाही? एक सुप्त आकर्षण अगदी मनाच्या तळापासून वाटू लागलं. आमच्यात जात, धर्म, शहरांतील अंतर, भाषा, काही काहीच आडवं आलं नाही. सलमा आणि माझ्यातला पहिला संवाद खूप छान झाला. आधी मोबाइलवर थोडं ‘चॅट’ केलं. माझं तोडकं मोडकं  इंग्रजी आणि त्यांचं संवाद साधणारं चांगलं इंग्रजी. मला त्यांची मुलाखत घ्यायची होती. त्यांची मातृभाषा तमिळ, मला तर ती येत नाही आणि माझी मातृभाषा मराठी, ती त्यांना येत नाही. मग आली का पंचाईत! मी त्यांना विचारलं, ‘‘कॅन यू स्पीक इन हिंदी?’’ गोड आवाजात त्या म्हणाल्या, ‘‘नो मा नो!’’ माझा पुढचा प्रश्न, ‘‘डू यू नो उर्दू?’’ त्या पुन्हा हसल्या आणि ‘‘नो…नो’’ म्हणाल्या. साहजिकच इंग्रजीला पर्याय नव्हता. त्यांनी आणखी एक पर्याय दिला. म्हणाल्या, ‘‘माझं वेळेचं गणित खूपच अवघड आहे. तू एक काम कर, मला प्रश्न पाठव, मी उत्तरं लिहून पाठवते.’’ एकाच फोनमध्ये प्रश्न सुटला.

 पण जेव्हा त्यांचं आयुष्य समजून घेत गेले, त्या वेळी लक्षात आलं, की प्रत्यक्ष जगताना त्यांना खूपदा अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागली. त्यांचे अडथळे म्हणजे अंधश्रद्धा, रूढी-परंपरा,  त्यांचं स्त्री असणं. म्हणून त्या लिहू शकत नव्हत्या का? त्यांची लेखणी पारंपरिक पुरुषी मानसिकतेला नाकारू पाहाते. जी सामाजिक दडपशाही आहे ती झुगारून देऊ पाहते. हे लिखाण कोणासाठी? ही धडपड कोणासाठी? आपल्याचसाठी मैत्रिणींनो! आपल्याला त्रास होऊ नये, जे काम आपण करतो आहोत ते अगदी सहज करू शकू, याचसाठी सलमा लढत आहेत. आपल्याला एक वाट करून देत आहेत. त्यांच्या वाट्याला जे आलं ते इतरांच्या वाट्याला येऊ नये यासाठी आपल्या वाटेवरचे काटे त्या आपल्या पदरात गोळा करत आहेत. खड्डे बुजवत, बुजवत त्या पुढे जात आहेत. ती मळवाट आता आपली वाट पाहते आहे, आपल्या चालण्यासाठी! ही वाट कुठे घेऊन जाईल आपल्याला?         एक माणूस म्हणून जगणं सोपं करणाऱ्या शिखराकडे…

अगदी नववीपर्यंतच शिक्षण झालेल्या सलमा आपल्या लिखाणानं आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहोचल्या आहेत. त्यांच्या पहिल्याच कादंबरीनं त्यांना भरभरून मानसन्मान दिले. त्यांनी लिहिण्यासाठी ज्या यातना सहन केल्या, त्यावर त्यामुळे फुंकर घातली गेली. त्या म्हणतात, ‘मला जे लिहायचं आहे, ते लिहिण्यासाठी अनामिका होऊन लिहावं लागलं.’ जिथं आपलं स्वत:चं साधं पेनही कोणी घेतलं, की आपण अस्वस्थ होतो, तिथे सलमांना आपलं लिखाण, आपली ओळख लपवून लिहावं लागतं. हा के वढा मोठा अधर्म! मी त्यांना विचारलंसुद्धा, ‘‘कसं शक्य झालं अनामिका होऊन लिहिणं?’’ त्या म्हणाल्या, ‘‘व्यक्त होणं, स्त्रियांच्या हक्कांसाठी, प्रश्नांसाठी, त्यांच्या समस्यांसाठी लढणं ही माझी प्राथमिक गरज होती. माझं कुटुंब, माझा समाज मला लिहू देईना, ही माझी मुख्य अडचण होती. अनामिका होऊन लिहिणं शक्य झालं, सोपं झालं, कारण त्यात कोणतंही बंधन नव्हतं, कोणताही दबाव  नव्हता. मी मुक्तपणे मला जे पाहिजे ते लिहू शकत होते, ही गोष्ट मला माझ्या नावापेक्षा जास्त मोठी वाटली. माझ्या आईवडिलांनी माझ्या कविता लिहिण्याला तसा विरोध केला नाही; पण समाजानं आक्षेप घेतला. मुस्लीम स्त्रीनं घरात राहावं, आपला चेहरा आणि शरीराचा कोणताही भाग इतरांच्या दृष्टीला पडू देऊ नये, अशी समाजमान्यता असताना, मी कविता कराव्यात, समाजासमोर यावं, ही बाब तशी समाजाच्या विरुद्ध जाणारी होती. नंतर कुटुंबानंही विरोध सुरू केला.’’ सलमा सांगतात, ‘‘लग्न ठरताना माझं काव्यलेखन हाच एक मोठा अडथळा होता; पण मी टोपणनावानं लिहीन, असं सांगितलं आणि माझं लग्न झालं. सगळ्यांनाच वाटलं, की मी संसारात पडले की आपोआपच बदलेन; पण तसं घडलं नाही. मी लिहीतच राहिले नाव बदलून, अनामिका होऊन!’’

