scorecardresearch

मन आभाळाचे व्हावे..

बालपणापासून मीही इतरांप्रमाणेच इवल्याशा विश्वातले अनुभव टिपत वाढले. त्यात बघणं, श्रवण, वाचन, कौटुंबिक आणि शालेय संस्कार मनावर होत गेले.

|| शोभा बडवे

मनुष्य एक विचारी प्राणी आहे. कळत्या वयापासून तो आपल्या आयुष्याबद्दल विचार करू लागतो. आयुष्याचा अर्थ काय? आपल्या जगण्याचा नेमका काय अर्थ? जीवनार्थाचा शोध घेण्याची वैचारिक प्रक्रिया अधूनमधून त्याच्या मना-मस्तकात चालूच राहते. हे अर्थ शोधण्याचं कोडं प्रत्येकाला जन्मभर जगण्याच्या वेगवेगळय़ा टप्प्यांवर नव्यानं पडतं. वाढतं वय, भोवतालची बदलती परिस्थिती, तिच्याशी करावी लागणारी हातमिळवणी, अशा अनेक गोष्टींतून त्याला आयुष्याचा अर्थ नव्यानं प्रतीत होतो. या कोडय़ाची उत्तरं यथामती शोधत तो पुढे वाटचाल करतो.

बालपणापासून मीही इतरांप्रमाणेच इवल्याशा विश्वातले अनुभव टिपत वाढले. त्यात बघणं, श्रवण, वाचन, कौटुंबिक आणि शालेय संस्कार मनावर होत गेले. त्या अनुषंगानं मन विचार करू लागतं. माझ्यापुरतं सांगायचं, तर लहानपणी ‘माझे जीवनगाणे’ किंवा ‘जीवन सुखदु:खाची जाळी..’ किवा ‘अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा’ असे स्वर-शब्द  कानावर पडत, तेव्हा बालबुद्धीला ही ‘जीवन’ नावाची काय भानगड आहे, याचा फारसा बोध होत नसे. फक्त शब्द आणि सूर मनावर ठसत. पुढे वाढत्या वयात झालेलं श्रवण-वाचन विचारावर परिणाम करत गेलं. आयुष्यातल्या भल्या-बुऱ्या अनुभवांची त्यात भर पडली. त्यातूनच जीवनाविषयीचे विचार (तत्त्वज्ञान हा फार बोजड शब्द होईल!) मनाला बांधत-सांधत राहिले.

मी साधी पदवीधर स्त्री. शाळेत मात्र पहिला नंबरवाली, तथाकथित हुशार वगैरे. अशा मी स्वत:चं करिअर, द्विपदवीधर होणं वगैरे सोडून आईवडिलांनी शोधलेल्या आणि आवडलेल्या उच्चविद्याविभूषिताच्या गळय़ात माळ घालून त्याच्यासह थेट परदेश गाठला. काही वर्षांनी परतल्यावर पतीच्या वैद्यकीय व्यवसायातल्या आनुषंगिक जबाबदाऱ्या निष्ठेनं, यथाशक्ती पेलल्या. ना माझं असं वेगळं कर्तृत्व,

ना वेगळं करिअर! त्यातून जे आयुष्य आकारलं, कौटुंबिक प्रगती झाली, त्यात नुसतंच हाताला हात लावून ‘मम’ म्हणण्यापेक्षा आपला मोठा सहभाग आहे, ही भावना मला पुरेशी सुखावह होती. त्यात माझं एकटीचं असं काहीच नव्हतं.

माझं म्हणावं असं माझ्यापाशी जे होतं, ते म्हणजे संगीतोपासनेची गोडी आणि माझं काव्य-साहित्यात रस घेणारं संवेदनशील मन. पतीच्या व्यवसायातल्या जबाबदाऱ्या, मुलांची शिक्षणं आणि इतर कौटुंबिक व्याप सांभाळत मी जमेल तसं काव्य-संगीतादी छंद जपत प्रयत्नपूर्वक त्यांचं संवर्धनही केलं.

मानवी विचारांचा खेळ किती गमतीशीर.. कधी विचित्रसुद्धा! कधी मला तीव्रतेनं वाटायचं, आपण प्रवाहपतिताप्रमाणे जगलो. सोयीस्कर निर्णय घेतच आयुष्याशी हातमिळवणी केली. स्वत:चं काहीही कर्तृत्व गाजवलं नाही. आणखी शिकून स्वत:साठी एखादी ‘खुर्ची’ मिळवली नाही. त्यावर दुसरं मन म्हणे, ‘जरी केली असतीस अशी प्रगती, तर जास्त सुखी झाली असतीस का? त्यापुढेही आणखी काही करता आलं नाही म्हणून खंतावली नसतीस का?’  मग ‘पुढे काय’ हा प्रश्न उरतोच! प्रगतीत नक्की ‘सुख’ मिळतं का? मग या विचारेशृंखलेचं मला हसू यायचं! आयुष्याच्या उतारावर हे असं वाटणं हा मनुष्यस्वभावच म्हणावा. अशा वेळी मला कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांची ‘द रोड नॉट टेकन’ ही कविता आठवायची. मी जो रस्ता टाळला आणि जो निवडला, त्यामुळेच माझं आजचं आयुष्य आकाराला आलं, माझं भलं झालं, असा अर्थ काढायला मीही यातूनच  शिकले. ‘न आत्मानं अवसादयेत’ म्हणत माझ्या रुखरुखणाऱ्या मनाची समजूत घालण्यात यशस्वीही होत गेले. ‘मतलब तो हैं दिल को समझाना, चाहे ये मानो चाहे वो मानो.’ अशा सकारात्मक विचारातूनच मला ‘मन आभाळाचे व्हावे, सारे विकल्प मिटावे.. क्षुद्र सुखांचे दु:खांचे, सारे हिशेब फिटावे’ अशा सकारात्मक काव्यरचनाही सुचत गेल्या. 

पत्त्यांच्या डावात आपल्या वाटय़ाला काही विशिष्ट पत्ते येतात. त्यातच आपल्याला जमेल तसं खेळावं लागतं. ‘असेच’ पत्ते माझ्या वाटय़ाला का? असा विचार योग्यही नाही. जे आहे ते आहे आणि नाही ते नाही, हे मनाला ठासून सांगायचं. वाटय़ाला आलेल्या पत्त्यांतूनच  डाव खेळायचा. हरणं आणि जिंकणं हे सगळं आपल्या मानण्यावर. जीवनाचा अर्थ आपण लावू तसा लागेल. या चित्रात आपण जसे रंग भरू तसं चित्र साकार होईल. त्यात दया, क्षमा, शांती आणि समाधानाचे रंग भरले, तर जगणं आनंदाचंच होतं आणि आपल्या आवडीच्या एखाद्या छोटय़ाशा स्वप्नाचा तारा उद्यासाठी उद्दिष्ट म्हणून सोबत जपला, तर ‘अधिकस्य अधिकं फलम्’! आपलं जगणं आपणच अर्थपूर्ण करू शकतो की!

ashokshobha@rediffmail.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Author shobha badve article mind should be in the sky akp

ताज्या बातम्या