संपदा वागळे waglesampada@gmail.com

साठी उलटली की म्हातारपणाचं ओझं अलगद खांद्यावर येतं आणि त्या विचारातच अनेकदा माणूस थकतो, पण आपल्या आजूबाजूला अशी अनेक माणसं आहेत ज्यांनी वयाची सत्तरी, ऐंशीच नाही, तर नव्वदी गाठली आहे; तरी ती कार्यमग्न आहेत. ९० व्या वर्षी स्वेटर विणून पूरग्रस्त मुलांना देणाऱ्या सुशीलाताई अभ्यंकर काय, किं वा ७७ व्या वर्षी विविध विषयांत पदवी घेणाऱ्या, रोज २५ किमी सायकलिंग करणाऱ्या मायाताई सरदेसाई, कर्णबधिर-मतिमंद मुलांसाठी आजही ताठ कण्याने उभ्या असणाऱ्या सत्तरीच्या रेखाताई गायकवाड असोत, की वयाच्या ८१ वर्षी रात्री २ वाजेपर्यंत जागून ‘सुगंधी द्रव्ये’ या विषयावर संशोधनात्मक लेखन करणारे डॉ. दिनेश रांगणेकर.. या साऱ्यांचं आयुष्य अनेकांना स्फू र्तिदायक ठरणारं.. १ ऑक्टोबरच्या ‘आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिना’च्या निमित्तानं..

Kishori Pednekar, pre-arrest bail,
करोना वैद्यकीय साहित्य खरेदीतील गैरव्यवहार प्रकरण : पोलिसांच्या ना हरकतीनंतर किशोरी पेडणेकर यांना अटकपूर्व जामीन
Assured support for Arun Gawli daughter for mayor Controversy over Rahul Narvekar statement
अरुण गवळीच्या कन्येला महापौरपदासाठी पाठिंब्याचे आश्वासन; राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्याने वाद
political fight, murlidhar Mohol, ravindra Dhangekar, pune Metro credit
मेट्रोच्या श्रेयवादावरून मोहोळ- धंगेकर यांच्यात खडाजंगी
Chandrakant Patil instructs angry workers to leave the hall in maval
महायुतीच्या मेळाव्यात ‘मानापमान’ नाटय़; चंद्रकांत पाटील यांच्याकडून ‘नाराज’ कार्यकर्त्यांना सभागृहाबाहेर जाण्याची सूचना

चिरतरुण गायिका आशा भोसले यांचा ८८ वा वाढदिवस अलीकडेच साजरा झाला. त्या दिवशी त्यांच्याच साठीला सुरेश भटांनी केलेली एक कविता समाजमाध्यमांतून फिरत होती.

‘तारु ण्य तुझ्या हृदयाचे हे असेच बहरत राहो

वार्धक्य तुझ्या जगण्याला हे असेच विसरत राहो’

हे वाचताना आशाताईंप्रमाणे सतत कार्यमग्न राहून निवृत्तीचा काळ सुखाचा करणारे अनेक ज्येष्ठ डोळ्यासमोर आले. सभोवती आनंदाचा मळा फुलवत मनाच्या वयाला पंचविशीच्या उंबरठय़ावरच थांबवणाऱ्या, अर्थात ‘स्टॅच्यू’ करणाऱ्या त्यांच्या स्फूर्तिदायी कहाण्या आठवल्या. त्यातील काही बिलोरी जीवनांना या लेखाद्वारे वाकून नमस्कार!

नव्वदीनंतरही स्वत:ला कसं कार्यक्षम ठेवायचं ते औरंगाबादच्या सुशीलाताई अभ्यंकर यांच्याकडून शिकावं! आज ९२ व्या वर्षीही त्यांचं वाचन, चिंतन, लेखन, सतत सुरू आहे. वाचनात आलेले सुविचार परिचितांना पाठवण्यासाठी त्या आता- म्हणजे टाळेबंदीच्या काळात मोबाइलवर मराठी टायपिंग शिकल्या. बघावं तेव्हा त्यांच्या हातात विणकामाच्या सुया असतात. आतापर्यंत अक्षरश: हजारो स्वेटर्स, बटवे, टेबलावरचे रुमाल विणून त्यातून मिळालेले सर्व पैसे राष्ट्राच्या आपत्ती निधीसाठी त्यांनी दिलेत. अगदी आता, या वयातही अडीच ते तीन दिवसांत त्यांचा एक स्वेटर विणून होतो. महाड-चिपळूणमधील पूरग्रस्त बालकांसाठी त्यांनी ४० स्वेटर्स विणून दिले. प्रत्येकाचं डिझाईन वेगळं! आजीनं पाठवलेली ऊब महाडच्या शरदराव गांगल या कार्यकर्त्यांने तिथल्या वाडय़ावस्त्यांवर पोहोचवली आणि आजीनं सुखावून नवे स्वेटर विणायला सुरुवात केली.