  खरं तर खूप आधीपासून, वयाच्या तेराव्या वर्षापासूनच सलमा यांची काव्यप्रतिभा फुलत होती; पण सलमा म्हणतात, ‘‘त्या काळात मी जे लिहिलं, त्याला खऱ्या अर्थानं कविता म्हणता येणार नाही; पण वयाच्या सतराव्या वर्षी मी गंभीरपणे लिहायला लागले. स्त्री-पुरुष नातेसंबंधांवर आणि सामाजिक प्रश्नांवर लिहायला सुरुवात के ली.’’ 

 ‘मकलाचुवाडूफ’( २०००) आणि ‘मयूरमैफ’ (२००३) या साहित्यविषयक नियतकालिकांमध्ये त्यांच्या कविता एकत्रितपणे प्रसिद्ध झालेल्या आहेत. यामध्ये अनुक्रमे साधारण ६० आणि ८० कवितांचा समावेश आहे.  त्यांनी अन्य मासिकांसाठीही लेखन के लं. ‘मकलाचुवाडूफ’ आणि ‘सिल्ली’ येथील ‘मकथाफ’ या नियतकालिकांनी २०१३ मध्ये घेतलेल्या लघुकथा स्पर्धेत त्यांना दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं होतं. ती ‘मृत्यू’ या संकल्पनेभोवती गुंफलेली कथा होती. याच काळात आणखी एक घटना घडली. तमिळ भाषेतील ‘इंडिया टुडे’मध्ये ‘कामाथ पाल’ या शीर्षकाखाली सलमा व इतर तमिळ लेखकांच्या साहित्यावर एक लेख प्रसिद्ध झाला. सनसनाटी पसरवणाऱ्या या प्रक्षोभक लेखामुळे सलमाचा परिवार- विशेषत: त्यांचा पती खूपच नाराज झाला. कुटुंबाला अशा प्रकारची प्रसिद्धी त्रासदायक वाटू लागली. सलमा सांगतात, ‘‘याच वर्षी काही लोकांनी लैंगिक विषयक काव्यलेखनाबद्दल आम्हा चार कवयित्रींवर (मालती मैत्री, सलमा, कुट्टी रेवती, सुकीर्थाराणी) हल्लाबोल केला. व्यक्तिश: अशा हल्ल्यांकडे दुर्लक्ष करणं चांगलं. जे काही वादंग झाले, ते काही पुरुष फिल्मी गीतकारांनी प्रसिद्धीसाठी जाणिवपूर्वक निर्माण केलेले होते. माझ्या कवितांमध्ये मी योनी आणि लिंग यांसारखे शब्द वापरले आहेत. त्यावरून गहजब झाला, मात्र काळाच्या ओघात माझ्या इतर अनेक मुलाखती विविध माध्यमांमधून प्रकाशित झाल्या, तेव्हा माझ्या कु टुंबीयांना या सगळ्या गोष्टींकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन मिळाला.’’  सलमांचं कवयित्री असणं हे वास्तव आता त्यांच्या कुटुंबानं आणि मुख्य म्हणजे समाजानं स्वीकारलं आहे.

 पहिल्या कवितासंग्रहाच्या प्रकाशनाच्या वेळी स्वत:चा फोटो प्रसिद्ध करायला नकार देणाऱ्या सलमा, स्वत:च्याच पुस्तक प्रकाशनाला उपस्थित राहू न शकणाऱ्या सलमा, आता मात्र जिल्हाधिकारी कार्यालयात काही कामासाठी जातात, तेव्हा एक लेखिका म्हणून तिथे त्यांचं स्वागत खूप जोरदार पद्धतीनं होतं. त्यामुळे सलमा म्हणतात, ‘‘मला एक वेगळी ताकद मिळते आहे. अर्थात साहित्यामुळेच!  माझ्या कवितेतून, कथेतून, कादंबरीतून दु:ख, वेदना येते. पुरुषांनी स्त्रियांना दिलेली तुच्छ वागणूक, यातून येणारा राग, नैराश्य हे माझ्या एकटीचे अनुभव नसून ते वैश्विक असतात. समाजात स्त्रीला कशी वागणूक दिली जाते, ते मी रोज पाहते आणि मला ती सहन होत नाही. त्यामुळे या स्त्रियांच्या भावना प्रातिनिधिक स्वरूपात माझ्या साहित्यातून मी व्यक्त करते.’’ समाजाला जाग येईलच, हा आशेचा किरण सलमांच्या मनात आहे.

