– सिद्धेश मोरे

‘आँखो ही आँखो में इशारा हो गया’ ही ओळ सर्वार्थानं लागू पडेल असं पूनम आणि माझं शालेय जीवनापासून चालू झालेलं अल्लड प्रेम! मी धसमुसळा, तर पूनम शांत, धीरगंभीर स्वभावाची. माझ्या प्रेमाचा तिनं स्वीकार करावा हीच माझी मोठी कमाई होती. आमच्या वाढत्या वयाबरोबर प्रेमातला अल्लडपणा जाऊन गंभीर तरलता येऊ लागली ती फक्त पूनममुळेच. इतर ‘लव्ह स्टोरीज’मध्ये जसा असतो तसा ‘ट्विस्ट’ आमच्या गोष्टीत आला नाही. छान घरून परवानगी, मग देवा-ब्राह्मणाच्या साक्षीनं लग्न, सगळं कसं ‘गुडी गुडी’. प्रेमाच्या गुजगोष्टी संसाराच्या जबाबदारीत कधी बदलून गेल्या कळलंच नाही.

Shukra Gochar in Mesh
२४ तासांनी ‘या’ ६ राशींच्या नशिबाला मिळेल श्रीमंतीची कलाटणी? शुक्रदेवाच्या कृपेमुळे व्यापारात होऊ शकतो मोठा फायदा
vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
Loksatta chavdi happening in Maharashtra politics news on Maharashtra political crisis
चावडी: नाना अन् तात्याचे पारावर उपोषण!

पण खरी परीक्षा सुरू झाली ती नंतर. आमचं लग्न झाल्यावर अचानक उद्भवलेलं माझ्या आईचं आजारपण, त्यात उडालेली आम्हा सर्वाची धावपळ.. या सगळय़ात एक गोष्ट चांगली घडली ती म्हणजे आमच्या मुलाचा- देवमचा जन्म. माझ्या आईचं निधन झाल्यावर पूनमनं ज्या प्रकारे आम्हा सर्वाना सांभाळून घेतलं त्याला तोड नाही. तेव्हा देवम अगदीच लहान- तीन महिन्यांचा होता. पण त्याही परिस्थितीत पूनम डगमगली नाही. पुन्हा पदर खोचून तिनं घर उभं केलं. घर आणि तिची व्यावसायिक जबाबदारी अगदी उत्तमरीत्या सांभाळली आणि अजूनही ती हे सारं नीट पार पाडते आहे.

अगदी पहिल्यापासून पूनमच्या काही गोष्टी अगदी आखीवरेखीव होत्या- जसं की नोकरी न करणं आणि स्वत:चा व्यवसाय असावा ही इच्छा, मग त्यासाठी तिनं घेतलेली मेहनत. जेव्हा तिनं ब्युटी पार्लरच्या व्यवसायात करिअर करण्याचं ठरवलं, तेव्हा तिच्या घरातून तिला हवं तसं सहकार्य नव्हतं. पण स्वत:च्या हिमतीवर तिनं आज तिच्या व्यवसायाचा डोलारा उभा केला आहे.   

माझ्या नोकरीच्या सुरुवातीच्या काळात पूनमचा आमच्या घराला ज्या प्रकारे हातभार लागला त्याला तोड नाही. अगदी आमचं पहिलं घर घेताना स्वत:चं मंगळसूत्र सोडून बाकी सगळे दागिने तिनं मोडले ते केवळ ‘आपलं घर’ व्हावं म्हणून. पूनमचा हाच सकारात्मक दृष्टिकोन मला नेहमी वेगळी उभारी देतो. अशीच एक घटना चार वर्षांपूर्वीची- पुण्याला नोकरीतल्या बढतीच्या निमित्तानं जेव्हा माझी बदली झाली, तेव्हादेखील पूनम अगदी सहज माझ्या पाठीशी उभी राहिली. स्वत:चं राहतं शहर, घर, माणसं सोडून नव्या शहरात जाणं तसं सोपं नव्हतं. पण केवळ पूनमच्या साथीनं पुण्यात स्थायिक होण्याचा निर्णय आम्हाला सहज घेता आला. त्या काळात मला लक्षात येत होतं, की माझ्यापेक्षा पूनमसाठी हा निर्णय जास्त आव्हानात्मक असणार आहे. तिचा अनेक वर्षांचा सुस्थित सुरू असलेला पार्लरचा व्यवसाय, ग्राहकांची बसलेली घडी, सगळं काही विस्कळीत होणार होतं, पण केवळ माझ्या आणि देवमच्या पुढच्या वाटचालीसाठी हा थोडा अवघड निर्णयही तिनं अगदी लीलया घेतला आणि आम्ही सगळे पुण्यात राहू लागलो. इथेही तिच्या मैत्रिणी झाल्या आणि सोसायटीमध्ये पुन्हा तिनं तिच्या व्यवसायाचा जम बसवला.