गरजवंतांना मदत करणं आणि एकही मिनिट वाया न दवडणं हे संस्कार त्यांना ‘राष्ट्र सेविका समिती’कडून मिळाले. लग्नानंतर त्या औरंगाबादजवळील नेऊर गावी आल्या.  त्यांनी पतीसह या गावात शाळा सुरू केली. योग्य शिक्षक मिळेपर्यंत स्वत: शिकवत राहिल्या. लग्न झालं तेव्हा त्या मॅट्रिक होत्या. नंतर त्यांनी मुलांबरोबर ‘बीए’ केलं. पुढे ‘बीएड’ही केलं. पती प्रल्हाद अभ्यंकर ‘हैदराबाद मुक्ती संग्रामा’त तुरुंगात गेले तेव्हा त्यांनी काही काळ बँकेत नोकरी केली. नंतर प्रल्हादजी १९७५ मध्ये आणीबाणीत पुन्हा गजाआड गेले, तेव्हा कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी औरंगाबादच्या एका शाळेत शिकवलं. मात्र गरजा कमीत कमी ठेवून कमाईतील एक वाटा समाजासाठी द्यायचा हे जन्मभराचं व्रत!

‘राष्ट्र सेविका समिती’मध्ये शहरप्रमुखापासून एक एक पायरी वर चढत त्या ‘अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख पदा’पर्यंत पोहोचल्या. समितीच्या कार्यासाठी त्यांनी संपूर्ण भारत उभाआडवा पिंजून काढला, तोही सार्वजनिक वाहनानं! वाघा बॉर्डरवर सहकारी स्त्रियांसह जाऊन सैनिकांना राख्या बांधल्या. या काळातील अनुभवांची गच्च पोतडी त्यांच्याजवळ आहे. ही जबाबदारी निभावत असतानाच वयाच्या साठीत त्यांच्या रामायण, महाभारत, श्रीसूक्त या विषयांवर प्रवचन मालिका सुरू झाल्या. सुरुवातीला ही बाई बोलतेय तरी काय ते बघू या, या उत्सुकतेपोटी लोक आले. मात्र त्यांना ऐकताच दुसऱ्या दिवसापासून त्या येण्याआधीच देवळात हाऊसफुल गर्दी जमू लागली! ही प्रवचनं त्यांनी मराठी, हिंदी तर कधी इंग्रजीतूनही दिली.

लेखन हादेखील त्यांचा आवडता प्रांत. त्यांची मराठी व हिंदीतून १५ पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. यातील ‘वंदे मातरम्’ पुस्तकाचा शासनाच्या ‘खडू फळा योजने’त समावेश झाला आहे. वयोपरत्वे त्यांनी प्रवासाला जाणं थांबवलं; पण मेंदू थांबलेला नाही. अजूनही वाचन व अभ्यास चालूच असतो. मोजकं खाणं, नियमित व्यायाम आणि दर तासाला घरातल्या घरात फेऱ्या, हे त्यांच्या तंदुरुस्तीचं रहस्य. आजही त्या आपली नऊवारी साडी आणि पलंगपोस स्वत: धुऊन वाळत घालतात. पुस्तक वाचून नोट्स काढतात. सुशिलाताईंचं शिस्तबद्ध जीवन बघताना त्यांचं यापुढील आयुष्यही असंच कार्यमग्नतेत जाईल, असा विश्वास वाटतो.