 सलमा यांनी आता राजकारणातही पाऊल ठेवलं असून त्या ‘डीएमके ’ (द्रविड मुन्नेत्र कळघम) पक्षात आहेत. सर्वच आघाड्यांवर त्या यशस्वीपणे काम करताना दिसतात. कुटुंब, लेखन, राजकारण, प्रत्येक गोष्टीत त्या समरसून गेलेल्या दिसतात. त्यांच्या वागण्यात कोणताही आव नाही. मुलांना सांभाळताना घरच्यांची मदत होते. राजकारणाचा अनुभव विचारताच त्या सांगतात, ‘राजकारण पूर्ण वेळाचं असतं. त्यामुळे इतर कामांचं नियोजन कोलमडतं आणि रोजच्या रोज नव्यानं नियोजन करून कामं करावी लागतात. सारखे फोन येतात, खूप संयमानं काम करावं लागतं. खूप लोक भेटायला येतात, कारण माझ्याकडे महिला शाखेच्या राज्य सचिव पदाची जबाबदारी आहे, त्यामुळे त्यांनाही वेळ द्यावाच लागतो.’’ राजकारणातील हे यश आपल्याला जरी दिसत असलं, तरी सलमा स्वत:ला यशस्वी राजकारणी समजत नाहीत. तसंही आपल्याकडे स्त्रियांना राजकारणात अनेक अडचणी येतात, त्यांना तोंड द्यावं लागतं. पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्रीला साहित्यात आणि राजकारणात कार्य करताना दडपशाहीला तोंड द्यावंच लागतं.

पुन्हा एकदा साहित्याकडे वळत मी त्यांना विचारलं,      ‘‘ ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या अनुवादित पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. तो मिळेल असं वाटलं होतं का?’’ सलमा सहजपणे सांगतात, ‘‘हो, वाटलं होतं तसं!’’ कारण सलमांचं आंतरराष्ट्रीय पातळीवर एक नाही, दोन नाही, तब्बल तीन वेळा कौतुक झालेलं आहे. त्यामुळे, ‘‘ ‘इरंधम नामशीन कधाई’ कोणत्याही भाषेत अनुवादित झालं, तरी मनात एक आशा असते, की याचंही काही तरी नक्की चांगलंच होईल,’’ हा त्यांचा आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणा मनाला भावला.

दक्षिण आशियाई साहित्यासाठीच्या ‘द डीएससी प्राइज’, ‘क्रॉसवर्ड बुक प्राइज’ व ‘मॅन एशियन प्राइस’साठी त्यांच्या साहित्याचं नामनिर्देशन झालं आहे. २००७ मध्ये ‘युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो’मध्ये सलमांच्या संपूर्ण साहित्यावर खास चर्चेचं आयोजन करण्यात आलं होतं. २००९ च्या ‘लंडन बुक फेअर’मध्ये तमिळ साहित्याची एकमेव प्रतिनिधी व सन्मानित अतिथी म्हणून त्या उपस्थित होत्या. सलमांच्या जीवनसंघर्षावर आधारित ‘सलमा’ (२०१३) हा माहितीपट दिग्दर्शक किम लाँगिनोटो यांनी बनवला आहे. या माहितीपटाला तीन आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’कडून ‘मूव्हीज दॅट मॅटर’ या व्यासपीठामार्फत जगभरात दाखवण्याकरिता निवडलेल्या माहितीपटांत ‘सलमा’चा समावेश आहे.

 पुनर्विवाह, एकट्या बायकांचं पुरुषांशिवायचं जगणं, त्यांची लैंगिक भूक दर्शविणारी मोकळी चर्चा, विधवा आणि घटस्फोटिता याचं जगणं, संसारात राहून दडपशाहीत गुदमरणाऱ्या स्त्रियांचे अप्रतिष्ठित आयुष्य, अनेक स्त्रिया अनेक संकटांचा सामना करत जगत असतात, या सगळ्यावर सलमा व्यक्त होतात. सलमा म्हणतात, ‘‘हे जग म्हणजे कुणा एकाची किंवा पुरुषाची खासगी मालमत्ता नाही. कोट्यवधी स्त्रिया पुरुषांबरोबर याच जगात त्यांच्याबरोबरीनं सुखदु:ख अनुभवत असतात. फरक इतकाच की ते सुख तिच्या वाट्याला जरा कमीच येतं. म्हणूनच माझ्या साहित्यातून व्यक्त होणाऱ्या व्यथा-वेदना माझ्यासारखं आयुष्य वाट्याला येणाऱ्या अनेक स्त्रियांच्या आहेत.’’