या सर्व प्रवासात एक गोष्ट मला आवर्जून नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे माझा नातेवाईकांचा गोतावळा मोठा आहे. या सगळय़ांशीच पूनमनं खूप छान जुळवून घेतलेलं आहे. खरं तर ही सर्व तिच्या सासरकडची मंडळी. पण ज्या प्रकारे तिचं माझ्या घरच्यांशी सूत जमलं आहे, कधी कधी त्यामुळे मलाच माझा हेवा वाटतो. आमच्या १२ वर्षांच्या संसाररूपी प्रवासात आम्ही दोघांनी एकमेकांना दिलेली साथ तितकीच महत्त्वाची आहे. दोघांच्याही प्रत्येक गोष्टीला आमचा एकमेकांना पाठिंबा असतो. त्याचबरोबर एखादी गोष्ट आवडली नाही, तर त्यातले संभाव्य धोकेही आम्ही एकमेकांना नीट समजावून सांगतो. विविध चित्रपट, नाटकं आणि अफाट वाचनाची आवड आम्हाला स्वस्थ बसू देत नाही. बहुधा त्यामुळेच प्रत्येक गोष्टीकडे आम्ही दोघंही खूप अर्थपूर्ण नजरेनं बघतो. 

 या लेखाच्या निमित्तानं मी पूनमला विचारलं, की ‘तुला नेमकं माझ्यातलं काय आवडतं गं?’ त्यावर तिचं उत्तर होतं, ‘‘तुझा मला आवडलेला सगळय़ात मोठा गुण म्हणजे तू वातावरण नेहमी हलकंफुलकं ठेवतोस, कितीही टेन्शन आलं तरी त्यातून मार्ग काढतोस. ‘बाप्पा आहे सोबत’ ही तुझी ओळ माझ्या मनाला खूप भावते आणि खरोखरच त्यातून मार्ग निघतो!’’ पहिलं घर घेताना आमचं गृहकर्ज मंजूर होत नव्हतं आणि आम्ही बिल्डरला आगाऊ पैसे देऊन बसलो होतो. तो काळ खरोखर कठीण होता. माझ्या आईचं आजारपण, नोकरीत स्थिरस्थावर होण्यासाठी चाललेली धडपड, पूनमचा नव्यानं सुरू झालेला व्यवसाय, सगळय़ा गोष्टी अगदी बरोबरीनं चालू होत्या. पण या सगळय़ात कधीही आम्ही आमचा मानसिक तोल सुटू दिला नाही. थोडी निराशा येत होती, पण कदाचित हाच कष्टाचा काळ असेल, अजून मेहनत करू या, म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी जास्त जोमानं आणि हसऱ्या चेहऱ्यानं तयार राहायचो. या १२ वर्षांत कमी कडू आणि जास्त गोड आठवणी पूनमच्या साथीनं जमा झाल्या. संसार म्हटल्यावर हे असणारच.

 मी प्रेम केलं, पण ते कसं टिकवून ठेवायचं हे तिनं शिकवलं. फक्त नजरेतून माझे भाव ओळखणारी, धीर देऊन प्रसंगी मागे उभी राहणारी.. आम्ही एकमेकांबरोबर असलो की एक प्रकारचा निवांतपणा लाभतो. शालेय जीवनापासून सुरू झालेला असा हा आमच्या प्रेमाचा प्रवास मला या गाण्याच्या ओळींची आठवण करून देतो- ‘बहरून प्रीत ये अशी

गाली पडे खळी जशी

साथ तुझी मला हवी जीवनी!’

siddhesh. more82 @gmail.com