गोरगरिबांविषयी कमालीचा कळवळा, त्या जोडीला अचाट साहस आणि  सतत शिकण्याची दुर्दम्य इच्छा, या गुणांचं भांडार ज्यांच्यापाशी आहे, अशा डॉ. अरुंधती (मायाताई) सरदेसाई यांचाही जीवनप्रवास असाच थक्क करणारा आहे. ७७ वर्षांच्या मायाताई आपल्या धाडसी स्वभावाचं मूळ सांगताना साठ वर्ष मागे गेल्या. म्हणाल्या, ‘‘खरं तर मला सैन्यातच जायचं होतं, पण तेव्हा फक्त वैद्यकीय क्षेत्रातील स्त्रियांनाच ही संधी मिळत असे. म्हणून मी ‘सैन्यातील नवरा हवा’ यावर तडजोड केली. त्यानुसार यशवंत सरदेसाई या वायुसेनेतील अधिकाऱ्याबरोबर माझं लग्न झालं. त्या वेळी मी फक्त वीस वर्षांची होते. यशवंत यांचं पोस्टिंग शिलाँगच्या सीमारेषेवर होतं.  तेव्हा पूर्व पाकिस्तानच्या सीमारेषेवर सैनिकी हालचाली सुरू झाल्या होत्या. यशवंत एकदा डय़ुटीवर गेले की दोन-तीन दिवस येत नसत. त्याच सुमारास आमच्या घराजवळील जंगलात पाकिस्तानी पॅराट्रूपर्स उतरल्याची बातमी कानांवर आली. यावर यशवंत यांची तयारी अशी, की  ‘तशी वेळ आलीच तर स्वत:ला संपवायचं!’ मृत्यूला रोजच सामोरं जाणाऱ्या पतीचे ते शब्द ऐकल्यावर जी काही थोडीफार भीती होती, तीही कायमची हद्दपार झाली. त्यानंतर पतीच्या सहवासात मायाताईंच्या निर्भयतेला अधिकच धुमारे फुटत गेले. निसर्गाच्या सान्निध्यात भटकंती करण्याची त्यांना मनस्वी आवड. वयाच्या सत्तरीनंतर त्या करत असलेले ट्रेक ऐकताना चकित व्हायला होतं. ७१ व्या वर्षी भूतानमध्ये ‘झोरबिंग’ (जाड रबराच्या फुग्यात बसून डोंगरावरून खाली वेगानं घरंगळत येणं),

७४ व्या वर्षी १२,००० फुटांवरून ‘पॅराग्लायडिंग’, त्याच वर्षी दक्षिण आफ्रिकेतील सर्वात उंच ‘बंजी जंप’, अशा अनेक चित्तथरारक मोहिमा त्यांच्या गाठीशी आहेत.

अंदमान किंवा बँकॉक-पटायाला गेलं, की लोक ‘स्कूबा डायव्हिंग’ किंवा ‘स्नॉर्क लिंग’ करून धन्य होतात; पण मायाताईंनी त्यापुढे जाऊन ६८ व्या वर्षी अंटाक्र्टिक व आक्र्टिक या दोन्ही महासागरांत (काही महिन्यांच्या अंतरानं) शून्य अंश तापमानाच्या अतिशय खोल पाण्यात उडी मारलीय. अंटाक्र्टिक मोहिमेसाठी भारतातून गेलेल्या त्या एकटय़ाच. बोटीत ४०-४२ सहप्रवासी भेटले; पण उडी मारणारे थोडेच होते. तसंच ग्रुपमध्ये दोन्हीकडे उडी मारणाऱ्या या एकमेव होत्या. मायाताईंचे आजवर ६५ ते ७० देश बघून झालेत. यातील अ‍ॅमस्टरडॅम, बेल्जियम, झुरिक, स्वित्झरलँड, ऑस्ट्रिया इत्यादी देश त्यांनी सायकलवरून भटकंती करत बघितलेत- तेही ७५ व्या वर्षी!