  सलमांचं साहित्य वाचताना ते जाणवतंच. त्या स्त्रियांच्या पारंपरिक आयुष्याचं धीटपणे निरीक्षण करून स्त्रीविषयक दृष्टिकोनातून निग्रही मांडणी करतात. तसंच त्यांच्या लिखाणात स्पष्टवक्तेपणा, धिटाई, दुर्दम्यता हे गुणही प्रकर्षानं जाणवतात.

सलमा म्हणतात, ‘‘माझी गृहिणी म्हणून ओळख मला आवडत नाही. लेखिका म्हणून असलेली ओळख मला जास्त महत्त्वाची वाटते. लेखिका जेव्हा लिहिते, तेव्हा तिच्या मनातील सर्व भावभावना ती साहित्याच्या रूपात मांडते. लेखक म्हणजे समाजाला शिस्त लावणारा, प्रसंगी कान उपटणारा, कधीकधी लहान मुलाची समजूत घालावी तसं ओंजारणारा गोंजारणारा एक भक्कम आधारस्तंभ असतो. म्हणूनच लेखक म्हणून माझी ओळख मला खूप महत्त्वाची वाटते. त्याचसाठी भविष्यातला माझा जास्तीत जास्त वेळ मी लिखाणाला देणार आहे,’’ असं त्या सांगतात.

  समाजाला सहज न दिसणारे, न जाणवणारे अनेक संघर्ष वाट्यास येणाऱ्या स्त्रिया जेव्हा लिहित्या होतात, तेव्हा ते शब्द काळजातून उमटलेले असतात. सलमांशी बोलून एक जवळची, माझ्याच मनातली भाषा बोलणारी स्त्री भेटल्याची भावना मनात निर्माण झाली. काळीजनातेच जुळले माझे. त्यांचं साहित्य वाचून तुम्हालाही असाच अनुभव येईल… खात्री आहे मला!

वेणा उत्तरघटिकांच्या

या रात्री

मुलांना जन्म दिल्यानंतरच्या

परिचित नागवेपणातून

तू शोधत राहतोस असंतुष्टपणे

माझं कधी काळचं न डागाळलेलं सौंदर्य

तू म्हणतोस,

‘तू खूपच तिरस्करणीय वाटतेस

ओटीपोटावर उमटलेल्या

गरोदरपणाच्या आडव्या-तिडव्या खुणांनी!’

हटू शकत नाहीत

या खुणा माझ्या देहावरून

– आणि तू म्हणत राहतोस

आज, उद्या आणि कायम

‘तू खूपच…’

खरंय,

तुझा देह माझ्यासारखा नाही

तो स्वत:ला उघड करू शकतो

तो स्वत:ला हवा तसा व्यक्त होतो

कदाचित यापूर्वीही

जन्म घेतला असेल तुझ्या मुलांनी

अनेक ठिकाणी… अनेकांच्या कुशीत

– आणि तरीही तुला अभिमान असेल

त्यांच्या जन्माच्या कोणत्याच खुणा नाहीत तुझ्या शरीरावर

मी काय करावं?

माझा नकार असला तरी

दुरुस्त करता येत नाहीत या शारीरखुणा

शरीर म्हणजे कागद नव्हे

जो कापता येईल आणि पुन्हा हवा तसा चिकटवता येईल

पूर्वीसारखा बनवता येईल

खरंच, बेईमान आहे निसर्ग माझ्याबाबतीत

तुझ्यापेक्षाही!

– पण तुझ्यापासूनच सुरू झाला होता

माझ्या उतरणीचा प्रवास

खूप विचित्र आणि विलक्षण

स्वप्नं विपुल पडतात

पूर्वरात्रीपेक्षा उत्तररात्रीत

आता मध्यरात्र आहे

भिंतीवरच्या चित्रात आतापर्यंत शांत बसलेला

हिंस्त्र वाघ

झेपावेल आता माझ्या डोक्यापाशी

आणि टक लावून पाहत राहील

डोळे वटारून माझ्याकडे!

मूळ कविता- सलमा

अनुवाद- सोनाली नवांगुळ

(‘मनोविकास प्रकाशना’च्या सौजन्याने)

rutavijayarv@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Author ruta thakur article intense words of women struggle internationally acclaimed author poet akp

Next Story
धनसंपदा : आर्थिक नियोजन- जाणा पैशाचे मोल
ताज्या बातम्या