लग्नाच्या वेळी त्यांच्याजवळ संख्याशास्त्रातील पदवी होती. मुलं दहावी-बारावीत असताना त्यांनी एमए’(तत्त्वज्ञान), ‘एमएड’ केलं. पुढे यजमानांचं आग्रा येथे पोस्टिंग झालं, तेव्हा त्यांनी निम्न श्रेणी वर्गासाठी घेतलेल्या प्रौढ शिक्षण वर्गाचा वायुसेनेत भरपूर बोलबाला झाला. त्यामुळे त्यानंतर जेव्हा यजमानांची गुवाहाटीला बदली झाली, तेव्हा सामानाची खोकीही उघडली नव्हती तेव्हापासूनच शिक्षणोत्सुक गोरगरिबांची मायाताईंच्या घरापुढे रांग लागली. त्यांचा तो ज्ञानार्जनाचा उत्साह  बघून मायाताईंनी वायुसेनेतील अधिकाऱ्यांच्या सहचारिणींचा एक गट बनवला आणि आठवी ते दहावीच्या मुलांसाठी आणि मोठय़ांसाठी नि:शुल्क वर्ग चालवले. त्याबरोबर वायुसेनेतील सैनिकांच्या विधवांना मिळालेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करण्यासाठी मार्गदर्शन केलं. या जबाबदाऱ्या सांभाळून त्यांनी आसामच्या सीमेवर बांगलादेशातील बेकायदा सोडून दिलेल्या मुलांसाठीही खूप काम केलंय. गुवाहाटी विमानतळाजवळील बालग्राममधली ती ७०-८० मुलं मायाताईंच्या गाडीची वाट बघायची आणि त्या निघाल्या की, त्यांचा हात घट्ट पकडून ठेवायची.

या व्यापाबरोबर एकीकडे त्यांचं ‘पीएच.डी.’ (तत्त्वज्ञान) देखील सुरू होतं. पीएच.डी.च्या अखेरच्या टप्प्यात त्या पुण्यात आल्या. ‘लाल बत्ती’ परिसरातील स्त्रिया व मुलं यांच्यासाठी काम करणाऱ्या समाजसेविका विजयाताई लवाटे यांचा उजवा हात बनल्या. त्यांच्या ‘निहार’ संस्थेसाठी त्यांनी तन-मन-धन वेचलं. ‘निहार’च्या अनुभवानंतर १९९७ मध्ये विजयाताईंची ‘मानव्य’ ही एचआयव्ही व एड्सग्रस्त मुलांसाठी काम करणारी संस्था जन्माला आली. या अभागी माता व बालकांसाठी मायाताईंनी जिवाचं रान केलं. या दरम्यान त्यांनी अनेक महाविद्यालयांत शिकवलं आणि मिळालेलं मानधन पूर्णपणे समाजासाठी दान केलं. २००४ ते २०१० या काळात त्या पुण्यातील ‘आरएसएसपी डी. एड. कॉलेज’च्या प्राचार्य होत्या. त्या साडेपाच वर्षांत त्यांनी एवढे नवे उपक्रम सुरू केले, की अनेक पुणेकर या महाविद्यालयाला देसाईबाईंचं कॉलेज म्हणू लागले!

विद्यार्थ्यांना घडवताना मायाताई स्वत:ही शिक्षणातील एकेक पायरी वर चढत होत्या. २०१० मध्ये त्यांनी ‘एलएलबी’ केलं. २०१८ मध्ये हिंदीतील ‘पंडित’ पदवी  घेतली. कायद्याचं शिक्षण घेतल्यावर तिन्ही दलांतील निवृत्त सैनिकांसाठी काम करणाऱ्या ‘आयईएसएम’ (इंडियन एक्स-सव्‍‌र्हिसमेन्स मूव्हमेंट) या संस्थेनं त्यांच्याशी संपर्क  साधून त्यांना आपल्याबरोबरीने कामात घेतलं. पुढे

७४-७५ व्या वर्षी त्यांनी भारतीय विद्या शास्त्रात (इंडोलॉजी) ‘एमए’ केलं आणि अलीकडेच ७७ व्या वर्षी त्यांनी संस्कृतमधून ‘कोविद’ ही परीक्षा दिलीय.

मायाताईंच्या जोडीदाराची साथ २००३ ला सुटली, पण त्यांचा देशसेवेचा वारसा त्यांच्या धाकटय़ा मुलानं- आनंदनं पुढे चालवलाय. आज तो भारतीय नौदलात ‘आर अ‍ॅडमिरल’ पदावर कार्यरत आहे, तर मोठय़ा मुलाचं ‘ब्रेन टय़ुमर’वरील संशोधन नावाजलं जात आहे. मायाताई सध्या पुण्यातील एका सेवाभावी अभ्यासिकेचं काम बघतात. रोज सकाळी २५-३० किलोमीटर सायकलिंग करतात. रविवारी हा फेरा भावाच्या घरापर्यंत म्हणजे चिंचवडपर्यंत ४०-४५ किलोमीटर्सचा होतो. मागच्या महिन्यात ऑगस्टमध्ये ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ व ताम्हिणी घाट हे ट्रेक पार पडलेत आणि नोव्हेंबरमध्ये गुवाहाटीच्या जंगलातील भ्रमंतीचा प्लॅन तयार आहे. आता सांगा.. मायाताईंना म्हाताऱ्या म्हणायला तुमची जीभ धजावतेय का?

शिरोडा (जिल्हा- सिंधुदुर्ग) हे नाव ऐकलं की ‘वि. स. खांडेकरां’चं गाव ही ओळख मनात जागी होते. याच गावाला रेखाताई गायकवाड या रणरागिणीनं आपल्या सामाजिक कर्तृत्वानं नवं वलय प्राप्त करून दिलंय. सरकारच्या लाभदायक योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवून त्यांचं जीवनमान उंचावण्याचं काम त्या गेली ३०-३५ वर्ष अत्यंत निष्ठेनं करीत आहेत. त्यांच्या कामाचा झपाटा पाहून त्यांनी पंचाहत्तरीचा टप्पा ओलांडलाय यावर विश्वास ठेवणं अंमळ जड जातं. पूर्वायुष्य ठाण्यात गेलेल्या रेखाताई लग्न झाल्यावर १९६४ मध्ये आपल्या डॉक्टर पतीसह शिरोडय़ात आल्या आणि इथेच रमल्या. संसारात रमलेल्या रेखाताईंना मुलं शिकण्यासाठी घराबाहेर पडल्यावर एकदम रिकामपण आलं. त्यावर मात करण्यासाठी त्यांनी ‘माऊली महिला मंडळा’ची स्थापना केली (१९८६). या मंडळानं शिरोडा व आसपासच्या गावांतील स्त्रियांचे अनेक बचतगट स्थापन केले. यांतील ८० ते १०० आजही कार्यरत आहेत. या बचतगटांना लघुउद्योगासाठी मदत करणाऱ्या सरकारच्या ‘डीआरडीए’ (डिस्ट्रिक्ट रुरल डेव्हलपमेंट एजन्सी) योजनेतून निधी मिळवून दिला. फक्त लाडू, शेव, चकली बनवणंच नव्हे, तर गोधडय़ा, चटया, नारळाच्या काथ्यापासून विविध वस्तू तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं. या पाठिंब्यामुळे अनेक स्त्रिया स्वावलंबी झाल्या. हे काम सुरू असतानाच वयाच्या ५५ व्या वर्षी रेखाताईंच्या आयुष्यात एक ‘टर्निग पॉइंट’ आला. त्यांना समजलं, की माता-बाल संगोपनासाठी जिल्हा पातळीवर काम करण्याची क्षमता असेल, तर एका इंडो-जर्मन प्रकल्पाद्वारा भरीव निधी उपलब्ध होऊ शकतो. स्वातंत्र्यसैनिक वडिलांची लेक असलेल्या रेखाताईंनी हे आव्हान स्वीकारायचं ठरवलं. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील उपेक्षित मुलांना प्रकाशाची नवी वाट दाखवण्यासाठी त्या सज्ज झाल्या. ‘माऊली महिला मंडळा’तर्फे केलेला अर्ज मान्य झाला आणि त्यातून सेवेचा नवा अध्याय घडला.

त्या वेळी या परिसरात कर्णबधिर मुलांसाठी एकही शाळा नव्हती. घराच्या एका कोपऱ्यात जागा आणि खायला अन्न यापलीकडे त्यांचा कोणी विचार करत नसे. रेखाताईंनी मंडळाच्या इतर सदस्यांसमवेत घरोघर जाऊन अशा मुलांचा शोध घेतला. त्यांच्या पालकांचा विश्वास संपादन केला. या परिश्रमातून २००० मध्ये १५ मुलांना घेऊन ‘माऊली महिला मंडळ, कर्णबधिर निवासी शाळा’ सुरू झाली. अर्थातच नि:शुल्क. हळूहळू मुलांची संख्या वाढू लागली, परंतु सगळं मार्गी लागलंय असं वाटत असतानाच परीक्षेचा क्षण आला. शाळेला फंड पुरवणारा तो प्रकल्प दोन वर्षांनी अचानक बंद झाला. या अवघड परिस्थितीत रेखाताईंचे यजमान डॉ. रामचंद्र गायकवाड त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. (डॉक्टर आज ८६ व्या वर्षीही कार्यरत आहेत.) त्यांच्याबरोबर समाजातील इतर दानशूरांनीही मदतीचा हात दिला आणि शाळा सुरू राहिली. दहा वर्षांनी शाळेला अनुदान मिळालं. मान्यता आधीच लाभली होती. आज या शाळेत ८० मुलं शिकताहेत. शिक्षक व शिक्षकेतर मिळून ४० कर्मचारी आहेत.

कर्णबधिर मुलांचा शोध घेताना रेखाताईंना मतिमंद मुलांची दयनीय अवस्था जाणवली. या मुलांना प्रेम देऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी कोंडुरा (तालुका- सावंतवाडी) गावी ‘माऊली महिला मंडळ, मतिमंद मुलांची शाळा’ सुरू झाली. या निवासी नि:शुल्क शाळेसाठी डॉ. गायकवाड यांनी कोंडुरा गावातील आपल्या फार्महाऊसमधील एक एकर जागा शाळेला दान केली. या सरकारमान्य, पण विनाअनुदानित शाळेत आज साठ मुलं शिकत आहेत. दोन्ही शाळांतील १८ वर्षांवरील मुलांना स्वयंरोजगाराचं शिक्षण दिलं जात आहे.

 वेंगुर्ला लोकन्यायालयाच्या सदस्य असलेल्या रेखाताईंचा ‘दु:खी, पीडित स्त्रियांच्या कैवारी’ असा लौकिक आहे. साधारण २५ वर्षांपूर्वीची गोष्ट.. पावसाचे दिवस, रात्री अकरा-साडेअकरा वाजता त्यांच्या घराची बेल वाजली. बाहेर नखशिखान्त भिजलेली आणि भेदरलेली एक तिशीतली स्त्री उभी! कळलं की ती घटस्फोट द्यायला तयार नाही म्हणून तिच्या नवऱ्यानं त्या रात्री तिला पुलावरून नदीत ढकलून देण्याचा बेत आखला होता. हे कळताच ती रातोरात धावत  रेखाताईंच्या आश्रयाला आली होती. तिला घेऊन त्या तशाच पोलीस ठाण्यात गेल्या. पुढे न्यायालयात खटला लढवून त्यांनी तिला न्याय मिळवून दिला. त्यांच्या या भूमिकेमुळे शिरोडा भागातील स्त्रियांवरील अत्याचाराला आळा बसला आहे. पंचाहत्तरीतील रेखाताईंची जिगर आणि ओसंडून जाणारा उत्साह आपल्यालाही प्रेरणा देणारा.

एखादं ध्येय नजरेसमोर असेल, तर ‘ज्येष्ठ नागरिक’ पदवी लागली तर वयाचा अडसर निद्रादेवीला स्वत:वर स्वार होऊच देत नाही. ही हुकमत मिळवणारं एक नाव डॉ. दिनेश रांगणेकर. ८१ वर्षांचे हे सद्गृहस्थ गेल्या चार-पाच वर्षांपासून आठवडय़ाचे पाच दिवस रात्री दोन-दोन वाजेपर्यंत जागून ‘सुगंधी द्रव्ये’ या विषयावर संशोधनात्मक लेखन करत आहेत. हा विषय ते ‘युडिसिटी’मध्ये (युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ

के मिकल टेक्नॉलॉजी- आताचं ‘इन्स्टिटय़ूट ऑफ के मिकल टेक्नॉलॉजी’) शिकवत असताना, ‘एमएससी टेक’च्या अभ्यासक्रमात नव्यानं सुरू झाला. तेव्हापासून म्हणजे १९९१ पासून तो त्यांच्या मनात ठाण मांडून आहे. आजपर्यंत अनेक खंडांची पूर्वतयारी झाली आहे. तरीही त्यांची लेखणी थांबलेली नाही. डॉ. रांगणेकर यांच्या नावावर असे अनेक विक्रम आहेत. सुरुवात मुंबई विद्यापीठातून ‘बी.एस्सी.’ला प्रथम क्रमांक मिळवण्यापासून झाली. ‘बी.एस्सी टेक’ करताना रंगद्रव्य (डाइज) हा विषय त्यांना अभ्यासला होता. नंतर त्यांनी युडिसिटीच्या पायलट प्लांटवर (वर्कशॉप) एका कंपनीसाठी संरक्षण दलाला उपयोगी अशा ‘स्मोक कलर’च्या रंगद्रव्याची निर्मिती केली. तोपर्यंत हा डाय भारतात बनत नव्हता. भारतमातेच्या या सुपुत्रानं देशासाठी केलेलं आणखी एक संशोधन म्हणजे ‘लेजर डाइज’ची निर्मिती. रेणूच्या विभाजनासाठी तसंच इतर अनेक गोष्टींसाठी वापरलं जाणारं हे रंगद्रव्य त्याआधी जर्मनीतून आयात केलं जात असे. वर्षांला अंदाजे दीडशे किलो ही ‘बीएआरसी’ची (भाभा अ‍ॅटॉमिक रीसर्च सेंटर) गरज.

डॉ. रांगणेकरांच्या संशोधनामुळे हे उत्पादन भारतात होऊ लागलं. त्यामुळे त्याचा दर निम्म्यावर आला. अभिमानानं सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे जर्मनीतून आयात केल्या जाणाऱ्या रंगद्रव्यापेक्षा इथे निर्माण केलेल्या त्या उत्पादनाची शुद्धता (प्युरिटी) अधिक होती. डॉ. रांगणेकर यांच्या शिरपेचातील आणखी एक तुरा म्हणजे २००० मध्ये युडिसिटीतून प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून निवृत्त होताना त्यांना मुंबई विद्यापीठानं ‘टीचर ऑफ द टीचर्स’ हा विशेष सन्मान देऊन गौरवलं.

पैसा व प्रसिद्धी यांची हाव या वैज्ञानिकाला कधीच नव्हती. म्हणूनच एका आंतरराष्ट्रीय कंपनीत मोठय़ा हुद्दय़ावर नोकरी की युडिसिटीतील प्राध्यापकी, या पर्यायांपैकी एक चतुर्थाश पगार कमी देणाऱ्या शिक्षकी पेशाची त्यांनी निवड केली. बुद्धिवान विद्यार्थ्यांना घडवण्याला प्राधान्य दिलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ३६ पीएच.डी.धारक आणि १६ ‘एमएस्सी टेक’ घडले आहेत. १९७२ मध्ये ‘डाय स्टफ टेक्नॉलॉजी’ या विषयात ‘पीएच.डी.’ मिळवल्यानंतर त्यांनी ‘युडिसिटी’च्या नियमांचं पालन करून खासगी सल्लामसलत (कन्सल्टेशन) द्यायला सुरुवात केली. त्यांच्या मार्गदर्शनाला एवढी मागणी होती, की निवृत्तीनंतरही पुढची पाच वर्ष त्यांचं हे काम सुरूच होतं. तेव्हाही ब्रेक लागला, तो पत्नीच्या आग्रहामुळे.

 गेल्या तीन वर्षांपासून रांगणेकर पतीपत्नी कामशेतला ज्येष्ठ नागरिकांच्या एका संकुलात राहताहेत. इथे त्यांच्या कवितांच्या सादरीकरणाचे व हिंदी-मराठी गाण्यांचे आजवर अनेक कार्यक्रम झाले आहेत व होत आहेत.

गिर्यारोहण हे त्यांचं आणखी एक वेड! तरुण वयात त्यांनी हिमालय,आल्प्स पर्वत, तसंच स्कॉटलँड व वेल्समधील अनेक मोहिमांचं नेतृत्व केलंय. वयाच्या सत्तर-एकाहत्तरीपर्यंत त्यांचं हे गिरिभ्रमण सुरू होतं. अंगभूत सर्जनशीलतेनं आणि कार्यमग्नतेनं ‘उम्र की ऐसी की तैसी’ करणारी ही मंडळी! ‘सांगा कसं जगायचं..’ या तुमच्याआमच्या मनातील प्रश्नाला या सदाबहार ज्येष्ठांनी आपल्या कृतीतून दिलेलं हे चोख उत्तर प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास वाटतो.